पत्रकारांनी खोड काढली वा खोटी बातमी दिल्यावर जसे त्याला माफ़ी मागून सुटायची मुभा आहे, तशीच ती केजरीवाल यांनाही आहे. आज त्यांच्यावर दुगाण्या झाडणार्या पत्रकारांनी थोडा संयम पाळून त्यांच्याकडे संसदेची माफ़ी मागण्याचा, दिलगिरी व्यक्त करण्याचा आग्रह धरण्याइतका संयम का दाखवू नये? यालाच जोतिबा फ़ुले कलमकसाई म्हणतात. आपल्या हाती लेखणी वा सता आहे, तिचा वापर इतरेजनांना हीन लेखून आपले महात्म्य वाढवण्यासाठी करण्याची ही वृत्तीच घातक असते. ती समाजात उच्चनीच भावना वाढीस लावते. भेदभाव निर्माण करते. त्या काळात त्याला धर्माचे लेबल लावले जायचे. आज नैतिकता, सभ्यता असले लेबल लावले जाते. पण तेव्हाचे भटजी जसे स्वत:च्या वागण्या बोलण्यात सभ्यता, धर्माचे काटेकोर पालन करीत नव्हते आणि उर्वरीत समाजाला मात्र त्या्चीच थोरवी सांगून, सामान्यांच्या मनात अपराधी भावना उत्पन्न करायचे; तसाच हा आधुनिक प्रकार आहे. अडसुळ प्रकरणी जो गुन्हा मटा दैनिकाने केला, तोच आज केजरीवाल करत आहेत. त्यावर त्यांना आरोपी म्हणायचा अविष्कार स्वातंत्र्याच्या समर्थकांना म्हणूनच अधिकार उरत नाही. तो निव्वळ दुटप्पीपणा असतो. कायदा राबवणार्याला किंवा त्याचा आग्रह धरणार्याला, त्याच कायद्यापासून सुटका नसते. अगदी पत्रकारांना सुद्धा. जो पो्लीस खोटी चकमक करतो, त्यालाही पोलिसच पकडून कोठडीत डांबतात ना? मग जे स्वत:ला प्रामाणिक पत्रकार म्हणवून घेतात त्यांनी तरी निदान आपल्यातल्या बदमाशी, भ्रष्टाचार करणार्या पत्रकारांचे समर्थन करून चालेल काय?
दुर्दैव असे आहे, की आज अशा बदमाशांना आपल्या पदराआड लपवून, थोर संपादक जुन्या महामहोपाध्यायांप्रमाणे अविष्कार स्वातंत्र्याचे उपरणे खांद्यावर सावरत, त्याने पिडलेल्या, सतावलेल्यांनाच शहाणपण शिकवू पहातात. दुसरे दुर्दैव असे, की आजचे शाहु-फ़ुले, आंबेडकरांचे भक्त अनुयायी सुद्धा या आधुनिक महामहोपाध्यायांच्या जंजाळात फ़सले आहेत. तेही या नव्या आधुनिक भटजीगिरीला जाब विचारायला धजावत नाहीत. त्यामुळे ही हा दांभिकपणा बोकाळत चालला आहे. मग उलटा चोर कोतवालको डाटे या हिंदी उक्तीप्रमाणे ’मटा’चे संपादक "दांभिक वाचाळवीर" असे आख्यान लावतात. त्यालाच आपल्या मराठी भाषेत भुताहाती भागवत असेही म्हटलेले आहे. जेव्हा माणसे तत्वज्ञानाच्या गप्पा मारतात आणि स्वत:च त्याचे उल्लंघन करतात वा विटंबना करतात, तेव्हा त्याला दांभिकता म्हटले जात असते. तेव्हा दांभिक लेखणीवीर कोण ते लक्षात आलेच असेल.
दुसरे अविष्कार स्वातंत्र्याचे लढवय्ये आहेत, आमचेच ठोकपाल हेमंत देसाई. त्यांनी नैतिकतेचा ठेका घेतलेला आहे. त्यामुळे दुसर्या कुणी त्यात ढवळाढवळ केली तर ते कमालीचे संतप्त होतात. मात्र त्यांचा हा ठेका इतरांसाठी असतो. जेव्हा त्यांनीच मांडलेली नैतिकता त्यांच्यावरच उलटू लागते, तेव्हा त्यांना नैतिकतेचे सुत विणण्यापेक्षा व्यवहाराचे कपडे थेट अंगावर घालायची घाई होत असते. जेव्हा युपीए सरकारच्या बहुमताचा विषय येतो, तेव्हा त्यांना नैतिकतेची गरज वाटत नाही. पण अण्णांचे आंदोलन चालते, तेव्हा त्यात मात्र शुचिता, पावित्र्य, नैतिकता असायलाच हवी. तिथे कोण कोणाबरोबर जातो ते महत्वाचे. सत्ता मिळवायला, टिकवायला वाटेल ते सौदे केले तरी बिघडत नाही. पण ती सवलत फ़क्त देसाई यांची कृपादृष्टी असलेल्या सेक्युलर कॉग्रेस व तत्सम पक्षांनाच त्यांनी दिलेली आहे. बाकी पक्षांना ती सवलत नाही. "टीम अण्णाचा राजकीय पक्ष व लोकशाहीबद्दलचा हा तिरस्कार खटकणारा आहे. शिवाय आपण म्हणजे हिमालयात तप करणारे जणू साधू-संतच हा अहंगंड संतापजनक आहे", इतके हेमंतभटजी क्रोधीत झालेले आहेत. पण त्यांचा आव लिहीतांना बोलतांना तरी त्यापेक्षा काही कमी असतो का? आपण म्हणजे पावित्र्याचे साक्षात पुतळेच आहोत, अशा थाटात ते नेहमी लिहित बोलत असतात. बुधवारी (२९/२/१२) ठोकपाल काय म्हणतात बघा, "राजकारणाला नैतिकता असू नये असे मुळीच नाही, मात्र एकजात सारेच भ्रष्ट आणि आम्ही मात्र संतमहात्मे हा आव कुणी आणू नये." दुसर्या कुणाचे सोडुन द्या, ज्या व्यवसायात हेमंत वावरतात, त्यातल्या लोकांनी तरी संतमहात्मे असल्याचा आव आणण्यासारखी परिस्थिती आहे काय? त्यांचे आवडते यजमान व कायबीइन लो्कमतचे संपादक निखील वागळे यानीच त्याची तळेगावला जाऊन साक्ष दिलेली आहे.
माध्यमरत्न असा पुरस्कार त्यांना तळेगाव पत्रकार संघाने दिला. त्या सत्काराला उत्तर देताना वागळे जाहिरपणे म्हणाले, नव्वद टक्के पत्रकार आज भ्रष्ट झालेले आहेत. त्यांच्या सहवासात राहुन हेमंतभटजी कसला आव आणत असतात? केजरीवाल व अण्णा टीमच्या पावित्र्याचा अहंगंड त्यांना संतापजनक वाटतो, मग अवतीभवती जो अहंगंड बोकाळला आहे त्याचे काय? तो गुदगुल्या करतो काय? एखादा दुसरा पत्रकार भ्रष्ट असेल म्हणून सगळीच पत्रकारिता भ्रष्ट झालेली नाही असे सांगणार्या देसाईंना वागळे यांनीच आपल्या सत्कारातून ९० टक्के भ्रष्ट असल्याची चपराक हाणलेली आहे. तेव्हा त्यांनी केजरीवाल वा अन्य कुणा राजकारण्यांकडे बोट दाखवण्याआधी, आपले घर साफ़ करण्यात लक्ष घालावे. मी तेच काम करतो आहे. कारण मी नैतिकतेचा ठेका घेतलेला नाही. जोवर मला माझ्या सहकरी पत्रकारांच्या वर्तनाबद्दल हमी देता येत नाही, तोवर दुसर्या कुठल्या क्षेत्रातील लोकांना नितीमत्तेचे धडे देण्याचा आधिकार मलाही उरत नाही, एवढी नैतिकता माझ्याकडे अजून जपलेली आहे. म्हणुनच मी निवडकपणे नैतिकता सांगत नाही. जेव्हा मटावर हल्ला झाला, तोही मुठभर शिवसैनिकांनी केलेला होता. तेवढ्यासाठी संपुर्ण सेनेला गुन्हेगारीची संघटना ठरवणे, देसाईंना गुन्हा वाटला नाही. मग त्यांचाच नियम केजरीवाल वापरतात, त्याचा संताप कशाला? सातशेतले पाच पन्नस खासदार आरोपात अडकले असतील तर केजरीवालसुद्धा (देसाई निकषानुसारच) संसदेबद्दल बोलत असतील, तर दोष त्यांचा नाही. आज ज्याप्रकारे माध्यमांनी लोकांसमोर राजकारणी, पक्ष, नेते, कार्यकर्ते यांचे चेहरे उभे केले आहेत, त्याचाच तो परिणाम आहे. केजरीवालच कशाला? रस्त्यावर, बसमध्ये, बाजारात, प्रवासात लोक काय बोलत असतात? "साले सगळेच चोर आहेत". हे लोकांच्या डोक्यात कोणी भरवले आहे? केजरीवाल यांनी नाही, पत्रकार, माध्यमांनीच ना? वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्यांनीच ना? मग संताप कशाला येतो? जे पेरले तेच उगवत असते ना?
यांना जाब विचारणारा कोणी नाही म्हणुन हे चालले आहे. पत्रकारांच्या घसरलेल्या नैतिकता व विश्वासार्हतेबद्दल कोणी बोलायचे? आज निदान राजकीय नेते, त्याचे अनुयायीच हात उचलत आहेत. कुठे गावगुंडच तेवढे धाडस करत आहेत. एखादा बिल्डर मारतो आहे. पण लोकांत पत्रकारांबद्दल सहानूभूती नाही, तर का नाही, याचाही गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे. जेव्हा अशाच भटजीगिरीचा अतिरेक झाला आणि नैतिकता दांभिक असल्याचे लोकांच्या लक्षात आले, तिथूनच महामहोपाध्याय ब्रह्मवृंदांची समाजातील विश्वासार्हता संपली होती. तेव्हा धर्माच्या ना्वाने चालेले थोतांड आज नैतिकता, पावित्र्य, स्वातंत्र्य अशा नावाने पुढे चालवण्याचा उद्योग सुरू झाला आहे. पण त्याचाही अतिरेक होऊ लागल्याने पत्रकारितेची विश्वासार्हता रसाताळाला चालली आहे. कारण "नैतिकतेचे ठेकेदार"च "दांभिक वाचाळवीर" होत चालले आहेत. त्यातून महागाई वाढत असताना, वृत्तपत्राचा उत्पादन खर्च निघणे अशक्य होत चालले आहे. मग त्यात गैरमार्गाने मिळवलेला पैसा आणू शकणारा, ओतू शकणारा प्रभावी ठरतो आहे. सगळी पत्रकारिताच अशा गैरलागू पैसे कमावणार्यांची बटीक बनत चालली आहे. आणि त्यांच्या जनानखान्यात ऐषारामाची जिंदगी जगताना पतिव्रतेचा आव आणत, जगाला नैतिकता शिकवणे हा भ्रष्टाचारच नाही तर बौद्धिक व्याभिचार होऊ लागला आहे. त्यामुळे केजरीवाल यांना सवाल करणारे पाहिले मग कोठीवालीने बोडकीला वटसावित्रीचे व्रत सांगावे तसे वाटू लागते.
हे सर्व लिहितांना मला खुप आनंद होतो असे अजिबात नाही. ज्या व्यवसायात चार दशके काढली त्याचे अध:पतन बघवत नाही, म्हणुन लिहिणे भाग आहे. प्रत्येक वस्तुची किंमत महागाईने वाढत असताना वृत्तपत्राच्या किमती वाढवायला आपण धजावत नाही, याचे मनापासून दु:ख होते. ती वाढवली तर कोणी पेपर घेणार नाहीत, खप घसरेल या भयाने पछाडलेल्यांनी कुठल्या नैतिकतेच्या गोष्टी लोकांना सांगायच्या? याचे वैषम्य वाटते, म्हणुन हे लिहावे वाटते. अशा दांभिकतेच्या ठेकेदार वाचाळवीरांपासून पत्रकारीता मुक्त व्हावी एवढीच त्यामागची कळकळ आहे. (क्रमश:)
भाग ( १९८ ) ७/३/१२
भाऊ अत्यंत पोटतिडकीने आपण केलेले हे विश्लेषण खूप दुःख देणारे आणि वास्तविक आहे. कुठल्याही पत्रकाराला पत्रकारितेची घसरत चाललेली प्रतिमा हि वेदनादायीच आहे. प्रकाश बाळ आणि हेमंत देसाई ही दोन माणस अत्यंत सुमार आणि फुसकट असे कय्बियन च्यानलचे बारमाही विश्लेषक म्हणून गेल्या काही वर्षांपासून आपण पाहत आहोत. पण त्यांच्या पत्रकारितेची प्रगल्भता, निस्पृहता, अजून तरी दिसलेली नाही. मात्र दरवेळी त्यांनी घेतलेली कोन्ग्रेस आणि सत्ताधाऱ्यांची बाजू, हिंदुत्ववादी पक्षांच्या विरोधातली भूमिका ही ठळकपणे नेहमीच दिसून आलेली आहे. ते भाडोत्री आणि नीतीमत्ताहीन 'पत्रकार' आहेत हे एव्हाना अवघ्या महाराष्ट्राच्या ध्यानात आलेच आहे.
उत्तर द्याहटवा१९९० साली सातपुड्याच्या दरयाखोरयांमध्ये अत्यंत विदारक अशी आदिवासींची परिस्थिती होती. कुपोषण, अनारोग्य, वैद्यकीय सेवांची बोंबाबोंब आणि शिक्षणाची तर पुरती वाट लागलेली होती. हा प्रकार सातपुड्या बाहेर तेव्हा जनतेला माहीतही नव्हता. धुळ्याच्या स्थानिक वर्तमान पत्रात जेव्हा हा सर्व वृत्तांत मी दिला तेव्हा बरेच वादळ उठले होते. तत्कालीन खासदार मला भेटायला तिकडे आले होते. वर्षभर न फिरकलेले शाळा मास्तर आधी मला भेटून मग पटापट पाड्यांवर बांधलेल्या शाळावर जात होते. रस्त्यांचे ठेकेदार जाताना डोळे वटारून जात होते, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर भेटायला यायचे. सर्व सुस्त यंत्रणा गतिमान झाली होती. हे सर्व मुद्दाम सांगायचे कारण म्हणजे 'पत्रकार' ही त्यावेळी एक शक्ती होती. पत्रकार ह्या शब्दामागे एक नीतीमत्तेचे बळ होते, कर्तव्याचे पावित्र्य होते.
आज मात्र चित्र फारच दारूण आहे. पत्रकार म्हणजे ब्ल्याकमेलर, विकला गेलेला, सुपाऱ्या घेणारा, तोडपानी करणारा, खंडणी बहाद्दर, भ्रष्ट, भामटा, पैसे घेऊन एखाद्या सत्याचा एखाद्याच्या फायद्यासाठी विपर्यास करणारा..अशी प्रतिमा काही नालायाकांमुळे तयार झाली आहे. आपसूकच माध्यमे भांडवलदारांची बटिक होत चाललीय. त्यात आलेली स्पर्धा सर्व मर्यादा ओलांडत आहेत. दुःख एकाच गोष्टीचे आहे कि महासत्तेलाही वेसण घालणारे, लोकांचा खरा आवाज असलेले हे महान अस्त्र आज बोथट झाले आहे. कलंकित झाले आहे. धन्देवायीकांच्या दावणीला बांधले गेले आहे.
Bhau torsekarani koncha tir marla ahe.
उत्तर द्याहटवा