लोकपाल विधेयकाच्या मागणीसाठी अण्णांनी आंदोलन छेडल्यावर तमाम सेक्युलर शहाणे अण्णांवर जे अनेक आरोप करत होते, त्यातला एक महत्वाचा आरोप अण्णा घटनेला जुमानत नाहीत असा होता. घटनेने संसद निर्माण केली आणि त्या संसदेवर कुठलाही कायदा बनवण्य़ासाठी सक्ती करणे म्हणजे गुन्हा, असाच आव आणला जात होता. घटना म्हणजे सर्वकाही असे तावातावाने सांगितले जात होते. यातला दुटप्पीपणाही तपासून बघितला, तर सेक्युलर असणे म्हणजे जणू फ़क्त बदमाश असणे आहे, काय अशीच शंका येते. लहान मुलांना उल्लू बनवण्यासाठी पुर्वी मोठी माणसे एक युक्ती करायची, त्यात एका बोटाला थूंकी लावून ते बोट दाखवायची. मग मुठी अशा तशा करून पुन्हा बोट दाखवले, तर त्यात भलत्याच बोटाला थुंकी लागलेली दिसायची. लहान मुलाला ती जादू म्हणून दाखवली जायची. त्यातून मग एक उक्ती मराठी भाषेत आलेली आहे. या बोटावरची थुंकी त्या बोटावर करणे. तमाम सेक्युलर राजकारणी, पत्रकार, बुद्धींमंत, संपादक वा वक्ते तशीच थुंकी या बोटावरून त्या बोटावर करताना दिसतील. अण्णा व लोकपाल आंदोलनातही तेच चालू होते. आपण भ्रष्टाचाराचे समर्थक नाही, पण अण्णांनी घटनेचा मान राखावा, लोकशाही व संसदेचा मान राखावा, असा शहाजोगपणा चालू होता. असे बोलाणार्यांना खरोखरच संसद, घटना, लोकशाही याची एवढी फ़िकीर असते काय? की जेव्हा त्यांच्या सोयीचे असेल तेव्हा घटना डोक्यावर घ्यायची आणि अडचणीची असेल तेव्हा त्यांनीच पायदळी तुडवायची?
१९९६ सालात जेव्हा भाजपा हा संसदेत सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आला, तेव्हा त्याच्या सोबत जायला एकही सेक्युलर पक्ष तयार नव्हता. मग जे कोणी भाजपा सोबत आले वा अजून टिकले, त्यांनी भाजपाला घातलेल्या अटी काय होत्या? त्या अटीतच सेक्युलर दुटप्पीपणा सामावलेला आहे. भाजपाने तीन मुद्दे सोडून दिले पाहिजेत वा बाजूला ठेवले पाहिजेत, अशी प्रमुख अट होती व आहे. एक अर्थात अयोध्येत राममंदिर बांधण्याची. तो कोर्टासमोरचा विषय असल्याने भाजपा त्यात काहीच करू शकत नाही. पण उरलेल्या दोन अटींचे काय? त्या परस्पर पुरक आहेत काय? भारतीय राज्यघटनेने जम्मू काश्मिरला विशेष स्थान दिलेले आहे. ते संघराज्यातील एक राज्य असले तरी त्याला ३७० कलमाने खास दर्जा दिलेला आहे. परिणामी त्याला इतरांप्रमाणे एक राज्य ठरवता येत नाही. जर तो भारताचा अविभाज्य भाग असेल, तर त्याचा हा दर्जा काढून टाकावा व त्यासाठी घटनेतुन ३७० कलम रद्दबातल करावे, असा भाजपाचा दिर्घकाळ आग्रह आहे. भाजपाने तो सोडावा असे सेक्युलर आग्रहपुर्वक सांगतात. ते कलम निमुट मान्य करणे म्हणजे घटनेचा सन्मान करणे असेल, तर त्याच घटनेचा अवमान करण्याचा खास अधिकार सेक्युलर असतील त्यांना कोणी दिला आहे काय? नसेल तर त्यांनी वेळोवेळी त्याच राज्यघटनेचा अवमान का केला आहे? नुसता अवमानच नव्हे तर त्यांच्याप्रमाणेच भाजपानेही घटनेचा अवमान करण्याचा आग्रह का धरला आहे?
ज्या तीन अटी भाजपाला घातल्या जातात, त्यातली तिसरी अट घटनेची पायमल्ली करणारी आहे. ती आहे समान नागरी कायद्याची. भाजपाने समान नागरी कायद्याचा अट्टाहास सोडावा, असाही याच सेक्युलर लोकांचा आग्रह आहे. तो घटनात्मक आहे काय? घटनाकार वा घटना समितीने जी मार्गसर्शक तत्वे घालून दिलेली आहेत त्यात समान नागरी कायद्याचा समावेश आहे. स्वातंत्र्योत्तर काळात, देशाच्या संसदेने व सरकारने सर्व भारतीय नागरिकांना समान सेक्युलर वागणूक देण्यासाठी, देशात सर्वांना लागू होणारा एकच समान नागरी कायदा बनवावा असे सांगितले आहे. आज त्याला सहा दशकांचा कालावधी उलटून गेला आहे. पण तशा हालचाली होणे दुरची गोष्ट, तशी मागणी केली तरी भाजपावर जातियवादाचा आरोप होतो. म्हणजे तीनपैकी दुसरी अट भाजपाने देशाच्या राज्यघटनेचा आदर करावा अशी आहे तर तिसरी अट त्याच भाजपाने त्याच घटनेचा सेक्युलरंप्रमाणे अवमान करावा अशी आहे. ह्याला काय म्हणायचे? एका बाजूला घटनेचा आग्रह धरायचा तर दुसरीकडे घटनेचा आग्रह धरणे गैर व गुन्हेगारी ठरवायचे. चमत्कारिक गोष्ट आहे ना? अशा चमत्काराला आपल्या देशात सेक्युलॅरिझम म्हणतात. कधी तो चार पायांचा पशू असतो तर कधी तो पंख असलेला उडणारा पक्षीसुद्धा असतो.
एक भाकडकथा आठवते. पशू आणि पक्ष्यांच्या वादात वटवाघळाने आपल्याला पंख असल्याने आपण पक्षी असल्याचा दावा केला होता. मग चोच नाही वा अशाच काही कारणास्तव आपण पशू असल्याचा दावाही केला होता. जोवर त्याला दोघांच्या समोर एकाच वेळी यावे लागले नाही तोवर ही लफ़ंगेगिरी खपून गेली. पण जेव्हा दोन्ही बाजूंनी एकत्र सभा घेतली, तेव्हा वटवाघळाची लबाडी उघडी पडली. आपल्या देशातले भंपक सेक्युलर त्या वटवाघळासारखे आहेत. ते सोयीनुसार कधी पक्षी असतात तर गैरसोय झाली मग ते पशू होतात. पण ते दोन्ही पैकी काहीच नाहीत. कारण पशू असो की पक्षी, त्याला सुर्यप्रकाश बघण्याची भिती वाटत नाही. म्हणजेच सत्य बघायची वा त्याला सामोरे जाण्याला त्यातला कुठलाही प्राणी घाबरत नाही. अपवाद फ़क्त वटवाघळाचा आहे. ते दिवसभर सुर्यप्रकाशात जग लखाखत असताना झाडाला उलटे लटकून रहाते. अंधार पडला मग त्याचा वावर सुरू होतो. योगायोगाने आपल्या देशातल्या सेक्युलरांची तशीच तर्हा आहे. ते दिवाभिताप्रमाणे सत्यापासून कायम दुर पळत असतात. समान नागरी कायदा व घटनेतील ३७० कलम हा त्याचाच पुरावा आहे.
जेव्हा ३७० कलमाचा विषय येतो तिथे ते घटनेचे पावित्र्य सांगतात आणि जिथे समान नागरी कायद्याचा प्रश्न आला मग त्याची घाई नाही म्हणत पळ
काढतात. काय अडचण आहे त्यात? तर समान नागरी कायद्याला हिंदू नव्हे तर मुस्लिम व ख्रिश्चन धर्मियांचा कडवा विरोध आहे. सेक्युलर हे असे जातियवादी वा धर्मांध आहेत. त्यांना हिंदू माणसाचे धर्मप्रेम हा सेक्युलर विचारांना धोका वाटतो. पण अन्य धर्मातला कडवेपणा मात्र धर्मश्रद्धा वा धर्मप्रेम वाटते. जोवर मुस्लिम समाजाची तयारी नाही तोवर समान नागरी कायदा आणायची त्यांना गरज वाटत नाही. मग तोच निवाडा हिंदू समाजाला का लावला जात नाही? हा माझा प्रश्न नाही. ही माझी शंका नाही. लक्षात ठेवा, हा सवाल भाऊ तोरसेकरने केलेला नाही. तो सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने विचारलेला सवाल आहे. भाऊ वा इतर कुणावर जातियवादाचा हिंदुत्ववादी म्हणून आरोप करता येईल. पण सर्वोच्च न्यायालयाचे काय? कारण आतापर्यंत तिनदा देशातील त्याच सर्वोच्च न्यायपीठाने समान नागरी कायदा बनवण्याचा सल्ला सरकार व राजकारण्याना दिलेला आहे. त्याचे काय?
आता असा सवाल केला मग टीव्हीवरचे तमाम जाणकार बुद्धीमंत मिळेल त्या बिळात दडी मारून बसणार आहेत. मी इतके बेधडक आरोप करतो, अगदी नावे घेऊन या शहाण्यांना नागडेउघडे करून टाकतो, तरी त्यातला एकही माझ्या प्रतिवादाला का समोर येत नाही, असा प्रश्न वाचकांना सतत सतावत असतो. तसे शेकडो वाचकांनी मला आतापर्यंत फ़ोनवरून विचारले सुद्धा आहे. त्याचे उत्तर त्यांना आता मिळाले असेल. जी दिवाभिते असतात, ती अशीच वट(निखील)वागळे असतात. ती सत्याच्या समोर येतील कशी? त्यांचा सेक्युलॅरिझम हा विचारांशी संबंधित नसून तो द्वेषमुलक भुमिकेतून आलेला आहे. त्यांचा सेक्युलर चेहरा हा प्रत्यक्षात मुखवटा आहे. त्यांना ना हिंदूंच्या भावनेशी कर्तव्य ना मुस्लिमांच्या प्रगती वा सुरक्षेशी संबंध. त्यांचा सेक्युलर पवित्रा हा भाजपा, शिवसेना वा रा. स्व. संघाच्या द्वेषातून आलेला सेक्युलर पवित्रा आहे. त्याचाही पुरावा मी देणार आहे. समजा उद्या भाजपा वा संघाने यांचा सेक्युलर विचार स्विकारला तर? समजा उद्या त्यांनी अयोध्येत मंदिर बांधायचा विचार सोडून दिला तर? हेच सेक्युलर लोक तिथे राममंदिर बांधायचा हट्ट केल्याशिवाय रहाणार नाहीत. कारण त्यांची भुमिका ही विचारांनी ठरलेली नाही. भाजपा वा संघ ज्याची मागणी करील त्याला विरोध, हे त्यांचे सेक्युलर तत्वज्ञान आहे. त्यामुळेच यांच्या मागणीला भाजपाने पाठींबा दिला तर हे सेक्युलर स्वत:च आपल्या मागणीच्या विरोधान घसा कोरडा करीत ओरडू लागतील. खरे नाही ना वाटत? मग उद्यापर्यंत कळ काढा. त्याचाही सज्जड पुरावा माझ्याकडे आहे. (क्रमश:)
भाग ( २१८ ) २८/३/१२
भाऊ,,इतका तिटकारा आहे SECULARISM चा तर काहो रामदास आठवलेंना सामील करुन घेतले??ही बौद्धिक बदमाशी नव्हे काय??लोक मनसे कडे का वळताहेत याचं चिँतन करा आधी....
उत्तर द्याहटवाभाउंना Secularism चा तिटकारा नसून हा शब्द वापरून त्याच्या नावाखाली राजकारण करनाऱ्या लोकांचा तिटकारा आहे. जे पक्ष सेक्युलर म्हनवतात तेच जाती धर्माचा आधार घेतात. उदारणार्थ काँग्रेस स्व:तला धर्मनिरीपक्षवादी समजते परंतु मते मागायला इमामाकडे जाते. मग तिथे कुठे आला Secularism. रामदास आठवले यांना बरोबर घेणे हाच Secularism.
हटवामहेश, तुमची भाउंच्या विचाराशी काहीतरी गफलत झालेली दिसतेय. भाऊंचे सुरुवातीपासूनचे लेख वाचले तर आपल्या हे लक्षात येईल. धन्यवाद !
i like your writing
उत्तर द्याहटवातुमचे लेखन सध्याच्या तथाकथित सेक्युलरवाद्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे आहे..तुमच्या या अत्यंत प्रामाणिकपणे आणि पोटतिडकीने लिहिलेल्या लिखाणाचा प्रचार आणि प्रसार अत्यंत आवश्यक आहे..
उत्तर द्याहटवा