कालच्या लेखामध्ये मी सय्यद इफ़्तिकार यांच्या विवरणाचा हवाला दिला होता. तो अनेकांना थक्क करणारा असेल. पण तेच वास्तव आहे. मुस्लिमेतर ज्याला सेक्युलर विचारसरणी किंवा आधुनिक राज्यव्यवस्था म्हणतात, ती इस्लामला अजिबात मान्य नाही. निदान ज्याला इस्लामचे धर्मपालन करायचे आहे, त्याला तरी ती मान्य नाही, असे जगभरच्या अनेक मुस्लिम विचारवंताचे मत आहे. आणि ते मान्य करून वा समजून घेऊन, आपण मुस्लिमांच्या वर्तनाकडे बघितले तर अनेक प्रश्नांचा उलगडा होऊ शकतो. आणि भारतातल्याच नव्हेतर जगभरच्या मुस्लिमांचे वर्तन तसेच दिसेल. भारतात रहायचे आणि राज्यघटना व कायदे जुमानायचे नाहीत, हे भयंकर तर्कशास्त्र आहे असे कोणीही म्हणेल. कारण नागरिक देशाचा असतो आणि तिथले कायदे त्याला मानायलाच हवेत, असे आपले ठाम मत असते. अशी आपली श्रद्धा असते. पण मुस्लिमांना तसे मानायची मुभा त्यांचा धर्म देतो का? आपण आधुनिक जमान्यात ज्याला राष्ट्र म्हणतो ती राष्ट्राची संकल्पना इस्लामला मान्य आहे काय? सय्यद इफ़्तिकार यांनी त्यावरही मार्गदर्शन केलेले आहे. शेषराव मोरे यांच्या पुस्तकातील त्या प्रदिर्घ अभिप्रायामध्ये सय्यद इफ़्तिकार यांनी राष्ट्र या संकल्पनेवर काय विचार मांडलेत ते वाचा, मग मुस्लिमांच्या किंवा तुमच्या स्वत:च्या राष्ट्रप्रेमाबद्दल तुमच्या मनातले सर्व आक्षेपच निकालात निघतील. इफ़्तिकार लिहितात,
‘राष्ट्र आणि राष्ट्रवादाची नवी कल्पना पाश्चिमात्यांनी औद्योगिक क्रांती नंतर प्रचलीत केली आहे. त्याला ते आधुनिक म्हणतात. त्यांनी दिलेल्या व्याख्याच खर्या आहेत, असे त्यांनी सर्व जगाला पटवून दिले आहे. आम्हीही (इथे आम्ही म्हणजे इफ़्तिकार यांना सर्वसामान्य भारतीय नागरिक असे सुचवायचे आहे)त्यांच्या या कल्पनांना बळी पडलो आहोत. राष्ट्राची व्याख्या आजपर्यंत कुणी अचुक मांडलेली नाही. कारण राष्ट्राच्या सीमा किंवा त्यांची चौकट सतत बदलत असते. राष्ट्र म्हणजे एका व्यक्तीची विस्तारित ओळख. त्या ओळखीमागची त्याची अस्मिता सतत बदलत असते. राष्ट्राशी आपल्याला संबंधित करणे (Identify) हाच एका व्यक्तीचा उद्देश असतो. त्याचे स्वत:चे अस्तित्व टिकवणे, त्याचे जतन करणे हेच त्याचे संबंध जोडण्यामागचे अंतिम ध्येय असते. म्हणून राष्ट्र किंवा राष्ट्रवादाची प्रवृत्ती वरचेवर संकुचित होऊन शेवटी एका व्यक्तीपर्यंत सीमित होत जाते. जेव्हा समोर मोठे संकट असते, तेव्हा राष्ट्रवादाची कल्पना व्यापक बनते. ते उद्दिष्ट साध्य झाले, की वेगवेगळ्या अस्मिता आपले डोके वर काढतात."
इथे इफ़्तिकार काय समजावून देत आहेत? ज्याला आपण राष्ट्र म्हणतो, त्याची काही अचुक व्याख्याच नाही. आणि राष्ट्र ही संकल्पना पाश्चात्यांची आहे. ती आपली भारतिय कल्पना नाही. त्यामुळेच त्याची आज सर्वमान्य असलेली व्याख्याही आपली नाही. एकदा हे मान्य केले, मग राष्ट्र आणि त्याच्या भौगोलिक सीमाच नि्रर्थक होऊन जातात. मग काश्मिरातला मुस्लिम पाकिस्तानशी निष्ठा का दाखवतो, या प्रश्नाला अर्थच उरत नाही. दुसरीकडे म्यानमारमधल्या मुस्लिमासाठी इथे मुंबईत मुस्लिम रस्त्यावर का उतरतात, त्याचेही रहस्य उलगडू शकते. कारण मुस्लिम आहेत ते राष्ट्र नावाची भौगोलिक सीमा व तिची व्याख्याच मानत नाही. मग त्या संकल्पनेशी निष्ठावान असण्याला अर्थ कुठे उरतो? इथे आणखी एक उदाहरण देणे योग्य ठरावे. पाकिस्तानी क्रिकेट संघाचा कर्णधार शोएब मलिक याने २००७ साली विश्वचषक टी-२० क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तान पराभूत झाल्यावर काढलेले उद्गार. तेव्हा अंतिम सामन्यात पाकिस्तानचा भारताकडून पराभव झाला. त्यावर बोलताना शोएब मलिक याने जगाभरच्या मुस्लिमांची माफ़ी मागितली होती. त्याचे काय कारण? त्यामागची मानसिकता कोणती? पाकिस्तानचा क्रिकेट संघ जगभरच्या मुस्लिमांचा संघ असू शकतो काय़? आणि तसे असेल तर मग भारताचा पराभव होऊन पाकिस्तान जिंकला असता तर तो जगभरच्या मुस्लिमांसाठी विजय ठरणार होता काय? मग भारतीय संघामध्ये जे मुस्लिम खेळाडू सहभागी होते त्यांचे काय? युसूफ़ व इरफ़ान पठाण असे बडोद्याचे दोन मुस्लिम भाऊच भारतीय संघात होते. मग त्यांनी भारताला मिळवून दिलेला विजय कोणाचा होता? मलिकने असे का बोलावे?
शोएब मलिक जे बोलला त्यालाही त्याचा तर्कशुद्ध खुलासा करता येणार नाही. तेव्हा त्याच्यावर बरीच टिका झाली होती. कारणही उघड होते. एकट्या भारताच्या संघातच मुस्लिम खेळाडू नव्हते, तर दक्षिण आफ़्रिका व अन्य संघातही मुस्लिम खेळाडूंचा समावेश होता. बांगला देशाच्या संघातही जवळपास सगळेच खेळाडू मुस्लिम होते. मग शोएबला काय म्हणायचे होते? तो अंतिम सामना मुस्लिम देश आणि मुस्लिमेतर देश यांच्यातला असल्याने मुस्लिमांचा जागतिक पराभव झाला असे त्याला म्हणायचे होते काय? जर तो मुस्लिमांचा जय किंवा पराजय असेल तर मग मुस्लिमाचे राष्ट्र तरी कुठले मानायचे? पाकिस्तान की बंगला देश? सौदी अरेबिया की इराक? कुठला देश मुस्लिमांचा असतो आणि त्यांच्या राष्ट्रनिष्ठा कशा सिद्ध व्हायच्या? शोएब मलिकने भारतीय मुस्लिमच नव्हेत तर जगभरच्या कुठल्याही देशात वास्तव्य करणार्या मुस्लिम नागरिकाच्या राष्टीयत्वावर प्रश्नचिन्ह लावले की नाही? त्याला मुर्ख म्हणायचे तर मग सय्यद इफ़्तिकार यांच्या्सारख्या इस्लामी धर्मपंडीताच्या विवेचनाचे काय करायचे? कारण इस्लामला आधुनिक राष्ट्रीय संकल्पना किंवा त्याची भौगोलिक व्याख्याच मान्य नाही, असे त्यांचे प्रतिपादन आहे. हे इस्लामचे वेगळेपण आपण लक्षात घेत नाही, म्हणुन मग अमूक बाबतीत कोणी मुस्लिम असा का वागला, त्याबद्दल आपल्या मनात शंका निर्माण होतात. मग बिचारा इर्फ़ान पठाण किंवा युसूफ़ पठाण आपल्या देशाच्या संघासाठी कडी मेहनत करून विजय मिळवून देतो, त्याला काय म्हणायचे? तो सच्चा मुस्लिम रहात नाही काय? शंका शेकडो असतात आणि त्यांची तर्कशुद्ध उत्तरे नसतात, मग अधिकच गोंधळ उडत असतो. इफ़्तिकार म्हणतात ते मान्य करू, की राष्ट्राची आधुनिक व्याख्या पाश्चात्यंनी तयार केली व आपल्या गळ्यात बांधली आहे. पण त्यानुसारच आजचा भारत देश उभा आहे व त्यानुसारच संमत केलेल्या राज्यघटनेनुसार त्याचा कारभार चालविला जाता आहे ना? मग त्याचे काय करायचे? ते कायदे किंवा ती घटना भारतातल्या मुस्लिमांनी मान्य करून जगावे की नाही? ती मान्य करण्यात मुस्लिमांच्या धर्मपालनाला बाधा येत असेल तर काय करायचे?
हे प्रश्न मी मुद्दाम विचारतो आहे कारण हेच प्रश्न सतत बोलले जात असतात आणि त्याची उत्तरे दिली जात नाहीत वा स्पष्ट केली जात नाहीत. उलटसुलट खुलासे येतात. त्यातून शंका निर्माण होतात. मग अब्दुल हमीदसारख्या शुरवीर जवानाचे हौतात्म्य बाजूला पडते. एका मुस्लिमाने देशासाठी गाजवलेला पराक्रम नजरेआड होतो आणि कोणी बॉम्ब फ़ोडले, घातपात केले त्याचाच गाजावाजा अधिक होतो. आणि असा गोंधळ हिंदू किंवा मुस्लिमेतरांचाच होत नाही, तर सामान्य मुस्लिमाचाही होतो. त्यालाही आपल्या राष्ट्रनिष्ठा आणि धर्मनिष्ठा यांच्यात कशाला प्रभूत्व, प्राधान्य द्यावे, त्याबद्दल स्पष्ट उत्तर नसते. एकूण सामाजिक घडामोडींपासून मुस्लिम वेगळा पडत जातो. मुख्य प्रवाहापासून दूर फ़ेकला जातो. मग त्याला जबाबदार कोण? स्वत:च अलिप्त राहू बघणारा मुस्लिम समाज, की त्याला मुख्यप्रवाहापासून अलिप्त ठेवणारे त्याचे धार्मिक नेतृत्व? आणि हे मुद्दाम मी इथे विचारतो आहे, कारण तो विषय आपल्या देशापुरता किंवा हिंदू-मुस्लिम संबंधापुरता मर्यादीत नाही. तो जागतिक विषय बनू लागला आहे. इथे असा विषय निघाला, मग कुणा संघ परिवार वा हिंदूत्ववाद्यांकडे बो्ट दाखवले जाते. पण मग जिथे हिंदू धर्माचे नावनिशाण नाही व जे प्रगत विकसित युरोपीय देश आहेत, तिथल्या अत्यल्प मुस्लिम लोकसंख्येचा कोणाशी कशाचा संघर्ष चालू आहे? मुस्लिमेतर राष्ट्रे वा देशात अलिकडे अशा घटना वारंवार घडत आहेत. त्यातून मुस्लिम एकाकी पडू लागला आहे. त्यामुळेच अशा प्रश्नांची उत्तरे शोधणे अगत्याचे बनू लागले आहे. कारण जगभर या विषयाचे रुपांतर मुस्लिम व मुस्लिमेतर असे होत चालले आहे. यातल्या अनेक युरोपियन देशात सांस्कृतिक विविधतेसाठी अरेबियन अफ़्रिकन देशातून मुस्लिम स्थलांतरणाला प्राधान्य देण्यात आले. ज्यांनी मुस्लिमांच्या मोठ्या लोकसंख्येला अगत्याने आपल्या देशात सामावून घेण्याचा प्रयत्न केला, तिथल्या लोकांशी स्थलांतरीत मुस्लिमांचा संघर्ष होण्याची काय कारणे असू शकतात? स्विटझर्लंड सारख्या देशात एका भव्य मशिदीच्या मिनाराची उंची किती असावी, यावर सार्वमत घेण्याची वेळ का यावी? सेक्युलर व उदारमतवादी देशांची मुस्लिमांकडे बघण्याची नजर का बदलत आहे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे म्हणुनच अगत्याची होत चालली आहेत. त्याचे काही दुवे सय्यद इफ़्तिकार यांच्या विधानांमध्ये मिळू शकतात. इस्लाम ही स्वतंत्र सामाजिक, राजकीय जीवनव्यवस्था असण्याशी या जगभर आढळणार्या बेबनावाचा संबंध येतो का? ( क्रमश:)
भाग ( ४६ ) १/१०/१२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा