बुधवार, १३ जून, २०१२

एका नागड्या मुलाची गोष्ट


   एक राजा असतो. त्याचे छान चाललेले असते. एके दिवशी त्याच्याकडे काही चतुर भामट्यांची एक टोळी येते. तुझ्या राज्यात सर्वकाही आहे, पण तुझ्यापाशी स्वर्गिय वस्त्रे नाहीत. तेवढी वस्त्रे असती तर तु महान सम्राट झाला असतास, असे ते त्याच्या डोक्यात घालतात. मग त्या राजाला दिवसरात्र त्या अवर्णनिय स्वर्गिय वस्त्रांची स्वप्ने पडू लागतात. अखेर तो त्या भामट्यांना बोलावून घेतो आणि स्वर्गिय वस्त्रे आणून देण्याचे काम त्यांच्यावर सोपवतो. मग त्यांची चंगळ होते. हवे तेवढे पैसे राजाच्या खजीन्यातून उचलायचे आणि चैन करायची, असा त्यांचा दिनक्रम चालू होतो. अधूनमधून राजाला स्वर्गिय वस्त्रांच्या प्रगतीच्या थापा मारून ते राजाला उल्लू बनवत असतात. काही महिने जातात व राजाचा धीर सुटतो. त्याच महिन्यात स्वर्गिय वस्त्रे आली नाहीत तर मुडकी उडवण्य़ाचा इशारा राजा देतो. तेव्हा पंधरा दिवसात ती वस्त्रे आणून दरबारातच राजाच्या अंगावर चढवण्याचे ते भामटे मान्य करतात. त्यासाठी ठरलेल्या दिवशी दरबार भरवायचीही राजाला विनंती करतात. मग सगळीकडे राजाच्या स्वर्गिय वस्त्रांचा बोलबाला सुरू होत होतो. राजाही खुश असतो. त्याच्या संपन्नतेमध्ये राहिलेली त्रुटी, ही स्वर्गिय वस्त्रे भरून काढणार म्हणुन तो कमालीचा उत्साहीत झालेला असतो.

   शेवटी तो दिवस उजाडतो. राजाचा दरबार पुर्ण भरून जातो. दाटीवाटीने लोकांनी तिथे गर्दी केलेली असते. मग मुख्य कार्यक्रम सुरू होतो. ते चार भामटे एका पेटीतून स्वर्गिय वस्त्रे घेऊन येतात आणि जनतेसमोरच नवी वस्त्रे राजाच्या अंगावर चढवणाचा सोह्ळा रंगू लागतो. एक एक वस्त्र राजाच्या अंगावरून उतरवले जाते आणि नवे वस्त्र त्याच्या अंगावर चढवले जात असते. ती वस्त्रे पाहून अवघा दरबार स्तंभित झालेला असतो, प्रत्येक उपस्थित माणूस राजाच्या नव्या वस्त्रांचे तोंड फ़ाटेपर्यंत कौतुक करत असतो. त्याचेही कारण असते. वस्त्र परिधानाचा सोहळा सुरू करण्यापुर्वी त्या भामट्यांनी एक अट लोकांना सांगितलेली असते. ही स्वर्गिय वस्त्रे आहेत, त्यामुळे पा्पी माणसांना त्या पुण्यवंत वस्त्रांची चमक दिसणार नाही आणि जे खर्‍या बापाचे नसतील त्यांना तर ही स्वर्गिय वस्त्रे दिसूच शकणार नाहीत. आता अशी अट असल्यावर कोणाला त्यांची चमक दिसणार नाही? आपल्या बापाच्या व आईच्या चारित्र्याची कोणाला फ़िकिर नसते? त्यामुळेच अवघा दरबार त्या अप्रतिम वस्त्रांच्या कौतुकात रममाण झालेला असतो. शेवटी राजाच्या अंगावरची सगळी जुनी वस्त्रे उतरवून होतात. शिल्लक उरते ती फ़क्त इवली लंगोटी. राजा त्या भामट्यांच्या गयावया करतो, की तेवढी लंगोटी आहे तशीच राहु देत. तेव्हा त्या भामट्य़ांचा म्होरक्या राजाला सल्ला देतो, की तसे केले तर तुमच्याच बा्पाच्या अब्रूचा प्रश्न उभा राहिल. तुम्हीच महाराज अनौरस संतती ठराल. तेव्हा आता नागडे होण्यावाचून पर्याय नाही. राजा त्यांना शरण जातो.

   राजा संपुर्ण नागडा होतो. पण  दरबार मात्र बेधूंद होऊन राजाच्या अप्रतिम स्वर्गिय वस्त्राचे गुणगान करण्यात गर्क झालेला असतो. मग त्या भामट्य़ांची हिंमत वाढते. ते म्हणतात, राजाच्या या अपुर्व वस्त्रांचे दर्शन सर्व जनतेला मिळाले पाहिजे. तेव्हा आता राजधानीतून राजाची नव्या वस्त्रांमध्ये मिरवणूक काढली पाहिजे. तेही होते. रस्त्याच्या दुतर्फ़ा लोकांनी गर्दी केलेली असते आणि झिंग चढल्यासारखे तमाम लोक त्या नागड्या राजाच्या नसलेल्या वस्त्रांचे गुणगान करत असतात. त्याच गर्दीत एका जवळच्या खेड्यातून आलेला म्हातारा गावकरी असतो. मजा बघायला मिळणार म्हणून त्याने सोबत आपल्या नातवाला आणलेले असते. लंगोटी नेसलेल्या त्या म्हातार्‍या गरीब गावकर्‍याच्या नातवाच्या अंगावर तर कपडेच नसतात. पण तो मजा अनुभवत असतो. मिरवणूक जवळ येताना व वाजंत्री वाजताना पाहून ते बालक आनंदलेले असते. मात्र काय चालले आहे, त्याचा त्या बालकाला पत्ताच नसतो. अखेर राजाचा रथ दृष्टीपथात येतो आणि ते बाळ जोरात ओरडते. "आयला, मी बी नागडा आनी राजा बी नागडा". नातवाचे हे शब्द कानी पडताच तो म्हातारा पोराच्या तोंडावर हात ठेवून त्याची मुस्कटदाबी करतो आणि त्याला गर्दीपासून दुर घेऊन जातो. तिथे पोराला चांगला धोपटून काढतो. नालायका, घराची बेअब्रू करतोस कायरे. दोन बापाचा आहेस कायरे मेल्या. म्हातार्‍याचे शिव्याशाप बाळाला कळत नाहीत. तो रडतरडत पुन्हा विचारतो, पण राजा नागडाच होता ना? त्याच्या अंगावर कपडे नव्हते ना?  

   मग आजोबा पोराला शहाणपणाचे चार शब्द सांगतो. राजा नागडाच आहे. पण अक्कल असेल तर त्याच्या अंगावरचे कपडे तुला दिसतील. नुसते दिसते तसे नसते. अनेकदा दिसते ते अक्कल वापरून बघावे व सांगावे लागते. लोकांना पटेल, रुचेल ते सांगावे. जे दिसते ते भलतेच असेल. म्हणून तेच सांगण्याला बेअक्कलपणा म्हणतात. जे खपून जाईल, सर्वांना मान्य होईल तेच सांगावे. मग ते तसे नसले तरी चालते. हे शहाणपण ऐकून ते बालक म्हणाले, मग आजोबा मी बेअक्कल राहिलेला बरा. मला खोटे बोलण्यासाठी अक्कल यायला हवी असेल, तर मला शहाणेच व्हायचे नाही. ही गोष्ट एवढ्यासाठीच सांगितली, की आज मी सत्यमेव जयतेबद्दल जे मुद्दे बोलतो, लिहितो किंवा सांगतो आहे, ते अनेक लोकांना आवडणारे नाहीत. राज्यशास्त्राच्या भाषेत त्यालाच पोलिटीकली इनकरेक्ट म्हणतात. मग पोलिटीकली करेक्ट काय असते? तर जे फ़ॅक्चुअली रॉंग म्हणजे वास्तवात चुकीचे असते, त्याला पोलिटिकली करेक्ट म्हणतात.. पण मला कधीच तसे बोलता, लिहिता वा सांगता आलेले नाही. मी वास्तवाच्या जवळ रहाण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे अनेकदा नावडते लिहितो, बोलतो, सांगतो. मी जे लिहितो आहे ते सत्य नाही, असा दावा मला नाराजी व्यक्त करणार्‍यांनी केलेला नाही. पण त्यांची एकच तक्रार आहे. मी खरे लिहित असलो, तरी आमिरबद्दल चांगले तेवढेच लिहावे. प्रश्न वा शंका उपस्थित करू नयेत. म्हणजेच पोलिटीकली करेक्ट असावे. मला आयुष्यभर ते जमले नाही आणि आज उत्तर आयुष्यात जमणे शक्य नाही. म्हणूनच आमिरच्या या नव्या सत्यमेव मिरवणूकीत सगळाच मीडिया त्याच्या स्वर्गिय कौतुकात रमला असताना, मी मात्र त्या नातवासारखा शंका काढत बसलो आहे. आणि माझा हा आजचा स्वभाव नाही.

   तीस वर्षापुर्वी मुंबईत गिरणीकामगार संपात त्याच कष्टक‍र्‍यांचे जीवन तो संप उध्वस्त करणार, ही बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका मला पटली होती. म्हणूनच मी त्यांच्या भूमिकेचे समर्थन करणारे लेख लिहिले, तेव्हा अनेक पत्रकार व कार्यकर्ते मित्रांनी माझ्याकडे नाराजी व्यक्त केली होती. पण आज त्या गिरणी कामगाराची अवस्था काय आहे? तेव्हा डॉ. दत्ता सामंतांना गिरणी कामगारांचे उद्धारकर्ते ठरवणार्‍या पत्रकारांचे लेखही मी जपून ठेवले आहेत. ते त्यावेळी पोलिटीकली करेक्ट होते. पण त्यात सव्वा दोन लाख गिरणी कामगार देशोधडीला लागला. तेवढी कुटुंबे उध्वस्त होऊन गेली. मी मांडलेले सत्य वास्तविक होते पण ऐकून घ्यायला कोण तयार होता? आज वाटते मी चुकीचा ठरला असतो, तरी बिघडले नसते. कारण मुद्दा कोण बरोबर असण्याचा नव्हता तर मानवी जिवन उध्वस्त होण्याचा आहे. गिरणी कामगारांच्या घरातली एक पिढी त्यात उध्वस्त होऊन गेली. त्याचे चटके पोलिटीकली करेक्ट बोलणारे व लिहिणारे आहेत, त्यांना भोगावे लागलेले नाहीत. तर त्यांच्या पोलिटीकल करेक्टनेसला भुलले, त्यांना हे दुष्परिणाम भोगावे लागले आहेत. आणि असेच नेहमी होत आले आहे. सामान्य माणसाला सोपी व पटणारी उत्तरे हवी असतात. आमिर ती त्यांना देतो आहे. मग ती त्यांना आवडणारच. डॉ. दत्ता सामंतही आवडेल असेच सत्य बोलत होते. "कोण म्हणतो देनार नाय घेतल्याशिवाय र्‍हानार नाय" ही आवडणारी व आवेश निर्माण करणारी घोषणा असली तरी सत्य नव्हती. कारण गिरणी धंदा डबघाईला आलेला होता व गिरण्या बंद करण्यासाठी मालकांना संप वा तत्सम काही तरी कारण हवेच होते. सामंतांच्या संपाने ते काम सोपे करून दिले. त्यांनी कामगारांना आवडणारे सत्य सांगितले. पण सत्य भलतेच होते. सत्य गिरण्या बंद पडण्याचे होते आणि तेच जिंकले. पण हे सत्य त्या आवेशात कोणाला ऐकायचे होते? आज आमिरच्या सोप्या व झटपट क्रांतीच्या मार्गाने भारावलेल्यांना तरी सत्य कुठे ऐकायचे आहे? त्यांना अवघड समस्या-प्रश्नांची सोपी उत्तरे हवी आहेत. ती मनोरंजक पद्धतीने मांडलेली बघायची आहेत. आमीर त्यांची गरज पुर्ण करतो आहे. मग इकडे भाऊने राजा नागडा म्हणून ओरडून काय होणार आहे?       ( क्रमश:)
भाग  ( २९४ )    १३/६/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा