हायकोर्टाने ज्याची संपत्ती जप्त करायला सांगितली, तो कॉग्रेसनेता कृपाशंकर सुद्धा अब्रुदार म्हटला पाहिजे. कारण त्याला अब्रु वाचवावी असे वाटते. त्याच्या संपत्तीची झाडाझडती पोलिसांनी सुरू केल्यावर, तो मुंबई सोडून फ़रारी झाल्याच्या बातम्या माध्यमात झळकू लागल्या. दोन दिवसात कृपाशंकर पत्रकारांसमोर आला आणि त्याने आपण कुठेही पळून गेलेलो नाही, असे जगाला ओरडून सांगण्याइतकी संवेदनशीलता दाखवली. आपण कायद्याची लढाई लढतो आहोत. माध्यमे आपली विकृत प्रतिमा रंगवत आहेत, असे जाहिरपणे सांगावेसे त्याला वाटले. म्हणजेच त्याला अब्रू नावाचा अवयव आहे हे मान्य़ करावे लागेल. आपल्यावर आरोप झाले तर त्याचा निदान खुलासा करावा, एवढी तरी सभ्यता त्याने दाखवली आहे. त्याने आपल्यावरचे आरोप खोटे आहेत असे सांगायचे धैर्य दाखवले आहे. तसे न केल्यास आपल्यावरचे आरोप लोकांना खरे वाटतील, इतकी लोकलज्जा त्याच्यापाशी सुद्धा आहे. पण आज जे अशा सार्वजनिक जीवनात वावरणार्यांच्या अब्रुशी सतत खेळत असतात त्यांचे काय? त्यांना लाजलज्जा, अब्रु, इज्जत वगैरे काहीच नसते काय? की ज्यांना लाजलज्जा नाही त्यांनाच हल्ली अब्रुदार, मान्यवर समजले जाते? दिवंगत कविवर्य नारायण सुर्वे यांनी पाच दशकापुर्वी तसे भाकितच करुन ठेव्ले होते. त्यांच्या काव्यपंक्ती आहेत, ’बेअब्रुच फ़ार झाली अब्रुदारांच्य जगात.’
आजचे अनेक मान्यवर संपादक, ज्येष्ठ पत्रकार त्याची जिवंत साक्ष देत असतात. मागले काही आठवडे किंवा त्याच्याही आधीपासून मी अनेक पत्रकार संपादकांचे वाभाडे काढतो आहे. त्यांच्या पापाचे पाढे वाचतो आहे. त्यांच्या खोटेपणाचे दाखले देतो आहे. पण त्यातल्या कोणालाही त्याचा प्रतिवाद करावा असे वाटलेले नाही. म्हणजे त्यांना ते आरोप सत्य म्हणून मान्य आहेत, असाच घ्यायला हवा ना? नसेल तर त्यांनी आरोप फ़ेटाळायला हवे होते. पण तसे होताना दिसत नाही. होणार सुद्धा नाही. कारण हा माझा गेल्या पंधरा वर्षाचा अनुभव आहे. तेव्हा मी यांचे पितळ मुंबईतल्या छोट्या माध्यमातुन उघडे पाडत होतो. त्याकडे काणाडोळा करून ही मंडळी गप्प बसली. ’किती लोक वा़चतात भाऊचे’ अशी स्वत:ची समजूत काढून त्यांनी तिकडे दुर्लक्ष केले. पण आता ’पुण्यनगरी’च्या रुपाने तेच वस्त्रहरण मी कोट्यवधी वाचकांसमोर करतो आहे. तरीही उत्तर द्यायची हिंमत नसेल, तर त्यांना त्यांचा खोटेपणा मान्य आहे असेच समजायला हवे. किंवा जाणारी अब्रु वाचवण्याची त्यांना गरज नाही असेही, असू शकेल. कदाचित सुर्वे म्हणतात तसे बेअब्रुच त्यांना प्रतिष्ठेची वाटत असेल.
इतरांचे सोडुन द्या. आपले ठोकपाल हेमंत देसाईंची गोष्ट घ्या. ते पुण्यनगरीत लिहितात, म्हणजे त्याना मी केलेले त्यांच्यावरचे आरोप व घेतलेले आक्षेप ठाऊक आहेत ना? त्यांनी त्याचा प्रतिवाद अजून केलेला नाही. जो माणूस विलासराव देशमुख यांच्यासारख्या केंद्रिय मंत्र्याला, ’जनाची नाही पण मनाची लाज असेल तर राजिनामा द्या’, असे जाहिरपणे सांगतात. पण त्यासाठी आधी यांना लाज कशाशी खातात ते तरी ठाऊक आहे काय? असते तर त्यांनी आपल्यावर आपल्याच वृत्तपत्रात होणार्या आरोपांना उत्तर दिले असते. तेच कशाला, रोजच्या रोज साधनशुचिता व चारित्र्याचे उपदेश जगाला करायचे आणि आपल्या चारित्र्याचा सवाल आला, मग बिळात दडी मारुन बसायचे. यांच्यापेक्षा मग कृपाशंकर अधिक अब्रुदार का नाही म्हणायचा? जी काही थोडीफ़ार अब्रु त्याच्यापाशी असेल तेवढी तरी तो जपायला बघतो ना? आपली विजार फ़ाटली असेल तर तिला ठिगळ लावयचा केविलवाणा प्रयास तो करतो ना? इथे आमचे ठोकपाल वा त्यांचे संप्रदायी निखील वागळे, कुमार केतकर, प्रकाश अकोलकर, द्वादशीवार, हुसेन दलवाई यापैकी कोणाला तरी अब्रु आहे काय? असती तर त्यांनी निमुटपणे उलटतपासणी सहन केली नसती.
माझा त्यांच्यावर काही व्यक्तीगत राग नाही. कारण त्यांनी माझे काही वाकडे केलेले नाही. सवाल आहे तो त्यांच्या अशा लिखाणातुन जे सामाजिक नुकसान होते त्याचा आहे. असे भंपक लोक जेव्हा समाजाला चारित्र्य, साधनशुचिता शिकवू लागतात, तेव्हा जनतेचा चांगुलपणावरचा विश्वासच उडू लागतो. चागले वाईट यातला फ़रक लोकांना कळेनासा होतो. पर्यायाने समाज, संस्कृती व राष्ट्र रसातळाला जात असते. जगाच्या इतिहासात अशा बुद्धिमंताच्या आहारी समाज गेले तेव्हा त्या महान संस्कृती व राष्ट्राचा र्हास झालेला आढळून येतो. ज्या गोष्टी व श्रद्धा; देश, समाज व राष्ट्राला अभिमानास्पद असतील त्यावरच तो समाज उन्नती करत असतो. त्याच पायावर समाज उभा असतो. अशी मंडळी तो पायाच उध्वस्त करायचा छुपा उद्योग करत असतात. ज्या नितीमुल्यांवर समाज चालतो, त्याची टवाळी, हेटाळणी यातून त्या पायावर हल्ला चढवला जात असतो. मग तो कधी केजरीवाल, कधी विलासराव, कधी बाळासाहेब ठाकरे, कधी अण्णा हजारे, कधी रामदास आठवले, कधी गोपिनाथ मुंडे अशा तमाम लोकात वावरणार्या व लोकांना आदरणिय वाटणार्या व्यक्ती असतील, त्यांचे चारित्र्यहनन, विडंबन, हेटाळणी ही मंडळी अगत्याने व कर्तव्यबुद्धीने करत असतात. त्याचे कारण काय? काय साधायचे असते त्यातून या शहाण्यांना?
सामान्य माणसाच्या जीवनात अश्या व्यक्ती प्रेरणादायी असतात. त्याला त्या व्यक्ती उर्जा देत असतात. त्यांच्यावरच हल्ला चढवला जात असतो. तेवढेच नाही. त्यांना श्रद्धा वाटेल अशा गोष्टी प्रतिकांवरही हल्ला चढवला जात असतो. एक छोटे उदाहरण पुरेसे ठरावे. म्हसोबा ही शिवी कोणी बनवली? ज्या दगडाला खेड्यातला माणुस देव मानतो त्याला शिवी बनवून काय साधले जात असते? दगडाची पूजा तर उच्चवर्णियसुद्धा करतच होते. पण त्यांनी शेंदुर फ़ासून दगडाचा देव केला, मग तो मारूती असतो. आणि सामान्य माणसाने दगड पुजला तर म्हसोबा ही शिवी असते. असे का? तर जो तुला प्रेरणा देईल जे तुझ्यासाठी पुजनिय ते फ़डतुस, असे दाखवून त्याच सामान्य माणसाला अपमानित करायची मानसिकता त्यात असते. त्यातून सामान्य माण्साचे खच्चीकरण केले जात असते. पुर्वी ते म्हसोबा, मरीआई अशा शब्दातून केले जायचे. आता ते त्याच सामान्य माणसाला आदरणिय वाटतील अशा व्यक्ती गोष्टीच्या अवहेलनेतुन केले जात असते. गरीबाच्या मुलीचे प्रेमप्रकरण लफ़डे असते. आलिशान सोसायटीतल्या मुलीचे प्रकरण अफ़ेअर असते. नेमकी तिच प्रवृत्ती मला या हेमंतबुवा किंवा त्यांच्यासारख्यांच्या लिखाणातून दिसते. त्याचा हाच पुरावा आहे, ते विलासरावांना लाज असेल तर राजिनामा द्यायला सांगतात. पण स्वत:वरच्या आक्षेप आरोपांना मात्र उत्तर देत नाहीत. मागे पेडन्युज संदर्भात लिहितांना त्यांनी कोणी सोनिया, राहुल गांधी यांना फ़ुकट प्रसिद्धी देतो असे म्हटले होते. तो संदर्भ त्यांचे जुने बॉस व महाराष्ट्र टाईम्सचे तेव्हाचे संपादक कुमार केतकर यांचा होता. तिथे थेट नाव घ्यायला काय हरकत होती? विलासराव, केजरीवाल यांचे नाव घेताना लाज वाटत नाही, तर केतकरांचे नाव घ्यायला का लाजायचे? की नवर्याचे नाव घ्यायला लाज वाटते?
हा दोन पत्रकारातला वाद नाही तर एकुणच आज बुद्धीवादाच्या नावावर जी समाजाची सार्वत्रिक दिशाभुल चालली आहे त्याला दिलेले आव्हान आहे. सत्य सांगण्याचा आव आणला जात असतो आणि प्रत्यक्षात सत्य दडपण्याची अखंड कसरत चालू असते. हे मी ठामपणे सांगू शकतो. कारण मी ईमेलच्या मागे लपून बसत नाही. थेट फ़ोन क्रमांक दिलेला असतो आणि वाचक नेहमी माझ्याशी बोलत असतात. देसाई यांनीही लोकांसाठी आपला फ़ोन उपलब्ध करून द्यावा, मग सत्य त्यांच्यापर्यंत पोहोचायला सोपे होईल. देसाईच कशाला बाकी्च्या संपादक पत्रकारांनीसुद्धा लोकांना वाचकांना सामोरे जाण्याची थोडी हिंमत दाखवावी. विलासराव, किंवा कृपाशंकर यांचे अनेक दोष असतील. पण ही माणसे लोकात वावरतात. आणि वेळ आली तर लोकांसमोर निर्भयपणे उभी रहातात. कधी लोकांचे जोडे सुद्धा खायची हिंमत दाखवतात. आणि इथे आमचे हे अविष्कार स्वातंत्र्याचा झेंडा खांद्यावर घेऊन लढाईचा आवेश आणणारे ठोकपाल लोकांसमोर जायलासुद्धा घाबरतात. मग त्यांच्यापेक्षा विलासराव, कृपाशंकर हे अधिक प्रामाणिक व अब्रुदार नाही का म्हणायचे? (क्रमश:) भाग ( १९९ ) ९/३/१२
( http://bhautorsekar.blogspot.in/ )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा