जनता चळवळीच्या इतिहासातील सामन्यत: दुर्दैवी किंवा ट्रॅजिक मुर्ती कोण असेल, तर चळवळीच्या प्रतापामुळे जुनी व्यवस्था धुळीस मिळाल्याचे पहाण्याइतके प्रदीर्घ आयुष्य लाभलेला चळवळीचा बुद्धिजीवी होय.
जनता चळवळी आणि विशेषत: क्रांत्या याबद्दल एक फ़ार मोठा गैरसमज जगभर पसरलेला आहे. भ्रष्ट व जुलमी शासनसत्तेला उलथून पाडून सामान्य नागरिकासाठी आचार, विचार आणि विवेकस्वातंत्र्य प्राप्त करून घेण्य़ासाठी सामान्य जनतेने ह्या चळवळी उभारलेल्या असतात, हा तो गैरसमज होय. या चळवळीचा प्रवर्तक जो बुद्धिजीवी वर्ग त्यातील मंडळींनी प्रस्थापित व्यवस्थेबरोबरच्या त्यांच्या स्वत:च्या हाणामारीच्या प्रसंगी नेत्र्दिपक शब्दांचे व घोषणांचे जे धुके निर्माण केलेले असते, त्या धुक्याचा परिणाम म्हणजे हा गैरसमज. समाज कोणताही असो, समाजामध्ये प्रस्थापित व्यवस्थेवर नाखुश असणारे काही लोक तरी निश्चितच असतात. समाजातील बुद्धिमंत त्याच लोकांना चिथावण्या देतात आणि त्यांच्या मदतीने चळवळी उभारतात. चळवळीचे खरे प्रवर्तक ही बुद्धिमंत मंडळी असतात. परंतु प्रचाराचा गदारोळ आणि घोषणांची आतषबाजी यातून निर्माण होणार्या धुरळ्यामुळे ही चळवळ सामान्य जनतेने राज्यकर्त्यांविरुद्ध सुरू केली आहे, असा आभास तयार होतो. पुढे समजा चळवळ यशस्वी झाली, समाजातील बुद्धिमान वर्गानेच ती चळवळ प्रवर्तित केलेली असल्याने सप्त स्वातंत्र्याचा विस्तार हे आश्वासन जाहिरनाम्यात पहिल्या क्रमांकाने असणार यात शंका नाही. मात्र चळवळीच्या उद्योगाला यश आले आणि प्रस्थापित सत्ता उलथून पडली, की मग त्या आश्वासनाचे काय होते ते विचारू नका. हे आश्वासन तेव्हा कचर्याच्या टोपलीत पडलेले असते आणि सप्त स्वातंत्र्ये आधी असतात त्यापेक्षा अधिक आकुंचन पावलेली असतात, जनता चळवळीसारख्या अवाढव्य उद्योगाचे हे वैशिष्ट्यपुर्ण लक्षण आहे. या चळवळी मानवी स्वातंत्र्याची कक्षा रुंदावण्याचे वचन देतात. पण प्रत्यक्षात ती कक्षा नेहमीच कमी करतात. मात्र त्याचवेळी त्या असेही भासवतात, की चळवळीची सुत्रे काही मतलबी आणि रक्तपिपासू व्यक्तींच्या हाती गेली आहेत. लबाडीने त्यांनी ती बळकावली आहेत. त्यांना दूर केल्यानंतर जाहिरनाम्यात दिलेले प्रत्येक वचन प्रत्यक्षात येणार आहे. आज जरी आम जनतेची फ़सवणूक झाल्याचे दिसत असले, तरी उद्या सर्व ठाकठीक होईल. वस्तुत: चळवळ प्रवर्तित करणार्या चळवळीच्या मूठभर बुद्धिजीवी अग्रदूतावाचून कोणाचीही फ़सवणूक झालेली नसते किंवा अन्य कुणी स्वातंत्र्यालाही वंचित झालेले नसतात. फ़सवणूक बुद्धिजीवींची झालेली असते. स्वातंत्र्याला वंचित बुद्धिजीवी झालेले असतात. गदा त्यांच्या स्वातंत्र्यावर आलेली असते. कारण प्रस्थापित सत्तेच्या मूढपणाचे आणि अकर्तृत्वाचे सार्वजनिक बाभाडे याच बुद्धिजीवींनी काढलेले असतात. प्रस्थापित व्यवस्था सहज मोडीत काढता येईल, अशी हवा त्यांनीच पसरवलेली असते. आपल्या नालायकीमुळे प्रस्थापित सत्ताधार्यांना सत्तेवर रहाण्याचा हक्कच उरलेला नाही, हा विचार त्यांनीच सर्वत्र पोहोचवलेला असतो. सत्ताधार्यांनी चालवलेल्या जुलूमाच्या आणि दडपशाहीच्या कहाण्यांना त्यांनीच शब्द व आवाज पुरवलेला असतो, आत्माविष्कार आणि आत्मप्रकटीकरणाच्या स्वातंत्र्याचे नारे त्यांनीच दिलेले असतात. हे सर्व करताना त्यांनी स्वत:च्या मनाशी गृहीत धरलेले असते, की ज्या गोष्टी त्यांना हव्याश्या वाटतात, त्याच सामान्य जनतेला हव्याश्या वाटतात. वस्तुत: सामान्य मनुष्याला आत्मज जबाबदारीचे लोढणे टाळायचे असते. आत्मज जबाबदारीमुळे मनावर येणार दडपण टाळण्याचे स्वातंत्र्य त्याला हवे असते. सामान्य मनुष्य़ आत्माविष्काराच्या आणि आत्मप्रकटीकरणाच्या स्वातंत्र्यामागे कधीच नसतो. स्वत:च्या जबाबदारीवर जीवन पेलणे हेच ज्याला कठीण वाटते, तो सामान्य मनुष्य आत्मज जबाबदारी स्वेच्छेने शीरावर घेऊ पाहिल हेच चुकीचे आहे. आत्मज जबाबदारीचे स्वातंत्र्य त्याच्याकडून कोणी काढून घेतल्यास ते त्याला हवे असते. आपल्या जबाबदारीवर आपल्या आवडेल तो आयुष्यक्रम निवडण्याचे स्वातंत्र्य हा सामान्य मनुष्यासाठी फ़ार मोठा भार असतो. हा भार कोणी आपल्या शीरावर घेईल, तर बरे अशी त्याची सुप्त भावना असते. कारण या जबाबदारी सोबत अपयशा़चीही जबाबदारी शीरावर घ्यावी लागते; हे सामान्य मनुष्याला चांगले ठाऊक असते. सामान्य मनुष्याला विवेकशीलतेचे स्वातंत्र्य नको असते. ज्याच्यावर आंधळा विश्वास ठेवता येईल आणि ज्याचे हुकूम पाळल्याने आपले भौतिक नुकसान होणार नाही, उलट फ़ायदाच होईल, असा हुकूम देऊन काम करून घेणारा कुणीतरी त्याला हवा असतो. हा सामान्य मनुष्य जुनी सत्ता आणि जुनी व्यवस्था उलथून टाकतो. परंतु मुक्त समाजाच्या आकर्षणातून ही गोष्ट तो करीत नाही. त्याला स्वतंत्र लोकांचा मुक्त समाज प्रस्थापित करायचा नसतो. त्याला समाज हवा असतो, तो ठोकळेबाज, एकछापी, निनावी लोकांचा. चिरेबंदी समाज, एक विचारांचा, एक भावनेचा. जुनी व्यवस्था दुष्ट आणि निर्दय होती; म्हणून सामान्य मनुष्याने त्या व्यवस्थेच्या विरुद्ध झेंडा खांद्यावर घेतलेला नव्हता. तर ती व्यवस्था पुरेशी कठोर व सामर्थ्यवान नव्हती, म्हणून त्याने तो झेंडा हाती घेतला होता. जिथे टोकाची दडपशाही असते, तिथे सामान्य मनुष्य मूग गिळून बसतो आणि सत्ताधारी दुर्बल होताच उठाव करतो, हे इतिहासात वरचेवर पहायला मिळते. जनता चळवळीत जे सामील होतात ते सत्ताधार्यांचा जुलूम खटकला म्हणून नव्हे; तर संपुर्ण समाजाला एकजीव करण्यात सत्ताधार्यांना अपयश आले म्हणून होय. मारझोड करून का होईना पण राज्यकर्ते जर का एकसंघ, एकछापी आणि एकढंगी समाज निर्माण करण्यात यशस्वी झाले असते, तर त्यांना याच कार्यकर्त्या सामान्य मनुष्यांनी डोक्यावर घेतले असते.
जनता चळवळीच्या बुद्धिजीवी पुढार्यांना वाटते, की सामान्य जनतेला स्वातंत्र्य, समता आणि बंधूता यासारख्या उदात्त ध्येयांची भूक लागली होती आणि त्या जनतेच्या निदर्शनास आपण ही भूक आणून दिली. म्हणून ती जनता राज्यकर्त्याच्या विरुद्ध एकत्र झाली होती. प्रत्यक्षात तसे काहीही नसते. बुद्धिजीवींचा तो भ्रम असतो. एक मोहक भ्रम; पण भ्रमच. स्वातंत्र्य व समता यापैकी एकाशीही जनतेला कर्तव्य नसते. कारण या अत्यंत अमूर्त कल्पना आहेत आणि दैनंदिन जीवनाशी त्यांचा बेताचा संबंध आहे. मग प्रश्न असा, की चळवळीसाठी जनता एकत्र कशी होते? त्याचे उत्तर हे, की जनतेसमोर राज्यकर्त्याच्या विरुद्ध जी भाषणे झडत असतात आणि ज्या घोषणा दिल्या जात असतात, ती ऐकून व पाहून मनुष्यास असे वाटू लागते, की राज्यकर्त्याचे काही खरे नाही. ते पडण्याच्या बेतात आहेत. आणखी एकच धक्का, की जमीनदिस्त होतील. दुसर्या शब्दात प्रस्थापित व्यवस्था सडली आहे म्हणून नव्हे, तर ती दुर्बल बनली आहे, हे बुद्धिजीवी पुढार्यांचे मत पटल्याने सामान्य माणसे लढ्यात उतरलेली असतात. सहाजिकच लढा संपून जेव्हा नवी व्यवस्था प्रस्थापित होते, तेव्हा सामान्य मनुष्याची काहीही फ़सगत झालेली नसते. कारण बुद्धिजीवी वर्ग ज्या कारणासाठी राज्यकर्त्या वर्गाच्या विरुद्ध असतो त्याच्याशी सामान्य मनुष्याला कसलेही कर्तव्य नसते. सामान्य मनुष्याला चळवळीतून जे हवे असते तेच त्याला मिळते. जनतेला एकछापी, चिरेबंदी समाजव्यवस्था हवी असते आणि तिला तीच व्यवस्था मिळते. चळवळ यशस्वी होताच काही काळ तरी सामान्य लोकांना जे हवे तेच मिळालेले असते. या व्यवहारात खरी फ़सगत चळवळीच्या सिद्धांतकाराची आणि बौद्धिक अध्वर्युंची होते. त्यांना मानवी स्वातंत्र्यामध्ये भरघोस वाढ हवी असते. नव्या राजवटीत ही स्वातंत्र्ये वाढण्याऐवजी कमी होतात. तेव्हा खरी ट्रॅजिडी, खरे दुर्दैव चळवळीच्या सिद्धांतकाराचेच ठरते.
चळवळीचे, वैचारिक प्रचाराचे, नेत्रदिपक घोषणांचे वगैरे पहिले पर्व संपून चळवळ दुसर्या पर्वामध्ये प्रवेशली, की चळवळीच्या आघाडीवरून ज्यांनी चळवळीला प्रेरणा दिलेली असते; त्या बुद्धिजीवी मंडळींना मागे ढकलण्यात येते. आता राजकारणात मुरलेल्या व्यक्ती त्या चळवळीच ताबा घेतात. आणि अगदी पद्धतशीरपणे चळवळीत काम करणार्या विचारवंतांना चळवळीच्या बाहेर जाण्यास भाग पाडतात. किंबहूना हे विचारवंत स्वत: होऊनच चळवळीतून बाहेर पडू लागतात. विचारवंताचे हे दुर्दैवच म्हणता येईल. कारण चळवळीला प्रेरणा त्यांनीच पुरवलेली असते. चळवळीसाठी पोषक वातावरण सुद्धा त्यांनीच तयार केलेले असते. तरीही चळवळीतून त्यांना माघार घ्यावी लागते. विचारवंतांच्या या दुर्दैवाची एकदोन कारणे सांगता येतील. कारण विचारवंतांची चळवळीतून केली जाणारी ही हाकालपट्टी हा अपवाद नसून जनता चळवळीच्या बहुतेक सगळ्या बौद्धिक अध्वर्युंच्या नशिबात हेच दुर्भाग्य लिहिलेले दिसून येते. विचरवंतांच्या या विशिष्ट दुर्दैवाने एक कारण ते खुद्द स्वत:च असतात. हे बौद्धिक अध्वर्यु तोंडाने जरी संघटित कृतीचा जप करतात, तरी मनातून ते खुद्द स्वत; मात्र कमालीचे व्यक्तीवादी असतात. आणि व्यक्तीवादी असल्याने, सर्वांनी एकत्र येऊन जगन्नाथाचा रथ ओढून न्यायचा आहे, या भूमिकेशी ्ते कधीही सहमत होऊ शकत नाहीत. प्रत्येक व्यक्तीने स्वत:च्या मताप्रमाणे जीवन जगावे, तो तिचा हक्क आहे आणि तिच्या परीने ती सुखी समाधानी होऊ शकते, या सिद्धांता्वर त्यांचा पुर्ण विश्वास असतो. हा विश्वास कदाचित अंधविश्वासात मोडेल इतका कडवा असतो. ह्या सिद्धांतावर विश्वास असल्याने, वैयक्तीक मताचे आणि उपक्रमशीलतेचे स्वातंत्र्य त्यांना मुळातच मान्य असते. परंतु चळवळीने वेग घेतल्यावर चळवळी्ची सुत्रे अशा व्यक्तींच्या हाती येतात, की ज्याचा व्यक्तीवादाला पुर्ण विरोध असतो. त्याला व्यक्तीबद्दल संपुर्ण अनादर असतो. ते फ़क्त संघटित कर्तृत्वच ओळखतात. बरे गंमत अशी, की जनता चळवळीसारख्या संघटितपणे लढा देणार्या चळवळीची सुत्रे अशाच महाभागांच्या हाती जातात. कारण जनता चळवळीत सामील होणारी जनता आणि असे नेते यांच्या धारणा जवळपास समान असतात.
(विश्वास पाटिल यांच्या ‘झुंडीचे मानसशास्त्र’ या पुस्तकातून. मानवी इतिहास, संस्कृती, सामाजिक व राजकीय विषयातले गाढे अभ्यासक चिंतक अशी त्यांची ओळख होती. हे ‘पानिपत’कार नव्हेत.) पृष्ठे २१०-२१३
atyant sundar vishleshan
उत्तर द्याहटवा