गेला संपूर्ण आठवडा टीव्ही बघताना मला अशी शंका येऊ लागली, की मराठी भाषेचे एखादे नवे चॅनेल सुरू झाले आहे काय? आणि त्या नव्या चॅनेलसाठी बाकीच्या सर्व चॅनेलचे प्रक्षेपण थांबवण्यात आले होते काय? कारण जिथे म्हणून मी रेमोटने जात होतो, तिथे तिथे तेच चेहरे दिसत होते. तेच तेच विषय आणि शब्द ऐकू येत होते. जिथे म्हणुन मी बातम्या ऐकायला जात होतो, तिथे फ़क्त कुठला ना कुठला ठाकरे चेहराच मला बघावा लागत होता. कधीकधी तर एकच चेहरा सगळ्या चॅनेलवर एकाच वेळी दिसत होता. इतकेच नव्हे तर तो चेहरा तोच मुद्दा बोलत होता. कधी एका चॅनेलवर उद्धव ठाकरे तर दुसरीकडे राज ठाकरे दिसायचे. मग थोडा फ़रक पडायचा. दोन चॅनेलच्या शब्दात किंवा चेहर्यात. कधी एकावर राज तर दुसरीकडे बाळासाहेब असा प्रकार होता. सभा दिसायच्या तेव्हा हेच दोन ठाकरे सगळ्या मराठी चॅनेलवर दिसत होते. मग प्रचाराची मुदत संपून गेली तरी ठाकरेदर्शन काही संपत नव्हते. मग मला असे वाटले की ’ठाकरे २४ तास’ असे काही नवे चॅनेल मराठी भाषेत सुरू झाले असावे का? आणि सगळ्या बाकी मराठी वाहिन्या त्याचेच पुन:प्रक्षेपण करीत आहेत काय? ही काय भानगड आहे असेच कोणालाही वाटावे, अशीच ही सगळी स्थिती आठवडाभर मराठी टीव्ही प्रेक्षक अनुभवत होता.
अर्थात एका घरातील तीनचार लोकांना सारखे छोट्या पदद्यावर दाखवायचा हा पहिलाच प्रकार नाही. हिन्दी आणि इंग्रजी वाहिन्यांवर गेल्या पाच निवडणूकांत सोनिया, प्रियंका, राहुल गांधी याना अखंड दाखवयाची स्पर्धा राष्ट्रिय वाहिन्यांवर चालू असतेच. मग त्यात राहुल घरातून बाहेर पडले किंवा त्यानी कुठले कागद फ़ाडले, यांनी दाढी खाजवली, तरी आपल्या देशात ती मोठी बातमी असते. प्रियंका आपल्या छोट्या मुलांसोबत व्यासपीठावर आल्या तरी बातमी होते. सोनिया, प्रियंका बाजूबाजूला बसल्या आणि एकमेकांशी त्यांनी कानगोष्टी केल्या, तर ती राष्ट्रीय महत्वाची बातमी होते. कधी प्रियंकाचा पती रोबर्ट वडेरा तिच्या सोबत रायबरेलीमध्ये पोहोचला, तरी कौतुकाचे चार शब्द सांगताना वाहिन्यांचा एक तास खर्ची पडतो. त्यांच्या तुलनेत मराठी वाहिन्यांची ’ठाकरे २४ तास’ दाखवण्याची स्पर्धा चमत्कारिक म्हणायचे कारण नाही. फ़रक इतकाच की गांधी मंडळी कधी कुठल्या चॅनेलच्या स्टुडिओत जात नाहीत. फ़ार कशाला ते चॅनेलवाल्यांना जवळ सुद्धा फ़िरकू देत नाहीत. लांबून दिसेल तेच जवळून बघितल्याचा आव आणत, मग चॅनेलवाल्यांना दिवस साजरा करावा लागत असतो. ठाकरे मंडळींनी त्याबाबत मराठी चॅनेलवाल्यांना चांगली साथ दिली म्हणायची. कारण त्यांच्या आधी प्रदिर्घ मुलाखती झाल्या. मग त्यांच्या जाहिरसभांचे थेट प्रक्षेपण झाले. आणि शेवटी पुन्हा चॅनेलच्या कार्यालयांना भेटी देऊन तिथे गप्पाटप्पांचे कार्यक्रम थेट प्रक्षेपित करण्यात आले.
याबद्दलही तक्रार करण्याचे कारण नाही. निवडणूक काळात अशा प्रकारे मतदारासमोर पक्षाचे नेते, त्यांच्या भूमिका यायलाच हव्यात. जाहिरसभांमधून स्पष्ट न झालेले मुद्दे किंवा जनतेच्या मनात निर्माण झालेल्या शंकांची उत्तरे, अशा मुलाखतीतून मिळू शकतात. पण मग अशा मुलाखती सर्वच नेत्यांच्या व्हायला हव्यात. पण तसे इथे घडताना दिसले नाही. इथे बाकीच्या पक्ष व नेत्यांच्या मुलाखती नाममात्र घेण्याचा उपचार पार पाडण्यात आला. बाकी सगळा वेळ ’ठाकरे २४ तास’ असाच खेळ होता. तिच एक बातमी आहे. कारण ज्या वाहिन्या अखंड याच ठाकरे कुटुंबाच्या अरेरावी, असंस्कृतपणा, असभ्य भाषा यावर प्रवचन सांगत असतात, त्यांनीच ऐन निवडणूकीच्या तोंडावर हा ’ठाकरे २४ तास’ का करावा? एकाने नव्हे तर तिन्ही मराठी वहिन्यांची २४ तास ठाकरे दाखवण्याची ही स्पर्धा चकित करणारी होती.
त्याची सुरूवात झी २४ तासचे मंदार परब यांनी केली. दहा दिवसांपुर्वी त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रदिर्घ मुलाखत घेऊन त्याची सुरूवात केली. दोनचार भागात त्याचे प्रक्षेपण झाले, त्याला चांगाला प्रतिसाद मिळाल्यावर स्टारमाझा मातोश्रीच्या आश्रयाला धावला. राजीव खांडेकर आणि प्रताप आसबे तिथे गेले आणि त्यांनी बाळासाहेबांच्या जुन्या आठवणी चाळवण्याचा उद्योग केला. त्यालाही छान प्रतिसाद मिळाला. खरे तर मुहूर्त महापालिका निवडणूकीचा, त्यात बाळासाहेबांच्या जुन्या आठवणींचा संबंध काय? पण त्याला मि्ळालेला प्रतिसाद चॅनेलवाल्यांना चकित करून गेला. या गडबडीत ठाम मतवाल्या ’कायबीइन लोकमता’लाही फ़रफ़टण्याची परिस्थिती आली. मग आयुष्यभर ठाकरे कुटुंबावर शरसंधान करण्यातच धन्यता मानलेल्या, निखिल वागळेलाही मातोश्रीच्या पायरीवर जाऊन उभे रहाण्याची नामुष्की आली. अगदी ’मला काय शिवी घालाल’ असे सेनाप्रमुखांना विचारायची पाळी वागळ्यांवर यावी, ही शोकांतिका म्हणायला हवी. कारण याच ठाकरी भाषेवरून युतीशासनाच्या काळात सरकारची शिवशाही नव्हेतर शिव्याशाही अशी थट्टा हेच वागळे करत होते. आणि परवा तोच माणुस आपल्याला बाळासाहेबांनी शिव्या घालाव्या म्हणून गयावया करत होता.
हा सगळा काय प्रकार होता? व्यवहारी भाषेत त्यालाच टीआरपी म्हणतात. आणि टीआरपी म्हणजे अविष्कार स्वातंत्र्यावर भांडवलशाहीने लादलेली गुलामी असते. ज्या चॅनेलकडे अधिक प्रेक्षक, त्याला जास्त जाहिराती मिळतात त्यामुळेच अधिकाधिक प्रेक्षक मि्ळवणे ही लाचारी असते. साहेबांची प्रदिर्घ मुलाखत आधी घेऊन ती बाजी झी २४ तासने मारली आणि बाकीच्यांची मग पळापळ झाली. त्या गडबडीत ठाममत मागे पडले. माझा आणि झी यांनी मुसंडी मारली तरी वागळे आपल्याच सवाली दुनियेत रममाण झालेले होते. शेवटी त्यांना त्यांच्या बाजार(बुणग्यांनी) विभागाने बाहेर काढून शुद्धीवर आणले. मग त्यांना नेऊन मातोश्रीच्या पायरीवर टाकले. तेव्हा कुठे वागळे टीआरपीच्या दुनियेत आले. त्यांनीही सेनाप्रमुखांकडे शिव्या घालण्यासाठी हट्ट धरला. पण तोपर्यंत खुप उशीर झाला होता. या गडबडीत निवडणूक बाजू्ला पडली आणि ठाकरे बंधू व बाळासाहेबांच्या जुन्या आठवणी हाच विषय होऊन गेला. सगळ्यातच ठाकरे दाखवण्याची इतकी जिवघेणी स्पर्धा जुंपली, की सगळ्याच चॅनेलवर ठाकरेच ठाकरे दिसू लागले. महापालिका, तिची कामे, नागरिकांच्या समस्या, इतर पक्ष यांची कुणालाच आठवण सुद्धा राहिली नाही. राज व उद्धव यांच्यातली भांडणे, त्यांचे एकमेकांवरील आरोप आणि त्याच्याही पलिकडे भविष्यात ते दोघे एकत्र येतील काय, याची चिंता व्यक्त करण्याचा उत्सव सुरू झाला.
दिडदोन वर्षापुर्वी जुन्या पिढीतल्या काही शिवसैनिकांनी दोघा भावांना एकत्र आणायची एक मोहिम आरंभली होती. तिच्यातून काहीही निष्पन्न झाले नव्हते. आता निवडणूक विसरून सगळे चॅनेलवाले त्याच कामाला लागले की काय असे वाटायची पाळी आली. हा प्रकार मतदानाचा दिवस उजाडण्यापर्यंत चालू होता. बुधवार संध्याकाळी उद्धव, राज यांच्या सर्व वाहिन्यांच्या स्टूडिओमध्ये कर्मचार्यांशी गप्पांचे कार्यक्रम चालू होते. त्यामुळे कुठलाही चॅनेल लावला तरी ठाकरे दिसतच होते. दोघे भाऊ आलटून पालटून चॅनेलच्या कार्यालयात हजेरी लावत होते. जिथे थेट प्रक्षेपण नव्हते, तिथे आधी झालेले चित्रण पुन:प्रक्षेपित केले जात होते. मग एकाच वेळी सगळ्यांच स्टुडिओत एकच ठाकरे दिसत होता. याला तंत्रज्ञानाचा चमत्कार म्हणतात. रोज चर्चेमध्ये आमंत्रित राजकिय पाहुणे व नेत्यांवर तोंडसुख घेणारे, शेवटी धंद्यासाठी किती लाचार होऊन त्यांच्याच लोकप्रियतेवर विसंबून असतात त्याचा साक्षात्कार यातून घडला.
इथे एक संदर्भ देणे मला अगत्याचे वाटते. १९९२ साली आजच्या ’सामना’चे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत लोकप्रभा साप्ताहिकाचे उपसंपादक होते आणि ’सामना’त दाखल होण्याआधी त्यांनी बाळासाहेबांची एक खास मुलाखत लोकप्रभेसाठी घेतली होती. त्यात त्यानी एक सवाल केला होता. सेनेच्या कारभारात उद्धव आणि राज ढवळाढवळ करतात, असा तेव्हा नुसताच आरोप होऊ लागला होता. तोच प्रश्न होता. त्यावर बाळासाहेबांनी एक उत्तर दिले होते. म्हणजे लोकप्रभेत तसे छापून आलेले होते. तेच उत्तर नंतरच्या काळात साहेबांनी अशा प्रत्येक प्रश्नाला दिलेले होते. आज ते कुणालाच आठवू नये याचे आश्चर्य वाटते. राऊत यांच्यासाठी ते अडचणीचे असेल. पण बाकी थोर संपादक म्हणून मिरवणार्या आणि सेनेला सतत अडचणीत आणणारे प्रश्न विचारणार्यांना, तो प्रश्न व ते उत्तर का आठवू नये?
राज उद्धव यांच्यातील भांडण वा वादाबाबतीत ते प्रश्नोत्तर कळीचा मुद्दा आहे. कारण तेव्हा सेनेत गटबाजी चालू शकत नव्हती आणि साहेबांची हुकूमत निर्णायक होती. सेनेतून बाहेर पडलेल्या भुजबळांनी ती तक्रार जाहिरपणे केली होती. रा्ज-उद्धव संदर्भात साहेब म्हणाले होते, ’ही मुले पक्षात काही ढवळाढवळ करत नाहीत. मला विषय किंवा मुद्दे समजून घेण्यात कारकुनी मदत करतात. त्यांच्यात भांडणे सुद्धा नाहीत. ज्या दिवशी तशी वेळ येईल तेव्हा आम्ही राजकारण सोडू. पण घरात दुफ़ळी होऊ देणार नाही.’ आज त्याचीच जाहिर चर्चा चालू आहे. दोन भावातले भांडण विकोपास गेले असून ते अगतिकपणे बघायची वेळ साहेबांवर आली आहे. तेव्हा हे २० वर्षापुर्वीचे कारकुन कधी शिरजोर झाले आणि भाऊबंदकीपर्यंत वेळ का आली, असा सवाल साहेबांना विचारायला हवा आहे. की कारकुन धन्याला जुमानासे झाले आहेत?
पण ’ठाकरे २४ तास’ रंगवण्यातच दंग असलेल्यांना काही आठवत नाही, माहित नाही आणि हे सगळे मी जवळून बघितले आहे असे सांगण्यातच धन्यता मानायची आहे म्हटल्यावर दुसरे काय व्हायचे? (क्रमश:)
(भाग-१८०) १७/२/१२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा