शनिवार, १७ मार्च, २०१२

चड्डी कॉग्रेस आणि धोती कॉग्रेसचा इतिहास



   आज आधी मला एका चोखंदळ वाचकाचे आभार मानले पाहिजेत. महाराष्ट्र विधान मंडळात अधिकारी असलेले श्री. वैराळकर यांचा मला काल अगत्याने फ़ोन आला होता. कालच्या माझ्या लेखातल्या एका चुकीच्या तपशीलाकडे त्यांनी माझे लक्ष वेधले, त्याबद्दल त्यांचे मन:पुर्वक आभार. १९७८ च्या निवडणुकीनंतर वसंतदादांनी बहूमत जमवताना जो जनता पक्ष पुरस्कृत आमदार फ़ोडला व त्याला उपाध्यक्ष बनवले, त्याचे नाव मला स्पष्टपणे आठवत नव्हते. ते मी ’आमदार वाघ’ असे लिहिले होते. ती माझी चुक होती. त्याचे नाव गजाननराव गरूड असे होते. एवढ्यासाठी मी वाचकांचे फ़ोन घेतो व त्यांच्याशी अगत्याने बोलत असतो. ते नुसते कौतुक करत नाहीत, तर अनेकदा चुका दाखवून देतात. कधी चांगले विषय सुचवतात, तर कधी सुटलेल्या महत्वपुर्ण मुद्द्याकडे लक्ष वेधत असतात. मला त्यांचा फ़ोन आला व त्यांनी एक नाव चुकले आहे असे म्हणताच, मी लगेच वाघ नावाबद्दल मी साशंक होतो याची कबुली देऊन टाकली. मला त्यात कमीपणा अजिबात वाटत नाही. उलट आपला वाचक असा चोखंदळ व जागरूक आहे याचा मला अभिमानच वाटतो. किंबहूना तेवढ्यासाठीच मी फ़ोन नंबर दिलेला असतो व वाचकांच्या संपर्कात असतो.

   परवा नाशिकमध्ये शेवटी मनसेचा महापौर निवडून आला. तो येणारच होता. कारण त्यासाठी सभागृहातील बहुमताची गरज नव्हती. त्याच निमित्ताने मी सध्या लिहितो आहे. उत्तर भारतात हे सभागृहातील बहुमताच्या खेळखंडोबाचे राजकारण ४५ वर्षापुर्वी सुरू झाले असले तरी महाराष्ट्राला त्याची बाधा खुप उशिरा झाली. जोवर इथे कॉग्रेस हा भक्कम पक्ष होता व त्याला सत्तास्पर्धेच्या लालसेने ग्रासले नव्हते आणि विरोधी पक्षातल्या दिग्गजांना सत्तेचा आजार जडला नव्हता, तोवर असे बहुमताचे तमाशे इथे होत नव्हते. त्याचा आरंभ १९७८ सालात हळुहळू झाला. त्याला आणिबाणीनंतरचे राजकीय वादळ कारणीभूत झाले. महाराष्ट्र राज्य स्थापनेपासून कधीच कॉग्रेस इथे पराभूत झाली नव्हती. तिला १९७७ च्या लोकसभा निवडणुकीने धक्का दिला. १९६९ सालातही इथे कॉग्रेसमध्ये फ़ुट पडली होती. पण तरी एकूण कॉग्रेस यशवंतरावांच्या मुठीत होती. १९६९ साली आधी चव्हाण, इंदिरा विरोधी गोटात राहिले. पण देशातील राजकारणाचा रंग ओळखल्यावर त्यांनी इंदिराजींना साथ देण्याचा पवित्रा घेतला आणि कॉग्रेस एकजीव राहिली. मात्र तसे दहा वर्षानंतर राहिले नव्हते. यशवंतराव प्रमुख नेता असले तरी त्यांची पक्ष व नेते कार्यकर्त्यावर निर्णायक हुकूमत उरली नव्हती. तशी गोष्ट विरोधी पक्षात नव्याने शिरलेल्या सत्तापिपासू लोकांची होती. त्यामुळेच मग महाराष्ट्रातील राजकीय संस्कृती घसरगुंडीला लागली. लोकसभेनंतर वर्षभरात आलेल्या विधानसभा निवडणुकीत कॉग्रेस हा पुर्वीसारखा एकसंघ पक्ष राहिला नव्हता. त्याला यशवंतरावांसारखा एकमुखी नेता उरला नव्हता. एकीकडे चव्हाणनिष्ठ तर दुसरीकडे चव्हाण चिरोधी टोळीची इंदिरा कॉग्रेस अशी स्थिती बनलेली होती.

   १९७८ सालातल्या धोती कॉग्रेस व चड्डी कॉग्रेसची लढत मजेशीर होती. आधी अशी नावे कॉग्रेस गटांना का देण्यात आली ते सांगितले पाहिजे. आणिबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत कॉग्रेसचा दारूण पराभव झाला होता. उत्तरेतल्या सर्व राज्यात कॉग्रेसची धुळधाण उडाली होती. मध्यप्रदेशातून माधवराव शिंदे हा एकमेव उमेदवार सोडल्यास कॉग्रेसचा दुसरा कोणी खासदार लोकसभेत निवडून आलेला नव्हता. अगदी रायबरेलीमध्ये इंदिराजी व बाजूला अमेठीत संजय गांधी पराभूत झाले होते. मग मोरारजी देसाई यांच्या नेतृताखाली जनता सरकार बनले व विरोधीपक्ष नेतेपद यशवंतराव चव्हाण यांना मिळाले. इंदिराजी पराभूत झाल्याने त्यांच्याविरुद्ध पक्षातल्या इतर नेत्यांनी उचल खाल्ली होती. कॉग्रेसचे अध्यक्ष ब्रह्मानंद रेड्डी हे होते, तर संसदेतील नेते यशवंतराव चव्हाण असे होते. त्यातून इंदिराजी आपल्या निष्ठावंताना घेऊन बाहेर पडल्या. त्यामुळे राहिलेल्या कॉग्रेस पक्षाला चव्हाण रेड्डी कॉग्रेस असे म्हटले जाऊ लागले. त्याचे थोडक्यात नाव च आणि ड्डी असे मिळुन चड्डी कॉग्रेस झाले. इंदिराजी बाजूला झाल्या तरी त्यांना महाराष्ट्रात फ़ारसा मोठा कोणी अनुयायी मिळाला नाही. अब्दुल रहमान अंतुले, वसंतराव साठे, नासिकराव तिरपुडे असे संघटनात्मक ताकद नसलेले लोक मात्र त्यांच्या सोबत गेले. त्यातले नासिकराव तिरपुडे राज्यातील इंदिरा कॉग्रेस या नव्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झाले. त्यांना फ़ॉरवर्ड ब्लॉक पक्षाचे जांबुवंतराव धोटे येऊन मिळाले. त्या दोघांनी इथे इंदिरा कॉग्रेसची धुरा वाहिली. त्यातून मग त्या गटाला धोट्यांचा धो आणि तिरपुड्यांचा ति मिळून धोती कॉग्रेस असे टोपण नाव मिळाले. इंदिरा कॉग्रेसने विदर्भात व मराठवाड्यात मुसंडी मारली. तर बाकी महाराष्ट्रात यशवंतरावांची कॉग्रेस शाबूत राहिली. पुढे शरद पवारांच्या दगाबाजीने चिडलेले वसंतदादा, यशवंतराव मोहिते, इत्यादी नेते इंदिरा कॉग्रेसमध्ये गेले आणि यशवंतराव चव्हाण एकाकी पडले. तेव्हा म्हणजे १९८० साली ते एकटेच त्यांच्या पक्षाचे महाराष्ट्रातील खासदार होऊ शकले. बाकी त्यांचा बालेकिला उध्वस्त झाला होता. याच कालखंडात कॉग्रेसपासून दुरावलेले माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण व सांगलीचे गणपराव कोळी, नगरचे माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांनी मिळून तिसरी महाराष्ट्र समाजवादी कॉग्रेस काढली होती. तिला मस्का कॉग्रेस असेही म्हाटले जात होते.  

   यातल्या मस्का कॉग्रेसला फ़ारसा अर्थ नव्हता. तो नेत्यांच्या कागदावरचा पक्ष होता. चव्हाण गट म्हणजे चड्डी कॉग्रेस पश्चिम महाराष्ट्रात बलवान होती तर विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात अनेक नाराज कॉग्रेसवाल्यांनी मग इंदिरा कॉग्रेस म्हणजे धोती कॉग्रेसचा आश्रय घेतला. पुढे राज्याचे मुख्यमंत्री झालेले बॅ. बाबासाहेब भोसले त्यापैकीच एक. त्यांना पक्षाने कधी महापालिकेचे तिकीट दिले नव्हते ते मुंबईत नेहरूनगर मतदारसंघात पडायला उभे राहिले. पण तिथून त्यांची ज्येष्ठता सुरू झाली. परिणामी १९८० सालात ते मंत्री व दोन वर्षात मुख्यमंत्री होऊन गेले. तर अशा धोती कॉग्रेसची मदार संघटनेपेक्षा इंदिराजींच्या लोकप्रियतेवर होती. त्यामुळेच अनपेक्षितरित्या तेव्हा धोती कॉग्रेसचे ६१ आमदार निवडून आले. राज्यात जवळपास सगळीकडे तिरंगी लढती झाल्या, दोन कॉग्रेस व जनता पक्ष असे उमेदवार लोकांसमोर होते. त्यात कॉग्रेस फ़ुटली असली व बदनाम असली तरी विरोधी पक्षाकडे तुल्यबळ लढाऊ नेते, संघटना व साधने नव्हती. शिवाय जनता पक्ष म्हणजे पुर्वाश्रमीचे समाजवादी, जनसंघ, संघटना कॉग्रेस व आणिबाणीनंतर जगजीवनराम यांचे अनुयायी म्हणून कॉग्रेस सोडून जनता लाटेवर स्वार झालेले कॉग्रेसजनच होते. त्यांच्यात एक पक्ष म्हणून एकवाक्यता कुठेच नव्हती.  शिवाय दिल्लीत सत्तांतर होऊन एक वर्षाचा कालावधी उलटला होता. त्यामुळे आणिबाणीचा रोष लोकांच्या मनातुन कमी झाला होता. म्हणुनच जनता पक्षाला वाटले होते तेवढे सोपे यश त्यांच्या वाट्याला आले नाही. तरी जनता पक्ष विधानसभेत सर्वात मोठा पक्ष म्हणुन निवडुन आला होता. त्याचे ९९ उमेदवार जिंकून आमदार झाले होते. पण आपण सर्वात मोठा पक्षा आहोत, म्हणुन सत्तेवर दावा करावा असेही जनता पक्षातल्या नेत्यांना सुचले नाही. ते फ़क्त आपले व मित्र पक्षांचे आमदार मोजत बसले आणि कोणाला नेता निवडावा यावर वाद घालत बसले. कारण सत्ता आयती चालत येत नाही ती बळकवावी लागते याचाही गंध त्यांना नव्हता. पण पराभूत होऊनही सत्तेचे गणित जुळवायला कॉग्रेसनेते धावपळ करत होते.

   वसंतदादा पाटिल पराभूत कॉग्रेसचे राज्यातील मुख्यमंत्री होते. सत्ता व मुख्यमंत्रीपद टिकवायचे तर बहुमताचा आकडा गाठायला हवा हे त्यांना कळत होते. त्यासाठी सर्वात जवळचा सहकारी इंदिरा कॉग्रेसच होऊ शकतो हे ओळखून त्यांनी दिल्लीला घाव घेतली आणि थेट इंदिराजींच्या पायावर लोळण घेतली. त्याने यशवंतराव विचलीत होणे स्वाभाविक होते. दादांनी धोती कॉग्रेसचा पाठींबा मिळवल्यावर अपक्ष व इतरांना लहानसहान आमिष दाखवून बहुमताचे गणित जुळवले. तरी जनता पक्षात जनसंघाचे उत्तमराव पाटिल, की समाजवाद्यांचे निहाल अहमद नेतेपदी निवडावे यात एकमत होऊ शकले नव्हते. दादांनी आपल्या पाठीराख्यांची यादी राज्यपालांना सादर करून सत्तेवर दावा केला, तेव्हा मग जनता पक्षाला जाग येऊ लागली. पण तोवर वेळ गेली होती. दादांनी बाजी मारली. सत्ता हाती घेतल्यावर आणखी आमदार जवळ करणे शक्य आहे हे अनुभवाने त्यांना चांगलेच ठाऊक होते. मात्र तिथून राज्यातली राजकीय सभ्यता घसरगुंडीला लागली. कारण याच सत्तालालसेने पुढे पुलोद व मॅजिक फ़िगर असलेल्या बहुमताच्या जुगाराला प्रतिष्ठीत केले. त्यात शरद पवार जेवढे दोषी आहेत तेवढेच थोर समाजवादी नेते एस.एम. जोशी सुद्धा कारणीभूत आहेत.  (क्रमश:)
भाग  ( २०७ )   १७/३/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा