आजच्या पिढीला खरा कार्यकर्ता कसा असतो हे ठाऊक नाही, असे मी म्हटले तर त्या तरूणांना राग येऊ शकेल. पण ती वस्तुस्थिती आहे. म्हणुनच तो आजचा तरूण भारावल्यासारखा अण्णा हजारेंकडे बघत असतो. कारण अण्णा हा त्याला अपवादात्मक माणूस वाटतो. इतका साफ़ स्वच्छ नि:स्वार्थी माणूस असू शकतो, याचेच या पिढीला आश्चर्य वाटते. पण कधीकाळी अशी माणसे शेकड्यांनी नव्हे तर हजारांनी याच समाजात वावरत होती. त्यांनाच कार्यकर्ता संबोधले जात होते. त्यांच्याकडे कोणी त्यागी, नि:स्वार्थी म्हणून आदराने बघत असला, तरी त्यांना कोणी साधूसंत समजत नव्हता. आपण प्रामाणिक असावे, ही धारणा समाजात रुढ होती. त्यामुळेच अशी नि:स्वार्थी माणसे कार्यकर्ता म्हटली जायची. पण त्यांच्याकडे कोणी साधूसंत म्हणून बघत नव्हता. आज अशी माणसे दुर्मिळ होत गेली आहेत. तसे आदर्शच आजच्या पिढीसमोर नाहीत. मग त्यांना कार्यकर्ता म्हणजे काय ते समजावे कसे? एक ताजे उदाहरण त्यासाठी पुरेसे ठरावे. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणूकीच्या निमित्ताने एका वाहिनीवर जुन्या महिला नगरसेविकांच्या मुलाखती घेतल्या गेल्या. त्यात मृणाल गोरे व इंदुमती पटेल अशा १९७० च्या दशकातील भिन्न पक्षातील महिलांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. आजच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी ५० टक्के राखीव जागा आहेत. तेव्हा एकही जागा महिलांसाठी राखीव नव्हती. या दोन्ही महिला त्या काळात पुरूषांच्या स्पर्धेत निवडणूका लढवून आपली छाप पाडणार्या महिला आहेत.
तशा या दोघी भिन्न पक्षातल्या होत्या. इंदुमती पटेल कॉग्रेसच्या तर मृणालताई विरोधी समाजवादी पक्षातल्या. कॉग्रेसवर नेहमीच भ्रष्टाचाराचा आरोप होत राहिला आहे. तरीही इंदुमती पटेल यांनी केलेले काम लक्षणिय होते. त्या आपले अनुभव सांगताना म्हणाल्या, ’स्थायी समितीची सदस्य म्हणून बैठकीला जाताना खुप तयारी करावी लागत असे. अजेंडा आलेला असायचा. त्याचा अभ्यास करण्यात दोन दोन दिवस खर्ची पडायचे. करोडो रुपयांचे प्रकल्प, योजनांचे तपशील अभ्यासले, तरच त्याबद्दल समोर बसलेल्या अभियंते, अधिकार्यांना प्रश्न विचारता येणार असत. त्यातले ते जाणकार आणि आम्ही जनतेचे प्रतिनिधी. त्यामुळेच होणार्या खर्चाबद्दल सावध रहावे लागत असे. आधी विषय समजुन घ्यायचा, तरच शंका विचारणार ना? आता म्हणे काही मिनीटातच शेकडो करोड रुपयांची टेंडरे पास होतात.’ त्या काय म्हणत होत्या त्याचा थांगपत्ता मुलाखत घेणार्या पत्रकार मुलीला लागला नाही. लागला असता तर तिने त्यांना त्याबद्दल अधिक बोलते केले असते. पण मुलाखत घेणार्यांना फ़क्त झटपट टेंडरे पास करून पैसे खाल्ले जातात, हेच दाखवण्यात रस होता. मग समजून घेणार काय? नगरसेवक म्हणजे जनतेचा रखवालदार, त्याने जनतेच्या पैशाची डोळ्यात तेल घालून किती काळजी घेतली पाहिजे व त्यासाठी कसा अभ्यास केला पाहिजे, ते इंदुमती पटेल सांगत होत्या. सार्वजनिक क्षेत्रात काम करणे म्हणजे केवढी जबाबदारी होती तेच त्या सांगत होत्या. पण उपयोग काय? ज्यांच्यासमोर त्या बोलत होत्या, त्यांना त्यातले अक्षरही कळत नव्ह्ते. मग त्यांना बोलणार्या व्यक्तीचे महात्म्य कसे कळावे? जनतेच्या एक एक पैशाची आम्हाला फ़िकीर असायची, त्यासाठी आम्ही अधिकारी, प्रशासन यांच्यावर नजर ठेवलेली असायची. म्हणुनच भ्रष्टाचाराला वाव नव्हता. उधळपट्टीला जागा नव्हती, असेच इंदुमती सुचवत होत्या. पण ते समजून घेण्याची बुद्धी मुलाखतकाराकडे नसेल तर त्याचा काय उपयोग होणार? त्यांच्या बोलण्यात मुद्दे होते, पण सनसनाटी अजिबात नव्हती. मग त्यातली बातमी आजच्या पत्रकार मुलीला समजावी कशी?
दुसरी मुलाखत मृणालताईंची. त्यांनी आपण त्या काळात संघर्ष करून झोपडपट्टीतल्या नागरिकांसाठी सार्वजनिक पाणीपुरवठा धोरण कसे अंमलात आणायला लावले त्याची कथा सांगितली. पण त्यातले गांभिर्यच मुलाखत घेणार्याला कळले नाही. मृणालताईंनी आपल्याच वस्तीतले उदाहरण दिले आणि भ्रष्टाचार कसा सुरू होतो व कसा रोखता येतो, हे अगदी निरागसपणे कथन केले. त्यांनी भ्रष्टाचार हा शब्द वापरला नाही. पण त्याची उपज सांगितली. त्यांच्याच वस्तीत सार्वजनिक नळ लागायचा होता. तिथल्या अधिकार्याने मग नगरसेविका असलेल्या मृणालताईंना खुश करण्यासाठी तो नळ त्यांच्या घराजवळ लावायची कल्पना मांडली. पाहिजे तर त्याच नळाची थेट जोडणी मृणालताईंच्या घरात आणून पोहोचवण्याची तयारी दर्शवली. पण त्याची ऑफ़र त्यांनी फ़ेटाळली व सर्व वस्तीला सोयीचे असेल, तिथेच सार्वजनिक नळ बसवायला भाग पाडले. त्यातून त्या काय सांगत होत्या? संबंधीत अधिकारी जनतेची सोय त्यांना ब्यक्तीगत घरगूती सुविधा बनवायला सांगत होता. त्यांच्यातला वैयक्तिक स्वार्थ जागवून त्यांना भ्रष्ट करू पहात होता. पण सार्वजनिक सोय किंवा पैसा हा वैयक्तिक वापरासाठी नसतो, लोकप्रतिनिधी त्याचे राखणदार असतात, मालक नसतात, हेच मृणालताईंनी त्यातून, त्या अधिकार्याला दाखवून दिले होते. तो अधिकारी व्यक्तिगत स्वार्थ जागवून त्यांना भ्रष्ट करू पहात होता. पण ठामपणे त्यांनी भ्रष्ट व्हायला नकार दिला, हाच त्या मुलाखतीतला गाभा होता. पण ते सर्व मुलाखतकाराच्या डोक्यावरून गेले. मृणालताईंसारखी व्यक्ती आपण भष्ट झालो नाही, म्हणून खुप पवित्र, चारित्र्यसंपन्न आहोत असे कधी सांगणार नाही. ती त्यांची निरागसता असते. त्यांचे अनुभव आजच्या स्थितीशी तुलना करून लोकांसमोर मांडणे आवश्यक आहे. पण त्यातले मर्म समजले तर ना? समजणार कसे? भ्रष्टाचार व शिष्टाचार यातला फ़रकच ठाऊक नसलेले शहाणे त्याचे विवेचन करणार असतील, मग असे भरकटणे अपरिहार्यच नाही का?
आपल्या कारकीर्दीत या दोन्ही विदुषींनी मोठमोठी अधिकारपदे भुषवली आहेत. मृणालताई ग्रामपंचायत सदस्यापासून थेट देशातील सर्वात मोठे लोकशाही व्यासपीठ असलेल्या लोकसभेपर्यंत जाऊन पोहोचल्या होत्या. विधानसभेत विरोधी पक्षनेता हे पद त्यांनी भुषवले आहे. इंदुमती पटेल यांनी पालिकेत कॉग्रेस पक्षाच्या गटनेत्या, महापौरपदाच्या उमेदवार होण्यापर्यंत मजल मारली होती. अनेकदा नगरसेविका म्हणून त्या निवडून आल्या. पण दोघीही कायम कार्यकर्त्याच राहिल्या. एका बाजूला इंदुमती कॉग्रेस पक्षाच्या, ज्या पक्षावर तेव्हाही भ्रष्टाचाराचे आरोप होत असायचे, तर दुसर्या बाजूला कायम विरोधी पक्षात राहून सत्तेशी झुंजणार्या मृणालताई आहेत. ज्यांच्यावर अगदी सत्ताधारीसुद्धा कधी भ्रष्टाचाराचा इवला आरोप करू धजले नाहीत. आजच्या तुलनेत तेव्हा कॉग्रेसचा भ्रष्टाचारही नगण्य होता. तळे राखी तो पाणी चाखी, म्हणतात तशी भ्रष्टाचाराची मर्यादा होती. पण त्याचाही जाब विचारणारे असायचे. त्यांना कार्यकर्ते म्हटले जायचे. सत्ताधारी असोत की विरोधक, दोघेही लोकांना घाबरून असायचे. लोक काय म्हणतील अशी लोकापवादाला घाबरणारी माणसे सार्वजनिक जीवनात वावरत होती. वृत्तपत्रात किंवा विरोधकांकडुन आरोप होतील, यापेक्षा पक्षातच कार्यकर्ता जाब विचारील याचा धाक असायचा. कारण तो कार्यकर्ता पुढार्याच्या मर्जीवर कार्यकर्ता बनत नसे, तर त्याच्या मेहनतीवर नेता निवडणूक जिंकत असायचा. कार्यकर्त्याला नेत्याची मर्जी संभाळावी लागत नसे, तर नेत्याला कार्यकर्त्याची मर्जी जपावी लागत असे. जनता दुरची गोष्ट झाली, कार्यकर्ताच नेत्याच्या वर्तनावर नजर ठेवून असायचा. त्याला मी कार्यकर्ता म्हणतो. कित्येक वर्षे पक्षात काम करूनही त्याला कुठली उमेदवारी मिळत नसायची, पण तो आपला पक्ष व पक्षाचा उमेदवार जिंकला म्हणुन खुश असायचा. त्याला आपला पक्ष, आपली विचारसरणी, आपली संघटना जिंकली याचे समाधान असायचे. मी जेव्हा कार्यकर्ता असा शब्दप्रयोग करतो, तेव्हा मला मृणालताई, इंदुमती पटेल यासारखी माणसे अपेक्षीत असतात. (क्रमश:)
(भाग-१८९) २७/२/१२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा