शुक्रवार, २ मार्च, २०१२

नरकात गेलेल्या पतिव्रतेची भाकडकथा


एक छान गोष्ट आठवते. एका वस्तीत एक सुंदर वेश्या रहात असते. तिच्याकडे रोज संध्याकाळी ग्राहकांची येजा चालते. येणार्‍यांचे मन रिझवणे हाच तिचा धंदा असतो. सहाजिकच तिला रोज दुपारपासून सजण्या शृंगारण्याचे वेध लागलेले असतात. तिच्यापासून जवळच रहाणार्‍या एका विवाहितेला त्या वेश्येचा खुप हेवा वाटत असतो. कारण ही पतिव्रता असते. पण नवरा कमावून आणेल त्यावरच संसाराचे गाडे ओढताना, तिच्या नाकी नऊ येत असतात. त्यातून पैसे वाचवून दागदागिने बनवणे वा परिधान करण्याची गोष्ट दुर राहिली. साध्या घरच्या वस्त्रप्रावरणांसाठी तिला झुंजावे लागत असते. मग साजशृंगार कुठला? आपण इतक्या पवित्र आणि ही सटवी वेश्या, पण मेलीची चंगळ आहे, अशा शिव्याशाप देतच ती त्या वेश्येचा द्वेष करत असते. पावित्र्याचे नशीब हे असे म्हणून स्वत:च्या नशीबाला दोषही देत असते. दुसरीकडे ती वेश्याही या सतीसावित्रीकडे नियमीत पाहून मनोमन दु:खी होत असते. तिला शेजारणीच्या सुखी संसाराचे खुप कौतुक असते. साध्या कपड्यात संध्याकाळी पतीच्या स्वागताला सज्ज रहाणारी ती पतिव्रता तिला सुखी समाधानी वाटत असते. थकून भागून घरी येणारा पती आपल्या पत्नीसाठी कधीतरी एखादा गजरा घेऊन येतो, त्यामागचे प्रेम व आस्था त्या वेश्येच्या नशीबी कधीच आली नव्हती. कोणी शेठ धनी अधूनकधून चांगला दागिना तिला आणून द्यायचे. पण त्यात प्रेम आपुलकीपेक्षा आसक्ती व हाव बरबटलेली असायची. तरीही त्याला हसून दाखवायचे, याच्या त्या वेश्येला वेदना होत असत. शेजारणीच्या पतीने आणलेला तो क्षुल्लक किमतीचा, पण प्रेमाने ओथंबलेला गजरा आपल्या नशीबी नाही म्हणून ती कर्माला दोष द्यायची. त्या श्रीमंतीला शेजारची पतिव्रता आसुसलेली होती तर तिच्या संसारसुखाकडे वेश्या आशाळभुतपण्र पहात असायची.

    योगायोग असा, की दोघी एकाच दिवशी मरण पावल्या. त्यांच्या आत्म्याला यमदूत चित्रगुप्ताकडे घेऊन गेले. तेव्हा दोघींना चकित व्हायची पाळी आली. त्यातल्या पतिव्रतेला नरकात ढकलून देण्याचा आदेश चित्रगुप्ताने दिला आणि वेश्येला मात्र सन्मानपुर्वक स्वर्गात घेऊन जाण्यास फ़र्मावले. मग त्या दोघी आश्चर्यचकित होणारच ना? पतिव्रतेचा तर तिळपापड झाला. तिने तिथल्यातिथे चित्रगुप्ताला जाब विचारला. "या बाजारबसवीला स्वर्गात पाठवतोस काय? की तुलाही बाह्हेरख्यालीपणाने पछाडले आहे? अरे ही तर पापीणी. आयुष्य कोणाशीही शय्यासोबत करण्यात गेले तिचे. पुण्याचा लवलेश तिच्या खात्यात नसेल आणि तिला स्वर्गाची दारे उघडतोस कायरे? आणि माझ्याकडे बघ, अठराविश्वे दारिद्र्यात काढली. पण कधी पतीधर्म सोडला नाही. कुठल्या परपुरूषाकडे वर नजर करून बघितले नाही. आणि मला नरकात ढकलतोस कायरे? कोणते पाप मी केले? आणि ह्या सटवीने तरी काय असे पुण्य केले?"

   तिथे लोकशाही नव्हती, की गोपनियतेचा कायदा नव्हता. त्यामुळेच माहिती अधिकाराचा अर्ज करून अशी माहिती मागायची गरज नव्हती. चित्रगुप्ताचा कारभार दंडविधानानुसार चालत नव्ह्ता, की आधी अटक, जामीन व नंतर सुनावणी. त्याने तात्काळ पतिव्रतेला तिच्या प्रश्नाची उत्तरे देऊन टाकली. बिचारी वेश्या मात्र जागच्याजागी अपराधी भावनेने चिडीचुप उभी होती. चित्रगुप्ताने आपल्या निवाड्याचा खुलासा व कारणे सांगितली. "हे पतिव्रते तु आयुष्यभर पतीखेरीज दुसर्‍या कुणा पुरूषाकडे बघीतलेसुद्धा नाही हे खरे आहे. पण मनाने तु कधीच शुद्ध नव्हतीस. तू अखंड या वेश्येचा, तिच्या दागदागिने, पैसे, श्रीमंतीचा हेवा केलास. यातले काही आपल्या नशीबी नाही म्हणुन कायम दु:खी राहिलीस तू. तशी चैन नशीबी नाही म्हणून तू पवित्र रहाण्याचे ढोंग करत होतीस. प्रत्येक क्षणी मनाने तु आपले पावित्र्य विटाळत होतीस. जगासाठी तू पतिव्रता होतीस, पण मनाने तू पापी होतीस. तुझ्या उलट हिची कहाणी आहे. दैवाने जो भोग तिला दिला तो तिने निमुटपणे भोगला. पण त्यात ती कधीच रमली नाही. ती सतत तुझ्या संसाराकडे बघून पातिव्रत्याची इच्छा बाळगून होती. मनाने ती कधीच विटाळली नाही. तिच्या देहाने अनेक पुरूषांशी संग केला. पण मनाने ती कायम शुद्ध पवित्र राहिली. ती श्रीमंती, दागदागिने, साजशृंगार करूनही ती त्यात कधीच रमली नाही. तेच तिचे पुण्य होते आणि आहे. ती स्वर्गात येण्यासाठी पुण्य जोडत नव्हती. पाप जगताना पुण्याचे ओझे डोक्यावर घेऊन चालत राहिली, तर तु पुण्याचे रडगाणे गात गात पापाची आराधना करत राहिलीस. हे पतिव्रते, तू त्या वेश्येत नरक पाहिलास तर तिने तुझ्यात स्वर्ग पाहिला. तुम्ही दोघींनी आपापली निवड इहलोकातच केली होती. मी फ़क्त त्याची अंमलबजावणी करतो आहे."

   म्हटले तर बोधकथा आहे, म्हटले तर भाकडकथा आहे. मुद्दा मात्र महत्वाचा आहे. आपण विचार कसा करतो आणि वागतो किती प्रामाणिक, त्यावर सगळे परिणाम अवलंबून असतात, एवढाच त्यातला बोध आहे. ह्या गोष्टीचे इथे प्रयोजन काय? तर आपण जे रोजच्या रोज वृत्तवाहिन्या वा वृत्तपत्रातून पावित्र्य चारित्र्याचे प्रवचन ऐकत असतो, ते सांगणार्‍या पतिव्रतांची ती गोष्ट आहे. गेल्या काही दिवसात कृपाशंकर सिंग, ए. राजा, सुरेश कलमाडी, यांच्यापासून सामान्य नगरसेवक उमेदवारापर्यंत कोण कसे किती भ्रष्ट आहेत, त्यांच्यावर किर्तन चालू आहे. साधा मतदारसुद्धा कसा उमेदवारांकडून पैसे वा वस्तू घेतो याची छाननी चालली आहे. ती छाननी करणार्‍यांचा आव त्या पतिव्रतेपेक्षा वेगळा आहे काय? अगदी लिहिणार्‍या, बोलणार्‍या पत्रकारांपासून तिथे जाणकार, अभ्यासक म्हणून हजेरी लावणार्‍यांपर्यंत कितीजण मनाने स्वच्छ व पवित्र आहेत? पदांसाठी पक्षांतर करणारे, उलट्या टोकाची भुमिका मांडू बघणारे, त्याच पतिव्रतेचे वंशज नाहीत काय? मतदाराने फ़ुकटच्या सहली उमेदवारांकडून उकळल्या, सोसायटीत लाद्या बसवून घेतल्य़ा. संस्था मंडळासाठी देणग्या घेतल्या तर ते भ्रष्ट झाले. मग त्याच उमेदवारांच्या जाहिराती वृत्तपत्रांसाठी, वाहिन्यांसाठी घेणारे पवित्र कसे? त्याच उमेदवाराच्या खर्चाने आलिशान हॉटेलात पार्ट्या झोडणारे शुद्ध कसे?

   डॉ.महाजन, डॉ. सप्तर्षींना कलमाडी इतका भ्रष्टाचार करायची हिंमत नसते. म्हणुन ते पवित्र असतात काय? तेवढे पाप जमत नाही, पण पक्षांतरचे पाप वैचारिक शाल पांघरून करायला जमते, म्हणून हुसेन दलवाई शुद्ध असतात काय? रोजच्या रोज मंत्री पुढार्‍यांकडून इंग्लिश पिणारे, जाणकार विश्लेषक चारित्र्यसंपन्न कसे? चित्रगुप्त इथे नसतो म्हणून ते शुद्ध आणि पवित्र असतात ना? सोनिया गांधींचे गुणगान करणारे दलवाई, त्याच सोनिया भरलेल्या आयकराचा तपशील लपवतात, त्यावर जाब विचारणार आहेत काय? भरलेल्या आयकराचा तपशील जाहिर झाला तर सोनियांना जीवाची भिती वाटते. पण त्याच रोज देशासाठी जीवाची पर्वा न करत कार्यरत असतात, असेही आपण ऐकत असतोच ना? भाकडकथेत चित्रगुप्त असतो म्हणून सोपी उत्तरे सापडू शकतात. वास्तविक जगात मात्र कायद्याचे राज्य असते आणि सगळे कायदेच भाकड ठरत असतात. त्यातून काही फ़ळत नाही, फ़ुलत नाही. जेव्हा अशा शुद्ध चारित्र्याचे ढोल पिटले जातात, तेव्हा वास्तव जीवनच भाकड होऊन जात असते. आज गुन्हेगार समाजकंटक कायद्यापेक्षा शिरजोर त्यामुळेच झालेले दिसतात. कारण अशा विटाळलेल्या पतिव्रता चारित्र्याचे आदर्श मांडत असतात. त्यातून कायदाच भाकड व भेकड होऊन जातो. मग त्यातुन दिशाभुल करण्यासाठी माहितीचा अधिकार नावाचे बुजगावणे पुढे केले जाते. चित्रगुप्त कशाला असाही सावल केला जातो. ९

    मित्रांनो या भाकडकथेतला चित्रगुप्त चाणाक्ष वाचकांनी एव्हाना ओळखला असेलच. त्या कथेतली पतिव्रता निदान चित्रगुप्ताच्या अंगावर तरी घावून गेली नव्हती. इथे वास्तव समाजातल्या चित्रगुप्ताला जन्मच घेऊ दिला जात नाही. तो चित्रगुप्त जिथल्या तिथे पापपुण्याचा न्यायनिवाडा करतो ना? त्याला तेवढा अधिकार आहे ना? त्याच्या अधिकाराला ढोंगी पतिव्रता नाकारू तरी शकत नव्हती. इथे आपल्या देशात तेवढे अधिकार चित्रगुप्ताला दिले तर तो शिरजोर होऊन बसेल, असा धाक दाखवला जातो. कथेतला चित्रगुप्त म्हणजे वास्तवातला लोकपाल असतो. ज्या पवित्र व चारित्र्यसंपन्न लोकांनी ती भिती व्यक्त केली आहे त्यांना चित्रगुप्ताची ताकद माहिती आहे तशीच जनलोकपालाची ताकद सुद्धा कलते. म्हणुनच त्यांना लोकपाल नको असतो. कारण तो यांच्या पातिव्रत्याचा धुव्वा उडवू शकतो ना? त्याची त्यांना भिती वाटणारच. कारण त्यांचे पावित्र्य व पुण्य कायद्याच्या कसोटीवर आरुढ झालेले आहे. नैतिकतेच्या निकषावर ते टिकू शकणार नाही ना? सगळा समाजच भ्रष्ट झाला आहे, असा कांगावा तेवढ्यासाठीच चालू असतो. आपल्या मनातले पाप लपवायला असा कांगावा फ़ायद्याचा असतो.  (क्रमश:)
भाग १९४    (३/३/१२)

५ टिप्पण्या:

  1. का नाही भ्रष्टाचार हाच आत्मा मानून नवीन 'घटना किंवा आचारसंहिता' लिहली जावी..??

    उत्तर द्याहटवा
  2. "कथेतला 'चित्रगुप्त' म्हणजे वास्तवातला 'लोकपाल' असतो. ज्या पवित्र व चारित्र्यसंपन्न लोकांना..चित्रगुप्ताची "ताकद माहिती आहे ...त्यांना लोकपाल नको असतो. कारण तो यांच्या पातिव्रत्याचा धुव्वा उडवू शकतो ना? त्याची त्यांना भिती वाटणारच. कारण त्यांचे पावित्र्य व पुण्य कायद्याच्या कसोटीवर आरुढ झालेले आहे. नैतिकतेच्या निकषावर ते टिकू शकणार नाही ना? सगळा समाजच भ्रष्ट झाला आहे, असा कांगावा तेवढ्यासाठीच चालू असतो."

    सामाजिक पतिव्रता ... राजकाऱण्यांच्या बटीक झाल्या... अण्णा हजाऱ्यांना पुरून उरणारे ... उपोषणकर्त्यांची राजरोस मस्करी करताना दिसतात... उपरेकार आपल्या सामाजिक परिवर्तन करायला राबणाऱ्या अनुयायांच्या सेनेची ढाल करून त्याआड लपताना दिसतात...
    भाकड कथा वाचताना दिसणारी पात्रे प्रामाणिक आहेत मात्र सध्याचे मुखवटेधारी अप्रामाणिक व तकलादू आहेत याचे भान आम्हाच नाही. तर त्यांना तरी कसे येणार

    उत्तर द्याहटवा
  3. खरेच अत्यंत विचारप्रवर्तक. भाऊ सौ साल जियो, और लिखते रहो...

    उत्तर द्याहटवा
  4. खुप छान भाऊ! गोष्टीरुपातील उदाहरण एकदम परफेक्ट! भाऊदा जवाब नहीं।

    उत्तर द्याहटवा