शुक्रवार, २३ मार्च, २०१२

सेक्युलरांची जातियवाद्यांची सत्तेसाठी आघाडी


  याच आठवड्यात महाराष्ट्रातील जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणूका झाल्या. त्यात कोण कोण पक्ष सत्तापदावर जाऊन बसले? त्यांनी सत्ता कशी मिळवली? कुठे शिवसेनेच्या पाठींब्यावर राष्ट्रवादी तर कुठे मनसेच्या पाठींब्यावर कॉग्रेस, राष्ट्रवादीची आघाडी सत्तेवर जाऊन बसली आहे. कुठे जातियवादी सेना भाजपाला सत्तेपासून दुर ठेवण्याची भाषा करत दोन्ही कॉग्रेस एकत्र आल्या तर कुठे कॉग्रेसला सत्तेपसून दुर ठेवण्य़ासाठी राष्ट्र्वादीने सेना भाजपाशी संगत केली आहे. मग त्यांनी लोकांसमोर ही जातियवादाची भाषा कशाला बोलायची? यालाच मी ढोंग म्हणतो. जेवढा सेना भाजपाचा हिंदुत्ववाद खरा नसतो तेवढाच कॉग्रेस राष्ट्रवादीचा सेक्युलॅरिझम खोटाच असतो. ही सर्व लोकांच्या डोळ्यात केलेली धुळफ़ेक असते. जेव्हा सोयीचे असते तेव्हा अशा गोष्टी तावातावाने बोलल्या जात असतात. मतांसाठी ती निव्वळ लोकांची केलेली दिशाभूल असते. आणि हे फ़क्त जिल्हा पातळीवर चालते असे मानायचे कारण नाही. अगदी थेट दिल्लीपासून गल्लीपर्यंत तोच तमाशा अगदी निर्ढावलेपणाने चालू असतो. 

   ज्या दिवशी या जिल्हा परिषद पदाधिकार्‍यांच्या निवडीचे निकाल लागत होते, त्याच दिवशी दिल्लीत मनमोहन सरकारची ममताने तारांबळ उडवली होती. तेव्हा त्याच कॉग्रेस पक्षाचे एक प्रवक्ते एका वाहिनीवर मोठे तात्विक विवेचन करत होते. जेव्हा देशाच्या हिताचे विषय असतात तेव्हा विरोधी भाजपाने पक्षिय भुमिका सोडून राष्ट्रहितासाठी सरकारच्या मागे ठामपणे उभे राहिले पाहिजे, असे त्यांचे तत्वज्ञान होते. ते चुकीचे अजि्बात नाही. असे पुर्वी झालेले आहे. १९७१ साली बांगलादेश संघर्ष पेटला होता, तेव्हा भाजपाचे (तेव्हाच्या जनसंघाचे) सर्वोच्च नेते अटलबिहारी वाजपेयी यांनी इंदिरा गांधी आमच्या एकमुखी नेता आहेत अशी जाहिर भुमिका घेतली होती. तीच भुमिका कारगील युद्धाच्या प्रसंगी कॉग्रेस घेऊ शकली का? उलट १९९९ सालात याच कॉग्रेसने भाजपा आघाडीतील अण्णा द्रमुक या पक्षाला फ़ोडून, कारण नसताना वाजपेय़ी सरकार एका मतासाठी पाडून; देशाच्या डोक्यावर मध्यावधी निवडणूका लादल्या होत्या. त्यातून साधले काय? आज हे प्रवक्ते जे तत्वज्ञान सांगत आहेत, ते त्यांना आजच सुचले आहे काय? आज प्रादेशिक पक्षांच्या शिरजोरीने सरकार अडचणीत येते आणि त्यात राष्ट्रीय हिताचा बळी दिला जातो, हा शहाणपणा त्यांना सुचला आहे. त्यासाठी ते राष्ट्रीय हिताचा हवाला देत आहेत. तो शुद्ध ढोंगीपणा आहे. तसे त्यंचे वा त्यांच्या पक्षाचे प्रामाणिक मत असते, तर त्यांनी १९९९ सालात वाजपेयी सरकार पाडायचे घातक डाव खेळलेच नसते. आज त्यांना राष्ट्रीय हिताची चिंता नसून आपल्या अडचणीत आलेल्या सरकारला भेडसावणार्‍या अंकगणिताची चिंता सतावते आहे.   
   गम्मत बघा, जेव्हा पाठींबा हवा तेव्हा त्यांना भाजपाने राष्ट्रहितासाठी पुढे यावे असे वाटते. याचा अर्थच ते भाजपा हा राष्ट्रहितासाठी पुढे येऊ शकणारा पक्ष आहे असे मान्य करतात. म्हणजेच भाजपाला राष्ट्रहिताची पर्वा आहे असेच त्यांना वाटते ना? मग निवडणुकीत मते मागताना त्याच भाजपाला सत्तेपासून दुर ठेवण्याची भाषा कुठल्या आधारावर केली जाते? कशाला भाजपाला सत्तेपासून दुर ठेवायचे असते? स्वपक्षाच्या स्वर्थासाठीच दुर ठेवायचे असते ना? त्याचा राष्ट्रहिताशी काहीही संबंध नसतो ना? तेव्हा मते मागताना भा्जपाच्या हाती सत्ता गेली, तर देशच संकटात येईल अशी आवई ठोकली जात असते. मग ज्याच्यापासून देशाच्या हिताला धोका आहे, म्हणुन दुसर्‍यांना सेक्युलर म्हणुन जवळ घेतले जाते, त्यातच द्रमुक, ममता वा अन्य पक्षांचा समावेश होतो ना? मग आज ज्याला कॉग्रेस संकट म्हणते, त्यांच्या सोबत जाण्यातून व त्यांना असे शिरजोर करून मुळातच देशाचे हित धोक्यात कोणी आणले? कशासाठी धोक्यात आणले? आपली सत्तालालसा भागवण्यासाठी कॉग्रेस या प्रादेशिक पक्षांसोबत गेली आहे, भाजपाही गेलाच होता. तेव्हा खरा धोका त्या प्रादेशिक पक्षांनी निर्माण केला नसून आपल्या सत्तालालसा पुर्ण करण्यासाठी ज्यांनी अशा तडजोडी केल्या, त्यांनीच देशहित धोक्यात आणले आहे. थोडक्यात देशहिताचा बळी कॉग्रेसच्या आजच्या नेतृत्वाने डोळसपणे दिला आहे. आणि आपण केलेल्या पापावर आता विरोधी पक्षाने पांघरूण घालून आपल्या सत्तेला वाचवावे ही त्यांची अपेक्षा आहे. याला बदमाशी म्हणतात.  
   जर्मनी वा ब्रिटनमध्ये याच प्रकारे आघाडीच्या सत्ता व सरकारे आहेत. पण त्यांनी सत्तेच्या वाटपासाठी तडजोडी केलेल्या नाहीत तर राष्ट्रहितासाठी एकत्र येऊन सरकारे स्थापन केली आहेत. त्यांना अशा अडचणी येत नाहीत. प्रादेशिक पक्षांना शरण जाण्याची आजच्या राष्ट्रीय पक्षांवर का वेळ आली? त्यांनी लोकमताचा आदर करण्याची सभ्यता दाखवली असती तर ही वे्ळ आली नसती. जेव्हा १९९६ सालात भाजपाला संसदेत सर्वात मोठा पक्ष म्हणुन लोकांनी निवडले होते, तेव्हा पराभूत कॉग्रेसने त्याचा आदर राखून त्याला अल्पमत सरकार बनवू व चालवू दिले असते; तर कुणाला प्रादेशिक पक्षांच्या तालावर नाचायची वेळच आली नसती. उलट त्यावेळी ४६ खासदार निवडून आलेल्या जनता दलाच्या नेतृत्वाखाली खिचडी सरकार बनवण्यास कॉग्रेसने सेक्युलर थोतांड पुढे करून पाठींबा दिला. मग तो मागे घेऊन विचका केला. म्हणजेच पाठींबा द्यायचा आणि सत्ता राबवणार्‍यांना खेळवायचा, पायंडा कॉग्रेसनेच पाडला आहे. आज त्याचेच परिणाम त्याला भोगावे लागत आहेत. आज जे शहाणपण कॉग्रेस प्रवक्ते सांगतात, तेच त्यांनी १९९६ सालात का वापरले नाही? तेव्हा ते पुण्य केले असते तर आज भाजपाला त्याची परतफ़ेड करावी लागली असती. मग भाजपा असो की कॉग्रेस असो, जो मोठा पक्ष आहे त्याला कुणाच्याही पाठींब्यावर, मर्जीवर अवलंबून रहावे लागले नसते. पण त्याला दुसरी बाजूसुद्धा आहे. पाठींबा याचा अर्थ बिनशर्त पाठींबा नव्हे तर कामचलावू पाठींबा.  
   कामचलावू पाठींबा याचा अर्थ सरकारने लोकहितासाठी घेतलेल्या निर्णयांसाठी पाठींबा. पण सरकार मनमानी करत असेल तर नाही. त्यामुळे आज जसे आकड्यांचे गणित पाठीशी असल्यावर सरकार मनमानी करते, तसे होऊ शकले नसते की पंतप्रधानाला पाठींब्यासाठी आशाळभूतपणे लहानसहान पक्षांच्या तोंडाकडे बघत बसावे लागले नसते. ही सगळी समस्या आकड्यांच्या लोकशाहीने आणलेली आहे. बहुमताचा आकडा जमवा आणि वाटेल तशी मनमानी करा, असा जो लोकशाहीचा अर्थ लावला गेला आहे, त्यानेच ही समस्या सर्वत्र निर्माण झाली आहे. दिल्लीत ती मनमोहनसिंग याना सतावते आहे तर गल्लीत ती एखाद्या महापालिकेत अडवणूक करते आहे. त्याला मतदार जबाबदार नाही तर मतलबी स्वार्थी पक्ष व त्याचे नेतेच कारणीभूत आहेत. जर तुम्ही पाठींब्याच्या बदल्यात मौज मजा करत असाल तर तो पाठींबा देणारेही आपली किंमत मागणारच. रामदेवांच्या उपोषणकर्त्या अनुयायांवर हल्ला करण्यासाठी सत्ता असते काय? अण्णांना उपोषणाआधीच अटक करण्यासाठी सत्ता असते काय? नसेल तर ते का घडले? चिदंबरम यांच्या अहंकारासाठी सत्तेचा दुरुपयोग चालू शकत असेल, तर ममताच्या अहंकारासाठी तिने त्याच सत्तेला ओलिस ठेवणात गैर ते काय? त्यांचा पाठींबा मिळवताना समिक्ररण सेक्युलर असते आणि त्यांच्याकडून अडवणूक झाली मग समिकरण राष्ट्रीय होते का? ही सगळी शुद्ध बदमाशी नाही काय?  
मुद्दा ती बदमाशी करणार्‍यांचा नाही, अशा फ़सवेगिरीला बौद्धीक आधार देणार्‍यांचा आहे. जे राजकारण सरळसरळ आकड्यांच्या आधाराने सत्ता मिळवण्यासाठी चालले आहे, त्यातली ही सेक्युलर जातिय धुळफ़ेक लोकांना समजावण्याचे काम ज्यांनी करायचे, तेच त्यातले खेळाडू झाले आहेत. म्हणूनच ही बदमाशी राजरोस चालू शकली आहे. अशा लबाडीला जातिय व सेक्युलर रंग चढवण्याचे कुठलेही करण नाही. उलट त्याचा खोटेपणा पत्रकार व माध्यमांनी उघड्यावर आणला पाहिजे. आज भाजपाने राष्ट्रहितासाठी सरकारच्या पाठीशी उभे रहावे असे कॉग्रेस प्रवक्ता म्हणतो, तेव्हा त्याला भाजपा राष्ट्रहीत मानतो काय, भाजपाच्या राष्ट्रप्रेमावर तुमचा विश्वास आहे काय, असे प्रश्न त्या प्रवक्त्याला विचारले पाहिजेत. सरकार वाचवायला भाजपाचा पाठींबा हवा यातला पोलखोल कोणी करायचा? मग आपल्या लक्षात येते, की सेक्युलर वा जातियवाद हेच मुळात थोतांड आहे. त्यानेच एकुण राजकारणाच पुरता विचका केलेला आहे. त्याचे ऐतिहासिक दाखले शेकड्यांनी देता येतील. किंबहुना सामान्य माणसाला भेडसावणार्‍या खर्‍या समस्यांवरून त्याचे लक्ष विचलित करण्यासाठीच थोतांड उभे करण्यात आले आहे काय, अशी कधी कधी शंका येते. (क्रमश:)भाग  ( २१३ )       २३/३/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा