गुरुवार, १४ जून, २०१२

भाविकाला छळणार्‍यात एकही डॉक्टर नव्हता ना?


    चोरट्यास रोखण्याच्या प्रयत्नात पाय गमवावा लागत असताना तिला मदत करण्याऐवजी रेल्वे यंत्रणा, विमान कंपन्या, एम्ब्युलन्स सेवेतून आलेल्या दारुण अनुभवाने भिवंडीतील मेहता कुटुंबिय व्यथित झाले आहेत. अंबाला येथे एक्स्प्रेसमध्ये चोरट्यास रोखताना रुळाखाली भाविकास पाय गमवावा लागला. मात्र  माणुसकीच्या भावनेतून भाविकास तात्काळ मदत करण्याऐवजी नियमांवर बोट ठेवत लुटालुटीचा डाव रंगवण्यात सार्‍या यंत्रणा दंग झाल्या होत्या . 
   भाविकासह मेहता कुटुंबियातील ३१ सदस्य काश्मीरमध्ये गेले होते. परतताना अमृतसरमध्ये सुवर्णमंदिराचे दर्शन घेऊन ४ जून रोजी ते गोल्डन टेंम्पल एक्सप्रेसमध्ये बसून परतीच्या मार्गावर आले. रात्री झोपण्यावेळी भाविकाने डोक्याखाली पर्स घेतली. मध्यरात्रीच्या सुमारास एका चोरट्याने ही पर्स खेचून पोबारा केला. तेव्हा जाग आलेल्या भाविकाने पाठलाग करत चोरट्यास दरवाज्याजवळ गाठले . तिथे दोघांची झटापट उडाली. तेव्हाच एक्स्प्रेसने वेग घेतला आणि चोराने भाविकास खेचले. यात तोल गेलेल्या भाविकाचा डावा पाय दुर्दैवाने रुळांखाली आला आणि तिला पाय गमवण्याची वेळ आली . 
   तोपर्यंत भाविकाचे वडिल किरण ( ५२ ), भाऊ राहुल यांनी तिला वाचवण्यासाठी स्टेशनवर उडी टाकली आणि ते दोघेही जखमी झाले. यानंतर मेहता कुटुंबियातील काहींनी तिघांना अंबालातील सरकारी हॉस्पिटलमध्ये नेले. तिथेच भाविकाचा डावा पाय कापावा लागेल, हे डॉक्टरांच्या लक्षात आले. त्यानंतर भाविकास रेल्वेने चंदीगडला नेण्यात आले . 
   मुंबईत चांगल्या उपचारांसाठी नेण्यासाठी तिच्या काही नातेवाईकांनी तिकीटासाठी चंदीगड रेल्वे अधिका्र्‍य़ांशी संपर्क साधला. तिला मुंबईला नेणे आवश्यक असल्याने तिकिटांची व्यवस्था करण्याची विनंती केली. मात्र सरकारी बाबूंनी नियमात बसत नसल्याचे सांगून त्यांची तिथून अक्षरशः बोळवण केली . 
   नाऊमेद होत त्यांनी विमानकंपन्यांकडे धाव घेतली. तिथेही, आमच्या पॅनेलचे डॉक्टर तिला तपासतील असे सांगत या तिकिटांसाठी ७२ तास अगोदर आरक्षण करावे लागते असे सांगितले. त्याशिवाय, अपघातग्रस्त व्यक्तीसाठी विमानात विशेष आसन असले तरी तिच्यासोबत अन्य तिघांना नेण्याच्या सुविधेसाठी २ लाख रुपये खर्च येईल, असे कळवून टाकले . इथेही माणसुकीचा लवलेश नसल्याचे पाहून त्यांनी खासगी एम्ब्युलन्सकडे चौकशी केली. तिथेही, एम्ब्युलन्स मालकाने सेवा देण्यासाठी चक्क ९० हजारांची मागणी केली. ' अडला हरी ...' म्हणत ही एम्ब्युलन्स घेत भाविकास मुलुंडमधील राज हॉस्पिटलमध्ये दाखल केले . 
   त्याचवेळी, टेम्पल एकस्प्रेसमध्ये वेगळेच नाट्य घडले. सर्वांचे तिकीटे किरण मेहतांकडे होती. त्याचा फायदा तिथल्या टीसीने घेतला. इतर सदस्यांकडे तिकीट नसल्याचा गैरफायदा घेत टीसीने पाच हजार रुपये मागितले आणि काहींना एक्स्प्रेसमधून उतरवले . 
  आपत्कालीन स्थितीत मदत करण्याऐवजी या सर्व यंत्रणांनी आम्हाला लुटण्याचा चालवलेला प्रयत्न वाईट आणि उद्विग्न करणारा असल्याची प्रतिक्रिया भाविकाने व्यक्त केली आहे . तर, भाविकाने दाखवलेल्या धाडसाची किंमत अशी मोजावी लागेल असे स्वप्नातही वाटले नव्हते ही तिच्या कुटुंबियांची व्यथा आहे .  

   सोमवार ११ जुनच्या महाराष्ट्र टाईम्स या दैनिकात छापून आलेली ही बातमी आहे. यात भाविका व तिच्या कुटुंबियांना यमयातना देणा‍यात कुठे कोणी डॉक्टर किंवा औषध कंपनी सहभागी नाही ना? भाविका मेहता आणि तिच्या कुटुंबाला जो अनुभव आला तो वैद्यकीय समस्येशीच संबंधित आहे. एका मुलीला पाय गमवावे लागले आहेत. तिच्या वडील व भावाला जखमी व्हावे लागले आहे. त्यात वास्तविक रेल्वेतील असुरक्षित प्रवासामुळे तिच्यावर हा प्रसंग ओढवला आहे. पण तिला वैद्यकीय मदत मिळावी यासाठी जी धडपड व धावपळ चालू होती, त्यात वैद्यक व औषध उत्पादक सोडून अन्य सेवांनी, यंत्रणांनी कसा प्रतिसाद दिला? भले ते वैद्यक क्षेत्राशी संबंधित नव्हते. पण एका जीवाशी प्रत्येकजण खेळत होता ना? आणि जो अनुभव भाविका व मेहता कुटुंबियांना  आला तोच अनुभव राणे, सावंत पाटिल वा पटेल, चोप्रा किंवा सुब्रह्ममण्यम असते तरी आला असता. कारण सवाल नावाचा नाही तर अशा अवस्थेत अडकलेले व फ़सलेलेल आसतात, त्यांना माणूसकीने मदत करण्याच्या उपजत प्रवृत्तीचा आहे. ती असती तर भाविकावर ही वेळ आली नसती. पण तशी वेळ आली व येते. कारण आपण माणुसकीच गमावून बसलो आहोत. आपण कमालीचे असंवेदनाशील व बधीर होऊन गेलो आहोत. तसे नसते तर यावेळी कित्येक लोकांनी भाविकाच्या मदतीला धाव घ्यायला हवी होती. पण तसे झाले नाही. ज्यांनी मदत करावी ते बेपर्वा वागले किंवा त्यांनी जिवावर बेतले होते त्यांच्या अगतिकतेचा लाभ उठवायचा प्रयत्न केला.

   यापैकी पाचपन्नास लोकांनी तरी सत्यमेव जयते नक्कीच बघितलेला असणार. पण त्यातले किती लोक प्रसंग ओढवला तेव्हा भाविकाच्या मदतीला धावले? नसतील तर का नाही धावले? ज्यांनी त्या अगतिकतेचा व लाचारीचा गैरफ़ायदा घ्यायचा प्रयत्न केला त्यात डॉक्टरी पेशाचा कोणीच नाही ना? म्हणजेच मुद्दा इतकाच, की फ़क्त डॉक्टरच लोकांच्या आजाराचा लाभ उठ्वतात, लोकांची लूट करतात व त्यांच्या जीवाशी खेळतात हा दावा अर्धवट सत्य आहे ना? फ़क्त डॉक्टर नव्हे तर ज्याला ज्याला तशी संधी आहे त्याला दुसर्‍याला लुटायचे आहे. मग ती लूट करताना कोणाच्या जीवाशी खेळायचा प्रसंग आला तरी बेहत्तर. याचीच साक्ष ही घटना देते ना? मी आमिरच्या सत्यमेव जयते मधील ज्या त्रूटी व अर्धसत्य समोर आणायचा प्रयत्न केल्यामुळे जे वाचक विचलीत झाले, त्यांच्यासाठीच हा खुलासा आहे. सवाल फ़क्त डॉक्टरी पेशाचा नाही. कुठल्याही क्षेत्रात जा, प्रत्येकजण दुसर्‍याला लुबाडायला उत्सुक आहे. ती लूट करताना आपण कोणाच्या जीवाशी खेळतोय याची फ़िकीर कोणाला राहिलेली नाही. अशा समाजात आपण जगत असताना डॉक्टर देखिल त्याचेच एक घटक आहेत. ते त्या पाशवी मनोवृत्तीला अपवाद असतील अशी अपेक्षा करता येईल काय? मग होते असे की ज्याला अशी संधी नाही तो आपण त्यातले नाही, असे साळसूदपणे सांगू पहातो. आमिरच्या एकू्णच कार्यक्रमातील ही दिशाभूल आहे. ठराविक पेशा किंवा मंडळी सोडली तर बाकी सगळे चांगले आहे असा जो गैरसमज त्यातून तो निर्माण करतो, तो धोकादायक आहे. त्यातून मोठे लोकप्रबोधन होते, जनजागृती होते, असे मला काही वाचकांनी आग्रहपुर्वक सांगितले. त्यात किती तथ्य आहे?

   सत्यमेव जयतेचा दुसरा भाग १३ मे रोजी प्रक्षेपित झाला. त्यात त्याने बालकांना अत्याचार होत असेल तर ओरडण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. इथे भाविका ओरडतच चोरामागे धावली होती. त्या रेल्वे डब्यात किमान ८० प्रवासी झोपले होते. त्यापैकी किती तिच्या मदतीला धावले? तिचा अपघात झाल्यावरही किती तास तिला साधी उपचाराला नेण्याची धावपळ होऊ शकली नाही? रेल्वे, विमान वा अन्य यंत्रणा व सेवा इतक्या अमानुष का होत्या? का तशा वागल्या? त्यापैकी कोणीच आमिरचा कार्यक्रम बघत नाही असे म्हणायचे काय? त्याने केलेल्या प्रबोधनाचे काय? प्रबोधन झाले असते तर भाविकाच्या मदतीला आसपासचे लोक का आले नाहीत? कारण अशा वेळी मदतीला धावणे त्रासदायक व कष्टाचे काम आहे. त्यापेक्षा आमिरला एसएमएस पाठवणे खुप सोपे व स्वस्त आहे. आमिरच्या सत्यमेव जयतेने भारावलेले किती लोक अशा प्रसंगी धाव घेतील? एकजणही धाव घेत नसेल तर आमिरका असर म्हणजे काय? आमिरने प्रबोधन व जागृती केली म्हणजे नेमके काय केले वा झाले आहे? हे जनजागृतीचे दावे खरे असतील तर भाविकावर अशी दुर्दैवी वेळ आली असती का? त्या गोल्डन टेंपल गाडीतल्या प्रवाशांपासून रेल्वे, विमान, एम्ब्युलन्स अशा सर्वच सेवेतील लोक सत्यमेव जयतेकडे पाठ फ़िरवून बसले आहेत असेच म्हणायचे काय? जे कोणी आवेशात आमिरच्या असर विषयी बोलत असतात, त्यापैकी एकही अशा कसोटीच्या प्रसंगी भाविकाच्या वाट्याला का आला नाही? तसे झाले असते तर तिचे पाय शाबूत राहिले असते. तिच्या कुटुंबियांना अशा नरकयातनांमधून जाण्याची वेळ आली नसती. सत्यमेव जयतेच्या पाच भागांच्या प्रक्षेपणानंतर महिनाभराने ही घटना ४ जुनला घडलेली आहे. तेवढ्या काळात किमान एक कोटी एसएमएस आमिरला आले असतील. पण त्यापैकी एकही हरीचा लाल भाविकाच्या मदतीला जाऊ शकला नाही. उलट तिच्या वाट्या्ला आले ते सगळेच डॉक्टर नसलेले पण यमराजाचे सहोदर आप्तस्वकीयच होते ना? (क्रमश:)
भाग  ( २९५ )    १४/६/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा