रविवार, ९ सप्टेंबर, २०१२

युरोप फ़्रान्समध्ये कोणी हिंदूत्ववादी नाहीत ना?


   अमेरिकेत काही काळ माझे वास्तव्य असताना तिथे ड्रायव्हींगची परिक्षा देण्याचा मी प्रयत्न केला. त्यासाठीच्या लेखी परिक्षेची तयारी करताना मला फ़्लोरिडा राज्याच्या परिवहन कायदे नियमांचा अभ्यास करावा लागला. त्या नियमांचीच लेखी परिक्षा घेतली जात असते. त्या नियमावलीच्या प्रस्तावनेचा आरंभच मला खुप आवडला. त्यात म्हटले होते, ‘फ़्लोरिडा राज्यातील रस्ते वापरण्याची सवलत तुम्हाला दिलेली आहे. पण तो तुमचा अधिकार नाही.’ मला खुप काळ ते वाक्य लक्षात राहिले. पण त्याचा नेमका अर्थ लागला नव्हता. त्यामुळेच त्याचा मनातल्या मनात उहापोह चालू होता. अचानक एके दिवशी मला त्याचा मतितार्थ कळला. रस्ता ही सार्वजनिक सोय असते. तिचा वापर करण्याची मुभा तुम्हाला सर्वांणा सोय म्हणून दिली आहे. पण तो वापर करताना तुम्ही दुसर्‍यांची गैरसोय करू नये वा दुसर्‍यांची गैरसोय होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. कारण ती सार्वजनिक सोय आहे. जर तुम्ही आपलीच मालमत्ता असल्यासारखे वागू लागलात किंवा मनमानी करु लागलात; मग तुम्ही इतरांसाठी अडचण होत असता. ती सुविधा वापरण्यापेक्षा तुम्ही तीच इतराची असुविधा करत असता. तो अधिकार तुम्हाला तिथला कायदा देत नाही. खरे तर कुठलाच कायदा अशी सुविधा किंवा अधिकार देत नाही. सामुहिक जीवनातला हा साधा संकेत आहे. जेव्हा आपण इतरांबरोबर सहजीवन जगत असतो, तेव्हा दुसर्‍या़ची गैरसोय होणार नाही याचीही काळजी घ्यायची असते. त्याचा विसर त्यापैकी कोणालाही पडला, मग समस्या सुरू होत असते. रस्त्यावर गाडी चालवायचा परवाना मिळाला, म्हणुन बेशिस्त वाहन चालवता येत नाही. ज्यातुन इतर वहाने वा चालकांना अडथळा होईल वा धोका निर्माण होईल; असे वाहन हाकण्याचा अधिकार मिळत नाही. असाच त्याचा अर्थ होता. तोच नियम आपल्या सार्वजनिक जीवनाला लागू होतो. जोपर्यंत आपण परस्परांना कुठली अडचण करत नाही, तोपर्यंत वादाला जागाच नसते. पण जेव्हा माझे हक्क वा अधिकार तुमच्या जीवनात वा अधिकारात अडथळे आणु लागतात, तेव्हाच गडबड सुरू होत असते. मौलाना वहिउद्दीन नेमके त्याच दुखण्यावर बोट ठेवत आहेत.

    ‘मुस्लिम जातात तेथे त्यांना सांस्कृतिक ओळख कायम ठेवायची असते. हे काही योग्य नाही. सतत आपल्या सांस्कृतिक ओळखीवर भर देणे, हा काही इस्लाम नाही.’  मुस्लिम समाजात ही एक मोठी समस्या आहे. त्यांना आपली मुस्लिम म्हणून असलेली ओळख लादण्याची जी हौस असते त्यातून इतरांशी त्यांचे वाद सुरू होतात. ही खरी समस्या आहे. अर्थात ती मुस्लिमांची व्यक्तीगत समस्या नाही. जेव्हा मुस्लिम म्हणून घोळका तयार होतो, तेव्हा अशा समस्येचा उदय होत असतो. कारण बहुधा कडवे धर्मनिष्ठ असा अट्टाहास करत असतात वा धरत असतात. त्यातून अनेक जागी वादावादी सुरू होत असते. इथे भारतातला विषय बाजूला ठेवू, कारण त्याबद्दल बोलायला वा लिहायला लागले; मग त्याला लगेच हिंदू मुस्लिम असा रंग चढवला जातो. पण जिथे हिंदू नाहीत किंवा हिंदूत्ववादी संघटनाही नाहीत; तिथे काय चालू आहे? वहिउद्दीन ज्या युरोपियन समस्येचा उल्लेख करतात, तिथे हिंदूत्ववादी नाहीत. मग तिथे मुस्लिम आहेत त्यांना तिथल्या बिगर हिंदू लोकांशी गुण्यागोविंदाने का जगता आलेले नाही? बुरख्याचा आग्रह त्याला कारणीभूत आहे असे वहिउद्दीन नजरेस आणून देतात. जर अन्य देशातून मुस्लिम स्थलांतर करून युरोपिय देशात वास्तव्याला गेलेले आहेत, तर त्यांनी तिथल्या संस्कृतीशी मिसळून वागावे, असेच वहिउद्दीन सांगत आहेत. त्याऐवजी तिथेही आपल्या मुळ देशाच्या संस्कृती किंवा ओळखीचा हट्ट वादाचे कारण होतो. तो हट्ट केवळ वेशभूषेचा नाही. तर तिथल्या नियम कायद्यांना झुगारणारा असतो. त्यातून वादाची ठिणगी पडत असते.

   अशीच एक समस्या मध्यप्रदेशच्या एका ख्रिश्चन मिशनरी शाळेच्या बाबतीत झाली. विदीशा येथील निर्मला कॉन्व्हेंट शाळेत एका महंमद सलीम नावाच्या मुस्लिम मुलाने  प्रवेश मिळवला तेव्हा त्या शाळेचे नियम त्याने पाळायला हवेत, ही साधी गोष्ट आहे. पण त्या मुलाने दाढी वाढवली आणि शाळेने आक्षेप घेतला आणि त्यात आपल्या धर्माचे पालन करण्यास प्रतिबंध होत असल्याचा दावा करीत त्या मुस्लिम विद्यार्थ्याचे पालक व समाजाचे नेते कोर्टात धावले. अगदी सुप्रिम कोर्टापर्यंत मजल गेली. त्याची गरज होती काय? जी शाळा एका अन्य धर्माच्या संस्थेकडून चालविली जाते, तिथे जाऊन तिथल्या सुविधांचा लाभ उठवायला तुम्ही जात असता. मग तिथे जे नियम आहेत त्याचे पालन करायचे नाही हा हट्ट कशाला? तुम्ही तिथे धर्मपालनासाठी जात नसता तर शिक्षण घ्यायला जात असता. पण प्रवेश मि्ळवताना तुम्ही सर्व नियमांचे पालन करू, असे मान्य करत असता. पण प्रवेश मिळाला मग धर्माच्या नावाखाली नियम मोडायचा अट्टाहास कशाला? वहिउद्दीन त्यालाच सांस्कृतिक ओळखीच हट्ट म्हणतात. याला हट्ट सुद्धा म्हणता येणार नाही. तो आडमुठेपणा असतो. आणि असा एखादा दुसरा असतो. पण तो जे वागतो आणि त्यासाठी धर्माचे लेबल लावतो. त्यामुळे मग तमाम मुस्लिमांकडे त्याच्यासारखेच म्हणून बघितले जात असते. कारण जो कोणी असा वागतो, त्याच्या विरोधात खंबीरपणे उभे राहून अन्य मुस्लिम मोठ्या संख्येने ‘हा इस्लाम नाही’ असे ठामपणे सांगायला पुढे येत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. वहिउद्दीन जर असा हटवाद म्हणजे इस्लाम नाही, असे ठामपणे सांगत आहेत, तर अन्य मुस्लिम तसे सांगायला का पुढे येत नाहीत? त्यांचे मौन किंवा शांतता अशा आडमुठेपणालाच इस्लाम ठरवायला अबोल मान्यता देत असतात. पर्यायाने त्या एका आडमुठ्या माणसामुळे जी जनमानसात मुस्लिमांची वाईट प्रतिमा तयार होते. सगळी गडबड तिथेच होते. संघर्षाला तिथून सुरूवात होत असते.

   हाच विषय फ़्रान्समधला सुद्धा आहे. आपल्याप्रमाणे त्या देशातही सेक्युलर सरकार व राज्यघटना आहे. मात्र आपल्याप्रमाणे तिथे सेक्युलर थोतांड चालत नाही. त्यामुळे धर्माला सार्वजनिक जीवनात कुठलीही लुडबूड करता येत नाही. मूळात सरकार कोणाच्याही धर्माची दखल घेत नाही, की नोंदही करत नाही. जो कोणी तिथे वास्तव्य करतो, त्याची नोंद फ़्रेंच नागरिक अशी होते. तो ख्रिश्चन नसतो, की मुस्लिम वा ज्य़ू नसतो. सर्वांना समान वागणूक देताना तिथे धर्माच्या नावावर कुठल्या सवलती नाहीत, की कुठला भेदभाव होत नाही. अशा फ़्रान्समध्ये काही वर्षापुर्वी सरकारी शाळेमध्ये कुठल्याही विद्यार्थ्याला धार्मिक चिन्ह वापरण्यावर बंदी घालण्यात आली. त्यात ख्रिश्चन मुलांनी क्रॉस परिधान करण्याला प्रतिबंध घालण्यात आला, तसाच तो शिख धर्मियांच्या पगडी फ़ेट्यावरही बंधने आली. मग शीख-मुस्लिमांनी त्याविरुद्ध आवाज उठवला. आपल्या धर्मावर हे आक्रमण असल्याचा दावा करण्यात आला. पण फ़्रान्स सरकारने त्याला दाद दिली नाही. ज्यांना सरकारी शाळेत जायचे त्या सर्वांना निर्बंध लागू झाले. तेवढेच नाही तर सार्वजनिक जागी बुरखा परिधान करण्यालाही बंधने घालण्यात आली. त्यावर मुस्लिमांनी जगभर आवाज उठवला होता. म्हणून कोणालाही तो अन्याय वाटेल. तिथे ख्रिश्चनांची बहूसंख्या असल्याने मुस्लिमांची गळचेपी होते, असे सांगितले गेले आणि ते चटकन पटणारे सुद्धा आहे. पण म्हणुन ते पुर्ण सत्य आहे काय? ती धार्मिक गळचेपी असेल तर अरबी देशात अन्य धर्मियांना वेगळी वागणूक मिळते काय? कुठलाही धर्म असो, बहुतांश अरबी देशात मुस्लिम महिलांप्रमाणे अन्य धर्मिय महिलांनाही सक्तीने बुरखा परिधान करायला भाग पाडले जाते ना? आणि त्याचे पालनही होते. ( अगदी आपल्या बरखा दत्त नामक इंग्रजी पत्रकार तिकडे जातात तेव्हा डोक्यावरून ओढणी पांघरूनच टीवःईवर दिसतात). मग अरबी देशातल्या अन्य धर्मियांनी त्याबद्दल तक्रार केली आहे काय? तिथे रहायचे असेल व वास्तव्य करायचे असेल, तर त्या अन्य धर्मियांनी अरबी संस्कृतीच्या नियमांचे निमूट पालन केले आहे ना? त्यावर धार्मिक अन्याय असा शिक्का मारलेला नाही. पण मुस्लिम बहुसंख्य असलेल्या देशात जे धर्मस्वातंत्र्य अन्य धर्मियांना मि्ळत नाही; ते स्वातंत्र्य व विशेषाधिकार (मुस्लिम देशातून अन्यत्र स्थलांतर करणारे मुस्लिम बिगरमुस्लिम देशात किंवा बहुधर्मिय देशात धार्मिक हक्क) म्हणुन मागत असतात, तिथून समस्या सुरू होते. मौलाना वहिउद्दीन त्याच दुखण्यावर बोट ठेवत आहेत. धार्मिक कडवेपणा दाखवणार्‍या मुस्लिम नेत्यांच्या या दुटप्पीपणवर एक मुस्लिम मौलवीच नेमके बोट ठेवतो आहे. पण स्वत:ला सेक्युलर म्हणवून घेणारे नेते किंवा पत्रकार कधी त्याबद्दल अवाक्षर बोलले आहेत काय? मौलाना वहिउद्दीन जो सांस्कृतिक ओळखीच्या हट्टाचा दोष मुस्लिमात आहे म्हणून सांगतात तो एकूण मुस्लिम समाजातला हट्ट नाही. तर ज्या मुठभर कडव्यांना मुस्लिम समाजावर आपली हुकूमत गाजवायची असते त्यांचा तो अट्टाहास असतो. आणि त्यातून मग संपुर्ण मुस्लिम समाजाकडे बघण्याची इतरांची एक दुषित नजर तयार होत असते. त्यापासून मुस्लिमांना बाहेर पडण्याची गरज आहे. ते कसे होणार?     ( क्रमश:)
भाग  ( २६ )   १०/९/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा