सगळेच साले चोर आहेत, असे नेहमी ऐकायला मिळते. निवडणूकासुद्धा भ्रष्टाचाराने जिंकल्या जात असतील, तर त्याला आळा घालणारे उपाय कोणी योजायचे? ज्यांचे हितसंबंध त्यात गुंतले आहेत ते त्यासाठी काहीही करणार नाहीत, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. मग हे शिवधनुष्य पेलणार कोण? ज्यांना गरज आहे त्यांनीच काहीतरी करायला हवे आहे. आणि असे लोक सामान्य माणसेच आहेत. त्यांनी काय करावे? कसे करावे? काही दिवसांपूर्वी इलियट नेस नामक अमेरिकन पोलिस अधिकार्याची सत्यकथा मी वाचकांसमोर मांडली होती. शिकागो शहराला गुन्हेगारी माफ़ियांच्या विळख्यातून सोडवण्यासाठी नेसने जो सिद्धांत मांडला होता, तोच इथेही उपयोगी ठरू शकतो. काय होता त्याचा सिद्धांत? Crime never pays हाच तो सिद्धांत आहे. गुन्हेगारी लाभदायक नाही असे लोकांना अनुभवातून दिसू लागले मग कोणीही त्याकडे वळणार नसतो. वळत नसतो.
आजचे चित्र उलट आहे, म्हणूनच अधिकाधिक लोक तिकडे वळत असतात किंवा त्याला शरण जात असतात. त्याला रोखण्यासाठीच पोलिस, कायदा, शिक्षा वगैरे सोयी केलेल्या आहेत. पण त्यांचा धाक उरलेला नाही. कारण त्यांचा हेतू सफ़ल होताना लोकांना दिसत नाही. शंभर गुन्हेगार पकडले तर त्यातल्या पाच लोकांनाही शिक्षा होताना आपण बघत नाही. विलंबीत न्यायप्रक्रीया, भ्रष्ट यंत्रणा यांनी कायद्याला निरुपयोगी व नंपुसक बनवून ठेवले आहे. लाज नावचा पदार्थ दुर्मिळ झाला आहे. त्यामुळेच जनाची नाही तरी मनाची लाज बाळगा, असे बेशरम लोकच प्रतिष्ठीत होऊन सांगत असतात. अशा प्रतिकुल परिस्थितीत सामान्य माणसाने तरी काय करायचे असा सवाल आहे. अण्णांसारख्या सात्वीक माणसाला नामोहरम होताना पाहिल्यावर सामान्य माणसाचे नितीधैर्य खच्ची होणे स्वाभाविक आहे. पण म्हणून सगळे काही संपले, असे मानण्याचे कारण नाही. शेवटी कुठल्याही शस्त्र वा कायद्यापेक्षा सामान्य माणसाची संख्यात्मक ताकद सर्वात प्रभावी व भेदक असते. जेव्हा ती ताकद मैदानात उतरते, तेव्हा सशस्त्र सैनिक सुद्धा शरणागत होतात. मोठमोठे सम्राट नेस्तनाबूत होतात. मस्तवाल सत्ताधार्यांचाही धीर सुटतो. जागरुक सामान्य जनता आणि तिचे नेतृत्व करणारी चळवळ्या कार्यकर्त्यांची संघटना, सर्वात प्रभावशाली ताकद असते. आज आपल्या देशात त्याचाच अभाव आहे. अण्णांचे आंदोलन तिथेच प्रभावहीन ठरले. लोकांचा पाठींबा आहे, पण त्याचे नेतृत्व करणारी कार्यकर्त्यांची फ़ौज नव्हती, तिथे सत्ताधारी शिरजोर ठरले. सत्तेची वा गुंडाची ताकद तुमच्या आमच्या विस्कळीतपणात व भयगंडात सामावलेली असते.
सामान्य माणूस एकेकटा असतो. पण ज्यांच्या संघटना असतात ते सामर्थ्यशाली असतात. इजिप्तच्या तहरीर चौकात जमलेल्या लाखो लोकांवर रणगाडे घालायची हिंमत तिथल्या लष्करालासुद्धा झाली नाही. कारण सैनिकांचे हत्यार भेदक नसते, तर समोरच्याच्या मनातली भिती त्याची शक्ती असते. समोरचा घाबरत नसेल तर हत्यार निष्प्रभ ठरत असते. मरण्याची भिती झुगारलेल्या तहरीर चॊकातल्या लाखोच्या जमावावर म्हणुनच सैनिक बंदूक चालवू शकले नाहीत. इथे अण्णांना उपोषणाआधीच अटक करणार्या पोलिस, सरकारला नंतर जमलेल्या लाखोच्या जमावाला अटक करण्याचीही हिंमत उरली नाही. ती आपली ताकद वापरण्याची इच्छा व बुद्धी सामान्य माणसाला शक्तीमान बनवू शकते आणि त्यातूनच आजच्या भ्रष्टाचार, लुटमार, अरेरावी, मनमानी, गुंडगिरी, बेशिस्तीला पायबंद घातला जाऊ शकतो. मस्तवाल सत्ताधीशांना वठणीवर आणले जाऊ शकते. पैशाच्या राजकारणाला वेसण घालणे शक्य असते. त्यासाठी त्यांच्या मार्गाने किंवा त्यांनी केलेल्या नियमानुसार लढाई लढून जिंकता येणार नाही. आपल्या तत्वावर त्यांना लढायला भाग पाडण्यानेच त्यांना पराभूत करता येईल.
विचार करा शिवरायांनी मोगल वा बादशहाच्या तैनाती फ़ौजे इतकी सेना उभारण्यात वेळ घालवला असता, तेवढी शस्त्रास्त्रे जमवत बसले असते, तर स्वराज्य स्थापन करणे त्यांना शक्य झाले असते का? महाराजांनी हाताशी जे आहे त्याचा चतुराईने वापर करून शत्रुच्या प्रचंड फ़ौजेला आपल्या रणनितीनुसार लढायला भाग पाडले. म्हणूनच मुठभर मावळ्यांना घेऊन एवढे मोठे साम्राज्य त्यांना उभे करता आले. आपण त्यांचे नाव घेतो पण त्यांना समजून घेतो का? गांधीजींनी शस्त्रास्त्रांनी लढणे शक्य नसल्याने नि:शस्त्र लढाईचे तंत्र अवलंबले होते. तिथेही फ़रक पडला. ज्यांना लढायचे आहे आणि जिंकायची इर्षा आहे, त्याला असुविधा वा अडचणींचा पाढा वाचून चालत नाही. हाताशी आहे त्या सामुग्रीच्या भरवशावर रणांगणात उतरावे लागत असते. त्यासाठी आपली बलस्थाने शोधावी, ओळखावी लागत असतात. शत्रूची कमजोर बाजू असेल तिथे हल्ला चढवावा लागत असतो. सामान्य माणसाची ताकद त्याच्या संख्येत असेल तर त्याने तिचीच सिद्धता करणे व वापर करणे हिताचे असते. जे सरकार, सता, राजकारणी, मुजोर मस्तवाल लोकसंख्येला घाबरतात, त्यांच्या समोर संख्येचे आव्हान उभे करणे हाच पर्याय असतो. नुसती गर्दी नव्हे तर प्रसंगी रस्त्यावर उतरणारी जागरुक लोकसंख्या व तिला संघटित करु शकणारी कार्यकर्त्यांची संघटना हाच त्यावरचा उपाय आहे.
साधी निवडणूक घ्या. पैशाचा खेळ आहे असे म्हटले जाते. पण हा पैशाचा खेळ का चालतो? पैसे वाटले जातात किंवा खर्च केले जातात त्यावर बंदी आहे. पण त्याचा उपयोग होत नाही. समजा असे पैसे कोणी खर्च करीत असेल पण घेणारेच नसतील तर तो खर्चू शकेल काय? जो खर्च करतो आणि जे लोक घेतात, त्यांना त्यातून निवडणूक जिंकायची असते. असा खर्चिक उमेदवार प्रचंड मतांनी आपटला, तर पुढचा कोणी इतका खर्च करायला धजावेल काय? ते कोण थांबवू शकतो? तिथले सामान्य मतदार थांबवू शकतात ना? त्यांनी संघटितपणे अशा नेमक्या उमेदवाराचा पराभव घडवून आणायची रणनिती यशस्वी केली तर? ती कशी होणार? तर त्यासाठी तिथे जागरुक जनता व त्यांना संघटित करु शकणार्या कार्यकर्त्यांची फ़ौज असायला हवी. ती फ़क्त निवडणूकीपुरती नव्हे तर कायम स्वरुपी असायला हवी. त्या कार्यकर्त्यांनी भ्रष्ट, मस्तवाल, मुजोर नेते, अधिकारी यांना वठणीवर आणायचे व्रत घेतल्याप्रमाणे काम करायला हवे. नेहमी भेटणारे कार्यकर्ते, त्यांच्या हाकेला ओ देऊन जमा होणारी लोकसंख्या, असे कायमस्वरुपी आंदोलन असायला हवे. ते कुठल्याही समस्येसाठी सज्ज असायला हवे. कोणाची रेशनकार्डासाठी अडवणूक होत असेल, सातबाराच्या उतार्यासाठी अडवणूक असेल, सोसायटीचे प्रकरण असेल, तर तात्काळ ही मोठी लोकसंख्या संबंधीताच्या भोवती उभी केली गेली पाहिजे. ज्याचे काम अडले वा अडवले आहे तो एकटा नाही, याची जाणिव कुठल्याही अधिकारी सत्ताधीशाला वठणीवर आणू शकत असते. हेच खरे लोकशाहीचे वास्तव स्वरुप आहे.
निवडणुकांनी लोकशाही यशस्वी होत नसते. जागरुक जनता व तिच्या सेवेतली सता, हेच लोकशाहीचे व्यवच्छेदक लक्षण असते. जनतेच्या धाकात चालणारा कारभार म्हणजे लोकशाही असते. ती सत्ता राबवणार्यांकडून यशस्वी होऊ शकत नाही. आपल्या अधिकारची जपणुक करणारी जनता लोकशाही यशस्वी करत असते. जेव्हा अशी लोकशाही अस्तित्वात येते तेव्हा आपोआपच भ्रष्टाचाराला पायबंद घातला जात असतो. ते काम सत्तेचे राजकारण करणार्या पक्षनेत्यांकडून होऊ शकत नाही. ती जबाबदारी निवडणूका न लढवणार्या व सत्तेपासून दुर राहून सत्तेवर वचक ठेऊ शकणार्यांना पार पा्डावी लागत असते. त्यासाठीच एका भक्कम राजकीय कार्यकर्त्यांच्या संघटनेची आपल्या समाजाला व देशाला गरज आहे. नेमक्या त्याचाच आज अभाव आहे. जो स्वत:ला कार्यकर्ता म्हणवतो तो चालू असलेल्या भ्रष्टाचारामध्ये आपला हिसा मि्ळवण्यासाठी धड्पडणारा असतो. तो लोकांना न्याय देण्याची भाषा वापरत सार्वजनिक जीवनात लुडबुडू लागतो. अन्यायाविरुद्ध खुप तावातावाने बोलतो. पण त्याचे उद्दिष्ट अन्याय दुर करण्याचे नसते, तर त्यातून हिस्सा मिळवण्याचे असते. असे नेते, कार्यकर्ते व त्यांचे पक्ष यांच्यापासून दुर राहुन काम करणार्यांची संघटना हाच खरा उपाय आहे. तो कसा साध्य करायचा? (क्रमश:)
(भाग-१८५) २३/२/१२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा