शुक्रवार, २२ जून, २०१२

माझे शब्द पोकळ शहाणपणाचे नाहीत


   फ़ादर्सडेच्या निमित्ताने माझी जी ओळख त्या लेखाने करून दिली, त्याने अनेक वाचक चकीतही झाले. कारण त्यांना प्रथमच लक्षात आले, की हा माणुस जे लिहितो त्याप्रमाणे वागायचा प्रयत्नही करतो. त्याचीही गोष्ट इथे सांगणे मला अगत्याचे वाटते. मी माझ्या मुलीच्या बालपणी आवश्यक होते तेव्हा माझ्या गरजा किंवा इच्छा बाजूला ठेवून तिला वेळ दिला, याचे लोकांना खुप कौतुक वाटते. किंबहूना त्यासाठीच त्या दिवशीच्या ’लोकसत्ते’तील त्या लेखाचे प्रयोजन होते. पण त्यात नेमके महान किंवा खास असे काही असावे असे मला अजीबात वाटत नाही. जर मीच तिला त्या काळात संभाळू शकणारा एकमेव व्यक्ती होतो व तिच्या आईला ते शक्यच नव्हते, तर मी जे केले त्यात मोठे असे काय आहे? एक जन्मदाता म्हणुन ते माझे कर्तव्यच नव्हते काय? केवळ मुलांच्या गरजा व त्यासाठी लागणारे पैसे किंवा साधने पुरवणे, एवढीच पालकाची जबाबदारी असते काय? पण दुर्दैवाने आज तशीच एक ठाम समजूत तयार झाली आहे. त्यातून अनेक समस्या तयार झाल्या आहेत. आपण मुलांना सर्वकाही द्यायला तयार असतो. त्यासाठी भरपुर पैसा मिळवणे हे आजच्या पालकांचे उद्दीष्ट बनले आहे. पण मुलांसाठी वेळ द्यायला मात्र आपण कमालीचे कंजुष असतो. मी तिथेच उदार होतो. किंवा जागरुक होतो म्हणायला हरकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे मुलीला अगदी कोवळ्या वयात संभाळावे लागल्याने मुलांच्या वाढीतले अनेक बारकावे मला शिकता आले. 

   थोडा वेळ माझी व मुलीची गोष्ट बाजूला ठेवून आजच्या पालकांना भेडसावणारी सर्वात मोठी समस्या बघू. दोन अडिच वर्षाच्या मुलांना हल्ली पालक शाळा नावाच्या कोंडवाड्यात नेऊन डांबत असतो. त्यासाठी मुल अवघे वर्षाचे झाल्यापासून धावपळ सुरू होते. कुठली शाळा, तिथे द्यायची देणगी, मासिक फ़ी, वेळोवेळी शाळा मागेल ते पैसे व खर्च, अधिक शिकवण्या, अशा खर्चाने पालक बेजार झाला आहे. कारण तो आपल्या उत्पन्नानुसार मुलाच्या शिक्षणाचे पाच सात वर्षाचे बजेट आखून कुठल्यातरी शाळेत प्रवेश मिळवत असतो. पण त्याच शाळेने त्यात दरवाढ केली, मग पालकाचे बजेट कोसळते. माझे तसे झाले नाही. कारण कुठलीही शाळा मुलांना उत्तम शिकवते, यावर माझा विश्वासच नव्हता. त्यापेक्षा प्रत्येक मुलाचा पालक किंवा प्रामुख्याने त्याची आईच त्याच सर्वोत्तम शिक्षक असतो, असे माझे ठाम मत होते. ते नुसते माझे मत नव्हते, तर माझ्या औपचारिक शिक्षण न घेतलेल्या आईकडून जे शिकलो त्यापासून तयार झालेले अनुभवी मत होते. ते अर्थातच कोणाला पटणारे नव्हते. कारण साधारण तीसचाळीस वर्षापुर्वीपासून मध्यमवर्गात इंग्रजी शिक्षणाचे खु्ळ शिरले होते. मध्यमवर्ग किंवा उच्चभ्रू मध्यमवर्गात त्याची आधी लागण १९७० च्या दशकात झाली. मग क्रमाक्रमाने इतर वर्गात जशी सुबत्ता येत गेली, तसतसे हे इंग्रजी माध्यमाचे खुळ साथीच्या रोगासारखे सर्वत्र पसरत गेले. माझ्या मुलीला शाळेत घालण्याच्या दरम्यात ते कनिष्ठ मध्यमवर्गात पसरू लागले होते. त्यामुळेच माझ्याही मुलीला दोन तीन वर्षाची असताना इंग्रजी नर्सरी म्हणजे प्राथमिक शि्क्षणपुर्व वर्गात दाखल करण्यात आले होते. मला ते अजिबात पटलेले नव्हते. मुलांना मराठीत शिकवायला हवे असे माझे "अभिमानी" मत होते. पण भावी काळात इंग्रजीला पर्याय नाही हे आम्ही पालक झालो त्या पिढीच्या इतके डोक्यात फ़ीट बसले होते, की मी घरात व कुटुंबात त्याचा प्रतिवाद करूच शकलो नाही. पर्यायाने माझीही मुलगी नर्सरीत दाखल झाली.

   पण भाऊ तोरसेकर हा अत्यंत चेंगट स्वभावाचा माणुस. माझे मन हट्ट सोडायला तयार नव्हते. पण माझ्या हाती मराठी किंवा मातृभाषेत शिकण्याने कल्याण होते, असे दाखवणारा कुठलाही पुरावा नव्हता. योगायोग असा, की "लोकप्रभा" साप्ताहिकात मी त्यावेळी लिहित होतो आणि वसुंधरा पेंडसे नाईक तिथे संपादक होत्या. त्यांच्याशी या विषयावर बोलणे झाले आणि त्यांनी त्यावरच लिहायचे काम मला दिले. लेख लिहिण्यापेक्षा मला माझ्या मुलीने मराठी माध्यमातून म्हणजे मातृभाषेच्या माध्यमातून शिकावे, या कल्पनेने पछाडले होते. मग मी अक्षरश: शेकडो लोकांशी बोललो. चारपाच नावाजलेल्या शाळाचे प्राचार्य, शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांशी मी संवाद साधला. त्यांचे अनुभव जमा करत गेलो. त्यातून इंग्रजी माध्यमाविषयी इतरांचे गैरसमज दुर करणे सोडाच, माझा स्वत:चाही गैरसमज दुर झाला. तो खरेच चमत्कारिक अनुभव होता. मुळात मी मातृभाषेच्या अभिमानाने ते काम हाती घेतले होते. पण जेव्हा माहिती जमवली, तेव्हा माझ्या लक्षात एक धक्कादायक गोष्ट आली. ती अशी, की उत्तम इंग्रजी भाषा शिकण्य़ासाठीच मुळात मुलांना मातृभाषेच्या माध्यमातून शिकवणे आवश्यक आहे. म्हणजेच इंग्रजी उत्तम येण्यासाठी इंग्रजी माध्यमात प्रवेश मिळवणे किंवा त्यासाठी प्रचंड देणगी, फ़ी वा खर्च हा शुद्ध मुर्खपणा आहे. मग त्यावर माझे असे जगावेगळे वाटणारे मत मांडणारा लेख मी लिहिला होता. तो "लोकप्रभा"च्या १८ व २५ ऑगस्ट १९८५ असा दोन भागात दोन अंकात प्रसिद्ध झाला होता. त्याचे शिर्षकच होते, "मातृभाषेला पर्याय नाही". तेव्हा अर्थातच माझी मुलगी इंग्रजी नर्सरीमध्ये शिकत होती, पण तिला मराठी माध्यमात आणायचा माझा निर्धार पक्का होता. पुढल्या वर्षी ती पहिलीत गेली आणि मी तिला मराठी माध्यमात आणुन बसवले. तेव्हा त्या शाळेचे खुद्द मुख्याध्यापकही थक्क झाले होते. कारण तेव्हा आजच्याप्रमाणे इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे पेव फ़ुटले नव्हते आणि इंग्रजीत प्रवेश मिळवायला मोठीच झुंबड उडालेली असे. मग हा एक पालक इंग्रजीतला प्रवेश रद्द करून मुलीला मराठीत आणतो, तेव्हा त्यांनाही मी व्यवहारी चक्रम वाटलो तर नवल नव्हते.

   पण मी जेव्हा त्यांना माझ्या लेखाचे दोन्ही भाग वाचायला दिले, तेव्हा त्यांनाही माझे मत पटले. मात्र मित्र परिचित वा कुटुंबियांच्या मनातही शंकाच होत्या. पण कोणी विरोध केला नाही. कारण माझा हट्टी स्वभाव आणि त्यांचा माझ्याविषयीचा अनुभव. जवळची कुटूंबातली इतर मुले इंग्रजी माध्यमात असताना माझा हा हटवाद कोणालाही खटकणे स्वाभाविकच नाही काय? पण मुद्दा इतकाच, की मी जेव्हा बोलतो वा लिहितो तेव्हा ते मलाच पटलेले असते आणि त्याच्यावर माझा विश्वास असतो. ते कागदी वा शाब्दिक शहाणपण नसते. तेव्हा अनेकांनी मी मुलीच्या आयुष्याची माती करतोय, असा शेरा मारला होता. त्यांच्यावर मी अजिबात रागवलो नाही. कारण त्यांनी सत्य अजून बघितले नव्हते. जेव्हा मी माझ्या त्या हटवाद किंवा प्रयोगात यशस्वी झालो, तेव्हा त्यापैकीच अनेकांनी त्या अनुभवावर पालकांना मार्गदर्शन करणारे पुस्तक लिहावे असा सल्लाही मला दिला. मी ते ( कोरीपाटी ) लिहून प्रसिद्धही केले आहे. मी अशा सर्वांच्या मताचा आदर करतो. कारण त्यांची मते खोटी वा चुकीची नसतात. अनेकदा अशी मते अपुर्‍या माहितीवर आधारलेली असतात. दोष त्यांचा नसतो, तर त्यांना अपुरी माहिती देऊन अंधारात ठेवणर्‍यांचा असतो. शिवाय सोपी उत्तरे वा उपाय लोकांना आवडतात. ज्यात कष्ट नाहीत. स्वत:ला गुंतून पडावे लागणार नाही, असे उपाय व मार्ग लोकांना आवडतात. मग असे मार्ग सुचवणारा, उपाय सांगणारा त्यांना जिंकू शकतो. माझ्यासारखा प्रयत्नांची कास धरायला सांगणारा, जबाबदारी घ्यायला पुढे यायला सांगणारा, नावडता असणारच. त्याबद्दल माझी काहीही तक्रार नाही.

   इंग्रजी भाषा फ़ाडफ़ाड बोलता आली मग मुल हुशार झालेच, हा किती सोपा उपाय आहे ना? पुढे कॉलेजचे शिक्षण इंग्रजीतच असणार आहे. मग आतापासूनच इंग्रजी यायला हवे. उच्चभ्रू मध्यमवर्गाचे आंधळे अनुकरण कनिष्ठ वर्गातले लोक करत असतात. त्या अनुकरणात सोपा मार्ग असतो. अभ्यास वा निरिक्षण न करता त्याचे अनुकरण अत्यंत सोपे असते. पण ते केल्याने येणारे आकस्मिक धोके मग संकटात ढकलून देत असतात. आज जे इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे लोण खेड्यापाड्यापर्यंत जाऊन पोहोचले आहे, ते पाहिले मग त्या पदरमोड करणार्‍या व पोटाला चिमटा घेऊन मुलांवर अफ़ाट खर्च करणार्‍या पालकांची मला खरेच दया येते. पण त्यांना मी कुठली मदत करणार? माझ्याकडे त्यांच्यासाठी स्वस्त व उत्तम शिक्षणाचा मार्ग आहे. पण सोपा मार्ग अजिबात नाही. त्यातल्या किती पालकांना मुलांनी उत्तम शिकावे अशी इच्छा आहे? मुलाच्या शिक्षणावर मोठा खर्च करण्याच्या महत्वाकांक्षेने आजच्या सुखवस्तू व कनिष्ठ मध्यमवर्गिय पालकाला पछाडलेले आहे. पण तो खर्च परवडेनासा झाला, मग त्यांची तक्रार असते. फ़ी कमी करावी, देणगी कमी करावी, अशा मागण्या सुरू होतात. पण यातले किती पालक मुलांना वेळ देऊ शकतील? पैशापेक्षा आपल्या मुलावर दिवसातला काही वेळ खर्च केला तर कुठलीही सामान्य शाळा देखील तुमच्या मुलांना गुणी व हुशार बनवू शकते. कारण शाळा अभ्यास करून घेत असते आणि पालक व कुटुंबिय मुलांना खरे शिक्षण देत असतात. पण हे पटायचे कुणाला? मी हे तीस वर्षाच्या अनुभवातून सांगतोय. पण मी आमिरखान थोडाच आहे. माझे कोण ऐकणार?  ( क्रमश:)
भाग  ( ३०२ )    २१/६/१२

1 टिप्पणी:

  1. भाऊ ....माझ्या मुली १ लीत आहेत ...मीही त्यांना मराठी माध्यमात घातले आहे व मलाही असाच अनुभव येत आहे.माझ्या मनात काही शंका नाही पण लोकांना मला निट उत्तरे देता येत नव्हती ती आता तुम्ही लिहिलेल्या लेखामुळे देता एतील. शोकांतिका एकच आहे कि आजच्या घडीला पूर्ण मराठी माध्यमाच्या शाळाच उपलब्ध नाहीत , सर्व अर्धमराठीच..........!!!

    उत्तर द्याहटवा