समोर मृत्यू साक्षात उभा असताना माणूस खोटे बोलत नाही असे म्हणतात. म्हणूनच मृत्यूपुर्व जबानी वा कबूली ही अगदी न्यायालयातही ग्राह्य मानली जात असते. सहाजिकच ज्यांनी साक्षात मृत्य़ुशी गळाभेट केली, अशीही माणसे त्यातून बचावली तर खरेच बोलतात, अशी आपली समजूत असते. माझी तरी तीच समजूत आजवर होती. पण मंत्रालयाला लागलेल्या आगीतून जी मोजकी माणसे अत्यंत नशीबाने बचावली, त्यात अनेक मंत्र्यांच्या जनसंपर्क अधिकार्यांचा समावेश होता. त्यातले एक किशोर गांगुर्डे बचावले तरी त्यांचा पाय मोडला आहे. मग त्याच आगीबद्द्ल त्यापैकी कोणी खोटे निवेदन करील का? भले मग रोजच्या नोकरीत सरकारी पेशा म्हणुन त्यांना सरकार व मंत्र्यांच्या नाकर्तेपणाव पांघरूण घालण्याचेच काम करावे लागत असो. इथे जे सांगायचे आहे, ते सरकारी निवेदन नसून, त्यांना ज्या मरणयातनांमधून जावे लागले, तो व्यक्तीगत अनुभव आहे. तेव्हा त्यांनी निव्वळ खरे बोलावे, एवढीही सामान्य जनतेने अपेक्षा करू नये काय? माझा एक सामान्य नागरिक म्हणुन तिथेच अपेक्षाभंग झाला आहे. म्हणूनच मंत्रालयाच्या आगीतून सहीसलामत सुटलेल्या, पण सरकारी खोटेपणाच्या फ़ुफ़ाट्यात पडलेल्या या जनसंपर्क अधिकार्यांच्या त्या जगजाहिर निवेदनाची उलटतपासणी मला अगत्याची वाटते. त्यांनी आपले खरेखुरे विदारक अनुभव कथन केले आहेत, की त्यांच्यावर त्यातही खोटे बोलण्याची व लिहिण्याची सक्ती झाली आहे? कारण जे अन्यत्र छापून आले वा सांगितले गेले, त्याच्या पलिकडे या सर्वांनी आपापल्या परीने त्यात खोटे बेमालूम मिसळण्याचा केलेला प्रयत्न लपून रहात नाही. ’पुढारी’ दैनिकातील संजय देशमुख कथित बातमीतली एक विसंगती मी काल दाखवली होती. ते एकाचवेळी अनेकजागी असल्याचे दावे करतात, हा बेछूट खोटेपणाच आहे, स्वत:च्या जीवावर बेतले असतानाही माणुस इतका खोटेपणा का करत असतो, असा मला प्रश्न पडतो.
देशमुख यांच्या (पुढारी) निवेदनातील ही दोन वाक्ये तुलना करून वाचा. १)"पाऊण तासानंतर नाकातोंडावर तापलेल्या धुराचे काळे लोट यायला लागले. खिडकीत लटकणे अगदीच अशक्य झाले." २)"अर्ध्या तासानंतर धुराचे लोट खुपच वाढले आणि मग आमचा धीर सुटायला लागला." इतकी विसंगत विधाने माणूस कसा करू शकतो? वाचक किंवा ऐकणारा तद्दन बेअक्कल आहे, याची खात्री असल्याशिवाय कोणी इतका बेछूट खोटेपणा करील काय? एकाच निवेदनात व पाठोपाठच्या परिच्छेदात पाऊण तासाचा अर्धा तास कसा होऊ शकतो? तेच देशमुख म्हणतात, " परंतु सुटकेची खरी कार्यवाही झाली ती शेवटच्या १५ मिनीटात. त्या १५ मिनीटात दादांच्या नेतृत्वाखालीच सगळी सुत्रे हलली." हे खरे मानायचे तर अजितदादा ती शेवटची १५ मिनीटे येण्य़ाची वाट बघत आधीपासून निष्क्रिय राहिले होते काय असा प्रश्न पडतो. पण देशमुख जे दादांना श्रेय देऊ पहात आहेत ते किती खोटे आहे, ते त्याच देशमुखांच्या त्याच निवेदनातून साफ़ उघडे पडले आहे. त्यासाठी पुढला परिच्छेद कालजीपुर्वक वाचा-
"दुपारी पावणे तीनच्या सुमारास अजितदादांच्या अध्यक्षतेखाली सहाव्या मजल्यावरील त्यांच्या समिती कक्षामध्ये बैठक होणार होती. त्यासाठी ते आले देखील. परंतू धुराचा वास येऊ ला्गल्याने धुर जाईपर्यंत सचिवांच्या दालनात दुसर्या ठिकाणी बसावे म्हणून ते बाहेर पडले. परंतु तोवर धुर जमा होऊ लागला होता. त्यामुळे सचिवांच्या दालनात न थांबता नाकावर रुमाल धरत आणि धुरातून वाट काढत, मध्ये भेटणार्या प्रत्येकाला बाहेर पड्ण्यासाठी खाली पिटा्ळत ते मंत्रालयाच्या विस्तार इमारतीकडे गेले. तिथून आरसा गेटच्या जिन्याने सहाव्या मजल्यावरून तळमजल्यापर्यंत खाली आले. अजितदादा समिती कक्षातून बाहेर पडल्यानंतर आम्ही सर्वांनी त्यांच्या पाठोपाठ बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. परंतु चौथ्या आणि पाचव्या मजल्यवरील धुराचा प्रचंड मोठा लोळ जिन्याच्या मार्गाने आमच्या कक्षासमोरच्या जागेत आल्याने आम्हाला कुणालाही बाहेर पडणे शक्य झाले नाही."
यातून देशमुख काय सांगतात? जेव्हा दादा बैठकीसाठी आले तेव्हाच त्यांना धुराचा म्हणजे आगीचा "वास" आला होता. म्हणुनच आमंत्रितांना त्याच धुरात घुसमटायला सोडुन दादा स्वत: मात्र धुरविरहित असेल अशा सचिवांच्या दालनात बसायला गेले. तिथेही तोच वास म्हणजे आग असल्याचे पाहुन दादांनी सटकण्याचा स्वत:पुरता निर्णय घेतला. पण आपल्या समिती कक्षात ज्यांना बसायला सांगितले आहे, ते घुसमटून मरतील याची दादांना फ़िकीर नव्हती. समिती कक्ष व सचिवांचे दालन यात फ़ारसे अंतर नसावे, म्हणुनच दादांच्या हालचाली देशमुखांना दिसत होत्या. दादा सटकताना पाहिल्यावर शंका आल्याने देशमुखांसह आमंत्रितही सटकण्याचा विचार करत होते. पण तोवर दादा धुराच्या लोटापलिकडे सुखरूप पोहोचले होते व त्यांनी थंड चित्ताने (मागे वळूनही न बघता) मागे राहिलेत त्यांच्या सुटकेचा विचारही मनाला शिवू दिला नव्हता. जे दादा जिन्याच्या दिशेने निघाले असताना, वाटेत दिसेल त्याला बाहेर पडण्याचा नुसता आदेशच देत नव्हते तर पिटाळून लावत होते, त्याच अजितदादांनी मागे समिती कक्षापाशी असलेल्या देशमुखांना ओरडून बाहेर पडायचे आदेश का दिले नाहीत? दादा काय करतात हे देशमुखांना दिसत होते, म्हणजेच कक्षात अडकलेली मंडळी दादांच्या आवाजाच्या टप्प्यात होती ना? मग दादांनी आपल्या जीवाभावाच्या देशमुखांना पिटाळुन लावण्याचा एकही प्रयत्न का केला नाही? की देशमुख वगैरे मंडळी तिथेच धुरामध्ये व आगीत घुसमटून जावी, ही दादांच्या आपत्ती व्यवस्थापनाची एक चाल होती? म्हणजे या जनसंपर्क अधिकार्यांना मुद्दाम समिती कक्षात धुर व आगीत फ़सू द्यायचे आणि आपण खाली जाऊन त्यांच्या सुटकेसाठी अग्नीशमन दलाची शिडी पाठवून त्यांची मृत्यूच्या जबड्यातून मुक्तता करायची योजना मनाशी आखतच दादांनी आरसा गेटकडे जाणारा जिना गाठला होता?
साधा ओरडून आवाज दिला असता, तर समिती कक्षात बसलेले व अडकलेले जनसंपर्क अधिकारी धुराचा लोट पार करून दादांच्या पाठोपाठ आरसा गेटकडे जाणार्या जिन्याकडे धावून येऊ शकले असते, ते सोपे काम दादांनी का करू नये? कारण देशमुखच सांगतात, की दादांच्या पाठोपाठ त्यांनीही समिती कक्षातून बाहेर पडायचा प्रयत्न केला होता. पाठोपाठ बाहेर पडणे म्हणजे दोन व्यक्तींच्या मध्ये दोनचार पावलांचेच अंतर असते, तेवढे अंतर दादा पार करू शकले तर देशमुखांना का पार करता आले नाही? की अजितदादा म्हणजे टेन कमांडमेंटस या चित्रपटात दाखवले आहे, तसे मोझेस आहेत? त्याने नदीच्या पात्रातून सुका रस्ता काढण्याचा चमत्कार घडवला होता. दादांना धुरातून निसटता येते आणि देशमुखांना तोच धुर तापलेला फ़ुफ़ाटा वाटतो काय? की दादा उष्णतारोधक कपडे नेहमीच वापरतात. त्यामुळे त्यांना तापल्या धुराच्या झळा जाणवल्या नाहीत आणि देशमुख आदी मंडळींना मात्र तो धुर सहन करता आलेला नाही? सचिवाच्या दालनाकडे बसायला गेलेले अजितदादा मागे राहिलेल्यांना एका शब्दानेही सावध करत नाहीत. पण पुढे गेल्यावर रुमाल नाकावर लावून अन्य अनोळखी लोकांना मात्र सुरक्षेसाठी बाहेर पडायला सांगतात, पिटाळून लावतात, हा भेदभाव कशाला करतात? समिती कक्षात दादांनी बोलावलेल्या बैठकीसाठी आलेले काही पावलांवर असताना अजितदादांनी त्यांच्याबद्दल अनास्था का दाखवली, त्याचे उत्तर देशमुख देत नाहीत. खरे सांगायचे तर त्यांच्या या निवेदनाने अजितदादांनी देशमुखांसह अन्य आमंत्रित जनसंपर्क अधिकार्यांना आगीत व धुरात घुसमटून मरायला कसे सोडुन दिले होते, हेचा सिद्ध होते. त्याची देशमुखांनी प्रथमदर्शनी साक्षच दिली आहे. जे काम दादा नुसत्या हाका मारून वा ओरड्याने करू शकले असते, ते काम होते देशमुख व इतरांना आधीच निसटण्यची संधी देण्याचे. पण अजितदादांनी नेमके तेवढेच सोपे काम केले नाही. म्हणुनच देशमुख व इतर आगीच्या सापळ्यात अडकले होते. त्यांना नंतर अग्नीशमन दलाच्या शिडीने सोडवणे दादांच्या हाततले काम नव्हते. अगदी मुख्यमंत्री वा उपमुख्यमंत्रीही ते काम करू शकत नव्हता. अग्नीशमन दलाच्या अधिकारी वा जवानांना दम देण्याच्या गोष्टी सोडून द्या. कारण ते असे कुणाला आग विझवतानाच्या वेळी दाद देत नाहीत. ज्यांनी त्या वेळी अजितदादांना टीव्हीवर पाहिले असेल, त्यांना दादांचा भेदरलेला चेहरा कधीच विसरता येणार नाही. तेव्हा देशमुखांनी दमदाटीच्या थापा मारण्यात अर्थ नाही. जो माणूस स्वत:च भेदरलेला व गोंधळलेला होता, तो अग्नीशमन दलाला, अधिकार्यांना दम देतो, आदेश देतो, हे कुठल्यातरी कॅमेरात चित्रीत झाल्याशिवाय राहिले काय? पन कॅमेराला दिसले नाही व टिपता आले नाही ते देशमुखांना धुराच्या लोटातूनही स्वच्छ दिसते ही कुठली सिद्धी आहे? वाचक इतका मुर्ख असतो का? (क्रमश:)
भाग ( ३११ ) ३०/६/१२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा