‘राजकीय पक्षांना फ़क्त अल्पसंख्यांक आणि दुर्बळ समाज घट्काची मते मिळवणे तेवढे माहित आहे, पण त्या पक्षांनी अशा वर्गाच्या कल्याणासाठी काहीच केलेले नाही. देशामध्ये धर्मनिरपेक्षता टिकून राहिली असेल तर ती कुठल्या राजकीय पक्षामुळे नव्हेतर हिंदूंमुळे शिल्लक उरली आहे.’
हे शब्द कोणा संघवाल्या हिंदूत्ववाद्याचे नाहीत, तर एका मुस्लिम मौलवीचे आहेत. दिल्लीतील ऐतिहासिक जामा मशिदीचे शाही इमाम मौलाना सय्यद अहमद बुखारी यांनी आक्टोबर २००६ मध्ये अलाहाबाद येथे पत्रकारांशी बोलताना हे मत व्यक्त केले होते. तेव्हा त्यातला गर्भितार्थ समजून घ्यायला हरकत नसावी. हिंदूमुळे म्हणजे हिंदूंच्या कुठल्या संघटना किंवा भाजपासारख्या राजकीय पक्षामुळे देशातील धर्मनिरपेक्षता टिकून राहिली असेही बुखारी यांना म्हणायचे नाही. कारण त्यांनी त्याच पत्रकार परिषदेत भाजपाला पराभूत करणे हे प्रत्येक मुस्लिमाचे कर्तव्य आहे, असे सांगताना १९८९ वगळता मुस्लिमांनी कधीच भाजपाला मते दिली नाहीत; असेही सांगितले होते. मग देशातल्या धर्मनिरपेक्षता म्हणजे सेक्युलॅरिझमेचे श्रेय बुखारी हिंदूंना का देतात? ते हिंदू समाज किंवा लोकसंख्येला श्रेय देत आहेत. आणि त्याचा नेमका अर्थ समजून घेण्याची गरज आहे. जसे त्यांनी मुस्लिमांना भाजपा विरोधी मतदान करण्याचे धार्मिक आवाहन आपल्या समाजाला केलेले आहे तसे धार्मिक राजकीय आवाहन हिंदू धर्मोपदेशक किंवा धर्मसंस्था म्हणुन कोणी कधी करत नाही. आणि कोणी केलेच तर त्याला हिंदू समाज कधी दाद देत नाही. धर्माचा राजकारणाशी संबंध नाही, हे तत्व हिंदू समाज उपजतच पाळत असतो. म्हणुनच तो आपोआपाच सेक्युलर असतो. त्याला कोणी सेक्युलर तत्वज्ञान शिकवण्याची गरज नाही. तो आपले राजकीय मत बनवतो आणि त्याप्रमाणे मतदान करतो. म्हणुनच त्याच्या मताचे गठ्ठे नसतात. कोणा सत्ताधीशाला वा राजकीय पक्षाला राजकीय-प्रशासकीय निर्णय घेताना हिंदूंच्या धर्मश्रद्धेचा विचार करावा लागत नाही, की भयभित व्हावे लागत नाही. पण तसे मुस्लिमांबद्दल म्हणता येईल काय?
इथे हिंदूंना मौलवी बुखारी जे धर्मनिरपेक्षतेचे श्रेय देतात, ते हिंदूंच्या सोशिकता व संयमी प्रवृत्तीला देत आहेत. ते म्हणतात, त्याचा नेमका अर्थ म्हणुनच प्रामुख्याने मुस्लिम समाजाने समजून घेण्याची मला गरज वाटते. कारण गेल्या काही वर्षात त्याच हिंदूमधल्या धर्मनिरपेक्ष प्रवृत्तीला ओहोटी लागताना दिसते आहे. ती बाब आक्रमक धर्मभावनांचे सतत प्रदर्शन मांडणार्या मुस्लिमांसाठी घातक आहे. कारण ती आक्रमकता हिंदूंच्या सोशिकता व संयमाच्या मर्यादेतच चालू शकणार आहे. जिथे हिंदूंच्या संयमाचा कडेलोट होईल, तिथे मग गुजरात सुरू होत असतो. आणि म्हणुनच नरेंद्र मोदी यांना गुजरात बाहेर मिळणारे नैतिक समर्थन, ही मला अत्यंत गंभीर बाब वाटते. हिंदू समाजातील ज्यांचा ज्यांचा आपल्या संयमी वृत्ती वा सोशिकतेबद्दल भ्रमनिरास होत आहे, त्यांच्यामध्ये मोदी विषयक आकर्षण वाढताना दिसत आहे. आणि हे बघायचे असेल तर दिसणारे सत्य आहे. मागल्या चार महिन्यात देशव्यापी अनेक मतचाचण्या झाल्या, त्यात प्रत्येकवेळी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान म्हणुन मिळणारी पसंती वाढत आहे. एक तर मोदी अन्य सर्व उमेदवारांपेक्षा अधिक लोकप्रिय असल्याचे प्रत्येक चाचणी सांगते. पण तेवढ्याने मोदी लगेच पंतप्रधान होणार असे अजिबात नाही. पण त्यांच्यकडे वाढणारा देशव्यापी कल हिंदूंमधील सोशिकता कमी होत असल्याचे लक्षण आहे. हिंदू किंवा मुस्लिमेतर समाजातील धर्मनिरपेक्षतेची भावना घटत असल्याचे ते निदर्शक आहे. मुंबईतील रझा अकादमीच्या मोर्चानंतरची दंगल अशा बदलणार्या मतांना किंवा भ्रमनिरासाला मदत करणारी असते. आणि म्हणूनच त्याकडे मुस्लिमांनी गंभीरपणे बघावे असे मला वाटते. असे मी पुन्हा मुस्लिमांनाच थेट आवाहन का करतो आहे? त्यापेक्षा मुस्लिमांच्या आक्रमकतेवर पांघरुण घालणारे खुप आहेत. सेक्युलर पोपटपंची करणार्या अशा विद्वानांवर विश्वास ठेवणे सोपे असले तरी ते घातक आहे. कारण त्यापैकी कोणी प्रसंग ओढवतो तेव्हा मुस्लिमांच्या मदतीला येणार नाहीत.
गुजरातच्या दंगलीसाठी नेहमी भाजपा व मोदी यांच्यावर दोषारोप होत असतात. पण त्याच दंगलीत बडोद्यातील बेस्ट बेकरीचे प्रकरण घडले. तेव्हा ज्यांना गुन्हेगार म्हणून शिक्षा झाली, त्यात भाजपाप्रमाणेच कॉग्रेसच्या नगरसेवकांचाही समावेश आहे हे विसरता कामा नये. त्या दंगलीत किती सेक्युलर पक्षाचे, कॉग्रेसचे कार्यकर्ते मुस्लिमांचे प्राण वाचवायला घराबाहेर पडले होते? उलट ज्यांच्यावर दंगलीचे खापर फ़ोडले जाते, त्याच भाजपावाल्यांच्या खांद्याला खांदा लावून अनेक कॉग्रेस कार्यकर्तेही मुस्लिमांवर हिंसक हल्ले करण्यात पुढेच होते. म्हणजेच सेक्युलर म्हणुन मुखवटे लावून मतांचा जोगवा मागणारेही विपरित प्रसंग आला, मग मुस्लिमांना वार्यावर सोडुन देतात किंवा अगदी थेट मुस्लिमांवर हल्लेसुद्धा करतात. आणि म्हणुनच सुरक्षा मोलाचीव वाट्त असेल तर मुस्लिमांनीच काही प्रश्नांचा वा विषयांचा गंभीरपणे विचार करावा असा माझा आग्रह आहे. आणि सर्वात गंभीर मुद्दा आहे तो हिंदू समाजाची धर्मनिरपेक्षता टिकवण्याचा. हिंदूंच्या संयमाचा कडेलोट न होण्याचा. कारण तीच हिंदूंची धर्मनिरपेक्षता वा संयम मुस्लिमांच्या सुरक्षेची खरी हमी असते. बाकी वाहिन्या किंवा माध्यमातून पोपटपंची करणार्यांच्या शब्दांचा काहीही उपयोग नसतो. मग मुस्लिमांनी विचार करायचा म्हणजे काय?
आपण जे मुस्लिम म्हणून धर्मप्रेम दाखवतो किंवा त्यातून मुस्लिमेतरांवर जो परिणाम होतो, त्याचा अतिरेक तर होत नाही ना? तो अतिरेक झाला आणि तशीच प्रतिक्रिया उमटू लागली तर? इमाम बुखारी यांचे विधान त्याच संदर्भात बारकाईने वाचणे व समजून घेणे अगत्याचे ठरावे. त्यांनी देश धर्मनिरपेक्ष असल्याचे सर्वस्वी श्रेय हिंदूंना म्हणजे हिंदू समाजाच्या संयमाला दिले आहे. पण मुस्लिमांना दिलेले नाही. म्हणजेच देशातील धर्मनिरपेक्षता हिंदूंच्या संयमावर अवलंबून आहे. त्याचा साधा सरळ अर्थ इतकाच, की भारतातील धर्मनिरपेक्षता हिंदूंच्या संयमी सोशिकतेवर विसंबून आहे, तिचा अंत पाहिला जावू नये. तो पाहिला गेल्यास नरेंद्र मोदी यांच्याविषयी आकर्षण सुरू होते. आणि ते आकर्षण वाढणे, मुस्लिमांना घातक असू शकते. कारण मोदी हा नुसता हिंदूत्ववादी नेता नाही, तर मोदी यांची प्रतिमा कुठल्याही आक्रमक मुस्लिम नेत्याइतकीच जहाल आहे. जेवढी त्यांच्या प्रेमात पडणार्या हिंदूंची संख्या वाढणार आहे, तेवढीच देशातील धर्मनिरपेक्षतेची हमी संपुष्टात येणार आहे. म्हणूनच भारतात अजून जो बहुसंख्यांक हिंदू समाज आहे, त्याला मोदींकडे आकृष्ट होण्यापासून बाजूला ठेवण्याचे काम मुस्लिम नेते व समाजाने करणे मला अगत्याचे वाटते. तसे का होऊ शकते?
अलिकडे ज्या घटना आसाम व अन्य संदर्भात घडल्या, त्यानंतर मोठ्या प्रमाणात मोदी हेच मुस्लिमांच्या आक्रमकतेला खरे उत्तर असल्याची चर्चा कानावर येऊ लागली आहे. ‘बघा जगात आणि देशात सगळिकडे मुस्लिम गडबड करू शकतात, पण गुजरातमध्ये त्यांची हिंमत होत नाही. कारण तिथे मोदींची दहशत आहे’; हा युक्तीवाद वा्ढत चालला आहे. फ़ेसबुक किंवा इंटरनेटवरील चर्चा व मतप्रदर्शन त्याची साक्ष आहे. पण ज्या समाजघटकाला अशा प्रकारे उघड बोलता येत नाही, तो प्रचंड लोकसंख्येतला वर्ग आहे आणि तोच खर्या दंगलीत सहभागी होत असतो. त्याला शब्दापेक्षा कृतीचे आकर्षण असते. असा वर्ग हिंदू किंवा मुस्लिमेतर समाजात वाढणे, धर्मनिरपेक्षतेला बाधक आहे. परिणामी धर्माविषयी कमालीची नाजूक मनस्थिती असलेल्या मुस्लिम समाजाला जास्त घातक आहे. कारण इवल्याशा कारणाने मुस्लिम रस्त्यावर येतात, तेव्हा समोरून प्रतिकार होणार नाही, संयम दाखवला जाईल; याची खात्री असते. ती खात्री संपली मग काय होईल? मोदींचे वाढते आकर्षण त्याच धोक्याची घंटा आहे. त्याला माध्यमांची टिका वा राजकीय आरोप हे उत्तर नाही. कारण दहा वर्षे चाललेले आरोप पचवून मोदी ठामपणे उभे आहेत. आणि त्याच बदनामीने त्यांना निराश वैतागलेल्या हिंदू समाजात लोकप्रियता मिळत चाललेली आहे. त्यातून हिंदूमधील धर्मनिरपेक्षतेचे आकर्षण संपले मग काय व्हायचे? समाजवादी पक्षाचे मुलायम, बिहारचे नितीशकुमार किंवा डावी आघाडी मोदी नकोत असे दडपण भाजपावर आताच आणु लागले आहेत, त्याची कारणे कोणी तपासून बघायची? गुजरातपेक्षा मोठी राज्ये संभाळणार्या पक्षाचे हे मोठे नेते मोदी नावाचा इतका धसका का घेत आहेत? मग त्यापासून मुस्लिम नेते व समाजाने काय धडा शिकला पाहिजे? मोदींना रोखण्यात कोणी पुढाकार घेतला पाहिजे? दिल्लीची सत्ता काबीज केल्यावर मोदी काय करू शकतात, या प्रश्नाचे उत्तर भयंकर आहे. ( क्रमश:)
भाग ( ४० ) २४/९/१२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा