गुरुवार, २० सप्टेंबर, २०१२

इस्लाम व मुस्लिमांना समजून घ्यायला हवे


   आज ही लेखमाला लिहित असताना मला जेवढा काही थोडाफ़ार इस्लाम किंवा मुस्लिम मानसिकता कळली आहे, त्याचा लवलेशही मला साधारण पाचसहा वर्षापुर्वी नव्हता. आज जसे वाहिन्यांवरचे अर्धवटराव विवेचन करतात, तशीच माझीही अक्कल चालत होती. कारण मुस्लिम  किंवा इस्लाम याविषयीचे माझे अज्ञान त्यांच्या इतकेच होते. अणि मजेची गोष्ट म्हणजे जसे हे वाहिन्यांवरचे मुर्ख बोलतात, तशीच काहीशी इकडची तिकडची पोपटपंची मीसुद्धा करत होतो. ‘शोधन’ साप्ताहिकाचे नौशादभाई म्हणतात, तसाच मीसुद्धा इस्लामविषयी पुर्णत: अनभिज्ञ होतो. म्हणजे काय? तर मला मुळात हिंदूधर्म सुद्धा माहित नाही, ज्या धर्माचा अनुयायी म्हणून मी जन्मत: ओळखला जातो. पण जे काही माझे स्वत:च्या धर्माविषयी अज्ञान आहे, त्याच निकषावर मी इस्लाम वा मुस्लिमांचे विवेचन करीत होतो. आज जाहिर चर्चेत तोच मुर्खपणा अत्यंत विद्वान माणसेही समाजाला मार्गदर्शन म्हणून करत असतात. सर्व धर्म सारखे किंवा सर्व धर्मामध्ये तीच मानवी उद्धाराची मूळ संकल्पना आहे, असली भोंगळ भाषा आपल्या कानावर पडत असते. पण वास्तवात तसे अजिबात नसते. म्हणून मग जेव्हा भलताच अनुभव येतो, तेव्हा आपण चकित होऊन जातो किंवा कुणाच्या तरी डोक्यावर त्याचे खापर फ़ोडून मोकळे होतो. ‘इस्लामदर्शन’ या संकेतस्थळावर नौशादभाई उस्मान यांनी (‘मुस्लिम म्हणजे कोण?’ हे) जे स्पष्टीकरण दिले आहे ते म्हणूनच मला मोलाचे वाटते. ते म्हणतात, ‘मुस्लिम म्हणजे मुस्लिमाच्या पोटी जन्मलेली किंवा अरबी-उर्दु नाव असलेली व्यक्ती म्हणजे मुस्लिम, हा गैरसमज आहे. इतर अनेक धर्मांविषयी ही गोष्ट खरी असू शकते, परंतु इस्लामची भूमिका यापेक्षा वेगळी आणि तर्कसंगत आहे. ही भूमिका फक्त आमच्या मुस्लिमेतर बांधवांनाच नव्हे तर बहुसंख्य मुस्लिमांना देखील माहित नाही.’

   त्या मुस्लिमेतर मुर्खांमध्ये पुर्वी माझाही समावेश होता. पण १९९२-९३ च्या मुंबईतील दंगलीनंतर मी क्रमाक्रमाने बदलत गेलो. माझा एक मित्र भाऊ कोरडे याने दंगलीनंतरच्या काळात मुंबईच्या धारावी परिसरात हिंदू मुस्लिम सहजीवनासाठी खुप काम केले. वकार खान व भाऊ कोरडे यांनी केलेल्या त्या कामासाठी एक तासाभराचा माहितीपटही "द बॉंड" नावाने तयार झालेला आहे. त्याचा जगात खुप गाजावाजा झालेला आहे. या मित्राबरोबर माझी नेहमी चर्चा होत असते. विचारांची देवाणघेवाण होते, तशीच अनुभवाचीही देवघेव होते. त्यातुनच मी मग इस्लाम समजून घेण्याचा दिशेने पहिले पाऊल टाकले. हरून रखांगी हा माझा खुप जुना मित्र आहे. तो सध्या सौदी अरेबियात स्थायिक झालेला आहे. त्याने एकदा बोलण्यातून विषय निघाला म्हणुन मला कुराणाची मराठी प्रत आणुन दिली; तशीच काही इस्लाम विषयक खुलासे करणारी छोटीछोटी पुस्तकेही आणून दिली. माझ्या चिकित्सक वृत्तीमुळे ती मी बारकाईने वाचत गेलो आणि मला इस्लाम धर्म व त्याचा इतिहास समजून घेण्यात रस निर्माण झाला. आणि जसजसा मी त्यात अधिक शिरत गेलो; तसतसा मला आजवरचे माझे अज्ञान लक्षात येत गेले. म्हणजे माझ्या समजूती किंवा गृहिते उध्वस्त होत गेली. त्याचे प्रमुख कारण म्हणजे इस्लाम विषयक जे काही वाचनात आलेले होते, ते एकीकडे पुर्वग्रह दुषित म्हणजे एकांगी विरोधातले होते. तर दुसरीकडे हरूनने आणून दिलेल्या पुस्तकात प्रचारी थाटाचा मजकूर होता. तिसरीकडे जे स्वत:ला सेक्युलर म्हणवून घेतात व मुस्लिम नाहीत; त्यांनी आपल्या भूमिकेला पुरक अर्धवट माहिती दिलेली. सहाजिकच इस्लामची भूमिका असे जे नौशादभाई म्हणतात, त्याचा नेमका चेहरा त्यापैकी कशातच सापडू शकला नव्हता. पण भाऊ कोरडेचे अनुभव आणि माझे वाढलेले वाचन यातून मी थोडाफ़ार इस्लाम समजू शकलो.

   याचा एक फ़ायदा असा झाला, की जे कोणी सेक्युलर म्हणून बोलत असतात, ते निव्वळ लोकाची दिशाभूल करतात हे लक्षात आले, तसेच जे कोणी इस्लाम विरोधात सातत्याने बोलत असतात, त्यांचेही अज्ञान मला समजू शकले. म्हणूनच नौशादभाई जे सांगतात ते कोणी सांगू शकला नव्हता. मुस्लिम असणे म्हणजे काय तेच तुम्हाला ठाऊक नसेल, तर तुम्ही मुस्लिम असू शकत नाही, तसेच तुम्ही इस्लामचे प्रामाणिक टिकाकारही असू शकत नाही. आज आपण ज्यांना जाहीर कार्यक्रमातून ऐकत असतो, ते नेमके असेच अर्धवट असतात. ते कारण नसताना सर्व धर्म सारखेच आहेत अशी थाप ठोकून समोरच्या लोकांची दिशाभूल करत असतात. तुम्ही इस्लामचे विरोधक असा किंवा समर्थक असा, तुम्हाला इस्लामची जी भूमिका समजून घेतली पाहिजे. अन्यथा तुम्ही केलेले समर्थन जेवढे निरुपयोगी असते, तेवढीच त्यावरची टिकाही निरर्थक असते. त्यातून कुठलेही हित साधले जात नाही. उलट अहित होण्याचा धोका संभवतो. जिथे ज्ञानापेक्षा गैरसमज निर्माण होतात, तिथे अहित अपरिहार्य असते. कारण शंकांचे निरसन होत नाही, तेव्हा बारीकसारीक गोष्टीत संशय पुढे येत असतात. आणि संशयाचे भूत मानेवर बसले, मग समजूतीला सुट्टी दिली जात असते. म्हणूनच मी इस्लाम म्हणजे इस्लामची भूमिका समजून घेण्याचा प्रयत्न करू लागलो. त्याचेही श्रेय मोठ्या प्रमाणात नौशादभाई यांच्या ‘शोधन’ साप्ताहिकालाच द्यावे लागेल. कारण जेव्हा मी सेक्युलर चळवळी व कार्यक्रमात तरूणपणी सहभागी व्हायचो, तेव्हा हमीद दलवाई यांच्या बंडखोर सुधारणावादाचा मी समर्थक होतो. आणि त्याच कालखंडात ‘शोधन’मधून हमीदभाईंवर अत्यंत कडवी टीका छापून येत असे. हरूनभाईने त्यावेळी त्या साप्ताहिकाची वर्गणी माझ्या एका नातागाच्या नावाने भरली होती. त्यामुळे पोस्टाने त्यांच्या घरी येणारा ‘शोधन’चा अंक मला १९७८-८० च्या कालखंडात नियमित वाचायला मिळत होता.

   मी ‘शोधन’मधली हमीदभाईवरची टिका वाचून कमालीचा अस्वस्थ होत असे. कारण मला हमीद हा मोठा क्रांतीकारक वाटत होता. आपोआपच त्याच्या विरोधातले कुठलेही युक्तीवाद कितीही विवेकी असले, तरी पटवून घेण्याच्या मनस्थितीत मी नव्हतो. पण त्यावेळी जे कुतूहल ‘शोधन’च्या वाचनाने निर्माण केले होते, तेच दोन दशकांनंतर उत्सुकतेचे कारण झाले असावे. पण जसजसे मी इस्लाम विषयक लिखाण वेगवेगळ्या मार्गाने मिळवत गेलो आणि अभ्यासत गेलो, तसतसे एक लक्षात आले; की आपण जे सार्वजनिक ठिकाणी ऐकतो किंवा राजकीय जाणकार व पत्रकार सांगत असतात, त्यापेक्षा वास्तवातला इस्लाम व मुस्लिम खुपच वेगळा आहे. हे लोक आपल्यासमोर अपवाद आणून उभा करतात आणि त्यालाच नियम म्हणून दाखवू व सिद्ध करू बघतात. मग तो नियम सिद्ध होत नाहीच. पण जे अपवाद असतात ते लुळे पडतात. त्यातून अकारण गैरसमज वाढायला मदत होते. आज आपल्या देशामध्येच नव्हेतर जगामध्ये म्हणूनच इस्लाम व मुस्लिम हे अनाकलनिय रहस्य बनले आहे. आणि नौशादभाई तेही लपवत नाहीत. ते म्हणतात, ‘समाजात शांती हवी असेल तर आम्ही एकमेकांना समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी थोडा वेळ खर्च करणे अगत्याचे आहे. सर्वात जास्त गैरसमज असलेल्या इस्लाम व मुस्लिम समाजाला आपण समजून घेऊ या.’

   कुठल्यातरी सेक्युलर वा मुख्यप्रवाहातील माध्यमाने इतके प्रामाणिक मत व्यक्त केले आहे काय? ‘सर्वात जास्त गैरसमज असलेल्या इस्लाम व मुस्लिम समाजाला’ समजून घेऊ या, असे नौशादभाई स्पष्टपणे सांगतात. मग मुद्दा असा उरतो, की हे गैरसमज कुठून व का निर्माण झाले? कोणी निर्माण केले? कशासाठी निर्माण केले? ते आपोआप निर्माण झाले, की जाणिवपुर्वक कोणी निर्माण केले आहेत? त्यात कोणाचा लाभ आहे काय? जर गैरसमज असतील आणि ते दुर करायचे असतील, तर सत्याला सामोरे जावे लागेल. आणि त्याला नौशादभाई तयार आहेत. पण दोन्ही समाजात सौहार्द असावे म्हणुन प्रयत्न करणारे तथाकथित सेक्युलर मात्र सत्याला सामोरे जायला तयार नाहीत. याचा अर्थ त्यांनाच खरे सामाजिक सौहार्द नको आहे काय? सेक्युलर म्हणजे दोन भिन्न धर्मिय किंवा जातिय समाजघटकांमध्ये शत्रूत्व असते काय? त्यामुळेच जे सेक्युलर नाहीत तर खरेखुरे नि:पक्षपाती व अभ्यासपुर्ण लिहिणारे आहेत व अलिप्तपणे गुणदोष सांगू शकणारे आहेत, त्यांच्या वाचनाकडे मी वळलो. इतकेच नाही तर इस्लामचे पुरस्कर्ते व कडवे विरोधक यांचीही मते अधिकाधिक वाचण्याचा प्रयास केला. त्यामुळेच मी असे ठामपणे सांगू शकतो, की आज इस्लाम जो बदनाम झाला आहे त्याला, त्याच्या कडव्या विरोधकांपेक्षा व मुस्लिमातील मुठभर अतिरेक्यांपेक्षा; मुस्लिमंविषयी वैचारिक दिशाभूल करण्यातच धन्यता मानणारे सेक्युलर उदारमतवादीच अधिक जबाबदार आहेत. आणि म्हणुनच मुस्लिमांनी जसे अन्य लोकांचे गैरसमज दूर करण्यात पुढाकार घेतला पहिजे, त्याचप्रमाणे अन्य धर्मियांनी इस्लाम वा मुस्लिम म्हणजे नेमके काय, ते समजून घेण्यास पुढे यायला हवे आहे. तरच ही सामाजिक दरी व अस्वस्थता संपवणे शक्य आहे.   ( क्रमश:)
भाग   ( ३७ )  २१/९/१२

1 टिप्पणी:

  1. सर्व धर्म हिंदु धर्मातुनच आले आहेत ह्या अनुशंगाने वरिल लेख ओढुनताणुन बरोबर म्ह्णता येईल अन्यथा नाही.लेखकाने क्रुपया स्प्ष्ट करावे त्यांना मांडायचा मुसलमान धर्म हा कुराण,मुहंम्म्द ह्याच्या पासुन अलीप्त आहे का? जर तसे आसेल तर ठीक आहे अन्यथा लेखकाने खरे कुराण वाचले आहे कि त्याच्या अनुवाद,दुरुस्त केलेली प्रत (सर्व चुकीच्या व वाईट गोष्टी जाणुन बुजुन वगळुन छापलेली पुस्तके) वाचली आहेत हे स्प्ष्ट करावे.कारण सत्य प्रतिमधे हा धर्म किती शांतत प्रिय व स्त्रीयांच्या बाबतीत देखिल किती 'मोठ्या' मनाचा आहे ते स्पष्ट आहे.

    उत्तर द्याहटवा