मुद्दाम मी शनिवारी सुट्टी घेतली. खरे सांगायचे तर मी संपूर्ण दिवस निवडणूक निकाल बघत टीव्ही सेटसमोर बसून होतो. याचा अर्थ त्या वाहिन्यांवर जी अघळपघळ चर्चा चालू होती, त्यासाठी मी ऐकत बसलो नव्हतो. तर या निवडणूकांचे निकाल नेमके काय संदेश देत आहेत, त्याचा मला शोध घ्यायचा होता. असे निकाल दुसर्या दिवशी सुद्धा अभ्यास करायला उपलब्ध असतात. पण त्याच दिवशी जो जल्लोष असतो तो मला महत्वाचा वाटतो. तिथे मात्र माझी पूर्ण निराशा झाली. कारण ज्याला महाराष्ट्राची मिनी विधानसभा निवडणूक म्हटले जात होते. तिचे निकाल मला बघायचे होते. पण ते दाखवणार्यांना महाराष्ट्र म्हणजे काय ते सांगायचे कोणी? त्यांचे जग टीआरपीमधेच अडकून पडलेले. त्यामुळे निवडणूका फ़क्त मुंबई व फ़ार तर पुणे, नाशिक या भागापुरत्या मर्यादित होत्या, म्हणायची पाळी बघणार्यांवर आली. सकाळी सर्व महाराष्ट्रात मतमोजणी सुरू झालेली होती. पण वाहिन्यांवर मात्र महापालिकांचेच निकाल किंवा त्याचे तपशील दिले जात होते. जिल्हा परिषद निवडणुका झाल्याची जणू खबरबात सुद्धा या लोकांना नव्हती. कारण तिथेही मतमोजणी सुरू आहे, याची साधी बातमी देण्याचे ही सौजन्य कुणा वाहिनीचा संयोजक, निवेदक दाखवत नव्हता. पहिल्यांदा ठाणे मग नाशिक-पुणे आणि नंतर मुंबई असा सपाटा चालू राहीला. शेवटी संध्याकाळपर्यंत मुंबईचे निकाल संपून मिरवणूका दाखवून झाल्यावर, यांना जिल्हा परिषदेचे निकाल आठवले.
महापालिकांच्या तीन पटीने जिल्हा परिषद निवडणूकीतला मतदार होता. शिवाय त्यासाठी ६०-७० टक्के इतके उत्साही मतदान झाले होते. याच्या उलट महानगरात अखंड प्रचार प्रयास करूनही ५० टक्क्यांच्या पुढे मतदान जाऊ शकले नव्हते. म्हणजेच खेड्यापाड्यातल्या मतदाराने जेवढा लोकशाही व मतदानाचा सन्मान राखला, तेवढाच नागरी मतदाराने त्याकडे काणाडोळा केला होता. त्यातही मुंबईकरांनी मतदानाबद्दल साफ़ तुच्छता दाखवली होती. तरीही कौतुक चालले होते ते मुंबईच्या निकालांचे. त्यातही पुन्हा भाऊबंदकीमध्ये सापडलेल्या ठाकरे बंधूंच्या भांडणाची तमाम वाहिन्यांना चिंता ग्रासत होती. हा काय प्रकार होता? याला अविष्कार स्वातंत्र्य म्हणायचे, की राजरोस राजकीय सौदेबाजीतली ढवळाढवळ म्हणायची? दोन ठाकरे बंधूंनी एकत्र यावे, असे अनेक जुन्या शिवसैनिकांना वाटते हे खरेच आहे. सेनेचे हितचिंतक व सहानुभूतीदार देखील तसे बोलून दाखवत असतात. पण त्याच्या बातम्या देण्यापलिकडे पत्रकारांचा त्याच्याशी काय संबंध असू शकतो? पण असे भासत होते, की वाहिन्यांचे मालक व्यवस्थापन किंवा त्यांचे संपादक, त्यासाठी सुपारी घेऊन कामाला लागले आहेत काय? त्यात मग निखील वागळेने अतिउत्साह दाखवला तर नवल नाही. कारण त्याने कायम बातमी देण्यापेक्षा बातमीचा विषय होण्याचीच पत्रकारिता केली आहे.
असो. या असल्या उथळ प्रक्षेपणाने माझा दिवस मात्र वाया गेला. कारण निकाल बाजूला पडले आणि नुसता उत्सव साजरा झाला. संपुर्ण महाराष्ट्राच्या निकालांसाठी मला दुसर्या दिवशीच्या वृत्तपत्रांवरच अवलंबून रहावे लागले. निवडणूकांचे अंदाज, त्यासाठी पुर्वचाचणी, तिचे अभ्यासपुर्ण विश्लेषण, आपल्या देशात तीन दशकांपूर्वी सुरू झाले. मागल्या अनेक निवडणुकात प्रणय रॉय यांनी त्याचे छान प्रदर्शन मांडलेले होते. पुढल्या काळात त्याचा सर्वच वाहिन्यांनी इतका विचका करून टाकला, की आता रॉय यांनी त्याकडे साफ़ पाठ फ़िरवली आहे. १९८० साली सर्वप्रथम रॉय यांनी अशी चाचणी घेऊन इन्दिरा गांधी प्रचंड बहुमत मिळवतील असे भाकित केले होते. त्यावर कोणी विश्वास ठेवला नव्हता. मात्र १९८४ साली इन्दिरा गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या निवडणूकीत राजीव गांधी नवखे होते आणि तरीही त्यांना अभूतपूर्व ४०० जागा मिळण्याचे भाकित रॉय यांनी केले आणि ते खरे ठरल्यावर, राजकीय अभ्यासक अशा चाचण्यांकडे गंभीरपणे बघू लागले होते. तोवर अशा चाचण्यांचे निकाल इंडीया टुडे या नियतकलिकात छापून यायचे. पण तंत्रज्ञानाचा पुरस्कर्ता असा चेहरा लावून वावरणार्या राजीवनी त्याला दुरदर्शनवर संधी दिल्याने हे प्रकरण गाजू लागले.
पुढल्या निवडणूकीत त्याच रॉय यानी आधी चाचणीचे अंदाज व्यक्त केले आणि नंतर त्यावर निकाल लागत असताना टिप्पणी करण्याचा कार्यक्रम सुरू केला. त्यात अर्थातच अनेक जाणकारांचा समावेश करून घेतला होता. आणि त्यांची ओळख फ़क्त जाणकार अशी करून दिली म्हणून ते जाणकार नसायचे, तर खरोखरच त्यांना त्यातले बारकावे ठाऊक असायचे. अगदी कुठल्या जिल्ह्यात, कुठल्या जातीच्या लोकसंख्येचे प्राबल्य आहे किंवा लोकसंख्येतील कोणाचा कसा प्रभाव राजकारणावर पडू शकतो, याचा अभ्यास केलेले ते जाणकार असायचे. त्यामूळेच ते कार्यक्रम लोकप्रिय झाले. पण मग नंतरच्या काळात वाहिन्यांचे पेव फ़ुटले आणि अशा पद्धतीचे विना अभ्यासाच्या चाचण्यांचे कार्यक्रम कोणीही करू लागला. मराठी वाहिन्यांचे युग आल्यावर हे पहिल्यांदाच घडते आहे. त्यामुळेच हा उत्सव साजरा झाला. मात्र तो उत्साहाने भरलेला असला तरी अर्थशून्य होता. कारण त्यात सहभागी झालेल्यांना त्यातले किती कळत होते देवच जाणे.
चार आठवडे अगोदर म्हणजे जेव्हा युती आघाडीचे जागावाटपावरून वाद चालू होते. तेव्हा कुणाला मनसे नावाच्या पक्षाची दखल घ्यावीशी वाटली नव्हती. तेव्हा मी ’पुण्यनगरी’च्या रविवार प्रवाह पुरवणीत (१५/२/१२) मनसे मुसंडी मारणार आणि तोच सेनेचीच नव्हे तर दोन्ही कॉंग्रेस पक्षांची मते खाणार, असे भाकित केले होते. त्यासाठी मला चाचणी करावी लागली नव्हती. आजवरच्या राजकारणाचा व निवडणूकीचा अभ्यास एवढ्याच आधारावर मी ते भाकित केले होते. अर्थात त्यामुळे मी खुप शहाणा ठरत नाही. कुठल्याही अभ्यासू जागरुक पत्रकाराला ते सांगता आले असते. दोन परस्पर विरोधी लढलेल्या पक्षांनी एकत्र येऊन युती आघाडी केली म्हणून त्यांच्या मतांची पुढल्या निवडणूकीत बेरिज होत नसते. हे आजवरच्या प्रत्येक निकालांनी दाखवले आहे. त्यापैकी काही मतदार मत बदलतो हा इतिहास आहे. त्यामुळेच मी ते आधी सांगू शकलो होतो. १९९९ सालात राष्ट्रवादीची वेगळी चुल मांडणार्या शरद पवारांनी फ़क्त कॉंग्रेसचीच मते खाल्ली नव्हती, तर युतीची काही मते फ़ोडली होती. कारण ते तेव्हा तिसरा पर्याय म्हणुन समोर आले होते. आता तेच कॉग्रेस सोबत गेल्यावर तिसरा पर्याय हवा असलेल्यांनी कोणाकडे जायचे? तो मनसे होता ना? आणि यात नवे काहीच नव्हते. गेल्याच वर्षी कल्याण डोंबिवली पालिकेत मतदाराने त्याची साक्ष दिली होती. सेनेऐवजी मनसेने भाजपा व राष्ट्रवादीचे बालेकिल्ले खाल्ले होते. त्याचीच पुनरावृत्ती मुंबई, नाशिक, पुण्यात झाली. पण ते धडपणे वाहिन्यांवरच्या ’जाणकारांना’ समजून घेता येत नव्हते. मग त्याचे विश्लेषण त्यांनी कसे करावे? सहाजिकच उत्सव आणि उत्साहापेक्षा काहीच होऊ शकले नाही.
खरे तर या सगळ्या निकालांमधे महत्वाचा मुद्दा होता अण्णा हजारे. गेले सहा महिने ज्या विषयाने महाराष्ट्र व देशाचे राजका्रण ढवळून काढले, त्याचा या निवडणूकीवर काय परिणाम झाला? किंवा का नाही झाला; याचे विश्लेषण आवश्यक आहे. त्यावर कोणी जाणकार बोलला नाही आणि बोललाच असेल तर अण्णांचा प्रभाव पडलाच नाही, अशी खुळचट पुस्ती जोडून अण्णा या विषयावर पांघरूण घालण्यात धन्यता मानली गेली. तिथेच या तमाम जाणकार व अभ्यासकांच्या अज्ञानाची साक्ष मिळते. जे कळत नाही किंवा ज्याचा आवाका येत नाही, ते नाहीच आहे असे भासवून पळ काढायचा, हा अशा उथळ जाणकार विश्लेषकांचा गुणधर्म झाला आहे. अण्णांच्या आंदोलनाचा प्रभाव मतदानावर पडला नसेल तर का आणि कसा? या प्रश्नाचे उत्तर द्यावेच लागेल. प्रभाव पडला असता तर निकालात कसा दिसला असता? आणि नसेल पडला तर त्याचे पुरावे काय आहेत? हे सविस्तर सांगण्याची गरज आहे. पण तसा प्रयत्नही कोणी केला नाही. कायबीइन लोकमत वाहिनीवरील चाचणीत सगळीकडे मतदारांनी जवळपास ७०-८० टक्के प्रमाणात मतावर अण्णांचा प्रभाव असेल अशी ग्वाही दिली होती. ती चाचणी खरी असेल तर तो प्रभाव गेला कुठे? आणि आता तेच चाचणीकर्ते प्रभाव पडला नाही म्हणत असतील तर त्यांची सगळी चाचणीच खोटी पडते ना? मला अनेक वाचकांनी हे निकाल ऐकून आणि वाचून त्याबद्दल शंका विचारल्या. अण्णांचे आंदोलन इतके जोरदार होऊन असे निकाल का लागले? त्याची उत्तरे देणे मला अगत्याचे वाटते. आणि पुढल्या काही लेखातून मी ती देण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण सरळ आहे. मी वाहिनीवरच्या जाणकारांप्रमाणे ईमेलच्या मागे लपून राहात नाही. मला थेट वाचक जाब विचारू शकतो किंवा प्रश्न विचारू शकतो. मला ते आवडते सुद्धा. कारण त्यातून तो वाचक आपल्याला जबाबदार बनवतो, असे माझे मत आहे. तेव्हा अण्णा फ़ॅक्टरबद्दल उद्या चर्चा करूया. (क्रमश:)
(भाग-१८१) १९/२/१२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा