दिल्लीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांच्या एका वाक्याभोवती मी किती घुटमळतो आहे, असे काही वाचकांना वाटू शकेल. पण त्यातला गर्भितार्थ समजून घेण्यासाठी त्याच एका वाक्याची अनेक कोनातून व अंगाने मिमांसा मला आवश्यक वाटते. त्याचे कारणही तसेच आहे. मानवी स्वभाव फ़क्त फ़ायद्याकडे बघण्याचा असतो. पण त्याच किरकोळ लाभातून किती भयंकर तोटे संभवतात, त्याकडे बघायची मानवी स्वभावाची तयारी नसते. म्हणूनच मानवी जीवनात अनेक समस्या भेडसावत असतात. वेळीच त्यांचा बंदोबस्त शक्य असतो, पण काणाडोळा करण्याच्या प्रवृत्तीने इवली समस्या भीषण भयंकर होईपर्यंत तिच्याकडे डोळसपण बघितले जात नाही. आपल्या लोकशाहीमध्ये आज जे आकड्याला अवास्तव महत्व आले आहे, त्याच्या फ़ायद्यामध्ये सगळे गर्क आहेत. पण त्याच आकड्यातून संभवणार्या धोक्याचा विचारही कोणाच्या मेंदूला शिवलेला नाही. म्हणूनच अनेक सेक्युलर विचारवंत किंवा मुस्लिम जहाल नेते, छातीठोकपणे मुस्लिमांच्या पाठींब्याशिवाय देशात सत्ता बनू शकत नाही; असे आग्रहपुर्वक सांगत असतात. त्याचा अर्थ नेमका काय आहे? आपल्या देशात सतरा अठरा टक्के मुस्लिम लोकसंख्या आहे. त्या लोकसंख्येला सतत हिंदूत्वाच्या भयगंडाखाली ठेवले, मग त्यांची निदान नऊ दहा टक्के मते एकगठ्ठा होऊन मिळू शकतात. मग ती कधी कॉग्रेस, मायावती, मुलायम किंवा डावे, ममता असे राजकारणी मिळवू शकतात. त्यावरच त्यांची मदार असते. पण जो बहुसंख्य हिंदू समाज मानला जातो, तो अनेक समाज घटक, जातीपातीमध्ये विखुरला आहे. त्याच कारणास्तव तो एकगठ्ठा मतदान करण्याची शक्यता नाही. कारण त्या वेगवेगळ्या जाती उपजातीचे पक्ष व संघटना उदयास आलेल्या आहेत. त्यांचे छोटे छोटे मतांचे गठ्ठे तयार झाले असून त्यात मुस्लिम गठ्ठ्याची भर पडली, मग बहुमताचे गणित जमवता येते. मग त्या गणिताला शह द्यायचा, तरी दुसर्या प्रकारे पुन्हा मुस्लिम मतांचा गठ्ठा गृहित धरूनच समिकरण मांडावे लागते. कारण कुठल्याही स्थितीत जातीपातींमध्ये विखुरलेला हिंदू मतदार एकगठ्ठा होणार नाही, याची हमीच त्या सेक्युलर गणितामागे आहे. पण गुजरातने त्या गृहिताला जबरदस्त धक्का दिला आहे. दहा वर्षे उलटून गेली तरी नरेंद्र मोदी यांनी दंगलीतून तयार झालेली मानसिकता गुजरातची अस्मिता म्हणुन टिकवली आहे. पण दुसरीकडे त्या गुजरातच्या अस्मितेला हिंदू आक्रमकता, असे लेबल लावून सेक्युलर माध्यमांनी त्या राज्यातील हिंदू गठ्ठा जपायला मोदींना मोठाच हातभार लावला आहे. सहाजिकच गुजरातमध्ये मुस्लिमांची लक्षणिय लोकसंख्या असूनही तिचा प्रभाव गठ्ठा मते म्हणून दिसत नाही. आणि ते वास्तव मोदींना सतत शिव्यांची लाखोली वहाणार्यांनी सामान्य मुस्लिमापासून लपवलेले आहे.
मागल्याच विधानसभा निवदणुकीची गोष्ट घ्या. मोदींच्या मुस्लिम विरोधावर तावातावाने बोलण्यात धन्यता मानणार्या कॉग्रेसचे राजकीय समिकरण किती बदलून गेले आहे? २००२ च्या विधानसभा निवडणुकीत गुजरातमध्ये कॉग्रेसने १७ मुस्लिम उमेदवार उभे केले होते आणि शक्य होईल तेवढी मोदींच्या मुस्लिम विरोधावर आगपाखड केली होती. पण पाच वर्षांनी आलेल्या विधानसभा निवडणूकीत कॉग्रेसचाही हिंदूत्ववादी चेहरा जगासमोर आलेला होता. त्या २००७ चा विधानसभा निवडणूकीत कॉग्रेसच्या मुस्लिम उमेदवारांची संख्या १७ वरून चारपर्यंत खाली का आली? प्रचारात व मोदींवर आरोप करताना आपला मुस्लिमप्रेमाचा चेहरा रंगवून मतदारासमोर मांडणार्या कॉग्रेसने मुस्लिमांना उमेदवारी देण्यात कंजुषी का केली? तेवढेच नाही दिल्लीहून कोणीही मुस्लिम कॉग्रेस नेता गुजरातमध्ये निवडणुक प्रचारासाठी फ़िरकला नाही. हा काय प्रकार होता? कॉग्रेस आपल्यावरचा मुस्लिम धार्जिणेपणाचा शिक्का पुसायला धडपडत होती का? एका जाहीर कार्यक्रमात मोदी यांनी कॉग्रेस नेते दिग्विजय सिंग यांना त्याच उमेदवारीबद्दल सवाल करून निरूत्तर केले होते. गुजरात विधानसभेची आमदारसंख्या १८१ इतकी आहे, त्यात दहा टक्के जरी मुस्लिम लोकसंख्या धरली तर कॉग्रेसने १८ मुस्लिम उमेदवार का उभे केले नाहीत? की मुस्लिम निवडून येणार नाहीत म्हणुन उभे केले नाहीत? पण त्याचवेळी पक्षाचे उमेदवार मुस्लिम मतांवर निवडून यावेत म्हणुन मोदींच्या विरोधत तो्फ़ा डागणे मात्र जोरात चालू होते. म्हणजेच हिंदू एकत्र आल्याचा तो परिणाम होता. मतांची तेव्हाची आकडेवारी पाहिली तरी त्याचीच साक्ष मिळते. मोदींच्या पक्षाला त्या विधानसभा निवडणुकीत ४९ टक्के मते मिळाली. याचा अर्थच जातीपाती पलिकडे जाऊन हिंदू मतांचा गठ्ठा बनवण्यात मोदी यांनी मोठेच यश मिळवले आहे. त्याच बळावर त्यांनी लागोपाठ तिथल्या निवडणुकीत यश मिळवले आहे. आणि त्या हिंदू मतांच्या प्रभावी गठ्ठ्य़ानेच मुस्लिम एकगठ्ठा मतदान करतात या राजकीय गृहिताला सुरूंग लावला आहे. तो मुस्लिम गठ्ठा मतांचा सिद्धांत अगदी कॉग्रेसनेही गुजरातमध्ये सोडुन दिला आहे. ज्यांना देशात हिंदूत्वाचा प्रभाव वाढू नये असे वाटते, त्यांनी या समिकरणाचा विचार न करून चालेल काय?
मोजक्या जागी तुमच्याकडे मतांचा हुकमी गठ्ठा असेल, तर तुम्ही मोठे यश मिळवू शकता असे आजच्या भारतीय लोकशाहीचे आकडेशास्त्र आहे. उत्तरप्रदेशात अलिकडेच ज्या विधानसभा निवडणुका पार पडल्या, त्यात अवघ्या २७ टक्के मतांच्या बदल्यात मुलायमच्या समाजवादी पक्षाने निर्विवाद बहुमत मिळवले आहे. त्यांच्यापेक्षा अवघी अडिच तीन टक्के मते कमी झाली, तर मायावतींच्या बसपाने शंभराहून जास्त जागा गमावल्या. तिथे भाजपाने पंधरासोळा टक्के मतेच मिळवली तर जागा अवघ्या दहा टक्के मिळाल्या. पण त्याच्या दुप्पट टक्के मते आणि पाचपट जागा मुलायमनी जिंकल्या. हे टक्के व गठ्ठे समजून घेतले तरच कोडे उलगडू शकते. मोदींच्या विजयाची भिती मुलायमना का वाटते, त्याचे उत्तर त्यातच सामावले आहे. मोदींची आक्रमक हिंदू नेता ही प्रतिमा भावली असेल, तर उत्तरप्रदेशाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या पंधरासोळा टक्के मतांमध्ये चक्क दहाबारा टक्के वाढ, केवळ मोदी या नावाने होऊ शकते. हे मुलायम ओळखतात. म्हणूनच त्यांना लगेचच लोकसभा निवडणूक नको आहे. त्यांना भाजपाचे भय नाही, तर मोदी पंतप्रधान पदाचे उमेदवार झाले तरची भि्ती आहे. पण मला त्याच्याशी कर्तव्य नाही. माझा मुद्दा आहे, तो मोदी या नावाभोवती गोळा होऊ लागलेल्या हिंदू मतांच्या गठ्ठ्याशी संबंधित आहे. गुजरातच्या हिंदू मतांच्या गठ्ठ्य़ाने मुस्लिमांच्या गठ्ठा मतांची जादू निकालात काढली आहे. त्यातून तिथल्या मुस्लिम समाजातील आक्रमकता किंवा त्यांचा राजकीय दबाव निष्प्रभ होऊन गेला आहे. देशाच्या राजकारण व सत्तेची सुत्रे ज्या सोनिया गांधींच्या हाती आहेत, त्यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल हे गुजरातचे मुस्लिम नेता म्हणुन मिरवतात. पण त्यांना त्या राज्यात काय स्थान आहे? तिथे कुठला मुस्लिम नेता आज स्वयंभूपणे उभा आहे? गुजरातचा मुस्लिम समाज दिशाहीनच नव्हेतर नेतृत्वहीन होऊन गेलेला नाही काय?
मोदींनी गुजरातचा केलेला विकास, वेगाने केलेली प्रगती, औद्योगिक भरारी, उत्पन्नातील वाढ हे सगळे गुजरातबाहेर दुय्यम मुद्दे आहेत. व्यापारी किंवा उद्योग जगतामध्ये त्यांची तशी प्रतिमा असेल आणि त्याचा एक प्रभाव देशातील मध्यमवर्गावर असू शकतो. पण सामान्य भारतीय किंवा एकू्णच जातिपातीमध्ये विखुरलेला जो हिंदू समाज आहे, त्याच्यासाठी मुस्लिमांपेक्षा जहाल व आक्रमक हिंदू नेता, अशीच एक मोदींची प्रतिमा उभी राहिली आहे. त्याच प्रतिमेची भुरळ गुजरात बाहेरच्या मोठ्या हिंदू लोकसंख्येला पडत चालली आहे. आणि त्याला दहा वर्षापुर्वीच्या दंगलीपेक्षा मधल्या दहा वर्षात मोदींनी मुस्लिम एकगठ्ठा मतांचे समिकरण संपवले, त्याचे अधिक आकर्षण आहे. या हिंदू गठ्ठा मतासमोर गुजरातचा भाजपा पक्षही नामोहरम होऊन गेला आहे. तिथले जुनेजाणते भाजपा नेतेही नामोहरम होऊन गेले आहेत. १९७०-८० च्या दशकात जशी कॉग्रेस म्हणजे इंदिरा गांधी, अशी मानसिकता तयार झाली होती, तशीच हळुहळू मोदींची प्रतिमा तयार होते आहे. सत्तेसाठी हिंदूत्वाची कास सोडलेल्या भाजपाच्या नेतृत्वाला पर्याय म्हणुन देशभरातील धर्मनिष्ठ हिंदु व कडवा भाजपा कार्यकर्ता मोदींकडे आशेने बघतो आहे, त्याचाच हा परिणाम आहे. पण त्याचे व्यापक परिणाम हिंदूंपेक्षा मुस्लिम राजकारणाला भोगावे लागणार आहेत. कारण मध्यंतरीच्या दोनतीन दशकात सेक्युलर म्हणजे मुस्लिम गठ्ठा मतांना शरण जाणे, असे जे चित्र तयार झाले, त्यावरची ही प्रतिक्रिया आहे. म्हणूनच मोदींच्या लोकप्रियतेची चढती कमान हा मुस्लिमांनी गंभीरपणे विचार करण्याचा विषय आहे, असे मला वाटते. सेक्युलर पक्ष वगैरे शुद्ध भंपकपणा आहे. हे गुजरातमध्ये मुस्लिमांना कमी उमेदवारी देऊन कॉग्रेसनेच दाखवून दिले आहे. हिंदू मतांचा गठ्ठा निर्माण झाला मग सेक्युलर म्हणून मिरवणारे तमाम पक्ष मोदींपेक्षा अधिक हिंदूत्ववादी होतील, हे विसरून चालणार नाही. कारण निवडणुकीच्या रिंगणातले पक्ष मतांचे लाचार असतात. मतांच्या गठ्ठ्य़ांचा धर्म कोणता याच्याशी त्यांना कर्तव्य नसते. ( क्रमश:)
भाग ( ४२ ) २६/९/१२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा