आज मी लेखमालेच पुढला भाग लिहायला बसलो होतो आणि खरेच मला आश्चर्याचा धक्का बसला. कारण सोमवार होता आणि जे रोज लेख पाठवायचे असतात त्याची इमेल करण्यासाथी इंटरनेट लावले. सहज म्हणून सवयीनुसार आधी फ़ेसबुकवर नजर टाकली तर कोणी तरी अब्दुल हमीदचे छायाचित्र त्यावर टाकले होते. आजच्या तरूण पिढीला कदाचित हे नाव ऐकल्यासारखे वाटणार नाही. पण त्या छायाचित्रातला तो नुसता चेहरा पाहिला आणि माझे मन एकदम भूतकाळात साडेचार दशके मागे गेले. तेव्हा मी शाळकरी विद्यार्थी होतो. तेव्हाची अकरावी म्हणजे मॅट्रीकच्या वर्गात होतो. १९६५ सालची गोष्ट आहे. लालबहादूर शास्त्री भारताचे पंतप्रधान होते आणि नवेच होते. तेव्हा अचानक पाकिस्तानने भारतावर हल्ला केला आणि युद्धच सुरू झाले. शाळकरी वयात फ़ारसे काही कळत नव्हते. पण आपल्या सैनिकांच्या पराक्रमाच्या बातम्या वाचताना मनाला खुप बरे वाटत होते. राष्ट्राच्या अभिमानाने छाती फ़ुगत होती. त्याच युद्धात अनेक पराक्रम भारतीय सैनिकांनी केले खरे. पण बातम्यातून वाचलेली त्यांची सगळीच नावे माझ्याही लक्षात राहिलेली नाहीत. त्याला अपवाद आहे तो अब्दुल हमीद. त्याचा वृत्तपत्रात छापून आलेला चेहरा आणि पराक्रम विसरताच आलेला नाही. त्याने एकट्याने खेमकरण विभागात पाकिस्तानी रणगाड्यांचे आक्रमण रोखताना केलेली शहादत विसरता येण्य़ासारखी नाही. सोबतचे अन्य सहकारी जखमी झाले व मारले गेले असताना एकट्याने लढताना अब्दुल हमीदने पाकिस्तानचे जगप्रसिद्ध अमेरिकन बनावटीचे चार पॅटन रणगाडे उध्वस्त केले होते. हाताशी तोफ़ नाही, मोठे बॉम्ब नाहीत किंवा रॉकेट लॉंचर्स नाहीत. तर साधे हातगोळे घेऊन पाक सेनेच्या आक्रमणावर अब्दुल हमीद एकटाच चाल करून गेला. त्याने आत्मबलिदान केले. पण पाक रणगाड्यांना बाजी मारू दिली नव्हती. त्याचे नाव अब्दुल हमीद होते, म्हणजे तोही मुस्लिम होता, पण अस्सल भारतीय होता. त्याचा मरणोत्तर परमवीर चक्र देऊन सन्मान करण्यात आला. ज्या उराशी जपलेल्या बहुमोल आठवणी आहेत, त्यातली ही एक जीवाभावाची आठवण आहे. आज वयाची साठी उलटून गेल्यावर देखील तोच अदुल हमीद माझ्या मनाला भुरळ घालतो आहे.
मग मनात प्रश्न येतो, की त्या दिवशी म्हणजे एक महिन्यापुर्वी आझाद मैदानच्या त्या अमर जवान स्मारकाची जी विटंबना झाली, ते स्मारक कोणाचे होते? ते भारतीय जवानांचे व शहिद झालेल्यांचे होते, म्हणजे कोणाचे होते? तो स्मारक फ़ोडणारा किंवा त्यावर लाथ मारणारा कुणाला विटाळत होता? माझ्यासारख्या लाखो करोडो भारतीयांच्या मनात घर करून बसलेल्या अदुल हमीद वा शेकडो भारतीय मुस्लिम सैनिकांच्याच हौतात्म्याची विटंबना करत नव्हता काय? राष्ट्राचा अभिमान म्हणून आत्मसमर्पण करणारा अब्दुल हमीद त्या विध्वंसकांना कोणीच कधी दाखवला किंवा समजावलाच नाही काय? रझा अकादमीने कधी या मोर्चासाठी येणार्या किंवा आणल्या जाणार्या मुस्लिम तरूणांना अब्दुल हमीदसारख्या हजारो देशप्रेमी मुस्लिम जवानांचा पराक्रम कधीच शिकवला नाही काय? असता तर त्यांच्याकडून असे पाप झाले असते काय? या देशाने अभिमान बाळगावा असे मुस्लिम कमी आहेत काय? रॉकेट वैज्ञानिक म्हणुन ज्यांच्याविषयी अवघ्या देशाला अभिमान वाटतो, ते डॉ. अब्दुल कलाम मुस्लिमच आहेत ना? ज्यांच्या शहनाई शिवाय काशीविश्वेश्वराच्या मंदि्रातला उतस सुरू होत नसे ते भारतरत्न बिस्मिल्ला खान मुस्लिमच ना? ज्याच्या तबलावादनाने जगाला भुरळ घातली आहे, तो उस्ताद झाकीर हुसेन मुस्लिमच ना? असे एकाहुन एक मुस्लिम सुपुत्र भारताच्या पोटी जन्माला आले, त्यांचे आदर्श मुस्लिम तरूणांच्या समोर ठेवले गेले असते, तर त्यांच्याकडुन अमर जवान स्मारकाची विटंबना झाली असती काय? ज्यांच्याकडून असे घडले त्यांना गुन्हेगार म्हणणे सोपे आहे, पण त्यांच्याकडून ते कृत्य अनवधानाने घडले आहे. त्यांच्या मनात आपली मातृभूमी किंवा राष्ट्राभिमान जोपासण्यात जी त्रूटी राहुन गेली, त्याचे हे परिणाम आहेत. आपण त्याच थोर पराक्रमी मुस्लिमांची अवहेलना करतो असे त्या हल्लेखोरांच्या मनालाही शिवले नाही, ही गंभीर बाब आहे.
ज्यांनी ते कृत्य केले ते गुंड होते, त्यामागे दाऊद टोळीचा हात होता, असल्या मखलाशीला अर्थ नाही. तो पलायनवाद आहे. जी आत्मियता मुस्लिम समाजात आपल्या देशाविषयी जोपासली गेली पाहिजे, त्यात कुठेतरी त्रुटी राहुन जाते आहे, त्याचे हे परिणाम आहेत. कारण त्या मुस्लिम मुलांसमोर देशाभिमानाची अस्सल मुस्लिम उदाहरणे ठेवली जात नाहीत, त्याचा हा दुष्पपरि्णाम आहे. त्या स्मारकाच्या मोडतोडीबद्दल माफ़ी मागणे किंवा हल्लेखोरांचा निषेध करणे दुय्यम असते. त्यापेक्षा त्यामागच्या आवेशाची गंभीर दखल मुस्लिमांकडून घेतली गेली पाहिजे. नुसते निषेधाचे शब्द कामाचे नाहीत. त्यामागची मनोवृत्ती ओळखली पाहिजे आणि ती दुर करण्याचे प्रयास व्हायला हवेत. आणि ही प्रवृत्ती आजची नाही, नवी नाही. हे सामान्य वाचकांना मी सांगायला हरकत नाही. अन्य मुस्लिम नेत्यांना सांगायला हरकत नाही.. आज कॉग्रेसचा मुस्लिम चेहरा म्हणून मिरवणार्या राज्यसभा खासदार हुसेन दलवाई यांनाही मीच हे आठवण करून द्यायला हवे आहे काय? त्यांचेच दिवंगत बंधू व मुस्लिम विचारवंत हमीद दलवाई यांचे हुसेनभाईंना स्मरण तरी उरले आहे काय? कारण आज मी इथे ज्या समस्या मांडतो आहे, त्याच समस्या चार पाच दशकांपुर्वी हमिद दलवाई मोठ्या हिरीरीने मांडत होते. त्यातूनच हुसेन दलवाई कार्यकर्ता म्हणून घडले आहेत. तेच हुसेन दलवाई पंधरा वर्षापुर्वी अबू आझमींच्या मांडीला मांडी लावून बसले, तेव्हा ते आपल्या भावाला पुर्णपणे विसरून गेले होते. डोळे मिटून साधूचिंतकाप्रमाणे अंतर्यामी भाषेत बोलण्याचा वाहिन्यांवरून आव आणणारे राजकीय विश्लेषक समर खडस त्याच हमीदभाई दलवाईंचे भाचे लागतात. त्यापैकी कुणाला तरी आपला हा विचारवंत आप्तेष्ट आठवतो तरी काय? त्यांना आजच्या सत्ताकारणापुढे हमीद दलवाई किवा त्यांचे विचार आठवत नसतील, तर त्यांना शहिद अब्दुल हमीद किंवा त्याची शहादत आठ्वण्याची अपेक्षा तरी कशी करता येईल?
त्याच्याही पलिकडची एक खाजगी आयुष्यातली आठवण माझ्या उरात जपलेली आहे. १९७० च्या सुमारास एका अपघातात माझे वडील भाजून खुप जखमी झाले होते आणि सहा महिने त्यांना अंगावर वस्त्रही परिधान करणे शक्य नव्हते. त्या कालखंडात मला त्यांच्याकडे लक्ष द्यायलाही सवड होत नव्हती. अशावेळी माझ्या धाकट्या भावाच्या सह्या घेऊन इस्पितळात त्यांची सगळी देखभाल करणारा जीवाभावाचा नातलग होता त्याचे नाव जहरुद्दीन ताजुद्दीन शेख. सोलापुरातून मुंबईच्या प्रभादेवी भागात वसलेल्या जहरुद्दीनची एका कार्यक्रमात ओळख झाली आणि आम्ही मित्र झालो. त्याची मैत्री रक्ताच्या नात्यापेक्षा गाढ होती. ती त्याने वडीलांच्या आजारपणात दाखवून दिली. पुढे त्याचे लग्न झाल्यावर त्याला बराच काळ मुलबाळ नव्हते तर माझ्या नर्स बहीणीने त्याला सर्वतोपरी वैद्यकीय मदत केली होती. आणि जेव्हा लागोपाठ त्याला चार मुले झाली तर ती पोसणार कशी, अशा शिव्या तिने घातल्या तर निमूटपणे ऐकून घेणारा जहरूद्दीन मी कधीच विसरू शकत नाही. हे सर्व अनुभव अलिकडल्या काळात पुसट होऊ लागले, म्हणुन मी मुस्लिम मनाचा शोध घेण्याच्या कामाकडे वळलो. मुस्लिम व बिगर मुस्लिम यांच्यात जी जागतिक पातळीवर भयंकर दरी गेल्या दोन दशकातून निर्माण होते आहे, त्याची कारणे मी मुद्दाम शोधू लागलो. कारण माझे अनेक मित्र परिचित मुस्लिम आहेत आणि त्यांच्याविषयी शंका संशय घेणे मला शक्यच नाही. पण त्याचवेळी अनुभव असे सांगतो, की डोळे झाकून मुस्लिम राजकारणावर विश्वास ठेवणेही अशक्य झाले आहे. मग मेहमानगडात मला रोज वृत्तपत्र आणुन देणारा अझीझ मुलाणी, सकाळी सकाळी चहा पाजणारा ऐजाज किंवा फ़ारुख, बाळोबाच्या जत्रेत पुढाकार घेऊन कर्तव्य बजावणारे डझनावारी मुस्लिम गावकरी जगासमोर यायचे कधी आणि आणायचे कोणी? की मुस्लिम एवढा शिक्का त्यांच्यावर बसतो आणि त्यांच्याबद्दल शंका घेतल्या जात असतील तर त्याकडे काणाडोळा करायचा? कुठेतरी हे चित्र बदलले पाहिजे आणि त्यासाठी जिथे चुका होत असतील व सुधारण्याची शक्यता आहे, त्याला प्रोत्साहन द्यायला नको काय? माझ्या मनातला अब्दुल हमीद पुसून टाकणार्यांना बाजूला सारून, मला नव्या पिढीसमोर सामंजस्याचे प्रतिक असलेले चेहरे आणायला नकोत का? जे उघड बोलत नसतील त्या शांतताप्रिय मुस्लिमांचा आवाज बुलंद करायला नको का? जे सतत विसंवादाची भूमिका घेतात व आडमुठेपणा करतात, असा जो मुस्लिम चेहरा आज प्रस्थापित झालेला आहे; तो पुसायला नको का? मी त्यासाठीच ही लेखमाला लिहितो आहे. त्यात एकीकडे मुस्लिमातील दोष दाखवताना सामंजस्याच्या जागा दाखवतानाच सोपे सरळ उपाय सुद्धा म्हणूनच सुचवण्याचा प्रयासही करतो आहे. त्यात कोणी हिंदुत्व शोधणार असेल तर मला त्याची पर्वा नाही. ( क्रमश:)
भाग ( २९ ) १३/९/१२
Great!! thanks!! This is a great remembrance! I have learned Abdul Hamid through my textbooks only! but I totally agree with you!
उत्तर द्याहटवा