आपल्याकडे हल्ली एक महान सेक्युलर किंवा धर्मनिरपेक्ष नाव पुढे आले आहे. ते गृहस्थ सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमुर्ती आहेत. त्यांची सडेतोड मते खुपच गाजत असतात. माध्यमांना त्याचे भलतेच कौतूक आहे. कारण आपली माध्यमे सेक्युलर आहेत. मात्र त्या महापुरूषाची जी मते हिंदूंच्या भावना दुखावतील तेवढ्याचे कौतुक होत असते. जर चुकून त्यांच्या सेक्युलर तोफ़ेचा मोर्चा अन्य कुठल्या धर्माकडे वळला, मग माध्यमेच त्यांच्याकडे काणाडोळा करतात. त्यांच्या महान सेक्युलर विचारांकडे पाठ फ़िरवली जात असते. सध्या निवृत्तीनंतर त्यांची नेमणूक प्रेस कौन्सिल ऑफ़ इंडीयाचे अध्यक्ष म्हणून झाली आहे. त्यांचे नाव आहे न्या. मार्कंडेय कटजू असे आहे. ही नेमणूक झाल्या झाल्या त्यांनी अनेक वाहिन्या व वृत्तपत्रे यांच्यावर अंधश्रद्धा पसरवणारे म्हणुन सडकून टीका केली होती. तेव्हा समाजाला अंधश्रद्धेतून मुक्त करणारा नवाच देवदुत भारतभूमीवर अवतरला; अशा थाटात त्यांचे अनेक ज्येष्ठ सेक्युलर पत्रकारांनी स्वागत केले होते. कारण त्यांनी विविध वृत्तपत्रे किंवा वाहिन्यांवर जी भविष्ये वा राशीफ़ल दाखवले जाते किंवा देवाधर्माच्या गोष्टी सांगितल्या जातात; त्यावर तोफ़ डागली होती. पण यांची ही मते आजची नाहीत. पण अजून न्या. कटजू भारतीय सेक्युलर विचारांमध्ये पुरेसे रुळलेले नाहीत. अन्यथा त्यांनी सेक्युलर म्हणजे हिंदूचीच टवाळी, ही मर्यादा संभाळली असती. बिचारे कटजू पडले प्रामाणिक सेक्युलर. त्यामुळेच त्यांनी न्यायालयात असतानाही असेच शब्द उच्चारले होते आणि त्यांना शब्द मागे घेण्याची वेळ आली होती. तीन साडेतीन वर्षापुवीची गोष्ट आहे.
मध्यप्रदेशातील विदीशा नावाच्या जिल्ह्यामध्ये निर्मला कॉन्व्हेंट नावाची एक ख्रिश्चन मिशनरी शाळा आहे. त्या शाळेतील महंमद सलीम नावाच्या दहावीच्या मुलाने एक याचिका केल्याचे प्रकरण त्यांच्याकडे आले होते. म्हणजे झाले असे, की शाळेचा नियम होता मुलांचे गाल साफ़ गुळगुळीत असायला हवेत. पण या महंमद सलीमला तो नियम, धर्म पालनातला अडथळा वाटला व त्याने कोर्टाकडे धाव घेतली. नियम पाळत नाही म्हणून शाळेने सलीमला काढून टाकले होते. त्यावर त्याने कोर्टात दाद मागितली आणि हे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन पोहोचले. शाळेचे नियम मोडू्न धर्माच्या नावाखाली दाढी राखण्याचा त्याचा हट्ट खालच्या कोर्टाने फ़ेटाळून लावल्याने तो सर्वोच्च न्यायालयात गेला होता. न्या. कटजू व न्या. रविंद्रन यांच्या खंडपीठासमोर त्याच्या अपीलाची सुनावणी झाली. त्यांनी ती याचीका फ़ेटाळून लावली. पण त्या अर्जाची सुनावणी चालू असताना न्या. कटजू यांनी सलीमच्या वकीलांना जे ऐकवले; त्यातून खुप वादळ उठले होते. झाले असे, की सलीमची बाजू मांडणारे वकील बी. ए. खान म्हणाले, इस्लाम धर्मपालनात दाढी राखणे अगत्याचे आहे. त्यातून सवलत नाही. तेव्हा खान यांच्या त्या दाव्याला रोखून कटजू म्हणाले, पण तुम्ही स्वत:च मुस्लिम आहात. मग तुम्ही दाढी का राखलेली नाही? त्यावर त्या वकीलाकडे उत्तर नव्हते. मग खंडपीठाने ते अपील फ़ेटाळून लावले. पण त्या सुनावणीत कटजू जे बोलले त्यातून मोठेच काहूर उठले. कटजू म्हणाले,
‘आम्हाला या देशात तालिबान नको आहेत. उद्या एखादी विद्यार्थिनी समोर येईल आणि म्हणेल की तिला बुरखा परिधान करायचा आहे. आपण त्याला मान्यता देणार आहोत काय? मी स्वत: धर्मनिरपेक्ष आहे. आणि आपल्याला नागरी हक्क आणि आपल्या धर्मश्रद्धा यात समतोल ठेवायला हवा आहे. आपण सेक्युलर संकल्पनेला खुप ताणून चालणार नाही.’
झाले. तेवढ्य़ा ताशेर्यांनी आपल्या देशात मोठेच सेक्युलर काहूर माजले. एका मुस्लिम विद्यार्थ्याच्या अर्जावर बोलताना न्या. कटजू यांनी केलेली टीप्पणी त्यांना महागात पडली. त्यांच्यावर चहुकडून टिकेचा वर्षाव सुरू झाला आणि मग पुन्हा त्या फ़ेटाळलेल्या अपीलाची सुनावणी होऊन नव्या निकालात महंमद सलीमची दाढी राखण्याची मागणी मान्य करण्यात आली. मौलाना वहिऊद्दीन युरोपातील बुरख्याबद्दल बोलत आहेत आणि आपल्याकडे तेच प्रकरण कशाप्रकारे हाताळले गेले, त्याचा हा दाखला आहे. आजवर त्याच न्या. कटजू यांनी शेकडो वेळा हिंदूंच्या धर्मश्रद्धा व समजूतींवर हल्ला चढवला आहे. पण त्यांना एकदाही शब्द मागे घ्यावे लागलेले नाहीत. नुसती तशी कोणी भाषा केली तरी आपली सेक्युलर माध्यमे, पत्रकार व विचारवंत त्या मागणी करणार्यावर तुटून पडतात. पण एक ताशेरा त्यांनी दाढीचा हट्ट व बुरख्याच्या संदर्भात केल्यावर तेच सेक्युलर, धर्मभावना जपायला सरसावतात. किती विरोधाभास आहे ना?
विषय तिथेच संपत नाही. त्यावेळी मुस्लिम विचारवंत व सेक्युलर मुस्लिम पत्रकार काय म्हणाले, ते समजून घेण्यासारखे आहे. त्यांनी तालिबान इथे नकोत या शब्दावर गदारोळ केला. एवढा गदारोळ करायची काय गरज होती? पण तोही मुद्दा सोडून द्या. मुद्दा आहे तो कटजू जे म्हणाले, त्यात मोठे काय आक्षेपार्ह होते? जर दाढी हा धर्मपालनाचा अविभाज्य भाग आहे असा दावा खान नावाचे मुस्लिम वकीलच करत होते, तर त्यांनीच दाढी का राखली नव्हती? मग ते इस्लामचे योग्य पालन करत नव्हते का? आणि जर त्यांनी दाढी न राखणे इस्लामला मंजूर असेल, तर त्या नुकतीच दाढी फ़ुटलेल्या विद्यार्थ्याने दाढीसाठी इतके आग्रही का असावे? आपण शाळेत धर्मपालनासाठी जातो, की शिकण्यासाठी? जर आपण शिकण्यासाठी जात असू तर असे हट्ट कशाला? आणि शाळेचा जो नियम होता तो आधीपासून होता तर असे नियम माहित असताना त्या शाळेत जाण्याची गरज काय? असे अनेक प्रश्न आहेत? कारण ती शाळा ख्रिश्चन मिशनरी चालवत आहेत. आणि तिथे जाऊन अन्य धर्माचा आग्रह धरणे कितपत योग्य व सहिष्णुतेचा भाग ठरतो? एवढीच धर्मपालनाची आस्था असेल तर ख्रिश्चन धर्मियांशी कसे वागावे याचे जे मुस्लिम धर्मग्रंथामध्ये मार्गदर्शन आहे, त्याचे काय? त्याचे उल्लंघन ख्रिश्चन शाळेत जाऊन होत नाही काय?
इथे एक गोष्ट मी वाचकांसमोर स्पष्ट करू इच्छितो. सामान्यत: पत्रकार वा अभ्यासक म्हणुन जी पोपटपंची चालते त्यापैकी मी एक नाही. जेव्हा अशा नाजूक व संवेदनाशील विषयावर मी उहापोह करतो आहे; तेव्हा मी कुराण, हदीस असे इस्लामी धर्मग्रंथ काळजीपुर्वक वाचले आहेत, त्यांचा अभ्यास केलेला आहे. त्याचप्रमाणे तेराहून शतकांचा इस्लामच्या इतिहास व आजच्या जागतिक इस्लामी वाटचालीशी चांगला परिचित आहे. वाहिन्यांवर जो पोरकटपणा चर्चेत भाग घेणारे करतात, त्यांच्या इतका मी अर्धवट नाही. म्हणूनच मी हा प्रश्न विचारला आहे. इस्लाम धर्मपालनात. पुरूषांनी दाढी राखणे किंवा महिलांनी बुरखा परिधान करणे याची कुठली तरतूद आहे; ते एकदा स्पष्ट समोर येण्याची गरज आहे. कारण मग तीच आपली ओळख असल्याचा आग्रह म्हणजे मुद्दाम केलेला अट्टाहास नाही काय? युरोपमध्ये बुरख्याचा वाद का होतो? मौलान वहिउद्दीन तेच म्हणत आहेत. किंबहूना त्याच्याही पुढे जाऊन तो खरा इस्लाम नाही, याचीही ग्वाही देत आहेत. पण त्यांचे कोणी ऐकतो आहे का? त्याऐवजी जे असे लहानमोठ्या बाबतीत हटवाद केले जातात, त्यातून अन्य धर्मियांच्या भावना दुखावल्या जातात, किंवा त्यांच्यावर कुरघोडी केली जात असते, त्यातून विवाद सुरू होतो. आणि म्हणुन वहिउद्दीन काय उपाय सांगतात? जुळवून घेता येत नसेल तर मुस्लिमांनी आपल्या मूळ देशात परत जावे. इथेही मी म्हणेन ख्रिश्चन शाळेत आपण प्रवेश घेतला तर त्या शाळेचे नियम आपल्याला हवे तसे बदलून मागण्याचा हट्ट म्हणजे त्या शाळेवर आपली ओळख लादणे नसेल. पण त्या शाळेची एक ओळख किंवा चेहरा आहे, तो बदलण्याचा प्रयास होत नाही काय?
मुस्लिम समाज म्हणुन जेव्हा मुस्लिम एकत्र येतात, तेव्हा त्यांच्यामध्ये जी सामुहिक ओळख असते, ती लादण्याचा अट्टाहास असतो त्यातून अनेक समस्या तयार होतात. आणि हा प्रकार इथे भारतातच नाही. जगभर आज तेच होताना दिसेल. आणि म्हणुनच मुस्लिम समाजातील शांतताप्रिय व समंजस नेतृत्व पुढे येण्याची गरज आहे. नेमके तेच होत नाही आणि तशी अपेक्षा केली तरी लगेच अन्याय होत असल्याचा आवाज उठवला जातो. गदारोळ सुरू केला जातो. लगेच इस्लाम खतरेमे अशी आवई उठवली जाते. मुस्लिमांमध्ये त्यातून सामुहिक भयगंड निर्माण केला जातो. वहिउद्दीन त्याकडेच लक्ष वेधत आहेत. आणि एकदा तसे झाले मग त्या समुहातील आक्रस्ताळे किंवा माथेफ़िरू जमावाचे म्होरके होत असतात. विचार करू शकणारे किंवा संयम दाखवू शकणारे दुर फ़ेकले जातात. आपल्याप्रमाणेच अन्य सेक्युलर लोकशाही देशात जे धर्मस्वातंत्र्य मुस्लिमांना मिळते तेवढे कुठल्या मुस्लिम देशात अन्य धर्मियांना मि्ळते काय? नसेल तर त्याचा इथले मुस्लिम कधी सहानुभूतीने विचार करणार आहेत की नाही? की प्रत्येक बाबतीत हट्ट आणि अट्टाहासच होणार आहे? आपण धर्माचा आग्रह धरतो आहोत की हटवादाचा अतिरेक करतो आहोत, याचा समंजस विचार व्हायला नको काय? निदान ज्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात, त्याचा तरी विचार सुरू होणार आहे की नाही? ( क्रमश:)
भाग ( २७ ) ११/९/१२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा