शुक्रवार, ७ फेब्रुवारी, २०१४

बुद्धीला निकामी करणारे सामुहिक मन

                                              (झुंडीचे राजकारण -४)

                       

   ‘कारवान’ नावाच्या एका नियतकालिकाने असीमानंद यांची मुलाखत प्रसिद्ध केली आहे. त्यावरून सध्या राजकारणासह माध्यमातून मोठेच वादळ उठवण्यात आलेले आहे. कारण हे स्वामी असीमानंद कुठल्या आश्रमात बसून मुलाखत देणारे कुणी साधू नाहीत, तर मालेगाव आणि समझोता एक्सप्रेस अशा दोन गाजलेल्या बॉम्बस्फ़ोटातले आरोपी म्हणून कुठल्याही आरोपाशिवाय गजाआड खितपत पडलेले हिंदूत्ववादी कार्यकर्ते आहेत. त्यांच्यासह साध्वी प्रज्ञा सिंग, कर्नल पुरोहित यांच्यावरही तोच आरोप आहे आणि आतापर्यंत विविध तपास यंत्रणांनी चौकशा केल्यावरही या आरोपींवर कुठलेही ठोस आरोप न्यायालयात ठेवले गेलेले नाही. त्यांच्यावरचे आरोप आक्षेप हे माध्यमांनी खळबळ माजवण्यासाठीच होत आले आहेत आणि हा खेळ गेली तब्बल साडे पाच वर्षे अव्याहत चालू आहे. त्यात कधी नवी भर पडते, तर कधी जुन्याच आरोप संशयांना उजाळा दिला जात असतो. जोपर्यंत त्यांच्यावर आरोप होत असतात तोपर्यंत त्याचे कौतुक माध्यमातून व काही गोटातून चालते आणि कंटाळा आला, मग तो विषय मागे पडतो. तब्बल साडेपाच वर्षे चाललेला हा खेळ खरा वा निदान तर्कसंगत असावा, असेही त्यावर ताव मारणार्‍यांना वाटलेले नाही. अत्यंत बुद्धीमान व सुसंगत विचार करणारे कित्येक पत्रकार, बुद्धीमंत, विश्लेषकही या एकूण तर्कविसंगत खेळात गटांगळ्या खाताना दिसतील. आता ‘कारवान’ नामक नियतकालिकात आलेली असीमानंद यांची ताजी मुलाखत घ्या. त्याच्या खरेखोटेपणाचा भाग बाजूला ठेवू. त्यात जे काही कथन करण्यात आलेले आहे, त्याची शहानिशा करावी, असे त्यावर तुटून पडलेल्या कुणा समतोल बुद्धीवाद्याला वाटले आहे काय? नसेल तर का वाटू नये? ही बाब अतिशय मोलाची व लक्षणिय आहे. त्यालाच झुंडीच्या मानसिकतेमध्ये सूचनाप्रवणता असे म्हणता येईल. ही सूचनाप्रवणता समजून घेतली, तर झुंडीचे सामुहिक मन कसे काम करते त्याचा अंदाज येऊ शकतो.

   असीमानंद ज्या आरोपात व प्रकरणात गुंतलेले आहेत, त्या घातपातांची आजवर अर्धा डझन यंत्रणांकडून तपासणी झालेली आहे. सध्या हे प्रकरण एन आय ए नामक केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणार्‍या यंत्रणेकडे धुळ खात पडलेले आहे. आरंभी महाराष्ट्रातील ए टी एस यंत्रणेने त्याचा तपास केला. त्यात मालेगाव येथील काही मुस्लिम तरूणांना अटक केलेली होती. पुढे अचानक त्या यंत्रणेचे प्रमुख बदलले आणि त्या पदावर आलेल्या हेमंत करकरे यांनी मालेगावच्या स्फ़ोटात हिंदू अतिरेकी असल्याचा शोध लावला. त्यावेळी समोर आणली गेलेली माहिती आज किती लोकांच्या स्मरणात आहे? करकरे यांच्या विशेष पथकाने साध्वी प्रज्ञा सिंग व कर्नल पुरोहित यांना अटक केली. त्यांच्याच तपासात पुढे असीमानंद, दयानंद पांडे अशा इतरांना अटक झाली. पण आरंभीच्या त्या तपासात असे उघड करण्यात आलेले होते, की ‘अभिनव भारत’ म्हणून हिंसक कारस्थाने शिजवणार्‍या या गटाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक मोहन भागवत यांची हत्या करण्याचेही कारस्थान केलेले होते. आज किती लोकांना त्याचे स्मरण आहे? तसे असेल, तर मग या कारस्थानी लोकांना मोहन भागवत यांच्याशी विश्वासात जाऊन कुठली मंजुरी घेण्याची गरज उरते काय? आता ताज्या प्रसिद्ध मुलाखतीवर विश्वास ठेवायचा, तर त्या टोळीच्या कारस्थानांना भागवत यांचाच आशीर्वाद होता. जुन्या आणि नव्या आरोप वा माहितीची सांगड घालायची, तर हे कारस्थानी मोहन भागवत यांच्याकडून हिंसा करायला मंजुरी घेत होते आणि तेव्हाच भागवत यांच्या हत्येचेही कारस्थान शिजवत होते. किंबहूना आपलीही हत्या घडवून आणायला भागवतच आशीर्वाद देत होते. कुठल्याही इतक्या मोठ्या संघटनेचा प्रमुख आपलीच हत्या घडवणार्‍यांना आशीर्वाद देतो, हे तर्कसंगत आहे काय?

   थोडक्यात हेमंत करकरे यांच्या तपासावर विश्वास ठेवायचा, तर या टोळीला भागवत यांची हत्या करायची होती आणि आजच्या ‘कारवान’ मुलाखतीलाच खरे मानायचे तर आपल्याच मारेकर्‍यांना भागवतच प्रोत्साहन देत होते. यातली एक बाजू खरी असू शकते आणि म्हणूनच दुसरी धडधडीत खोटी असू शकते. पण तेव्हा साडेपाच वर्षापुर्वी अतिशय हिरीरीने करकरे यांनी केलेल्या आरोप वा आक्षेपावर डोळे झाकून विश्वास ठेवणारा जो वर्ग होता; तोच आज तितक्याच मिटक्या मारीत नेमक्या उलट्या आरोपावरही आंधळेपणाने विश्वास ठेवतो आहे. असीमानंद यांच्या मुलाखतीनुसार भागवतांवर आणि संघावर शंका घेणार्‍यांना करकरे यांनी केलेला गौप्यस्फ़ोट आठवतो तरी आहे काय? नसेल तर कशाला आठवत नाही? मिमांसा त्याची आवश्यक असते. कारण यापैकी सर्वच माणसे बुद्धीमान व चिकित्सक आहेत. त्यांना कोणी सहजासहजी तर्कविसंगत विधानाने उल्लू बनवू शकणार नाही. पण इथे अनुभव उलटेच सांगतो. हीच माणसे तेव्हा ज्या विधानावर नि:शंक मनाने विश्वास ठेवत होती, त्याच्याच उलट्या वक्तव्यावर आज तितकाच विश्वास दाखवत आहेत. अशा बुद्धीमान लोकांची बुद्धीही अशी पंगू कशाला होते? तर त्याचे उत्तर सूचनाप्रवणता असे आहे. त्यांना आवडणारी व पटणारी माहिती देत गेलात; तर त्यांची तर्कशक्ती उदासिन होऊन काहीही मान्य करू लागते. त्यांच्यातली चिकित्सक वृत्ती निकामी होऊन जाते. तुम्ही दिलेली माहिती, सूचना वा बातमी त्यांना मनापासून आवडणारी असायला हवी. ती खरी वा वास्तविक असण्याची गरज नसते, जे ऐकायला अशी माणसे आसुसलेली असतात, म्हणजे त्यांचा पुर्वग्रह त्याकरीता उतावळा असतो, अशी माहिती खरी असण्याची गरज नसते, तर खुश करणारी असावी लागते. ती माहिती तात्काळ स्विकारली जाते आणि ती माहितीच चिकित्सक तल्लख बुद्धीला निद्रीस्त करीत असते. एकदा अशी बुद्धी सुप्तावस्थेमध्ये गेली, मग व्यक्ती डोळसपणे त्याच्या सारासार बुद्धीलाही न पटणार्‍या गोष्टी बिनदिक्कत स्विकारू लागते. इतकेच नव्हेतर त्या तर्कविसंगत विषयाचे हिरीरीने समर्थन करू लागते.

   यालाच सूचनाप्रवणता म्हणतात. जेव्हा काही लोक समविचारी असतात किंवा एका ठराविक भूमिकेवर ठाम मत बनवून बसलेले असतात; त्यांना वास्तविक माहितीची गरज नसते. त्यांच्या मताशी जुळणारी माहिती, पुरावे त्यांना हवे असतात. त्यांच्या मताला छेद देणारी कुठलीही माहिती अशा व्यक्तीला नको असते. याला एका ठराविक विषयावर तयार झालेले सामुहिक मन कारण असते. असे सामुहिक मन म्हणजे समविचारी लोक असतात. ते लोक एकत्र जमणारे किंवा एकमेकांपासून दुर वसलेले असले, तरी त्यांच्या प्रतिक्रिया समान आढळतील. आताही ‘कारवान’मधील असीमानंद यांच्या मुलाखतीनंतर उमटलेल्या प्रतिक्रिया तपासल्या, तर तशाच दिसतील. त्यात संघाच्या समर्थकांनी ती मुलाखत झटकून टाकली आहे, तर तितक्याच उत्साहात संघाच्या विरोधात ठाम असलेल्या लोकांनी त्यातला आरोप निखळ सत्य असल्याचा दावा केलेला दिसेल. यापैकी कोणाला त्या मुलाखतीची सत्यासत्यता तपासून बघायची गरज वाटलेली नाही. हाच प्रकार आपण मोठ्या प्रमाणात मोदी समर्थक, केजरीवाल यांचे पाठीराखे किंवा संघाचे समर्थक वा  विरोधक यांच्यात पाहू शकतो. प्रमुख्याने अलिकडल्या काळात केजरीवाल समर्थक व आम आदमी पक्षाच्या पुरस्कर्त्यांचे वागणे बघितले, तर त्याची नित्यनेमाने साक्ष मिळत असते. डोक्यावर आम आदमी पक्षाची टोपी चढवली, ही सूचनाप्रवणता किती प्रभावशाली काम करते त्याचे सदोदीत अनुभवास येणारे ते उदाहरण आहे.

   झुंडीलाच दुसर्‍या भाषेत समविचारी असेही संबोधले जात असते. त्यात सहभागी झाले; मग आपापल्या सामुहिक मताशी ठाम रहावे लागते आणि त्याच्याशी मतभेद होऊ शकेल, असे काहीही ऐकून घेणेही अन्याय अत्याचार वाटू लागतो. अशी नुसती जरी शंका आली, तरी आपापल्या जागी राहून अशा समविचारी झुंडीतला माणूस भिन्न प्रकृती वा प्रवृत्तीच्या व्यक्ती वा मतावर तुटून पडतो. ही भावना इतकी प्रखर व अनावर असते, की भिन्न मत म्हणजे अवघ्या विश्वाच्या एकूण अस्तित्वालाच धोका असल्याच्या आवेशात त्याचा प्रतिकार सुरू होतो. त्यासाठी मग तशा सूचना त्या समुहाला पुरवण्याचेही काम कुणाला करावे लागत असते. अशा सूचना वास्तविक असायचे कारण नसते. केजरीवाल यांनी मुख्यमंत्री म्हणून राज्यघटनेचे पालन करायचे शपथेवर मान्य केलेले आहे. मग जनलोकपाल विधेयक त्याच घटनात्मक चौकटीतून विधानसभेत आणायला त्यांनी नकार देऊन चालेल काय? ज्या घटनेच्या आधारावर तुम्ही सत्ता हाती घेतली; तिलाच झुगारण्यात घटनेचे उल्लंघन होत नाही काय? पण हे कुणा ‘आप’नेता वा कार्यकर्त्याला पटते काय बघा. शक्यच नाही. तो कितीही शिकलेला सुशिक्षीत सुबुद्ध असो. त्याची बुद्धी ते पटवूनच घेणार नाही. कारण मागल्या दोनतीन वर्षात केजरीवाल बोलतील तेच सत्य आणि योग्य; अशी त्या प्रत्येकाची सामुहिक मानसिकता घडवण्यात आलेली आहे. असे एकाच वेळी एकाच विषयावर कुठल्याही मतभिन्नतेशिवाय एकमत होण्यालाच समविचारी वा झुंडीचे सामुहिक मन म्हणता येईल. त्याला वेगळा चिकित्सक विचार सुचत नाही आणि पुढे आला तरी सहन होत नाही. त्याला आवडणारा विचार ऐकायचा असतो आणि तोच निखळ सत्य असल्याचे आधीच ठरून गेलेले असते. सोवियत युनियन कोसळून पडेपर्यंत ते आतून किती पोखरले गेले आहे, त्याच्या बातम्या झळकत होत्या. पण इथल्या बुद्धीमान भारतीय कम्युनिस्ट नेत्यांना, विचारवंतांना तो अमेरिकेन हस्तकांचा प्रचार वाटत होता. मात्र तो मनभावीपणा अजिबात नव्हता. अगदी मनापासून त्या प्रत्येक विद्वानाचा त्यावर प्रामाणिक विश्वास होता. त्यात कुठलेही ढोंग नव्हते. त्यालाच सूचनाप्रवणता म्हणतात. जिथे जिथे चिकित्सक बुद्धी सुप्त व निकामी होऊन जाते.

   झुंड ही अशी असते ती जमावासारखी एकत्र असायची गरज नसते. पण कुठेही पसरलेली विखुरलेली असली, तरी ती एकाच वेळी विविध स्थानी एकाच प्रेरणेने, सुचनेने कार्यप्रवण होऊ शकते. कारण झुंडीत शिरले, मग आपली बुद्धी गुंडाळून ठेवावी लागते. अशी माणसे झुंडीला प्रिय नसलेले विषय असतात तेव्हा एकदम वेगळे वागताना बोलताना दिसतील. पण जिथे त्यांचे समुहमन कार्यप्रवण होते किंवा तशी सूचना येते; तिथून त्यांच्या वर्तनामध्ये आमुलाग्र बदल झालेला दिसेल. त्यात एकसुरीपणा व एकजिनसीपणाही आढळून येईल. आज त्याचे प्रभावी उदाहरण म्हणून आम आदमी पक्षाकडे बघता येईल. तितका झुंडीचा प्रभावशाली अविष्कार सध्या अन्य समाजघटकात आढळून येत नाही. (अपुर्ण)


1 टिप्पणी:

  1. भाऊ,

    अगदी अचूकपणे दुखऱ्या नसेवर बोट ठेवलंत. तथाकथित बुद्धीजीवी वर्ग प्रचारास सहजगत्या बळी पडतांना दिसतो. या वर्गाला टीव्हीवर दाखवतील ते वा पेपरमध्ये छापून येईल ते सारं खरं वाटतं. यावरून अमेरिकेतली गोष्ट आठवली. २९ एप्रिल १९७५ पर्यंत अमेरिकी जनतेची समजूत होती की व्हियेतनाम मध्ये अमेरिका जिंकत आहे. २३ एप्रिलला राष्ट्राध्यक्ष जेराल्ड फोर्ड यांनी युद्ध संपल्याचं जाहीर केलं होतं. वर्तमानपत्रे आणि दूरचित्रवाणीचा एव्हढा प्रभाव असे की प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी असल्याची लोकांना जराही शंका आली नाही. आणि ३० एप्रिलला सगळ्या अमेरिकी वृत्तपत्रांत एक छायाचित्र झळकलं. सायगावच्या अमेरिकी वकिलातीच्या छपरावरून शेवटचा अमेरिकी सैनिक हेलिकॉप्टरला लटकत पळून निघाल्याचं! जागतिक महासत्तेकडून माघार अशी घेतली जाते...?

    वस्तुस्थिती आणि प्रचार यांतला फरक जाणून घेण्याची क्षमता हरवून बसलेला समाज गुलामगिरीच्या खाईत चुटकीसरशी ढकलला जातो. तेव्हा बुद्धीजीव्यांपासून सावध!

    असो.

    स्वामी, असीमानंद, साध्वी प्रज्ञा सिंह, प्रसाद पुरोहित, इत्यादिंची डांबवणूक हे हुकूमशाहीचं लक्षण आहे. एकही मानवाधिकाऱ्यास यांच्या यातना दिसत नाहीत? आरोपावाचून तुरुंगात टाकणे हा उघड कायदेभंग आहे. न्यायालय झोपा काढीत बसलं आहे का असाही प्रश्न आहे.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    उत्तर द्याहटवा