कोण हे डॉ. झाकीर नाईक आणि काय आहे त्यांचा युट्युबवरील व्हिडीओ? नाईक यांचा जागतिक पातळीवरील इस्लामिक चळवळीमध्ये मोठा दबदबा आहे. वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर झालेले झाकीर नाईक नंतरच्या काळात धर्मशास्त्राकडे वळले आणि कुराणच नव्हेतर हिंदू व ख्रिश्चन धर्मग्रंथांसह अनेक वैज्ञानिक ग्रंथ संशोधनाचे हवाले देऊन ते कुराण व इस्लामची महती सांगण्याचे कार्य करीत असतात. सर्व धर्माच्या परिषदा भरवून, त्यात अन्य धर्मांच्या संकल्पना खोडून काढण्यात ते कुशल असल्याचे मानले जाते. अनेक धर्माच्या उपदेशकांना परिसंवादात त्यांनी पराभूत केल्याचाही दावा आहे. मात्र ही सगळी कसरत आहे. आपले हुकूमी चहाते व पाठीराखे जमवून टाळ्या मिळवण्यापलिकडे नाईक यांची मजल गेलेली नाही. खरे तर कुठल्याही जादूगाराने किंवा किमयागाराने समोरच्या प्रेक्षकाची मती कुंठीत करून त्याला भारावून टाकावे; असा शो डॉ. नाईक उत्तम प्रकारे पार पाडत असतात. आणि समोर भारावून जायला उत्सुक श्रोतृगण जमा असला, मग फ़ारसे कष्टही घ्यावे लागत नाहीत. त्यात पुन्हा फ़टाफ़ट कुराण, गीता किंवा बायबलच्या अध्याय व श्लोकांचे दाखले क्रमांकासह दिले, मग श्रोता भारावून जाणे सोपे असते. मुद्दे बाजूला रहातात आणि नाईक यांच्या स्मरणशक्तीच्या चमत्काराने श्रोता भारावलेला असतो. त्यातले यश हे बौद्धिक नसून ती किमया मानवी स्वभावाशी खेळण्याच्या कौशल्याची आहे. हे कसे साध्य होते? कुठलीही मुलगी वयात येत असते, तेव्हा तिच्या उपजत वृत्ती तिला सौंदर्याविषयी जागृत करत असतात. अशावेळी आपणही सुंदर आहोत हे ऐकायला ती षोडषवर्षिय मुलगी उत्सुक असते. मग प्रत्यक्षात ती किती का काळी कुरूप असेना. तिला आपल्या सौंदर्याचे गुणगान ऐकायला आवडत असते. एका गाजलेल्या हिंदी चित्रपटातले लोकप्रिय गीत आहे,
‘क्या खुब लगती हो, बडी सुंदर लगती हो’. मग ते शब्द ऐकून ती म्हणते, ‘फ़िरसे कहो, कहते रहो; अच्छा लगता है. जीवनका हर सपना अब सच्चा लगता है’.
हा मानवी स्वभावाचा उपजत गुण आहे. जे ऐकायचे असते ते खरे असायची गरज नसते, तर आवडणारे असावे लागते. आणि आवडणरे असेल तर ते खोटे असले तरी खरे वाटू लागते. ‘सपना सच्चा लगता है’. डॉ. झाकीर नाईक जी गर्दी समोर जमवतात, तिला आवडणारे सांगू लागतात आणि मग ते वास्तवात खरे व योग्य असण्याची गरज उरत नाही. भुरळ घालणारे असावे, याची ते मस्त पेरणी करतात. त्यातून अन्य धर्मापेक्षा इस्लाम हा कसा श्रेष्ठ व परिपुर्ण आहे, तेच समोर जमलेल्या श्रद्धावंतांना ऐकायचे असते. ते नुसते कुराण वा हादीसमधील दाखले देऊन शक्य नसते, तेवढे अन्य धर्मग्रंथ व पुराणकथेतील पोकळ्या सांगून शक्य असते. झाकीर नाईक यांनी ते कौशल्य छानपैकी आत्मसात केले आहे. आणि त्याचे उत्तम मार्केटींग केले आहे. पण म्हणून ते सर्वकाही सत्य बोलतात वा सांगतात असे मानायचे कारण नाही. उलट डॉ. झाकीर नाईक किती धडधडीत सफ़ाईदार खोटे व अर्धसत्य बोलतात, त्याचाही दाखला आहे. एका अभ्यासू तरूणाचा हा व्हिडीओसुद्धा युट्यूबवर उपलब्ध आहे. नाईक यांच्या विधाने व दावे यांचे पुरते पोस्टमार्टेम केलेले आहे. अवघ्या पाच मिनिटात झाकीर नाईक तब्बल पंचवीस असत्ये कथन करतात; हे त्याने उदाहरणे व दाखले देऊन सिद्ध केले आहे. पण त्याच्याकडे नाईक यांच्यासारखी मार्केटींगची यंत्रणा नाही. म्हणूनच त्याचा फ़ारसा गवगवा होत नाही. या तरूणाने नाईक यांच्या पाच मिनिटाचा व्हिडीओ घेऊन एक एक वाक्य आणि त्यातला दावा तपासून पुराव्यानिशी खोटा पाडला आहे. तोही व्हिडीओ युट्युबवर उपलब्ध आहे. पण त्याला खोटा पाडायचे कष्ट कधी नाईक यांनी घेतलेले नाहीत.
माझा नाईक यांच्या बाजारीकरणावर आक्षेप नाही. त्यांनी आपले दुकान जरूर चालवावे. पण ते दुकान चालवताना भारतीय वा अन्य कुठल्या देशातील समाज घटकांमध्ये वितुष्ट येणार नाही व त्यातून हिंसा भडकणार नाही, याची मर्यादा पाळावी. दुसर्याच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची काळजी घ्यावी. आपल्या धर्म किंवा धर्मश्रद्धा श्रेष्ठ ठरवण्यासाठी अन्य कोणाच्या धर्मभावना व श्रद्धांची अवहेलना करण्याचे कारण नाही. ज्या व्हिडिओबद्दल मी याआधी लिहिले आहे, त्यात नाईक हिंदूंच्या भावना दुखावण्याचे आवाहन नाईक करतात आणि तसे न करणार्या मुस्लिमांना डिवचतात, ही गंभीर बाब आहे. आपला हिंदू मित्र दुखावेल म्हणुन किंवा आपल्या दुकानात येणारा हिंदू ग्राहक दुखावेल म्हणुन मुस्लिम धर्मविषयक सवाल त्यांना विचारत नाहीत, अशी तक्रार करून डॉ. नाईक काय साध्य करू बघत आहेत? ते स्पष्ट शब्दात मुस्लिमांना सवाल करतात, तुम्हाला आपल्या अल्लाहच्या श्रद्धेपेक्षा हिंदूची मैत्री प्यारी आहे काय? अल्लाहबद्दलची श्रद्धा अन्य कुणा धर्मियाच्या श्रद्धा दुखावूनच सिद्ध होत असते काय? हे कुठले तर्कशास्त्र आहे? ही दोन धर्मियातील मैत्रीभाव बंधूभाव उध्वस्त करण्याची ती चिथावणीच नाही काय? थोडक्यात नाईक कोणते आवाहन करीत आहेत? अलाह प्यारा असेल तर त्याच्यासाठी हिंदूच्या धर्मश्रद्धा दुखावणे अगत्याचे आहे. त्याचा व्यवहारी अर्थ असा, की मैत्री किंवा व्यवसाय दुय्यम असून धर्मासाठी कुणाशीही वैरभावना जोपासली पाहिजे. आणि तसे करणार नसाल तर मुस्लिम म्हणुन घ्यायला तुम्ही नालायक आहात. ही धर्मविद्वेषाची चिथावणी नाही काय?
व्यवहारी जीवन आणि धर्मचिकित्सा यांच्या जागा वेगवेगळ्या असतात. नाईक असे सवाल ज्या प्रेक्षक श्रोत्यांसमोर करतात, ते चर्चेचे व्यासपीठ असते. आणि त्यातील नाईक यांचे आवाहनानुसार श्रोत्यांनी वागायचे तर कृती व्यवहारी क्षेत्रात होणार असते. म्हणजे हिंदू मित्राला मुस्लिमाने मैत्री बाजूला ठेवून दुखावणे असते. आपल्या दुकानात आलेल्या ग्राहकाला माल देण्याऐवजी धर्मचिकित्सा त्या मुस्लिम दुकानदाराने करायची काय? ती चिकित्सा त्याला ग्राहक व मित्रापासून तोडणारी नसेल काय? त्या मैत्रीत व व्यवहारात त्यातून बाधा येणार नाही काय? मग यातून काय साधले जाणार असते? नाईक तरी नेमके काय साधू पहातात? समोरचा जो हिंदू मित्र असेल, तर तो कसा प्रतिसाद देईल; तेही नाईक यांनी कथन केले आहे. पण तसाच प्रतिसाद येईल याची खात्री नाही. ‘अरे जाने दो झाकीर, वोह तो कहानी है’ असे एखादा संयमी हिंदू म्हणू शकेल. पण तो संयमी नसला तर? आणि त्यानेही तसेच दुखावणारे प्रत्युत्तर मुस्लिम मित्र वा दुकानदाराला तिथल्या तिथे दिले मग? त्यातून मुस्लिमाच्या भावना दुखावणार ना? मग तो मुस्लिम समजूतदार वा संयमी नसला तर काय परिणाम संभवतात? की तेच नाईक यांना अपेक्षित आहे? नौशादभाई नेमके त्याच दुखण्यावर बोट ठेवतात. झाकीर नाईक यांच्यासारखे ‘तथाकथित मुस्लिम’ इस्लामची प्रतिमा खराब करत असतात. कारण नसताना गुण्यागोविंदाने नांदणार्या दोन समाजात विष कालवत असतात. पण त्यांना वेळच्यावेळी आवर घातला जात नाही किंवा लगाम लावला जात नाही, तेव्हा काय होते?
‘तथाकथित मुस्लिमांच्या वाईट कृत्यांना संपूर्ण समाजाच्या व पर्यायाने इस्लामच्या नावावर चिटकवले जाते. त्यामुळे समाजात आंतरधर्मिय तेढ निर्माण होऊन देशात अराजकता पसरते. मग दंगली, लाठीचार्ज, गोळीबार, संचारबंदी, सूडचक्र, खून, अत्याचार, नरसंहार वगैरे-वगैरे...’ असे नौशादभाईच म्हणतात. आणि म्हणुन मी डॉ. झाकीर नाईक यांच्या व्हिडीओचा इथे उहापोह केला. एकीकडे हेच नाईक मुंबई व अनेक जागी विविधधर्मिय शांतता परिषदा भरवतात. मुंबईत तर डोळे दिपवणारा समारंभ ते दरवर्षी साजरा करतात. आठवडाभर चालणार्या त्यांच्या त्या सोहळ्याला जगभरातून मुस्लिम विचारवंत धर्मोपदेशक हजेरी लावतात. म्हणजेच झाकीर नाईक ही दुर्लक्ष करण्यासारखी व्यक्ती नाही. म्हणुनच त्यांच्या वक्तव्याकडे काणडोळा करता येणार नाही. कारण चिथावणार्या शब्दांची जादू झूंडींना आवडत असते आणि झूंडीने असे शब्द उचलले; मग ते विध्वंसक हत्यारापेक्षाही हानिकारक ठरू शकतात. नौशादभाईंना व अन्य मुस्लिम बुजूर्गा्ना म्हणुनच माझी विनंती आहे, की त्यांनी मुस्लिम समाजातील ही समस्या ओळखली आहे, तर तिचे निराकरण करण्यातही पुढाकार घ्ययला हवा आहे. ते ज्यांना डुप्लीकेट मुस्लिम म्हणतात, त्यांच्या चिथावण्यांनी विपरित प्रसंग ओढवू शकतात. मग अशा हिंदूमधील प्रवृत्तीला रोखायला जसे अनेक सुबुद्ध हिंदू पुढाकार घेतात, तसाच एक मुस्लिमांचा आक्रमक सुबुद्ध वर्ग मजबूत करणे अगत्याचे झाले आहे. तसे झाले तर आझाद मैदानसारख्या घटना घडणारच नाहीत आणि मग त्याच्यावर प्रक्षुब्ध प्रतिक्रिया उमटण्याचा धोकाही आपोआपच संपुष्टात येईल. ( क्रमश:)
डॉ.नाईक विरोधातला व्हिडीओचा इंटरनेट दुवा- http://www.youtube.com/watch?v=6Bnqp3tI484
भाग ( ३६ ) २०/९/१२
I appreciate sensible talking by Mr. Bhau Torsekar. More and more people (both Hindus and Muslims) should read these articles.
उत्तर द्याहटवाडॉ नाईक यांनी त्या video मध्ये बोलतात कि प्रसाद खाल्याने मुसलमानाचा अल्ला वरील प्रेम कमी होतो.....माझा त्यांना एकच प्रश्न आहे...त्यांच्या घरी जर तेह आईच्या हातच जेवल केल कि बायको वरील प्रेम कमी होतो का?? तस होणार नाही हे साहजिकच...म्हणून जर प्रसाद खाला तर हिंदू देवावर प्रेम वाढणार आणि अल्ला बद्दल प्रेम कमी होणार असले तर्क कोणी शिकवले त्यांना....
उत्तर द्याहटवा