गेल्या शनिवारी मला एका मुस्लिमाचा फ़ोन आला होता. तो हिंदीत बोलत होता. मी कुराण वाचले आहे काय, असा सवाल त्याने केला. त्यावर मी होकार देताच त्याने उलट सवाल केला, की कुराण वाचूनही तुम्हाला इतक्या शंका कशाला येतात? मग मी त्याला उलटा प्रश्न विचारला, की त्याने खरेच कुराण वाचले आहे काय? आणि वाचले असेल तर मी या लेखमालेत असे काय लिहिले, की जे कुराणाची अवज्ञा करणारे आहे? तर त्याच्याकडे उत्तर नव्हते. पण त्याने आपली मळमळ व्यक्त करून फ़ोन बंद केला. त्याचे म्हणणे एकच होते, मी मुस्लिमांविषयी इतके सवाल का उपस्थित करतो आहे? तो हिंदीत बोलत होता. त्यामुळे मी मराठीत काय लिहितो, याचा बहुधा त्यालाही पत्ता नसावा. मात्र मी मुस्लिमांच्या वर्तनाबद्दल काही शंका उपस्थित करतो आहे एवढेच त्याला कळलेले असावे. पण त्याची दुसरी बाजू अशी, की तो धर्मनिष्ठा दाखवत असला तरी त्यालाच धर्म म्हणजे काय व त्याचे गांभिर्य काय त्याचा थांगपत्ता नव्हता. पण जेव्हा असे लोक मुस्लिमांचा चेहरा म्हणून अनुभवास येतात, तेव्हा नवनव्या समस्या निर्माण करत असतात. त्याच्याशी संवाद झाल्यावर मला एका इस्लामी वेबसाईटची आठवण झाली. इस्लामदर्शन असे त्या संकेतस्थळाचे नाव आहे. अत्यंत सोप्या मराठी भाषेत तिथे मराठी वाचकाला इस्लाम समजून घेण्यासाठी मदत होऊ शकते. माझेही ‘पुण्यानगरी’मधले एकदोन लेख तिथे पुनर्प्रकाशित केलेले आहेत. शिवाय एका लेखासंबंधाने प्रतिवादही केलेला होता. तिथे मुस्लिम कोणाला म्हणावे याचे उत्तम मार्गदर्शन आहे. त्यानुसार हा जो कोणी मला फ़ोन करणारा आहे, तो मुस्लिम ठरत नाही. उलट त्याला डुप्लिकेट मुस्लिम म्हणायला हवे. किंबहूना असेच लोक मोठ्या प्रमाणात इस्लाम व मुस्लिमांबद्दल विकृत प्रतिमा निर्माण करतात, असे म्हणायला हरकत नाही. नौशाद उस्मान नावाचे ‘शोधन’ साप्ताहिकाचे काम करणारे गृहस्थ आहेत. एकदा त्यांनी मला फ़ोन करून गप्पासुद्धा केल्या होत्या. यांनी तिथे दिलेल्या विवरणाचा हा उतारा छान आहे.
‘मुस्लिम म्हणजे कोण? आता तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न झाला. मुस्लिम म्हणजे मुस्लिमाच्या पोटी जन्मलेली किंवा अरबी-उर्दु नाव असलेली व्यक्ती म्हणजे मुस्लिम, हा गैरसमज आहे. इतर अनेक धर्मांविषयी ही गोष्ट खरी असू शकते, परंतु इस्लामची भूमिका यापेक्षा वेगळी आणि तर्कसंगत आहे. ही भूमिका फक्त आमच्या मुस्लिमेतर बांधवांनाच नव्हे तर बहुसंख्य मुस्लिमांना देखील माहित नाही. त्यामुळे काही तथाकथित मुस्लिमांच्या वाईट कृत्यांना संपूर्ण समाजाच्या व पर्यायाने इस्लामच्या नावावर चिटकवले जाते. त्यामुळे समाजात आंतरधर्मिय तेढ निर्माण होऊन देशात अराजकता पसरते. मग दंगली, लाठीचार्ज, गोळीबार, संचारबंदी, सूडचक्र, खून, अत्याचार, नरसंहार वगैरे-वगैरे...! समाजात शांती हवी असेल तर आम्ही एकमेकांना समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी थोडा वेळ खर्च करणे अगत्याचे आहे. सर्वात जास्त गैरसमज असलेल्या इस्लाम व मुस्लिम समाजाला आपण समजून घेऊ या.’
इस्लामचा धर्मानुयायी व अभ्यासक असूनही नौशाद यांची शैली किती नम्र आणि प्रामाणिक आहे बघा. एका बाजूला नुसतेच चिडून फ़ोनवर वाटेल ते मला ऐकवणारे व धर्माभिमानाचा देखावा करणारे आणि दुसरीकडे आपल्या धर्मतत्वाची ओळख दुसर्यांना व्हावी म्हणून प्रामाणिक प्रयत्न करणारे, यात असा जमिन अस्मानाचा फ़रक असतो. इथे नौशादभाई म्हणतात, मुस्लिम असण्यामागची ‘भूमिका फक्त आमच्या मुस्लिमेतर बांधवांनाच नव्हे तर बहुसंख्य मुस्लिमांना देखील माहित नाही’. आणि त्यातून काय होते? ‘त्यामुळे काही तथाकथित मुस्लिमांच्या वाईट कृत्यांना संपूर्ण समाजाच्या व पर्यायाने इस्लामच्या नावावर चिटकवले जाते. त्यामुळे समाजात आंतरधर्मिय तेढ निर्माण होऊन देशात अराजकता पसरते. मग दंगली, लाठीचार्ज, गोळीबार, संचारबंदी, सूडचक्र, खून, अत्याचार, नरसंहार वगैरे-वगैरे...’
म्हणजेच दोन्ही बाजूच्या अडाणीपणातून शंका व संशयाला जे खतपाणी घातले जाते, त्याचेच विपरित परिणाम आपण बघत असतो. नुसता मुस्लिम मातापित्यांच्या पोटी जन्माला आल्यामुळे कोणी मुस्लिम असू शकत नाही. त्याला मुस्लिम व्हायचे असेल व रहायचे असेल, तर त्याने ईश्वरी आज्ञांचे काटेकोर पालन करायलाच हवे. त्यातून सुटका नसते किंवा सुट घेता येत नाही. आणि अशी सुट कोणी घेत असेल तर तो खरा मुस्लिमच नाही. तर तो डुप्लिकेट मुस्लिम आहे असेही नौशादभाई म्हणतात. आणि मला वाटते ही अशी जी डुप्लिकेट मंडळी आहेत, तीच समाजात वितुष्ट निर्माण करत असतात. ज्याचे परिणाम एकू्णच समाजाला भोगावे लागत असतात. आणि तिथेही सत्य सांगण्यापासून नौशादभाई पळवाट शोधत नाहीत. अत्यंत प्रामाणिकपणे ‘तथाकथित मुस्लिमांच्या वाईट कृत्यांना संपूर्ण समाजाच्या व पर्यायाने इस्लामच्या नावावर चिटकवले जाते. त्यामुळे समाजात आंतरधर्मिय तेढ निर्माण होऊन देशात अराजकता पसरते’, असे सत्य सांगुन टाकतात. मला वाटते नौशादभाईसारख्या मुस्लिमांचा चेहरा जगासमोर आणि एकूण लोकसंख्येसमोर येण्याची गरज आहे. जो चेहरा मुस्लिम आहे, तसाच समजूतदार व सुसंस्कृत आहे. माध्यमांनी असे चेहरे अधिकाधिक प्रसिद्धी देऊन लोकांसमोर आणले पाहिजेत. ज्यांना सनसनाटी विधाने करता येणार नाहीत, की खळबळ माजवता येणार नाही. पण समाजामध्ये सामंजस्य निर्माण करण्याची क्षमता ज्यांच्यामध्ये आहे. दु्र्दैव इतकेच, की त्यांना समोर आणलेच जात नाही. त्याऐवजी जे स्फ़ोटक भडक बोलतात, त्यांनाच पुढे आणले जाते. म्हणूनच जेवढे ते डुप्लिकेट तथाकथित मुस्लिम या गैरसमजाला जबाबदार आहेत, तेवढीच माध्यमे सुद्धा दोन समाजातील वितुष्टाला कारणीभूत आहेत असे मी मानतो.
माझे लिखाण असो, की नौशादभाईंसारखे लेखक अभ्यासक असोत, आमच्यात अनेक मतभेदाचे मुद्दे आहेत. पण आम्ही जेव्हा बोललो, तेव्हा अत्यंत मनमोकळे बोललो होतो. कुठेही कटूता नव्हती. एकमेकांना न पटणारे मुद्दे असतातच, पण संवाद तर सुरू होतो. जसजसे तुम्ही संवाद करू लागता तसे विवादातूनही काही सुसंवादाचे मुद्दे सापडू लागतात. अनेकदा आपण जे मुस्लिम नेते वा पत्रकार शहाणे वाहिन्यांवर बघतो, ते सहसा मुस्लिमातील गैरवृत्तीचे लोक इस्लाम कसा बदनाम करतात, त्यावर बोलत नाहीत. उलट हिंदू संघटनांवर खापर फ़ोडण्यात धन्यता मानतात. मग दुसरी बाजू तेवढ्याच आग्रहपुर्वक यांच्या दोषावर बोट ठेवू लागते. इथे नौशादभाईंनी कुठेही अन्य धर्मियांच्या दोषावर बोट न ठेवता मुस्लिमातील दोषाकडे ठामपणे अंगुलीनिर्देश केला आहे. मग त्यांच्याविषयी कुठला हिंदूत्ववादी सुद्धा शंका घेऊ शकणार नाही. त्यालाही निमुटपणे आपल्यातल्या दोषांचा स्विकार करणे भाग पडेल. तिथूनच खरी देवाणघेवाण सुरू होऊ शकते. पण अशी चर्चा किंवा विवाद व संवाद मुख्य प्रवाहातील माध्यमातून होऊच दिला नाही तर एकमेकांवर दोषारोप खुप होतात. पण संवादाला सुरूवातच होत नाही. आणि त्या बाबतीत असे दिसेल, की माध्यमात दोन्ही बाजूंमध्ये संघर्ष पेटवण्याची मनोवृत्तीच अधिक दिसते. हिंदू असो की मुस्लिम त्यांच्यातला को्ण स्फ़ोटक बोलला, तेच वाक्य काढून जास्त प्रसिद्धी दिली जात असते. आणि नौशादभाईंसारखे लोक बाजूला फ़ेकून दिले जात असतात.
मला खात्री आहे. मी आज इथे इस्लामदर्शन किंवा नौशादभाईंच्या लिखाणाचा जो उतारा दिला आहे, तो वाचून अनेक मराठी वाचकच नव्हेतर हिंदूत्ववादी सुद्धा थक्क होतील. कारण त्यांच्यापैकी कोणी इतके स्पष्ट शब्दात मुस्लिमांचे दोष इस्लामी प्रकाशनात सहसा वाचलेले नसतील. उलट मुस्लिमांच्या भावना दुखावण्यातच धन्यता मानणार्या काही बंडखोर लेखकांचा समावेश होऊ शकतो. तस्लिमा नसरिन किंवा रश्दी यांच्या इतकीच नौशाद उस्मान यांना प्रसिद्धी मिळू शकली तर? पण मुख्य प्रवाहातील माध्यमांमध्ये सहसा असे होत नाही. तिथे एका बाजूला अबू आझमी यांच्यासारखे चिथावणीखोर किंवा दुसरीकडे रश्दीसारखे डिवचणारेच मुस्लिम समोर आणले जातात. किंबहूना मुस्लिमांचा समजूतदार चेहरा समोर येऊच नये, अशी काळजी माध्यमे घेतात की काय अशी कधीकधी शंका येते. की त्या डुप्लीकेट मुस्लिमांचा चेहरा समोर आणून मुस्लिम समाजाला एकुणच बदनाम करण्याचे सेक्युलर कारस्थान शिजलेले आहे? त्यात हिंदू मुस्लिमांच्या कोंबड्या झुंजवून मताचे राजकारण करण्यासाठी ते कारस्थान राबवले जात असते? ( क्रमश:)
भाग ( ३५ ) १९/९/१२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा