शाळेत काय शिकलो याचा शाळा सोडल्यावर ज्याला विसर पडतो आणि तरीही जे शिल्लक उरते; त्याला शिक्षण म्हणतात. -अल्बर्ट आईन्स्टाईन.
१९६५ सालात मी जुनी म्हणजे अकरावी इयत्तेची शालांत परिक्षा उत्तीर्ण झालो. त्यानंतर शाळेशी संबंध तुटला. पुढे पंचवीस वर्षांनी मला आमचे तेव्हाचे प्राचार्य भेटले. म्हणजे माझ्या एका मित्राचा सरांशी कायम संपर्क होता. पुण्यात आम्ही गेलो असताना तो म्हणाला, चल जरा सरांना भेटू. तिथे त्याने ओळख करून दिली. सरांना मी संपादक पत्रकार झाल्याचे कौतूक वाटले. मग त्यांनी मास्तरी थाटात मला प्रश्न विचारला. इतके क्लासेस वाढलेत, हे योग्य आहे का? तेव्हा मला शाळेतला प्रसंग आठवला. आमच्या वर्गातल्या एका मुलाच्या दफ़्तरात गाईड सापडले, म्हणुन सरांनी त्याला चांगला झोडपून काढला होता. बाकीच्या मुलांनाही दोन दोन पट्ट्या खाव्या लागल्या होत्या. आपला विद्यार्थी गाईड वापरतो याचा सरांना प्रचंड संताप आलेला होता. त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मी म्हणालो, सर तुमच्यासारखे शिक्षक राहिले नाहीत, म्हणुन क्लासेस वाढलेत. त्यांच्यासारखे म्हणजे? सरांनीच शंका काढली. त्यांच्यासारखे म्हणजे आपण शिकवतो आणि मुलाला गणित वा सायन्स येत नसेल तर त्यांना सहन होत नसे. आपण दगडालाही शिकवू शकतो, असा त्याकाळच्या शिक्षकांचा स्वाभिमान होता. आपला विद्यार्थी क्लासला किंवा शिकवणीला जातो, हा त्यांना अपमान वाटे. आज तसा अभिमान दिसत नाही, की विद्यार्थ्यांबद्दल आपुलकी दिसत नाही. मग त्याचेच परिणाम दिसतात. माझे हे उत्तर सरांना चकीत करून गेले. त्यांना आवडले व पटलेही. तेव्हा त्यांनी कौतुकाने विचारले, हे सर्व कुठे व कधी शिकलास? तर मी उत्तरलो, सर तुम्हीच तर शिकवलेत. त्या उत्तराने सर चमकले. म्हणाले, अरे, मी तर गणित-भूमिती शिकवायचो. तू तत्वज्ञानाची भाषा बोलतो आहेस. मग मी सरांना त्यांच्या शिकवण्याच्या शैलीचा किस्सा सांगितला.
भूमितीचे प्रमेय शिकवताना सर नेहमी म्हणायचे दिगोकाउ मांडा. म्हणजे दिलेल्या गोष्टी आणि काढायचे उत्तर. प्रमेयात ज्या दिलेल्या गोष्टी आहेत त्याच्याच सुत्राने वाट शोधत गेले, की काढायचे उत्तर सापडते, ही सरांची शिकवण होती. मी सामाजिक समस्या असोत की देशासमोरचे प्रश्न असोत, दिगोकाउ सुत्रानेच विचार करतो हे सांगितले, तेव्हा सर हसू लागले. म्हणाले, मी तर असा विचार करायला शिकवले नव्हते. इथे आईन्स्टाईन काय म्हणतो ते लक्षात घेतले पाहिजे. तो म्हणतो, शिकलेले विसरून गेल्यावर शिल्लक उरते तेच शिक्षण. सरांनी मला व सर्व वर्गालाच प्रमेय सोडवायला शिकवले होते. पण मी त्यातून जगातल्या सर्वच प्रश्नांची उत्तरे काढायला शिकलो. त्यांनी त्याच हेतूने व दिशेने शिकवले नसेल. पण ते शिकवत होते, त्यातून काय शिकायचे ते समोर बसलेल्या मुलांवर अवलंबून होते. शिकण्याची ही प्रक्रिया कशी असते? रात्रीच्या वेळी काळोख्या रस्त्याने चाललो असताना, एखादी गाडी बाजू्ने निघून जाते. तिला रस्ता दिसावा म्हणुन तिचे हेडलाईट्स चालू असतात. पण त्याच उजेडात आपल्यालाही रस्ता दिसत असतो. त्या मोजक्या क्षणात आपण पुढल्या शेदोनशे पावलांचा रस्ता बघून घेतला, तर आपले त्या अंधारातले मार्गक्रमण सोपे होऊन जाते. त्यालाच शिकणे म्हणतात. समोर दिसते व जाणवते, त्यापासून काय घ्यायचे ते आपल्या हाती असते. त्याची कोणी आपल्यावर सक्ती करू शकत नाही. आणि सक्ती करून शिकताही येत नाही. शिकवून शिकता येत नसते तर शिकणार्याला शि्कवता येत असते. शिकणे ही वृत्ती आहे. तिला प्रोत्साहन देण्यासाठी सोयीसुविधा यांच्यापेक्षा इच्छाशक्ती मोलाची असते. तिचा अभाव असेल तर नावाजलेली शाळाही निरूपयोगी असते. आपण मुलांच्या शिक्षणासाठी पैसे खर्च करतो, पण त्याच्या शिकण्याच्या इच्छेला खतपाणी घालायचे विसरून जातो. सगळी गडबड तिथेच होते.
जन्माला आल्यापासून मुल शिकायला सुरूवात करते. त्याआधी त्याला साधे अंगावरचे दुध प्यायचे म्हणजे काय, तेही ठाऊक नसते. पण माता त्याचे इवले तोंड आपल्या स्तनापाशी आणून त्याला स्तनपान शिकवते. पहिले काही क्षण ते बाळ नुसते चाटते, मग जेव्हा चाटण्यातून नकळत स्तन चोखले जाते, तेव्हा त्यातून येणारा पान्हा त्याला कार्यरत करतो. इथून अर्भकाचे शिक्षण सुरू होत असते. आईचा पान्हा पोषक व मधुर असतो, मुल ते लगेच स्वीकारते. जन्मत: मुल रडतच असते. त्याला रडण्यापलिकडे काहीच प्रतिसाद ठाऊक नसतो. मग आईच्या सहवासात ते मुल बघून बघून हसू लागते. ते आईच्या हसण्याचे अनुकरण करत असते. त्याच्या हसण्याला आई वा इतरांचा चांगला प्रतिसाद मिळतो, हे पाहून ते बाळ हसायला शिकते. नेहमी दिसणारे चेहरे व अचानक दिसणारे चेहरे यातला फ़रक करायला शिकते. मानव प्राण्याची उपजत प्रवृत्ती त्याच्यात असते आणि जगण्यासाठी सुरक्षित काय आहे, त्याप्रमाणे वागण्यापुरती बुद्धी त्याच्यापाशी असते. तेवढ्यावर त्याची वाटचाल सुरू होते. बाकी प्रत्येक गोष्ट त्याला शिकूनच आत्मसात करावी लागत असते. ज्या प्राणी समुहात राहायचे आहे, त्यांच्या शिस्तीनुसार जगायला आवश्यक गोष्टी ते बाळ शिकत जाते. म्हणजेच शिकणे ही मुलाची उपजत प्रवृत्ती असते. आपण त्याला जसे वळण देत जाऊ, तसतसे मुल शिकत जाते. मात्र त्यात त्याच्या शिकण्याच्या उपजत वृत्तीला अडचण होता कामा नये, याची काळजी आपण घेतली पाहिजे. तिथेच सगळी गडबड होत असते. मुलांना शिकवण्याच्या उत्साहात, त्याने शिकायचे आहे हेच आपण विसरून जातो व त्याच्यावर सक्ती करू लागतो. त्याच्यातल्या कुतूहलाला चालना देण्यातून शिक्षण होत असते. उलट त्याच्यातल्या कुतूहलाला कुंठीत करण्याने त्याच्या शिकण्याच्या प्रक्रियेत बाधा आणली जाते. शिकणे ही आनंददायी गोष्ट आहे. ती कंटाळवाणी झाली, मग मुलांचे त्यावरील लक्ष विचलित होते. आपल्याला वाटते की मुल शिकायचा कंटाळा करते आहे. पण वस्तुस्थिती उलट असते. आपणच त्याच्या शिकण्याची प्रक्रिया कंटाळवाणी करत असतो.
मुलांना खेळायला खुप आवडते. आपण ज्याला खेळ म्हणतो वा समजतो, ते प्रत्यक्षात मुलाचे शिकणेच असते. पण त्यात कंटाळवाणे काही नसलयाने मुले उत्साहात खेळत असतात आणि त्यातून नकळत कितीतरी गोष्टी शिकत असतात. विचित्र वाटेल पण एक गोष्ट इथे नमूद केली पाहिजे. कुठलेही आईबाप वा पालक मुलांना कधी शिव्या शिकवत नाहीत. पण मुले शिव्या, अपशब्द शिकतात ना? खोड्या काढायला मुले कुठून शिकतात? खरे बोलायला आपण मुलांना नेहमीच शिकवतो, मग खोटे बोलायचे शिक्षण मुले कुठून मिळवतात? आपण ज्या गोष्टी शिकवत नाही, त्या मुले शिकतात कुठून? दुसरीकडे आपण कानीकपाळी ओरडून मागे लागून शिकवतो, त्या गोष्टी मात्र आत्मसात करताना मुलांच्या नाकी दम आलेला दिसतो. हा काय विरोधाभास आहे? न शिकवता शिकणे आणि शिकवले ते न शिकणे, असे का व्हावे? तर शिकणे हे मुलाच्या हातात असते. शिकवणे आपल्या हाती असले. तरी त्याची सक्ती करता येत नाही. ते शिकणे मुलाच्याच मर्जीवर अवलंबून असते. मुलाच्या प्रतिसादावर अवलंबून असते. या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करून आपण मुलांचे शिक्षण करू शकत नाही. मग त्यासाठी कितीही पैसा ओतला म्हणून उपयोग नसतो. नावाजलेली मान्यवर शाळा, तिथल्या उत्तम सोयीसुविधा, यातून शिक्षण होणार नसते. ते केवळ मुलांच्या इच्छेवर आणि प्रयत्नावरच अवलंबून असते. कारण चांगल्यावाईट गोष्टी मुल कायम शिकत असते. त्याची शिकण्याची प्रक्रिया अखंड चालू असते. आपण त्यात किती, कुठे व को्णती मदत करणार व त्याला कोणती दिशा देणार एवढेच आपल्या हाती असते.
आजचा पालक तेवढीच गोष्ट विसरला आहे. म्हणून मुलांचे शिक्षण महाग झाले आहे. ममता, माया व आपुलकी यांची जागा पैसा व साधने सुविधांनी घेतल्याचा तो दुष्परिणाम आहे. आपण मुलांना शिकवायचे आहे, त्यांचे भवितव्य घडवायचे आहे, या संभ्रमातून पालकाने बाहेर पडणे ही यातून योग्य मार्ग शोधण्याची पहिली पायरी आहे. तिथून सुरूवात केली तर शिक्षण महाग वा खर्चिक रहाणार नाही. कारण शाळा व तिथल्या अत्याधुनिक सुविधा ही तुमच्या मुलाची गरज उरणार नाही. मग त्यातले व्यापारी व त्यांची दुकाने तुमची लूट करू शकणार नाहीत. निरूपयोगी औषधे वा चाचण्या रोग्याच्या गळ्यात मारल्या जातात, तसेच अनावश्यक खर्च पालकाच्या गळ्यात मारले जात असतात. मग अशा व्यापार्यांनी तुमची मुले हे त्यांचे भांडवल केले तर नवल कुठले? ( क्रमश:)
भाग ( ३०४ ) २३/६/१२
Shreyas Kale:
उत्तर द्याहटवाBhau, khup chhaan. Mala khup patla he. Majhi saglyat changli shaala mhanaje Zilla Parishad Shala Gajananwadi, Kashti, Shrigonda, Ahmednagar hi hoti. Ek hi rupaya kharch na karta khup changali shaala hoti ti.
Dhanyavad Bhau ! Shikshan prakriyemadhil mahattvachya goshti'kade laksha vedhale ahe...Mazya 2 varshachya mulishi samvad sadhatana ani tichi ani tichya barobar mazi shikanyachi prakriya anubhavatana hya gosticha khoop upayog hoil ase vatate...
उत्तर द्याहटवाSasneh,
Amol
उत्कृष्ट ।
उत्तर द्याहटवाधन्यवाद, भाऊ एकदम छान लेख आहे.
उत्तर द्याहटवाभाऊ खुप छान लेख...डोळे उघडणारा..
उत्तर द्याहटवाVery nice article Bhau.
उत्तर द्याहटवामस्तचं..... शीर्षक आणि लेख .... माझ्या सारख्या नवीन पालकाला खूप उपयोगी...
उत्तर द्याहटवाSharing on FB.