शनिवार, २२ फेब्रुवारी, २०१४

सैया झुठो का बडा सरताज निकला



   दिल्लीत सध्या काय चालू आहे? एका बाजूला संसदेत तेलंगणा राज्यनिर्मितीचा घोळ आहे. लोकसभा राज्यसभेत धुमाकुळ आहे आणि दिल्ली विधानसभा स्थगीत करून तिथे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेली आहे. दुसरीकडे लोकसभेच्या आगामी निवडणुकीचे वेध सर्वांनाच लागले आहेत. त्यात मुरलेल्या जुन्या पक्ष व नेत्यांसह नवख्या आम आदमी पक्षानेही मुसंडी मारलेली आहे. त्यासाठी अवघा दिड वर्ष वय असलेल्या या पक्षाच्या तरूण नवख्या मुख्यमंत्र्याने राजिनामा देऊन ज्या प्रकारचे राजकारण केले; त्यामुळे नुसतेच जुने राजकारणी नव्हेतर भले भले राजकीय विश्लेषकही चक्रावून गेलेले आहेत. आजवरच्या राजकीय अभ्यासाला या नव्या राजकीय घडामोडीचे आकलन करताना नाकी दम येतो आहे. केजरीवाल व त्यांचा नवा पक्ष राजकारणात नवे पायंडे पाडतो आहे, की असलेल्या व्यवस्थेला उध्वस्त करतो आहे, याचेच रहस्य उलगडताना अनेकांची दमछाक झाली आहे. कारण त्यात केजरीवाल एकीकडे मोठा इमानदार राजकारणी वाटतो, तर दुसरीकडे त्याच्या वागण्याविषयी अनेक शंका संशय मनात येत रहातात. या पक्षाला काय हवे आहे वा करायचे तरी काय, असा प्रश्न पडतो. त्यांनी असे का वागावे, त्याचेही आकलन होत नाही. होणार्‍या चर्चा इतक्या उथळ व संदर्भहीन असतात, की त्यामधून गोष्टी स्पष्ट होण्यापेक्षा अधिकच गुंतागुंत होत जाते. पण समजून घ्यायला वा उलगडायला हे खरेच इतके जटील कोडे आहे काय?

   मंगळवारी दैनिक ‘पुढारी’मधून याच विषयावर दिर्घलेखातून विश्लेषण करायची सूचना मिळाली, तेव्हा मी प्रवासात होतो. सातार्‍याहून पुण्याला निघालो होतो. फ़ोन संपला आणि बस पकडून निघालो, तेव्हा वार्‍यावर डोळा केव्हा लागला कळलेच नाही. पाऊण तासाने खंबाटकी घाटाला बगल देण्यार्‍या बोगद्यातून बस उतरत असताना बसमधल्या काही शाळकरी पोरांनी गलका केला आणि जाग आली. पुढे शिरवळ येईपर्यंत सैरभैर विचारांना गवसणी घालताना अचानक एक जुने चित्रपट गीत आठवले. चोपन्न वर्षापुर्वी यश चोप्राने दिग्दर्शित केलेल्या पहिल्या चित्रपटातले खुप गाजलेले ते युगलगीत आहे. महेंद्र कपूर व लतादिदींनी गायलेले आणि राजेंद्रकुमार व माला सिन्हा यांच्यावर चित्रीत झालेले. जसजसे ते गीत गुणगुणत गेलो, तसतसे दिल्लीतल्या आजच्या जटील राजकारणाचे अनेक धागे उलगडत गेले आणि नीरा नदीच्या पुलावर येईपर्यंत मनातल्या मनात गीतकार साहिर लुधयान्वीला साक्षात दंडवत घातला. आजच्या राजकीय अभ्यासकांना, जाणकारांना जे कोडे सतावते आहे, त्याचे भाकित या कवीने तब्बल चोपन्न वर्षापुर्वी आपल्या लोकप्रिय गीतामध्ये करून ठेवलेले असावे? अगदी मोजक्या व नेमक्या शब्दातले ते गीत मी शाळकरी वयात ऐकलेले. हजारदा तुम्ही सुद्धा ऐकलेले असेल. अर्थात तेव्हा चित्रपट बघता आलेला नव्हता. दहा वर्षानंतर कॉलेजच्या काळात बघितला. ती सगळी कथा आठवली. आपण मनपुर्वक वा अनवधानाने कितीतरी गाणी ऐकतो. पण खरेच त्यातल्या गर्भित अर्थाकडे वळून तरी बघतो काय? त्या चित्रपटातला नायक नायिका एक प्रेमगीत गातात

तेरे प्यार का आसरा चाहता हूँ
वफ़ा कर रहा हूँ वफ़ा चाहता हूँ......
हसीनो से अहद ए वफ़ा चाहते हो
बड़े नासमझ हो ये क्या चाहते हो....

   यातला प्रेमवीर बाजूला ठेवा. प्रेमाने भारावलेली प्रेयसी बाजूला ठेवा. त्यांच्यात सामावलेला केजरीवाल किंवा भारावलेली दिल्लीची जनता आपण बघितली काय? त्यांच्यातच नवनवे राजकीय पक्ष वा नेते आणि त्या त्या कालखंडात भारावलेली मतदार जनता आपण बघू शकलो आहोत काय? हातात झाडू घेऊन देशाला भ्रष्टाचारमुक्त करायला निघालेल्या केजरीवाल व त्याच्या सख्यासोबत्यांनी दिल्लीकरांना मागल्या सहा महिन्यात जी मधूरवाणीने भुरळ घातली; त्याचे शब्द, त्यातला आशय महेंद्रकपूरच्या स्वरापेक्षा कितीसा वेगळा होता? त्याला साशंक मनाने दाद म्हणजे मते देणार्‍या दिल्लीच्या मतदाराचा सावध प्रतिसाद लताच्या स्वरापेक्षा भिन्न होता काय? फ़क्त तुम्ही साथ द्या आणि बघा, अवघे जग आपण उलथेपालथे करून टाकू; असाच त्यातला आशय नाही काय? त्यातला आर्जवी स्वर आणि तितकेच आश्वासक शब्द. तो प्रेयसीला म्हणतो तुझे मंदीर उभारून तुझी पूजा बांधीन. पण त्याच्या प्रेमाला सावध प्रतिसाद देणारी ती प्रेयसी पदोपदी त्याला इशारा देते आणि धोके दाखवते आहे. पण बंडाचा झेंडा खांद्यावर घेतलेला प्रियकर कुठे शुद्धीवर येतो? त्याची मर्दुमकी चालूच असते तो म्हणतो

दुपट्टे के कोने को मुँह में दबा के
ज़रा देख लो इस तरफ़ मुस्कुरा के
मुझे लूट लो मेरे नज़दीक आ के
कि मैं मौत से खेलना चाहता हूँ,
वफ़ा कर रहा हूँ वफ़ा चाहता हूँ

रिवाज़ों की परवाह ना रस्मों का डर है
तेरी आँख के फ़ैसले पे नज़र है
बला से अगर रास्ता पुर्खतर है
मैं इस हाथ को थामना चाहता हूँ, 
वफ़ा कर रहा हूँ वफ़ा चाहता हू

   केजरीवाल व त्यांच्या पक्षाने दिल्लीकरांना भेडसावणार्‍या प्रत्येक समस्येवर सोपा उपाय काढला होता. प्रत्येक नियम ही जगण्यातली अडचण आहे, म्हणूनच प्रत्येक कायदा झुगारून लावा, प्रत्येक कायदाच भ्रष्टाचाराची जननी आहे, तो पायदळी तुडवा. यापेक्षा त्यांची भूमिका तसूभर वेगळी होती काय? केजरीवाल व त्यांच्या पक्षाची भूमिका त्या गाण्यात अशी येते. ‘जनलोकपालके लिये सौ कुर्सिया कुरबान, भ्रष्टाचारसे कोई सौदा नही’, हे ऐकायला खुप बरे वाटते. पण ज्या परिस्थितीत केजरीवाल यांनी दिल्लीकरांचे भवितव्य राज्यपालाच्या हाती सोपवून पळ काढला आहे, त्यातून आता लोकांनी आपले निवडून दिलेले आमदारही निरूपयोगी झालेले आहेत. त्यांना कुठला अधिकार राहिलेला नाही. त्या बदल्यात दिल्लीकरांच्या नशीबी काय आले?

   वीजेचे दर अर्धे करणार, सातशे लिटर मोफ़त पाणी, साडेतीन लाख हंगामी कर्मचार्‍यांना कायम नोकरीत घेणार, ज्यांनी आंदोलनात सहभागी होऊन दिड वर्ष वीजेची बिलेच भरली नाहीत, त्यांना अर्धी बाकी माफ़; इत्यादी सगळी आश्वासने बारगळली आहेत. ही सगळी आश्वासने पुर्ण करण्याचा मार्ग भलताच कठीण म्हणजे ‘पुर्खतर’ आहे असे सगळेच ओरडून सांगत होते. पण आपल्या नायकाला पर्वा कुठे होती? ‘बला से अगर रास्ता पुर्खतर है’. ज्यांनी केजरीवाल यांच्यावर विसंबून ह्या सर्व गोष्टी केल्या; त्यांच्यावर आज काय परिस्थिती आलेली आहे? ते सर्व कर्मचारी आजही हंगामी कंत्राटी आहेत, ज्यांनी दीड वर्षापासून वीजबिले थकवली, त्यांच्या बोकांडी पंधरावीस हजाराची बिले बसली आहेत. पाण्याची टंचाई कायम आहे. आणि हे सगळे धोके दिल्लीकरांनी प्रेमात पडलेल्या प्रेयसीसारखे ओढवून आणलेले नाहीत काय? कळत असूनही ते धोके पत्करलेले नाहीत काय? मौतसे खेलनेवाला फ़रारी झाला आहे आणि बिचारी जनता गोत्यात सापडली आहे. प्रत्येक युगात आणि प्रत्येक समाजात असे क्रांतीकारक येतच असतात आणि त्यानी घातलेली भुरळ त्या त्या कालखंडात जनतेला भुलवतच असते. आपल्या मनातल्या शंका संशय गुंडाळून जनता त्या स्वप्नाला भुलतच असते. केजरीवाल नावाच्या जादूगार प्रियकराचे समिकरण कुठे फ़सले? काय चुकले त्याचे? साहिरने त्याचेही उत्तर त्याच गाण्यात प्रेयसीच्या मुखातून दिलेले आहे.

ज़रा सोच लो दिल लगाने से पहले
कि खोना भी पड़ता है पाने के पहले
इजाज़त तो ले लो ज़माने से पहले
कि तुम हुस्न को पूजना चाहते हो, 
बड़े नासमझ हो ये क्या चाहते हो

मोहब्बत की दुश्मन है सारी खुदाई
मोहब्बत की तक़दीर में है जुदाई
जो सुनते नहीं हैं दिलों की दुहाई
उन्हीं से मुझे माँगना चाहते हो,
बड़े नासमझ हो ये क्या चाहते हो

गलत सारे दावें गलत सारी कसमें
निभेंगी यहाँ कैसे उल्फ़त कि रस्में
यहाँ ज़िन्दगी है रिवाज़ों के बस में
रिवाज़ों को तुम तोड़ना चाहते हो,
बड़े नासमझ हो ये क्या चाहते हो 

काळजीपुर्वक वरच्या एक एका ओळीचा अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न आपण कधीच केलेला नाही. करीतही नाही. कुठल्याही समाजात झटपट क्रांती होत नसते. बदल होतच असतात आणि जुन्या गोष्टी टाकून नव्या स्विकारल्या जात असतात. पण कुठलेही बदल रातोरात होत नाहीत. काही नव्या गोष्टी काळानुरूप येतात आणि जुन्यांना बाजूला सारून प्रस्थापित होतात. पण जादूची कांडी फ़िरवावी, तसे मोठे बदल होत नाहीत. जो कोणी असे करायचे म्हणतो, तो एकतर लफ़ंगा असतो किंवा मुर्ख तरी असतो. आणि साहिरच्या गीतातली प्रेयसी त्याचीच ग्वाही देते. ‘कि खोना भी पड़ता है पाने के पहले, इजाज़त तो ले लो ज़माने से पहले’.

   जितका हे गीत मी गुणगुणत गेलो, तितका मला दिल्लीतल्या नव्या राजकीय वादळाचा अर्थ सहज उलगडत गेला. वयात येणार्‍या प्रत्येक मुलीच्या आयुष्यात असाच एक वादळी कालखंड येत असतो. जिथे तिचेच आयुष्य नव्हेतर अवघ्या जगाचा चेहरामोहरा बदलून टाकू शकेल, असे भासवणारा कोणीतरी प्रियकर तरूण भेटत असतो, भुरळ घालत असतो. त्यापेक्षा मानवी समाजाची अवस्था वेगळी नाही. ग्रासलेल्या किंवा गोंधळलेल्या समाजाला त्यापासून मुक्ती देणारा कोणीतरी प्रेषित उद्धारकर्ता हवाच असतो आणि आसपासच्या जाचक वाटणार्‍या जगाला उध्वस्त करून टाकायची त्याची भाषा त्या समाजाला भुरळ घालत असते. त्याच्या कल्पना, स्वप्ने वा शब्दाविषयी हळव्या मनातल्या शंकाही सावधानतेचे इशारे देत असतात. पण हुरळलेले मन सावधानतेला झुगारून धोक्यांकडे झेपावापयला उतावळी होतच असते. दिल्लीकर मतदारांची मानसिकता त्यापेक्षा वेगळी नव्हती. अजूनही त्या भुलभुलैयातून दिल्लीकर पुर्णत; बाहेर पडू शकला, असे आपण म्हणू शकत नाही. आणि दिल्लीकर कशाला देशाच्या अन्य शहरातले कित्येक सुशिक्षीत, सुखवस्तू लोकही केजरीवाल यांच्या पक्षाची भुरळ घालणारी भाषा ऐकून आज भारावलेले आपण बघू शकतो. त्यात नवे काहीच नाही. व्यक्तीगत जीवनात किंवा सार्वजनिक जीवनात असे सातत्याने घडल्याचे इतिहासात दाखलेच आहेत. पण त्यामुळे कायदे-नियम वा संकेत, परंपरांच्या जंजाळातून मानव समाज कधीच मुक्त होऊ शकलेला नाही. कारण समाज म्हणून जगताना जी सुरक्षीतता व स्थैर्य अत्यावश्यक असते, त्यासाठी नियम कायद्याचे जोखड मानेवर घ्यावेच लागते.

   स्वस्तात वीज, मोफ़त पाणी वा कायमची नोकरी हवी, ही अपेक्षा चुकीची म्हणता येणार नाही. पण त्या सुविधांच्या उभारणीचा खर्च करण्याच्याही तरतुदी करायला हव्यात. त्या करणार्‍याला परवडणेही आवश्यक असते. त्यात लूटमार असू नये, हे मान्य केले तरी त्याचा व्यवहार जमवावा लागतो. दुसर्‍यांवर चोर डाकू असे आरोप केल्याने त्यावरची उत्तरे सापडत नसतात. म्हणूनच जीवन नियमात व कायद्यात बसवावे लागते. जमाखर्चाचे गणित जु्ळवावे लागते. ज्याला ती प्रेयसी रिवाज म्हणते. ‘यहाँ ज़िन्दगी है रिवाज़ों के बस में’ याचा अर्थ इतका सोपा आहे. मग तो रिवाज वीजदरातला असेल, पाणीपुरवठ्यातला असेल, धरणी वा सत्याग्रहाशी संबंधीत असेल, प्रशासकीय सत्ता विकेंद्रीकरणाचा असेल. विकेंद्रीत सत्ताधिकाराचा असेल. त्याचा स्विकार करून त्याच्या मर्यादेत राहूनच व्यवहार चालवावे लागतात. त्यात उतरून त्यांची कालबाह्यता सिद्ध करून त्यात बदल करावे लागतात. आपण कशाची पर्वा करीत नाही, असे बोलणे धाडसाचे असले तरी परिणामशून्य असेल तर घातकच असते. उतावळ्या प्रियकरासारखे असते. दिल्लीच्या राजकारणाचा म्हणूनच एक मनोरंजक थरारक सिनेमा होऊन गेला. दुर्दैवाची गोष्ट इतकीच, की इथे कथानकातली पात्रे यश चोप्राच्या चित्रपटासारखी काल्पनिक नाहीत. खरीखुरी दिल्लीची आम जनताच त्याचे दुष्परीणाम भोगते आहे.

   देशाला १९४७ सालू स्वातंत्र्य मिळाल्यावर ह्या लोकशाही देशाचे व समाजाचे भवितव्य कोणत्या दिशेने जायचे; याची दिशा ठरवण्यात देशातल्या जाणकारांनी तब्बल तीनचार वर्षे खर्ची घातली. घटना समिती बनवून एकीकडे देशाचा हंगामी कारभार चालवणार्‍या नेत्यांनी दुसरीकडे दुरगामी दिशा देणारी राज्यघटना बनवली. त्यानुसार पहिल्या निवडणूका व्हायला व पहिले निर्वाचित सरकार सत्तेवर यायला, तब्बल पाच वर्षाचा कालावधी उलटला. त्यातून आकाराला आलेले कायदे व व्यवस्था म्हणजेच आजच्या भारतीय समाजाचे ‘रिवाज’ झालेले आहेत. त्यात जुने व कालबाह्य होतात, त्यांना काळानुसार निकालात काढून त्यांच्या जागी नवे कायदे व नियम आणायची व्यवस्थाही त्याच राज्यघटनेत केलेली आहे. शेकडो राष्ट्रीय नेते या साडेसहा दशकांच्या काळात उदयास आले व कालौघात गडपही झाले. पण आजही देशाची राज्यघटना कायम आहे आणि तिने निर्माण केलेली व्यवस्था या देशाच्या अब्जावधी जनतेला आश्वासक सुरक्षीत जीवनाची हमी देते आहे. त्याच व्यवस्थेला झुगारणारे केजरीवाल पहिलेच नाहीत. त्यात खोट काढणारा आम आदमी पक्ष पहिलाच नाही. यश चोप्राच्या तरूणपणी त्यांनी काढलेल्या त्या क्रांतीकारी चित्रपटाची कथाही अर्धशतकात खुप बदलत गेली. तीस वर्षानंतर ‘दिलवाले’मध्येही त्यांनी रिवाजांशी झुंजणारा, पण रिवाज बदलण्यासाठी मागल्या पिढीला भाग पाडणारा नवा नायक रंगवला. प्रत्येक पिढी आपल्या परीने व्यवस्थेतले जाचक बदल झुगारून उभी ठाकते आणि तेव्हा सोयीचे ठरतील असे बदल त्यात घडवून आणते, प्रस्थापित व्यवस्थेमध्ये ही नवी पिढी काही परिणामकारक बदल घडवून आणते. पण आमुलाग्र बदल कधीच घडत नाहीत. त्या डागडूजीलाच परिवर्तन म्हटले जाते. व्यवस्था आपल्या जागी कायम असते. कारण व्यवस्था ही मानवी समाजाची आत्यंतिक गरज असते. या उलथापालथीमध्ये अनेकांच्या व्यक्तीगत जीवनामध्ये वादळे येतात. त्यांना मग समाज उदात्त होऊन हौतात्म्य बहाल करीत असतो.

   तीनचार पिढ्यांच्या फ़रकाने बघितले, तर त्या समाजात आमुलाग्र बदल झालेले दिसतात. त्याचे कारण हे असे बदल प्रत्येक पिढीच्या धक्काबुक्कीतून घडत असतात. पण एकाच पिढीत मोठा बदल झाला, असे सहसा होत नाही. कारण कुठलाही समाज एकाच पिढीतल्या आमुलाग्र बदलासाठी मोजावी लागणारी मोठी किंमत द्यायला सहसा राजी होत नाही. दिल्लीतले राजकीय वादळ तसेच एका चित्रपट कथेसारखे मनोरंजक असले, तरी त्याचे काहीसे परिणाम विद्यमान राजकीय व्यवस्थेवर होणारच. पण केजरीवाल किंवा त्यांचे सवंगडी म्हणतात, तितके आमुलाग्र बदल निदान त्यांच्याकडून घडण्याची शक्यता नाही. कारण त्यासाठी मोजावी लागणारी प्रचंड किंमत द्यायची त्यांची तयारी कुठेच दिसली नाही. त्यांनीही आपल्या कामातून वा व्यवहारातून पळवाटाच शोधून चलाखी करण्यात धन्यता मानलेली दिसली. अनुदानातून आपल्या मतदारांना सवलती देणे वा नुसत्याच आरोपातून अन्य पक्षांना गुन्हेगार ठरवण्याची त्या पक्षाची कार्यशैली; कुठल्याही अन्य प्रस्तापित राजकीय पक्षाइतकीच बनेल व लबाड होती व आहे. एखाद्या रेल्वेच्या प्रवासात कडाक्याचे भांडण हमरातुमरी करून गर्दीत आपल्याला जागा मिळवली जाते त्यातलाच प्रकार. त्यापलिकडे आम आदमी पक्ष वा केजरीवाल यांनी अधिक योगदान भारतीय राजकारणाला दिले असे अजिबात म्हणता येणार नाही. त्यांनी प्रस्थापित राजकारणात स्वत:चे स्थान निर्माण केले. एखाद्या प्रेमवीराने प्रेमविवाह करून आपण जगातला मोठाच अभूतपुर्व पराक्रम केल्याच्या थाटात मिरवावे आणि नेहमीच्या जगात स्वत:ला समावून घ्यावे; त्यापेक्षा अधिक काही झाले आहे काय?

   मुख्यमंत्रीपद गेल्यावर निवासस्थान न सोडणार्‍या राबडीदेवी आणि केजरीवाल यांच्यात किती फ़रक आहे? प्रत्यारोप झाल्यावर तोंड लपवून बसणार्‍या मुलायमपेक्षा केजरीवाल वेगळे आहेत काय? जनता दरबार सोडून पळणार्‍या केजरीवालांपेक्षा निदर्शनांसमोर न आलेले मनमोहन सिंग वेगळे कसे? दारात धरणे धरलेल्या शिक्षकांकडे ढूंकून न बघणारे केजरीवाल आणि निदर्शकांवर लाठीमार करणारे अखिलेश यादव भिन्न कसे? बाकीचे आपल्या इमानदारीची अहोरात्र जपमाळ ओढत नाहीत. तेवढा फ़रक सोडला तर आम आदमी पक्ष आणि बाकीचे सगळेच राजकारणी एकाच माळेचे मणी आहेत. साहिरच्या शब्दात केजरीवाल आणि मंडळींना आपण ‘बडे नासमझ हो’, इतकेच म्हणू शकतो. की शांताराम बापूंच्या चित्रपट गीताच्या शब्दात म्हणायचे

सैया झुठो का बडा सरताज निकला

३ टिप्पण्या: