शुक्रवार, २१ सप्टेंबर, २०१२

सामंजस्याची प्रक्रिया सुरू होणे महत्वाचे


   ही लेखमाला लिहितांना मला भलेबुरे फ़ोन आले. त्यात अनेक समंजस लोक होते, तसेच काही नुसतेच चिडलेले होते. पण त्याला महत्व नाही. साधायचा हेतू मोलाचा असतो. जसे काही मुस्लिमांचे मन विचलित झाले तसेच काही हिंदूंना जणू काही हत्यार हाती लाभल्यासारखे वाटले. ज्यांना मुस्लिमांच्याच डोक्यावर खापर फ़ोडायचे असते, त्यांना दोषच बघायचे असणार आणि या लेखमालेत इतके नेमके दोष मी मांडलेले आहेत, की तेवढे कुणा हिंदूत्ववाद्यानेही मांडलेले नसतील. मग त्याच हेतूने ही लेखमाला वाचणार्‍यांना उत्साह आला तर नवल नाही. पण माझा हेतू कुणाच्या डोक्यावर खापर फ़ोडण्याचा अजिबात नाही. तसेच करायचे असेल तर माझ्यात आणि उठसुट संघ किंवा शिवसेनेवर खापर फ़ोडणार्‍या सेक्युलर अर्धवटरावांमध्ये काय फ़रक उरला? दोष दाखवणे किंवा नुसते आरोप करणे याला मी पलायनवाद म्हणतो. जे दोष असतील ते दाखवणे योग्य आहे. पण तिथेच विषय संपता कामा नये. ते दोष दूर करण्याचाही प्रयत्न असायला हवा. आणि जर तो प्रयत्न माध्यमे किंवा तथाकथित सुधारक वा राजकीय मंडळी करणार नसतील, तर सामान्य माणसानेच त्यात पुढाकार घ्यायला हवा. कारण जे काही बिघडते, त्याचे सर्व दुष्परिणाम त्याच सामान्य माणसाला भोगावे लागत असतात. मग त्याचा धर्म हिंदू असो की इस्लाम असो. मग त्यानेच आपल्या या समस्येवर उपाय का शोधू नये? त्यानेच परस्परांच्या धर्माविषयी ज्ञान करून घेण्यात गैर काय? जे दोष मुस्लिमांकडून हिंदूंना दाखवले जातात, त्याची मिमांसा करून ते दुर करण्याचा हिंदूंनी प्रयत्न करावा आणि मुस्लिमांचे दोष आसतील तर त्यांच्याकडे चर्चेतून त्याविषयीची भूमिका समजून घ्यावी. त्यासा्ठी दोघांमध्ये संवाद सुरू व्हावा. कुठलीही कटूता न आणता संवाद सुरू व्हावा.

   यात एकच अडचण मला नेहमी जाणवायची, की हिंदूंच्या मनात मुस्लिमांविषयी शंका आहेत, आक्षेप आहेत. पण त्याना नेमके शब्दरूप देण्यात ही तक्रारखोर मंडळी तोकडी पडतात. त्यांच्या मनातल्या त्या शंका व प्रश्नांना मी म्हणूनच इथे सार्वजनिक स्वरूप दिले आहे. त्याचा आधार घेऊन त्यांनी मुस्लिम परिचित, मित्र, सहकारी असेल, त्याच्याशी संवाद साधला पाहिजे असे माझे मत नव्हे तर आग्रह आहे. नुसत्या शंका मनात ठेवून संशयाने बघून हे प्रश्न कधीच सुटणार नाहीत. मजेची गोष्ट अशी, की आपण मिश्र समाजात असतो. त्यामुळे सार्वजनिक स्वरूपात हिंदूंचे उत्सव होतात, मतप्रदर्शन चालते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात मुस्लिमांना हिंदू धर्माविषयी थोडीफ़ार कल्पना असते. पण हिंदू मात्र इस्लामविषयी मोठ्या प्रमाणात अनभिज्ञ असतो. म्हणूनच तो मुस्लिमाच्या साध्या साध्या गोष्टीकडे संशयाने बघू लागतो. त्या शंका मी इथे थोड्याफ़ार प्रमाणात मांडल्या आहेत, त्याचा आधार घेऊन तुम्ही तुमच्या मित्र परिचित मुस्लिमाशी संवाद साधू शकाल. त्याला जेवढा इस्लाम वा त्याचा धर्म माहित आहे, तेवढ्यावर त्याच्याकडे त्यावर खुलासा मागा. खुलासा याचा अर्थ जाब मागणे नव्हे, तर समजून घेण्यासाठी प्रयत्न करणे होय. आणि त्याच्याकडे खुलासा मिळत नसेल तर तो निदान त्याच्या कुणा मौलवी धर्मोपदेशकाला विचारून तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल ना? पण त्याचा एक लाभ असा आहे, की त्याचेही इस्लामविषयक अज्ञान दुर होण्यास तुम्ही हातभार लावू शकाल. पर्यायाने त्याच्याशी तुमचा जो संवाद सुरू होतो, त्यातुन भिन्न धर्मिय असूनही जवळ येण्याची प्रक्रिया आरंभ होत असते. तेवढ्या प्रमाणात शंका संशयाचे जाळे तुटत असते. तो संवाद व्हावा हीच माझी मूळ इच्छा आहे. हा सगळा खटाटोप त्यासाठीच आहे.

   दोन बाजूंनी एकमेकांबद्दल गैरसमजात जगण्यातून दुरावाच निर्माण होत नाही, तर ज्यांना कोणाला त्यांच्यात संघर्ष पेटवायचा असतो त्यांच्यासाठी पोषक वातावरण निर्माण होत असते. त्यांना गैरसमज हवेच असतात. की म्हणूनच दोन्ही बाजूंच्या डिवचणार्‍या गोष्टी घटनांना अगत्याने प्रसिद्धी दिली जाते? आणि जेव्हा असे होत असते तेव्हा त्यातून जे लोक दुखावतात, त्यांच्या  जखमेवर मीठ चोळले; मग अधिकच भडका उडत असतो. एक ताजी गोष्ट घ्या मुस्लिम आरक्षणाची. मुस्लिमांना ओबीसीमधून काही टक्के आरक्षण देण्याचा निर्णय मोठ्या आवेशात सामाजिक न्यायाचा ठरवला जात असतो. पण त्याचे नेमके किती लाभ मुस्लिमांना मिळणार, याचा दोन्हीकडून विचार होत नाही, झालेला नाही. कधीतरी आपण आजवरच्या आरक्षणाचे लाभ तपासून पाहिले आहेत काय? जेव्हा संधीच कमी असतात किंवा सोयीच कमी तुटपुंज्या असतात, तेव्हा टक्केवारीने अशा दुर्बळांच्या वाट्याला किती आणि काय येत असते? जेव्हा रांगेत लाखभर माणसे उभी आहेत, तेव्हा संधी वा सुविधा ह्जार असल्या मग एकूण गरजवंत आहेत त्यातले ९९ टक्के वंचित रहाणार असतात. अगदी टक्केवारीने बघितले तरी त्यात मग अधिक वंचित उरतो तो मागास समाजच असतो. कारण जेवढा मागास समाज किंवा मागास घटक, तेवढी त्यातल्या गरजवंतांची टक्केवारी अधिक असते. मग एक लाख गरजवंत असे आपण म्हणतो, तेव्हा त्यातले अर्धेअधिक मागास घटकातलेच असतात. म्हणजेच जर पन्नास टक्के आरक्षणाच्या संधी मिळाल्या तरी त्याचा खरा लाभ त्या जातीजमातीमधील सुखवस्तू व पुढारलेल्यांनाच मिळतो आणि जे खरे गरीब व गरजू असतात, त्यांची वंचना कधीच संपत नाही. पण आपल्या जातीमधल्या कुणाला मिळाले म्हणून उअरलेल्यांनी खोट्या आनंदात मशगुल रहावे अशी अपेक्षा असते.

   ज्या ज्या जातीजमातींना आजवर आरक्षण मिळाले त्यांच्यातल्या किती लोकसंख्येला त्याचे खरेखुरे लाभ मिळू शकले, त्याचा तपास केला तर या रहस्याचा उलगडा होऊ शकेल. कारण समस्या टक्केवारीच्या आरक्षणाची नसून उपलब्ध अपुर्‍या संधीची आहे. आपल्या देशात प्रगती व विकास करताना संधी निर्माण करण्याचा दृष्टीकोनच नसल्याने मुळात संधीचा तुटवडा आहे. मग ते अपयश लपवण्यासाठी आरक्षणाचे तुकडे फ़ेकून विविध समाज घटकात झुंज लावता येते आणि ज्यांनी नाकर्तेपणाने देश चालवून विकासाच्या संधीच निर्माण केलेल्या नाहीत, त्यांच्या पापावर मस्त पांघरूण घातले जाते. शिवाय इवल्या तुकड्याकरीता झुंजणार्‍यांना न मिळालेला ‘न्याय दिला’ म्हणुन मिरवताही येत असते. असे का होऊ शकते? तर समाज घटकात दुफ़ळी व एकमेकांच्या विरुद्ध भावना चिथावलेल्या असल्या, मग त्यांना स्वत:ला काय मिळते यापेक्षा दुसर्‍याला काय मिळाले नाही; यातच आनंद अनुभवायची सवय लागते. दुसर्‍याच्या दु:खात सुख शोधण्यात समाजाचे विविध घटक रंगून गेले, मग झुंजवणार्‍यांना मजा मारायची निश्चिंत मोकळिक मिळत असते. इतकी चांगली फ़सवणुकीची सोय समाज घटकात वैरभावना असली मगच मिळत असताना कोण कशाला त्या परस्पर विरोधी घटकांत सामंजस्य निर्माण करील? त्यापेक्षा न्यायाच्या, सवलतीच्या व आरक्षणाच्या ‘सामाजिक न्यायाचे’ गाजर दाखवून झुंजत ठेवण्याचेच राजकारण होणार ना? आणि ज्यांचे हितसंबंध अशा भांडणात किंवा वैरभावनेत गुंतलेले आहेत, त्यांच्याकडुन गैरसमज दुर करण्याचा प्रयत्न होईलच कशाला? उलट अधिक दुफ़ळी व भांडणे होतील यासाठीच प्रयत्न होणार ना? आज सेक्युलर पुरोगामी राजकारण नेमके त्याच दिशेने व वाटेने चालू आहे.

   यातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे विविध समाज घटकांनी आपल्यात नेमके कुठे पटत नाही किंवा काय भांडण आहे वा मतभेद आहेत, त्याचा शोध घेऊन त्यावर मात करण्याचे मार्ग शोधून काढणे. आणि यात मुस्लिम समाजाने पुढाकर घ्यावा अशीच माझी इच्छा आहे. कारण स्वातंत्र्योत्तर काळात सेक्युलर या शब्दाने सर्वात अधिक शोषण व दिशाभूल कोणाची केली असेल तर ती मुस्लिम समाजाची केलेली आहे. किंबहूना आरंभी ते फ़क्त कॉग्रेस पक्ष करत होता. आता त्यात अनेक भागिदार तयार झालेले आहेत. पण त्याची जाणिव झालेल्या समाज व वर्गातून मग पर्यायी व्यवस्था उभी राहू लागली. ती अत्यंत धोकादायक आहे. आज नरेंद्र मोदी यांच्या प्रभावाखाली देशभर एक नवे धृवीकरण सुरू झालेले आहे, ते धृवीकरण सहा दशकातल्या मुस्लिमांच्या गठ्ठा मतांचा पर्याय म्हणून उभे रहात आहे. सेक्युलर अतिरेकाने जो विकृत मुस्लिम चेहरा समोर आणला आहे व जे अनुचित गैरसमज निर्माण केले आहेत; त्यातून मग हिंदूंमध्ये गठ्ठा मतांची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याचा बिमोड पाखंडी सेक्युलर वर्तन करू शकणार नाही. तर खरेखुरे धर्मनिरपेक्ष विचार व त्याद्वारे विविध समाज घटक व त्यांच्यातले सौहार्द हाच त्यावरचा पर्याय आहे. आणि म्हणुनच त्याची सुरूवात सामान्य मुस्लिम व हिंदूंनी करावी अशी माझी अपेक्षा आहे. म्हणुनच ही लेखमाला त्याला चालना देण्यासाठीच मी लिहित आहे. तिचा रोख हिंदूंमधील अस्वस्थ लोकांनी मुस्लिमांना समजून घेण्याचा, शंका, प्रश्न विचारण्याची प्रक्रिया सुरू करणाचाच आहे. आणि काही ठिकाणी तसे प्रयास सुरू झाल्याचे वाचकांनी मला फ़ोन करून कळवले हा मी शुभशकून मानतो.      ( क्रमश:)
भाग    ( ३८ )  २२/९/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा