मी सातारा माण तालुक्यातल्या महीमानगड गावात काही दिवस वास्तव्य करतो हे आधीच सांगितले आहे. तिथे शेजारीच सातवीतला अनिकेत कुंभार उर्फ़ बाबू नावाचा मुलगा आहे. त्याला हॉर्लिक्स किंवा बोर्नव्हिटा हवे असते. अशा कित्येक जाहिराती टिव्हीवर बघून खेड्यापाड्यातल्या मुलांनाही भुरळ घातली जात असते. त्यातल्या किती खाद्यवस्तू खरेच शारिरीक वाढीसाठी उपयुक्त आहेत? कुरकुरे किंवा पेप्सी लेहर अशा खाद्यवस्तू किंवा मॅगी नुडल्स तर अनेक आजाराला आमंत्रण असल्याचे सिद्ध झालेले आहे. पण आपण अगदी सुशिक्षित म्हणवणारे लोकही मुलांना त्याच अपायकारक गोष्टी अगत्याने खाउ घालत असतो. त्यातून आजारांना आमंत्रण देत असतो. चविष्ठ वाटावे व चवदार लागावे म्हणून अशा पदार्थांमध्ये ज्या रसायनांचा मारा केलेला असतो त्यातून डझनावारी आजार नकळत आपल्या शरीराचा कब्जा घेत असतात. केसाला लावायचे शाम्पु. वेगवेगळी तेले. सौंदर्यप्रसाधने यांचा जाहिरातीमधून आपल्यावर मारा होत असतो. त्यापैकी किती गोष्टी खरेच आपल्या गरजेच्या आहेत? किती अनावश्यक आहेत? किती आरोग्याला अपायकारक आहेत? पण आपण पैसे खर्च करून त्या आजार वा अपायांना आमंत्रण देतच असतो ना? आपण इतके मुर्ख आहोत काय, की पदरमोड करून कुठल्या अपाय आजारांना आमंत्रण देऊ? पण होते मात्र तसे आहे. जागतिक आरोग्य संघटना व अन्य संशोधनाने वेळोवेळी जे अहवाल दिलेले आहेत, त्याकडे पाहिल्यास पुढारलेल्या देशात चक्क बंदी असलेल्या अनेक वस्तू व उत्पादने इथे बेधडक निर्माण होतात व विकल्या जात असतात. त्यात औषधांचाही समावेश आहे. मग हे चालते कसे? तर त्यालाच ब्रॅन्ड मार्केटींग म्हणतात. एक नाव मोठे करायचे आणि मग त्याच नावाने काहीही भोळ्याभाबड्या लोकांच्या गळ्यात मारायचे. त्यासाठी लोकांना आवडणार्या व्यक्ती वा नावाजलेल्या लोकांना पुढे करायचे असते.
सचिन तेंडुलकर, आमिरखान, ऐश्वर्या राय, अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, महेंद्रसिंग धोनी, हे आपल्या देशातले लोकप्रिय चेहरे आहेत. त्यांच्यावर प्रेम करणारे, त्यांच्या प्रतिमेची भुरळ पडलेले लोक, त्यांच्या तोंडून बाहेर पडणार्या शब्दांवर सहजगत्या विश्वास ठेवत असतात. अशी नावाजलेली माणसे स्वत: एक व्यक्ती म्हणूनच ब्रॅन्ड झालेली असतात. मग अन्य व्यापारी कंपन्या त्यांना पुढे करून, आपला माल लोकांच्या गळ्यात मारायचा उद्योग करत असतात. त्याला मार्केटींग म्हणतात. हल्ली माल याचा अर्थ वस्तू एवढाच राहिलेला नाही. एखाद्या राजकीय सभेला गर्दी जमवण्यासाठी अशा लोकप्रिय व्यक्तींची हजेरी मोलाची मानली जाते. जाहिर सभा समारंभ, सोहळे उत्सव यात मग मुद्दाम त्यांना आणले जात. त्यांची हजेरी असली मग त्यांना बघायला गर्दी आपोआपच जमते. त्याला ब्रॅन्ड व्हॅल्यू म्हणतात. म्हणजे नावाची, छापाची किंमत. अगदी सत्यमेव जयतेची जी वेबसाईट आहे तिचेही तोतये निघाले आहेत. त्या बनवेगिरीला फ़सू नका असे का सांगितले जाते? तर आमिरच्या नावाने सत्यमेव जयते चालते. मग सत्यमेव जयते हे नाव ब्रॅन्ड होतो. त्याच नावाने अनेकजण आपली तुंबडी भरू शकतात. ते होऊ नये म्हणून तोतयेगिरीपासून सावध रहायचा सल्ला दिला जात असतो. पण मुद्दा काय आहे? तर ब्रॅन्ड. ज्या नावावर लोक विश्वास ठेवतात, आपला जो विश्वास आहे त्याचा हा असा धंदा चालतो. त्याला ब्रॅन्ड हे व्यापारी भाषेतले नाव आहे. एकदा का ब्रॅन्ड प्रस्थापित झाला, मग त्या नावाने काहीही खपवता येत असते. त्याची किंमत कितीही लावली तरी लोक मोजायला तयारच असतात असे नाही, तर उत्सुक असतात.
या बाबतीतला डॉक्टर विषयीचा माझा अनुभव इथे मुद्दाम नमूद करण्यासारखा आहे. माझी मुलगी काही महिन्यांची असताना डॉ. एस. एन. लोहे या नामवंत डॉक्टरांकडे आम्ही तिला घेऊन गेलो होतो. तिला चढलेला ताप उतरत नव्हता. पण तिच्या अंगाला हात लावण्यापुर्वीच त्यांनी आम्हा आईबापांना तंबी भरली, "तुमच्याकडे मोजायला पैसे आहेत म्हणुन इथे मुलीला माझ्याकडे घेऊन यायचे नाही. जरा सर्दी पडसे झाले म्हणून माझ्याकडे यायचे नाही. मुलीचे बारीकसारीक आजार तुम्हालाच हाताळता आले पाहिजेत. मुलांची तब्येत उत्तम राखायची तर त्याला डॉक्टरपासून दुर ठेवायचे असते. तुमच्याकडे खर्चायला पैसे असतील पण माझ्याकडे कुणाच्या श्रीमंतीचे चोचले पुरवायला वेळ नाही. जो आजारी आहे त्याच्यासाठीच माझा वेळ वापरता आला पाहिजे. माझा वेळ व कौशल्य खर्या आजारी मुलांसाठी आहे. इथे पैशाची मस्ती चालत नाही." त्यांचे शब्द मी अजून विसरलो नाही. कारण प्रत्येक पेशंटकडुन ते वेगवेगळी फ़ी घेत होते. आमच्याकडून तेव्हा त्यांनी शंभर रुपये घेतले तर आधी एक गरीब मुस्लिम महिला बाळाला घेऊन आली होती, तिच्याकडून फ़क्त दहाच रुपये घेतल्याचे मी पाहिले होते. आणि डॉक्टर लोहे कोणी सामान्य असामी नव्हती. बालरोगतज्ञ म्हणुन त्यांचा मुंबईच्या वैद्यक क्षेत्रात मोठाच दबदबा होता.
आणखी एक आठवण त्यांचीच इथे नमूद केलीच पाहिजे. त्यांनी लिहून दिलेले एक औषध दहा दुकाने फ़िरूनही मिळाले नाही, म्हणुन मी पुन्हा दुसर्या दिवशी त्यांच्याकडे गेलो व पर्यायी औषध लिहून मागितले. तर डॉ. लोहे यांनी मलाच दम भरला. मी सांगतो म्हणजे हे औषध उपलब्ध आहे. आणि तेच मुलीला दिले पाहिजे. दुसरे सांगणार नाही. बाप झाला आहेस तर पन्नास नाही शंभर दुकाने फ़िरून औषध शोधून काढ. पर्याय कसा चालेल? उपायाला पर्याय नसतो. शेवटी ते औषध मला दिड दिवस फ़िरल्यावर मिळाले. पुढे त्याबद्दल बोललो तर डॉक्टर म्हणाले तेच स्वस्त पण सर्वात उत्तम औषध होते. पर्याय महाग पण परिणामकारक नव्हते. मुद्दा इतकाच, की त्यांनी मला वैद्यक सेवेविषयी जागरुक बनवण्य़ाचे मोठे काम केले. पर्याय महत्वाचा नसून उपाय महत्वाचा असतो, हे मी तिथेच शिकलो. आज किती लोकांना आपल्या प्रकृतीविषयी तेवढी आस्था आहे? त्या डॉक्टरांनी मला नुसती औषधे सांगितली नाहीत तर माझ्या आरोग्यविषयक कल्पनांमध्ये आलेली विकृती साफ़ केली. जर तुम्हाला आपल्या प्रकृतीबद्दल फ़िकीर नसेल तर अन्य कोणी कशाला त्याची पर्वा करील, हेच त्यांच्या दमदाटीचे सार होते. आजच्या डॉक्टरांकडे आपण जातो, तेव्हा आपण खरेच किती जागरुक असतो? पैसे मोजायची मस्ती त्यामध्ये किती असते आणि आपल्या स्वत:च्या पकृतीमध्ये सुधारणा व्हावी, याबद्दल आपली आस्था किती असते?
आपल्याला आजारातून उपचार करणारा डॉक्टर हवा असतो, की झटपट चमत्कार घडवणारा जादूगार हवा असतो? पैशाची काळजी करू नका, अशी भाषा कुठेही ऐकू येत नाही काय? वाटेल ते करा डॉक्टर पण उद्या ठिकठाक झाले पाहिजे, असे कोण सांगत असतो? जेव्हा आसपासचे लोक असे बोलतात किंवा त्यातही पुढारलेले, सुखवस्तू लोक असे वागताना दिसतात, तेव्हा सामान्य माणुसही त्यांचेच अनुकरण करत असतो. आणि हा माझा शहरी अनुभव नाही. ज्या खेड्यात मी वास्तव्य केले आहे, तिथे दोन बाटल्या सलाईन चढवले हे मोठेपणाने सांगणार्यांना मी ऐकत असतो. त्याचे खुप दु:ख होते. मला तर हा आता आजारच वाटू लागला आहे. एखादी महागडी वस्तू खरेदी करावी तशा थाटात सामान्य माणसे उपचार व डॉक्टर यांच्यासाठी केलेला खर्च अभिमानाने सांगतात, तेव्हा त्यातले सत्य शोधणे भाग असते. त्या सत्याकडे पाठ फ़िरवून हा गंभीर विषय मनोरंजक करून मांडणे लोकांच्या व आमिरच्या डोळ्यात अश्रू जरूर आणु शकेल. पण त्यामुळे समाजाचे आरोग्य सुधारण्याची अजिबात शक्यता नाही. उलट ते अधिक बिघडतच जाण्याची दाट शक्यता आहे. कारण खर्चीक चंगळवादातून आजच्या जीवनाला जो आजार जडला आहे त्यानेच या समस्या निर्माण केल्या आहेत. आंधळे अनुकरण त्याचे एक कारण आहे. आमिर खानने समस्या खर्या सांगितल्या, पण त्याचे विश्लेषण मात्र अर्थाचा अनर्थ करणारे आहे. एका तात्विक ग्रंथाचा मनोरंजक सिनेमा करून टाकावा असाच सगळा प्रकार आहे. सोपी उत्तरे व सोपे उपाय कसे घातक असतात ते लौकर कळत नाहीत. त्याचे परिणाम उशीरा समजतात व समजून उपयोग नसतो. कारण दुरुस्ती करण्याची वेळ निघून गेलेली असते. जागतीक आरोग्य संघटनेने तेच पाप केले त्याचा दाखला किती लोकांना ठाऊक आहे? सोप्या उत्तरातला तो यमराज तुमच्या आमच्या जीवाशी काय खेळ खेळून गेला ते करोडो भारतीयांना अजून कळू शकलेले नाही. ( क्रमश:)
भाग ( ३०० ) १९/६/१२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा