शनिवार, २२ सप्टेंबर, २०१२

नरेंद्र मोदी हिंदूना का आवडू लागलेत?


   मी जेव्हा हिंदू मुस्लिम यांच्यातले सौहार्द म्हणतो तेव्हा ती प्रक्रिया दोन्ही बाजूंनी सुरू होण्याची गरज आहे. ती एका बाजूची असून भागणार नाही. तशी असणे किंवा तशी दाखवणे तद्दन खोटारडेपणा किंवा निव्वळ देखावा असतो. आणि असे माझे म्हणणे नाही, तर इलामच्या अनेक अभ्यासकांचे मत आहे. कोणा हिंदूत्ववाद्याचेही ते मत नाही. आणि म्हणुनच जेवढा सामान्य हिंदूने इस्लाम समजून घेण्याची गरज आहे, तेवढाच आपला धर्म मुस्लिमांनीही समजून घेण्याची गरज आहे. बहुतेक तसे नसते, त्यामुळेच घोटाळा होत असतो. सध्या जगभर एका चित्रपटाने कल्लोळ माजवला आहे. अमेरिकेतल्या कुणा ख्रिश्चन वा ज्यु धर्मियाने प्रेषित महंमदांच्या संदर्भात चित्रपट काढला. त्यात प्रेषितांची बदनामी झाली म्हणून हे काहूर माजले आहे. ही बदनामी नेमकी काय आहे, असे आपल्या परिचित वा मित्र मुस्लिमाला विचारून बघा. बहुतेकांना यापैकी काहीच ठाऊक नसेल. बदनामी किंवा विटंबना एवढेच तो छातीठोकपणे सांगू शकेल. याचे कारण तशी त्याची ठाम समजूत आहे. तशी माहितीच त्याच्यापर्यंत पोहोचली आहे. आणि अशी माहिती मिळाली, मग चिडून संतापुन रस्त्यावर येणे आणि प्रेषितांच्या बदनामी वा विटंबनेच्या विरोधात प्राणपणाने लढायला सिद्ध होणे; म्हणजेच इस्लामचे पालन, अशी त्या सामान्य मुस्लिमाची ठाम समजूत करून देण्यात आलेली आहे. मग त्याने रस्त्यावर उतरून हिंसक होणे चुक मानता येईल काय? त्याला जेवढा धर्म किंवा धर्मपालन माहित आहे, त्यानुसारच तो वागत असतो. मग त्याला दोषी ठरवून प्रश्न सुटत नाही. तो ज्याला धर्मपालन समजतो किंवा धर्म मानतो, त्याबद्दल त्याच्याशी चर्चा करून त्याच्या वागण्याची उकल केली पाहिजे. त्याला बोलते केले पाहिजे.

   एक गोष्ट बघा. पाकिस्तान हा स्वत:ला इस्लामिक देश म्हणतो म्हणूनच तिथेही त्या अमेरिकन चित्रपटाबद्दल गुरूवार-शुक्रवारी मोठीच हिंसक निदर्शने झाली. पण त्याच पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली आहे. अमेरिकन अनुदानावर तिथल्या खर्चाची बेगमी करावी लागते. तशीच अवस्था पॅलेस्टाईनची आहे. अमेरिका व युरोपियन देशांकडून मिळणार्‍या एक अब्ज डॉलर्सच्या अनुदानावर पॅलेस्टाईनचे अर्थकारण चालते. त्या अनुदानाच्या मदतीने स्वत:च्या पायावर उभे रहाणेही त्या दोन्ही देशांना शक्य झालेले नाही. पण इस्लामिक आंदोलनाचा विषय असेल, तर हेच दोन्ही देश सर्वात जास्त आघाडीवर दिसतील. म्हणजेच आपल्या व्यक्तीगत जीवनातील दुर्दशेबद्दल तिथल्या बहुतांश मुस्लिम जनतेला कसलीच फ़िकीर नाही. कुपोषण, गरीबी, उपासमार, बेकारी, मागासलेपणा अशा कुठल्याही विषयावर तिथे अशी मोठी आंदोलने होत नाहीत. युरोप किंवा अमेरिकन अनुदानावर जगण्याची लाचारी व अगतिकता त्यांच्या संतापाचे कारण होत नाही. पण धर्माचे नाव घेतले मग तात्काळ सर्वस्व पणाला लावायला तिथली मोठी लोकसंख्या रस्त्यावर उतरते. दुरची उदाहरणे कशाला? आपल्या जम्मू काश्मिरचीच गोष्ट घ्या. मागल्या दोनतीन दशकात त्या राज्याचा खर्च केंद्राच्या अनुदानावरच चालू आहे. एकूण उलाढालीमध्ये ९० टक्क्याहून जास्त रक्कम केंद्राने पुरवावी लागते. कारण सततच्या हिंसाचाराने कधीकाळी तेजीत चालणारा पर्यटन व्यवसाय दिवाळखोरीत गेला आहे. पण त्यातून जी दयनीय अवस्था तिथल्या मुस्लिम लोकसंख्येच्या नशीबी आली आहे, त्याचे वैषम्य तिथल्या कुठल्या मुस्लिम नेत्याच्या बोलण्यातून कधी्तरी दिसते का? पण तोच काश्मिर सध्याच्या व्हिडीओ प्रकरणात हिंसक आंदोलनामध्ये आघाडीवर दिसला.

   काही अपवाद सोडले तर जवळपास सर्वच मुस्लिमबहुल देशात अशीच परिस्थिती दिसेल. त्याचे कारण मग मुस्लिम स्वभावात शोधावे लागते. धर्माचा विषय निघाला मग मुस्लिम असे का वागतात? आणि अन्य धर्मिय म्हणजे हिंदू, ख्रिश्चन, बौद्ध, जैन इत्यादी तसे का वागत नाहीत, असा प्रश्न पडतो. अर्थात देशातले किंवा जगातले सर्वच म्हणजे प्रत्येक मुस्लिम असाच वागत नाही. पण मुस्लिम म्हणुन जी त्या धर्माच्या अनुयायांची आज जागतिक ओळख झाली आहे, ती अशीच भडक व हिंसक नाही काय? आणि जेव्हा असा चेहरा जग आपल्या डोळ्यांनी पहाते किंवा कानाने ऐकते, तेव्हाच कुठल्या वाहिन्या, चॅनेलवर कोणी मुस्लिम विचारवंत ‘इस्लाम म्हणजे शांतता’ असे सांगू लागतो; तेव्हा त्यावर विश्वास कसा ठेवायचा? आपल्या डोळ्यांवर की त्या पोकळ शब्दांवर? खरेच इस्लाम म्हणजे शांतता असेल तर बारीकसारीक गोष्टीतून इस्लामच्याच नावाने मुस्लिम हिंसक का होतात? कधीतरी हे वाहिन्यांवर दिसणारे मुस्लिम विद्वान त्याचे तर्कशुद्ध उत्तर देणार आहेत काय? नसतील तर त्यांचे काही बिघडत नाही. पण खरेच प्रत्येकवेळी शांत रहाणारा जो संयमी अन्यधर्मिय आहे, त्याचा संयम सुटेल तेव्हा काय होणार, हा गंभीर प्रश्न आहे. तेव्हा पोकळ शब्द उपयोगी नसतात. गुजरात हे त्याचे भयानक उदाहरण आहे. त्यावर संघ परिवाराचे कारस्थान असा आरोप केल्यामुळे विषयाचे गांभिर्य संपत नाही. तिथे दोन अडिच महिने चाललेल्या दंगलीत किमान आठदहा लाख अन्यधर्मिय किंवा हिंदूंनी सहभाग घेतला हे विसरता कामा नये. हे काही लाख लोक कारस्थान शिजवून असे काही करू शकत नाहीत. मुठभर लोक कारस्थान करतात आणि बाकीच्या प्रक्षुब्ध हिंसक झुंडीकडून पाशवी कृत्य करून घेत असतात. पण ती बाकीची प्रक्षुब्ध झुंड उपलब्ध नसेल, तर मुठभर कारस्थानी इतका मोठा हिंसाचार घडवून आणु शकत नाहीत.

   गुजरातच्या नरोडा पाटिया येथे दहा वर्षापुर्वी ९७ मुस्लिमांची निर्घृण हत्या झाली. त्यात आता चाळीस, पन्नास आरोपींना शिक्षा झालेली आहे. पण तेवढेच लोक त्या हत्याकांडात सहभागी होते काय? इतक्या कमी संख्येने ह्ल्लेखोर आले असते, तर त्यांचा तिथल्या मुस्लिम वस्तीने यशस्वी मुकाबला केला असता. पण तसे नव्हते. कित्येक हजाराच्या संख्येन तिथे हिंदू किंवा मुस्लिमेतरांचा जमाव चाल करून आलेला होता. म्हणूनच मुस्लिम स्वत:चा बचाव करू शकले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. तेव्हा त्यातल्या पन्नास शंभर लोकांना शिक्षा देऊन किवा गुन्हेगार ठरवून मुस्लिमांना सुरक्षित झालो असे मानता येणार नाही. सुडाचे समाधान नक्की मिळू शकेल. पण तेच हवे आहे, की मुस्लिमांना सुरक्षित जीवन हवे आहे? सुरक्षित जीवन हवे असेल तर जेव्हा दंगल चालू होती, त्यावेळी इतका हजारो मुस्लिमेतरांचा जमाव असा पाशवी हिंसक होऊन का चाल करून आला, त्याचा विचार नको का करायला? कारण त्या जमावातल्या मुठभरांनाच कायदा दोषी ठरवू शकला आहे आणि बाकी हजारपट दंगेखोर मोकाट आहेत आणि त्यापैकी कोणी घडल्या प्रकाराबद्दल पश्चात्तापही व्यक्त केलेला नाही. ती बाब अधिक भयंकर आहे. म्हणूनच जर दुसरा लोकसमुह म्हणजे मुस्लिमेतरांच्या जमावानेही हिंसक व्हायचे ठरवले तर काय? हा प्रश्न अंगावर शहारे आणणारा आहे. त्याचा विचार कोणी करायचा? मोदींवर खापर फ़ोडून ते संकट संपते का?

   आज जसे जगभर मुस्लिम एका चित्रपटासाठी हिंसक जमावाच्या रुपाने आक्रमक झाले आहेत आणि जाळपोळ करत आहेत, त्यापेक्षा गुजरातच्या दंगलीचे स्वरूप व लक्ष्य वेगळे होते काय? गुजरातच्या दंगलीचा व हत्याकांडाचा निषेध करायला आजही उत्साहात पुढे सरसावणारे किती मुस्लिम नेते, आजच्या हिंसक हल्ल्यांच्या निषेध करताना दिसतात? ते दिसत नाहीत, तेव्हाच मुस्लिमेतरांच्या मनात शेकडो शंका निर्माण होत असतात आणि त्यांची उत्तरे कुठेच मिळत नाहीत. उलट मुस्लिमांच्या भावना दुखावल्यात, अशी मखलाशी करणारे मुस्लिम नेते विचारवंत समोर येतात; तेव्हा मुस्लिमेतरांच्या शंकांचे रुपांतर संशयात होऊ लागते. त्याचे निराकरण करणे अगत्याचे असते. पण त्याची कोणालाच फ़िकीर नाही. ज्यांना मुस्लिमांच्या मतांच्या गठ्ठा मतांवर डोळा ठेवून राजकारण खेळायचे असते, त्यांना दंगलीत मरतो कोण व किती याच्याशी कर्तव्य नसते. त्याला मतांच्या गठ्ठ्य़ाशी कर्तव्य असते. म्हणूनच परवा ममता बानर्जी काय म्हणाल्या? ‘जुम्मेके नमाजके बाद हमारे मंत्री इस्तिफ़ा देंगे’. पश्चिम बंगालाम्ध्ये २७ टक्के मुस्लिम लोकसंख्या आहे आणि त्यासाठीच ममता अशी भाषा वापरतात. दिल्लीतल्या राजकीय पेचप्रसंगाचा जुम्मेकी नमाजशी काय संबंध असतो? हेच मुस्लिमेतरांना खटकणारे असते. मग त्याला वाटू लागते मतांच्या गठ्ठ्याला मतांच्याच गठ्ठ्य़ानेच उत्तर दिले पाहिजे. त्यातूनच मग नरेंद्र मोदी हा हिंदू आक्रमकतेचा नवा चेहरा समोर येऊ लागला आहे आणि त्याविषयीचे आकर्षण हिंदूमध्ये वाढत चालले आहे. त्याच्या परिणामांचा विचार मुस्लिम नेतृत्वाचे किंवा विचारवंतांनी कधीतरी गंभीरपणे केला आहे काय? अशा मोदीविषयी आकर्षणाच्या परिणामांकडे चिकित्सक दृष्टीने बघितले आहे काय? मुस्लिमांच्या धार्मिक आक्रमकतेचा हिंदूंवर किंवा मुस्लिमेतरांवर पडणार्‍या मानसिक प्रभावाचा विचार तरी कोणाच्या मनाला शिवला आहे काय? असेल तर त्याचे प्रत्यंतर मुस्लिमांच्या वर्तनातून दिसायला हवे ना? दिल्लीच्या शाही इमाम बुखारी याचे शब्द त्यासाठी मार्गदर्शक ठरावेत.( क्रमश:)
भाग   ( ३९ )      २३/९/१२

1 टिप्पणी:

  1. bhau assam madhe kiti muslim hote,gujrat madhe 92 chya adhi jalelya riot madhe kiti muslim hote,kashmir madhe 20 lakh hindunchi hatya zali tya madhe kiti muslim hote ??????????????????

    उत्तर द्याहटवा