तीन वर्षे झाली असतील त्या चित्रपटाला प्रदर्शित होऊन? नेहमीप्रमाणे आमिरखानचा तोही चित्रपट खुप गाजला होता. मुख्यप्रदेश नावाच्या राज्यात पिपली नावाचे एक गाव असते. तिथे नाथादास माणिकपुरी नावाचा एक गरीब शेतकरी असतो. बुधियादास हा त्याचा भाऊ असतो. धनिया ही बुधियाची बायको तर आजाराने ग्रासलेली व अखंड मुलगा व सुनेच्या नावाने लाखोली वहाणारी त्याची अम्मा, असे हे खेडूत कुटुंब असते. नाथा व बुधिया यांनी गावातल्या शेतजमीन व घराच्या बदल्यात बॅंकेकडून कर्ज काढलेले असते. नाथा खुप रा्बत असतो. पण घरखर्चाची कधीच तोंडमिळवणी होत नसते. दोन्ही भाऊ आईला फ़सवून कमाईचे पैसे दारूत बुडवत असतात. मग कर्जाचा बोजा चढत जा्तो आणि परिस्थिती हाताबाहेर जाते. एके दिवशी दोन भावात गप्पा चालू असताना एक शक्कल त्यांना सुचते. धाकट्या नाथाने कर्जबाजारी शेतकरी म्हणुन आत्महत्या करावी. गावचा मुखीयाही त्यांची कल्पना उचलून धरतो. कर्जमाफ़ीसाठी आत्महत्या हाच छान व सोपा उपाय असतो. एका चहाच्या टपरीवर बसून दोन्ही भाऊ या आत्महत्येबद्दल बोलत असताना तिथला स्थानिक वार्ताहर ते ऐकतो आणि थेट त्याची खळबळजनक बातमी बनवतो. वृत्तपत्रातली ती बातमी एक राष्ट्रीय वृत्तवाहिनी ब्रेकिंग न्यूज म्हणुन वापरते आणि बघताबघता नाथाची आत्महत्या हा राष्ट्रीय हेडलाईनचा विषय होऊन जातो. बातम्यातून ती भानगड मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचते. ऐन पोटनिवडणुक लागली असताना ही आत्महत्या म्हणजे विरोधी पक्षांच्या हातात कोलितच मिळते. विरोधी नेते पिपलीत येऊन धडकतात, तसेच मोठ्या वाहिन्यांचे पत्रकारही तिथे येऊन थडकतात. मग नाथाच्या होऊ घातलेल्या आत्महत्येचे महाकाव्य चालू होते आणि थेट प्रक्षेपणातून एक राजकिय व्यापारी नाट्य रंगू लागते. राजकीय नेते, शेजारी, गावकरी, पत्रकार, वाहिन्या असे सगळेच कसे नाथाच्या अगतिकता व दैन्य दारिद्र्याचा आपापल्या व्यापारी राजकीय मतलबासाठी भावनाशुन्य वापर करून घेतात, त्याचीच ही अप्रतिम कथा आमिरखान प्रॉडक्शनने सादर केली होती.
स्वत: अमिरने त्यात भूमिका केलेली नव्हती. कुणा नव्या होतकरू दिद्गर्शिकेकडून त्याने हा चित्रपट निर्माण करून घेतला. अत्यंत कमी बजेटमध्ये काढलेल्या या चित्रपटाने चांगला धंदा केला. नुसता धंदाच केला नाही. नेहमीप्रमाणे सामाजातील घडामोडींविषयी आमिर कसा संवेदनाशील कलावंत आहे त्याचेही तेव्हा खुपच कौतुक झाले होते. आपल्या त्याच संवेदनशील भूमिकेतून त्याने हे कथानक सादर केले आणि समजातील भावनाशुन्य व्यापारीवृत्तीवर नेमके बोट ठेवले, असेही कौतुक झाले होते. आजच्या भारतीय समाजात जे स्वत:ला समाजहिताचे कैवारी म्हणवून घेतात व सामाजिक न्यायासाठी लढत असल्याचा आव आणतात, ते कसे प्रत्यक्षात आपापले मतलब साधण्यासाठी सामान्य गरीबाच्या भावना, यातना, वेदना, सुखदु:ख, अगतिकता, लाचारी यांचा निर्दयपणे व्यापारी वापर करत असतात, त्याचीच कहाणी आमिरने तिथे सादर केली होती. त्या चित्रपटाच्या नावातच बोचरी टीका आहे. "पिपली लाईव्ह". आज माध्यमे व पत्रकार किंवा स्वयंघोषित सामाजसेवक कसे गरीबांच्या दु:ख समस्यांचाही बाजार मांडतात, ती कथा किंवा तेच आपले बोचरे भाष्य आमिर तीन वर्षात विसरून गेला काय? गेले काही दिवस मी आमिरच्या सत्यमेव जयते या मालिकेची उलटतपासणी घेतो आहे, ती वाचून अनेक भारावलेले वाचक विचलित झाले आहेत. निदान आठ दहा वाचकांचे मला तसे फ़ोन आले आहेत. ते आमिरच्या कार्याने भारावून गेले आहेत. सहाजिकच त्याच्यावर मी केलेली टिका किंवा उपस्थित केलेले प्रश्न त्यांना अन्याय वाटतो आहे. म्हणूनच त्यांना व एकू्णच माझ्या वाचकांना तीन वर्षापुर्वीच्या आमिरखानचा चेहरा दाखवणे मला अगत्याचे वाटले. त्यापैकी कितीजणांना तो चित्रपट आठवतो? त्या चित्रपटातून आमिरने जे भाष्य एकूण माध्यमे, पत्रकार, समाजसेवक वा राजकारण्यांवर केले, त्यांचेच अनुकरण तो आज करत नाही काय? त्यातले दोन प्रतिस्पर्धी चॅनेल, त्यातले भावनाशुन्य रिपोर्टर, त्यांच्यातली व्यावसयिक जीवघेणी स्पर्धा, हेवेदावे आणि त्यासाठी नाथाच्य जीवाशी चाललेला खेळ. तसेच्या असेच सत्यमेव जयतेचे स्वरूप नाही काय? एकूण आव समाज जागृतीचा, लोकप्रबोधनाचा किंवा मिशन वा चळवळीचा. पण मुळ हेतू धंदा व गल्लाभरूचाच नाही काय?
परवा मेडिकल कौन्सिलने आमिरच्या मालिकेने डॉक्टरी पेशाची सरसकट बदनामी केली म्हणुन आक्षेप घेतले. एकतर्फ़ी आरोप करून संपुर्ण वैद्यक व्यवसायाला आरोपीच्या पिंजर्यात उभे केले, ही डॉक्टर लोकांची नाराजी आहे. त्यांचे समाधान न करता आमिरने त्यांनी कोर्टात जावे असे प्रत्युत्तर दिले आहे. त्यातून पिपली लाईव्ह दाखवणार्या चॅनेलचा पत्रकारच त्याने समोर जिवंत (लाईव्ह) केला नाही काय? देशाच्या कानाकोपर्यात पसरलेल्या लाखो डॉक्टर्सना एका फ़टक्यात त्याने गुन्हेगार ठरवून टाकले आहे. सवाल त्याने सादर केलेल्या कार्यक्रमात किती सत्य आहे, याचा नसून एकूण त्या पेशाबद्दल जनमानसात संशय घालण्यात आला, त्याचा आहे. हंगामा खडा करना मेरा मक्सद नही, असे सांगणार्या आमिरने शेवटी हंगामा मजवण्यापलिकडे काय साधले आहे? या देशातील वैद्यक व्यवसायाकडे संशयाने बघितले जाणार आहे. ते सव्वाशे कोटी सामान्य जनतेसाठी आरोग्यदायक आहे काय? आज ऐंशी टक्के लोक सरकारी दवाखान्याकडे पाठ फ़िरवून खाजगी डॉक्टरकडे जातात. ती अवस्था कशामुळे आली आहे? तशी सरकारी दवाखान्यांची व इस्पितळांची अवस्था नसती तर लोक खाजगी डॉक्टरांकडे गेले असते काय? ते गेलेच नसते तर त्यांच्या लाचारीचा असा लाभ कोणाला उठवता आला असता काय? म्हणजेच यातला पहिल्या क्रमांकाचा आरोपी आहे तो सरकार व दुर्दशा होऊन निकामी झालेला सरकारी आरोग्य विभाग. त्याबद्दल अवाक्षर न बो्लता खाजगी डॉक्टर लोकांना लुबाडतात, अशी आरोळी ठोकणे, लोकांच्या टाळ्या मिळवणारे नक्कीच आहे. हंगामा खडा करणारे सुद्धा आहे. पण त्यामुळे लोकांच्या आरोग्याला त्यातून दिलासा कसा मिळणार आहे? सरकारी दवाखाने सुरळीत चालू असते, तर लोकांना खा्जगी डॉक्टरकडे जावेच लागले नसते. सरकारी आरोग्यव्यवस्थेकडे जास्त लोक आले, तर त्यांना तिथेच औषधे द्यायची तर जेनेरिक औषधेच द्यावी लागणार. म्हणजेच लोकांना दुकानात जाऊन महागडी औषधे घ्यावीच लागणार नाहीत. पण त्या मुळ रोगाबद्दल आमिर अवाक्षर बोलत नाही.
कल्याणकारी लोकशाही राज्यात सार्वजनिक आरोग्य ही सरकारची जबाबदारी असते. पण सरकारने आज त्याकडे साफ़ पाठ फ़िरवली आहे. त्यावरील लोकांचा विश्वास साफ़ उडाला आहे. त्यामुळेच लोक खाजगी डॉक्टरकडे अधिक संख्येने जाऊ लागले आहेत. दिषित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, सार्वजनिक अस्वच्छता, सांडपाणी साचणे, अन्नपदार्थातील सरसकट भेसळ. वाढती बकाल वस्ती, नियोजनशुन्य विकास यांनी लोकांचे आरोग्य धोक्यात आणले आहे. त्यामुळे डॉक्टरी पेशा आता धंदा बनला आहे. जणू सरकारने करोडो लोकांना त्या खाईत ढकलून दिले आहे. अगतिक करून सोडले आहे. सरकारी वा सार्वजनिक आरोग्यसेवा इथे किती निरोगी होती त्याचे एक उदाहरण पुरेसे ठरावे. १९६९ सालात थोर मराठी साहित्यिक आचार्य अत्रे बॉम्बे हॉस्पिटल या अत्याधुनिक खाजगी रुग्णालयात मृत्यूशी झूंजत होते. तिथले उपाय थकले तेव्हा त्यांना परेलच्या केईएम या महापालिका रुग्णालयात आणले गेले. तात्कालीन गृहमंत्री बाळासाहेब देसाई यांनी त्यासाठी वायरलेसच्या पोलिस गाड्या रुग्णवाहिकेच्या पुढेमागे ठेवून तातडीने अत्र्यांना सार्वजनिक रुग्णालयात हलवले होते. म्हणजेच आलिशान खाजगी रुग्णालयाच्या थोबाडीत मारू शकेल, इतकी सार्वजनिक आरोग्यसेवा निरोगी. कार्यक्षम व गुणकारी होती. आज तिचीच तब्येत डबघाईला आलेली आहे. म्हणून लोकांना खाजगी डॉक्टरकडे जावे लागत असेल तर पहिला आरोपी सरकार आहे. त्यानेच सार्वजनिक आरोग्यसेवा निकामी करून लोकांना खाजगी सेवेकडे ढकलले आहे. त्यासाठी अगतिक व लाचार बनवले आहे. आजारी नागरिकाला वार्यावर सोडून दिले आहे. त्याचेच हे सर्व दुष्परिणाम आहेत. या मुळ आजाराला आमिरने स्पर्श तरी केला काय? की भ्रष्ट सरकारी आरोग्यसेवा व सत्ताधारी यांच्या पापावर पांघरूण घालण्यासाठीच आमिरने हा नवा पिपली लाईव्ह सादर केला? चॅनेलवाल्यांनी छान धंदा केला, आमिरनेही कमाई केली. लोक बिचारे अजून तसेच आजारी आहेत. मग पिपली लाईव्हचे गाणे थोडे बदलून म्हणावेसे वाटते.
चॅनेलवाले बहुतही कमात है
आमिरखान खाये जात है
( क्रमश:)
भाग ( २९२ ) ११/६/१२
वैदकीय महाविद्यालये वाढू नयेत अशी दक्शताच घेतली जात आहे. जर ती सरकारी क्षेत्रात निघाली तर 'अमुक्राराव' पाटील 'तमुकगावकर' अशा नावाचे नोटा छापायचे मशीन कसे चालणार खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात? हा सरळ सरळ मोठा घोटाळा आहे. जाणीवपूर्वक केलेला.. सरकारमधेही हेच दरोडेखोर आणि शिक्षणात त्यांचीच मुले बंदुका घेऊन पब्लिकला लुटायला बसेलेली, चंबळच्या डाकूसारखे उभे गंध लावून, दाढीमिशा वाढवून, खाली धोतर आणि वर काळा ढगळा शर्त घालून बसलेली...हे सर्व विचारपूर्वक झालेय. आणि याचे जनक, लोकांचे लै लाडके वसंतराव बरका राजे ! त्यांनीच खाजगी वैद्यकीय महाविद्यालाचा धंदा आपल्या पिलावळीकरिता खुला करून घेतला..
उत्तर द्याहटवा