बुधवार, १४ मार्च, २०१२

ठाण्यात राज ठाकरेंनी काय मिळवले?



   राज ठाकरे यांनी ठाण्यात महापौर निवडणुकीत युतीला पाठींबा दिल्यावर त्यामागे सौदेबाजी वा सत्तेची समिकरणे शोधत बसलेल्यांना जुना इतिहास सुद्धा आठवला. असे राजनी प्रथमच केलेले नाही. याआधी त्यांनी बदलापुर, अंबरनाथ नगरपालिकेत सेना भाजपा युतीला पाठींबा दिला होता. मग गेल्याच वर्षी कल्याण डोंबिवली महापालिकेत सुद्धा युतीलाच पाठींबा दिला होता. आता सुद्धा त्याचीच पुनरावृत्ती झालेली आहे. हे वरवर दिसणारे सत्य आहे. ते कोणी नाकारू शकत नाही. पण अशा पा्ठींब्याच्या बदल्यात मनसेसा्ठी राजने काय मागितले? काय वसूल केले? बारा वर्षे याच महाराष्ट्रात कॉग्रेस राष्ट्रवादी यांची सेक्युलर युती सत्तेत आहे. जेव्हा एकमेकांच्या विरोधात दोन्ही पक्षांनी प्रथमच निवडणूक लढवली, तेव्हा दोघांनी एकत्र येण्याची काय गरज होती? दोघांनी एकमेकांवर भ्ररपुर चिखलेफ़ेक केली होती. पण १९९९ सालात त्यांना एकत्र आणण्यासाठी याच सेक्युलर पत्रकारांनी पुढाकार घेतला होता. दोन्ही कॉग्रेस व इतर सेक्युलर पक्षांना मिळालेली एकत्रित मते युतीपेक्षा जास्त आणि ती सेक्युलर मते आहेत, म्हणूनच युतीला सत्तेबाहेर ठेवण्याचा कौल मतदाराने दिला आहे असे तत्वज्ञान कोण हिरीरीने मांडत होते? आज वाहिन्यांवर बाष्कळ बडबड करतात तेच होते ना? परवा राजने युतीला पाठींबा दिल्यावर विद्वत्ता झाडणार्‍यात त्यांचाच समावेश होता ना? मग मतमोजणी संपल्यावर त्या मतदानाचे अर्थ असे लावायचा सिद्धांत कुणाचा? त्यांचाच ना? त्यांच्या विद्वत्तेमुळेच शरद पवारांना विदेशी सोनिया अस्सल देशी व ’राष्ट्रवादी’ वाटू लागल्या ना? मग आज राजने निकालानंतर सेना भाजप युतीला पाठींबा देण्यात गैर काय? पुण्यात कलमाडींना शिव्याशाप देऊनही बहुमत मिळाले नाही, तेव्हा सत्तेसाठी अजितदादा त्याच कॉग्रेसचा पाठींबा घेतात ना? मग राजने असे काय वेगळे केले की इतका गहजब केला जावा? राजेने एक गोष्ट नक्कीचे वेगळी केली आहे. त्याने या सेक्युलर वा इतर पक्षनेते वा सेक्युलर पत्रकारांप्रमाणे सौदेबाजीला तत्वज्ञान बनवलेले नाही. त्याने कुठल्याही पदाचा वा सत्तेचा सौदा केलेला नाही. त्याने प्रत्येकवेळी बिनशर्त पाठींबा दिलेला आहे. आपल्या हाती सत्ता आली नाही म्हणून जनतेने दिलेल्या कौलाचा विचका करणारे व्यापारी तत्वज्ञान राजने मांडलेले नाही किंवा तसे सौदे केलेले नाहीत. हाच आणि एवढाच फ़रक आहे. तो एकाही राजकीय विश्लेषकाला ओळखता आलेला नाही.  

   ठाण्याची गोष्ट कालची आहे. याच प्रकारे डोंबिवलीमध्ये भरपुर जागा जिंकल्यावरसुद्धा राजने बिनशर्त पाठींबा दिला होता. त्यानी पाठींब्याच्या बदल्यात सत्तेत भागिदारी केलेली नाही. कुठेच तसे केलेले नाही. इतर पक्ष व नेत्यांपेक्षा हे राजचे वेगळेपण लक्षात न घेता, त्याच्या पाठींब्याचे विश्लेषण होऊच शकत नाही. अर्थात त्यात त्याचा राजकीय स्वार्थ नक्कीच आहे. पण तो इतर नेत्यांप्रमाणे हावरेपणाचा नमुना नाही. त्याने अशा पाठींब्यात दुरगामी राजकीय स्वार्थ पाहिला आहे. आपण सत्तेसाठी हावरे नाही, अशी आपली प्रतिमा हा तरूण नेता उभी करतो आहे. तेवढेच नाही तर अशा तुटपुंज्या सत्तापदातुन पक्षात जी सत्तास्पर्धा सुरू होईल, त्यालाही त्याने पदे नाकारून पायबंद घातला आहे. कुठलेच पद नसल्याने त्याच्या पक्षाचे निवडून आलेले सदस्य एकाच पातळीवर रहातात. शिवसेनेत जोवर सत्ता नव्हती तोवर आजच्याप्रमाणे भाऊबंदकी निर्माण झाली नव्हती. भाजपातसुद्धा तिचा लवलेश नव्हता. सगळे कार्यकर्ते जिवाभावाचे सहकारी होते. त्या रोगापासून मनसेला अलिप्त ठेवायचे तर बाहेरुन पाठींबा सोयीचा आहेच. पण दुसरीकडे राजला वा मनसेला सत्तेची हाव नाही अशी प्रतिमा जनमानसात निर्माण व्हायलाही त्याची मात होतेच. हा मोठा फ़रक आहे.

   २००४ सालात राष्ट्रवादीने दोन आमदार जास्त निवडून आणले तर थेट मुख्यमंत्री पदावर दावा केला होता. मग दोन्ही पक्षांकडे बहुमत असूनसुद्धा पंधरा दिवस सरकार बनू शकले नव्हते. कारण सत्तेची हिस्सेदारी निश्चित होत नव्हती. शेवटी मुख्यमंत्रीपद सोडण्याच्या बदल्यात दोन मंत्रिपदे अधिक देण्याचा सौदा झाल्यावरच ते सेक्युलर सरकार स्थापन झाले होते. आतासुद्धा ठाण्यात करोडो रुपयात अपक्षांना खरेदी करण्याच्या बातम्या चालल्या होत्या. अशा बाजारात राजने फ़ुकट बिनशर्त पाठींबा का द्यावा? देण्याघेण्यासाठी फ़क्त पैसा कामाचा नसतो. राजकारणात व सार्वजनिक जिवनात इतर अनेक गोष्टी दिल्य घेतल्या जात सतात. न घेताही मिळत असतात. लोकशाहीत लोकांच्या सदिच्छा ही मोठी मुल्यवान असते. तिचीच मते होत असतात. ठाण्यात सगळेच पक्ष सत्तालालसेने बरबटलेले दिसत असताना व एकमेकांच्या जिवावर उठलेले असताना, नागरीहितासाठी बिनशर्त पाठींबा ठाणेकरांची मने जिंकणारा असतो. त्याची किंमत आज कळणार नाही. पुढल्या निवडणुकीत कॅश होणारा तो चेक असतो. त्या एका चालीतुन राजने तोच चेक मिळवला आहे. दोन अडिच वर्षात लोकसभा विधानसभेच्या निवडणुका व्हायच्या आहेत. त्यावर डोळा ठेवून त्यानी खेळलेला हा डाव आहे. आपण सत्तेला आसुसलेले नाही तर लोकहितासाठी कोणाशीही सहकार्य करू शकतो. आपण जनता व नागरिकांच्या भावना व मताचा आदर करतो, हेच राजने दाखवायचा प्रयास केल आहे. ते करताना त्यानी सेनेच्या तीन आमदारच नव्हे, तर ठाण्यासह राज्यातल्या तमाम शिवसैनिकांची मने जिंकली आहेत. त्याची किंमत वाहिन्यावर बसून वहावत जाणार्‍यांना कधीच कळणार नाही. सर्वच व्यवहार पैशाचे नसतात. पदांचे नसतात. त्याच्याही पलिकडे खुप काही मिळवायचे असते.  

   काजोल, शिल्पा शेट्टी व शाहरुखच्या पहिल्या बाजीगर या चित्रपटातले एक वाक्य आठवते. काजोलच्या बापाशी एका काररेसमध्ये मुद्दाम शाहरुख हरतो. तेव्हा तो बाप त्याला विचारतो, तु जिंकत असतानाही का हरलास? त्यावर शाहरुख म्हणतो, काही मिळवण्यासाठी काही गमवावे लागते. राज ठाकरे यांनी ठाण्यात सेनेला पाठींबा देताना मुठभर सत्तापदे गमावली असतील, पण त्यांनी ठाणेकरांच्या सदिच्छा, शिवसैनिकांच्या शुभेच्छा मिळवल्या आहेतच. पण त्याचवेळी आपण हट्टी वा दुष्टावा करणारे नाही, असे दाखवून उद्धव ठाकरे यांच्यावर कुरघोडीसुद्धा केली आहे. एका बाजूला हे दोन भावा्तील भांडण असले तरी त्यात मराठी माणसाच्या भावना गुंतलेल्या अहेत. त्यात अशा भावनांचा चतुराईने वापर करण्याचे कौ्शल्य राजने दाखवले आहे. अगदी शिवसैनिक असलेल्यांना त्या दिवशी उद्धवपेक्षा राजनेच सेनेची लाज राखली असेच वा्टले असणार. त्यातही जे बाळासाहेबांवर मनापासून प्रेम करतात, त्यांना राजने एका चालीत जिंकले आहे. हे खरे राजकारण आहे. त्याचा थांगपत्ता वाहिन्यावरील चर्चा करणार्‍यांना लागलेला नाही. यातले रहस्य उलगडण्यापेक्षा हे शहाणे दोन भावांचे भांडण नाटकी असल्याचा जावईशोध लावत बसले होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्य्क्ष मधुकर पिचड आणि वाहिन्यावरचे ज्येष्ठ पत्रकार यांची प्रतीक्रिया समान असावी यातच अभ्यासकांच्या अकलेचे किती दिवाळे वाजले आहे त्याचा अंदाज येऊ शकतो. ठाणे  हातचे गेले असते तर साहेबांच्या जिव्हारी लागले असते. त्याचे भान उद्धवने ठेवले नाही, पण राजने ठेवले, असेच कोणालाही वाटणार. आणि त्यासाठीच खेळलेली ही धुर्त राजकीय चाल आहे. पण तो विधयक पवित्रा सुद्धा आहे. आजच्या सत्तालोलुप जमवाजमवीच्या राजकारणाला नवे चांगले वळण देण्यासाठी त्याला एक उत्तम पाऊल म्हणता येईल.  

   ज्याला बहुमत नसेल पण तो मोठा पक्ष म्हणून लोकांनी निवडला असेल, त्याला इतरांनी बाहेरून पाठींबा द्यावा. जो पाठींबा फ़क्त बहुमताचे गणित जमवून मनमानी करण्यासाठी नसेल, तर जनहितासाठी सत्ता राबवण्यापुरता असेल. बाहेरून पा्ठींबा देणार्‍याने दक्षता ठेवायचे काम करावे. गफ़लत होताना दिसली अर पाठींबा काढून घेण्याच्या अटीवरच मदत करावी. थोडक्यात गुणात्मक पाठींबा असे समिकरण का नसावे? सत्ता तुम्ही घ्या पण जनतेसाठी राबवा, असा पाठींबा का दिला जाऊ नये? सत्ता भोगणार्‍याला मनमानी करायची संधी त्यात उरणार नाही. लोकांना चागला कारभार मिळू शकतो. भ्रष्टाचाराला आळा घातला जाऊ शकतो. वास्तविक शरद पवार यांच्यासारख्या अनुभवी, जाणत्या नेत्याने ही भुमिका कधीतरी मांडायला हवी होती. १९९९ सालात एकमेकांच्या विरोधात लढलेल्या दोन्ही कॉग्रेसपेक्षा एकत्रित लढलेल्या सेना भाजपाला एकत्रित जास्त जागा मिळालेल्या होत्या. जनतेचा कौल त्यांनाच मिळाला होता, विदेशी सोनियांना शरण न जाता शरद पवारांनी आपल्या आमदारांचा असा गुणात्मक पाठींबा युतीला दिला असता तर? एक चांगला पायंडा राज्यात व देशात निर्माण झाला असता ना? राजसारख्या नवख्या पोराने त्याची सुरूवात केली आहे. तर निदान त्याचे कौतुक करण्याची तरी दानत आपल्याकडे असायला हवी ना?  (क्रमश:)
भाग ( २०४ )    १४/३/१२

३ टिप्पण्या: