महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यावर न्यायालयाने एका जमिन प्रकरणात ताशेरे झाडले आहेत. आणि तशी वेळ त्यांच्यावर पहिल्यांदाच आलेली नाही. याच्याआधी एका सावकारी प्रकरणात सुद्धा त्यांच्यावर सुप्रीम कोर्टाने ठपका ठेवला होता. त्यामुळे अशा गोष्टींची विलासरावांना आता सवय झाली आहे. त्यांनाच कशाला आता सर्वच राजकीय पक्षाना आणि नेत्यांना अशा ताशेरे, ठपक्यांची सवय अंगवळणी पडली आहे. मग त्यांनी राजिनामा वगैरे देण्याचा संबंधच कुठे येतो? अर्थात तशी कोर्टाची वगैरे काही मागणी नाही. म्हणूनच विलासरावांनी त्यावर प्रतिक्रीया देण्याचे कष्ट घेतलेले नाहीत.
राहिला प्रश्न नैतिक जबाबदारीचा. भानगडीत सापडला मग पदाधिकार्याने राजिनामा द्यावा असे पुर्वी म्हटले किंवा समजले जाई. त्याला सार्वजनिक जीवनातील उच्च परंपरा वगैरे समजले जात होते. पण तो काळ खुप वेगळा होता. तेव्हा नैतिकता सेक्युलर वगैरे झालेली नव्हती. पत्रकारिता सुद्धा नॉर्मल होती. नैतिकतेमध्ये सेक्युलर जातिय असे पंथ विभाग झालेले नव्हते. शिवाय निवडून येण्याची क्षमता, असले निकष राजकारणात आलेले नव्हते, की मतदारांची जातिय-सेक्युलर अशी विभागणी झालेली नव्हती. आणि त्याचे प्रमुख कारण नैतिकता पक्षनिरपेक्ष होती. राजकारणात जेवढे लोक सभ्य होते तेवढेच पत्रकारिता, बुद्धीवादी प्रांतातले लोक सभ्य होते. अगदी खेड्यापाड्यातल्या गरिबापासून मुंबईतल्या सुखवस्तू श्रीमंतापर्यंत, सर्वांकडे लाज नावाचा डोळ्यांना न दिसणारा अवयव होता. अब्रु नावाची काहीतरी एक वस्तू बाजारातही सोन्यापेक्षा महाग मानली जात होती. आता जमाना खुप बदललला आहे. बेअब्रु म्हणजे प्रतिष्ठा झाली आहे. त्यामुळेच सार्वत्रिक बेशरमपणा करण्याला सुसंस्कृत मानले जाते. जो अधिक बेशरम, तेवढा अधिक प्रतिष्ठीत मानला जातो. जो अधिक खोटारडा तेवढा अधिक नैतिक समजला जातो. मग अशा जगात आणि काळात विलासरावांनी कुठली लाज बाळगावी आणि दाखवावी अशी अपेक्षा करायची?
२००८ सालात ते मुख्यमंत्री असताना त्यानी एकदा नैतिक जबाबदारी पत्करून राजिनामा दिलेला आहे. तो त्यांना का द्यावा लागला? कसाब आणि टोळी मुंबईत आली आणि त्यांनी जे रक्तपाताचे थैमान घातले त्यानंतर विलासराव घटनास्थळाला भेट द्यायला गेलेले होते. त्यांच्या सोबत सरकारी कॅमेरामन होता. ताजमहाल होटेलला मुख्यमंत्र्याने भेट दिल्याचे आतले चित्रण वाहिन्यांकडे नव्हते. ते फ़क्त दुरदर्शनला देण्याचा सरकारी प्रघात आहे. पण अपवादात्मक परिस्थिती असल्याने विलासरावांनी ते सरकारी कॅमेराने झालेले चित्रण, सर्व वाहिन्यांना देण्याचे सौजन्य दाखवले. त्यात त्यांच्या सोबत त्यांचा पुत्र रितेश व त्याचे मित्रही होते. त्यामध्ये निर्माता रामगोपाल वर्मा होता. त्यावरून माध्यमांनी काहुर माजवले आणि त्यात बिचार्या विलासरावांचा बळी घेतला गेला. खरेच त्यात विलासरावांचा गुन्हा असता, तर त्यांनी ते चित्रण वाहिन्यांना कशाला पुरवले असते? पण त्यांच्या सभ्यतेचा गैरफ़ायदा घेऊन त्यांचा माध्यमांनी तेव्हा बळी घेतला.
तेव्हा माणसे मारली गेली असताना मुख्यमंत्री पुत्राच्या चित्रपटाची चिंता करत होते, अशा आवया उठवणारे सभ्य होते काय? की निर्लज्ज होते? आपल्याच काही पत्रकार बंधूनी हे जे पाप केले, तेव्हा किती पत्रकारांनी जनाची नाही तरी मनाची लाज बाळगून, त्यामागचे सत्य सांगण्याचे धाडस दाखवले होते? नसेल तर त्यापैकी कोणाला आज विलासरावांना लाजेकाजेस्तव राजिनामा द्यायला सांगण्याचा अधिकार उरतो काय? दुसर्याला लाजेची शपथ घालण्यापुर्वी आपली लाज जरा तपासून तरी पहायला हवी ना? आपल्या कमरेला लंगोटी सुद्धा नसलेल्यांनी, कुणाच्या फ़ाटलेल्या पाटलोणीची चर्चा करावी काय? पण कोडगेपणा हा असा गुण असतो, की दिगंबर असुनही तो इतरांना कपड्याची महत्ता सांगू पहातो. मला विलासरावांचे समर्थन करण्याची गरज नाही. त्यांच्या पापाची फ़ळे ते जरूर भोगतील. पण त्यांच्या पापाची शिक्षा फ़र्मावण्याचा आव आणणार्यांनी निदान आपल्या अंतरंगात झाकून पहावे एवढीच माझी अपेक्षा आहे. ’विलासरावांना जनाची नाही तरी मनाची लाज असेल तर त्यांनी राजिनामा द्यावा’ असे ’ठोकपाल’ ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई फ़र्मावतात तेव्हा त्यांच्या लाजेचा दाखला कोणी मागायचा?
देसाई अधुनमधून ’कायबीइन लोकमत’ वाहिनीवर दिसतात. तिथे सगळ्यांच्या अब्रुचे राजरोस दाखले मागण्याच उद्योग अखंड चालू असतो. त्यात ठोकपालही सहभागी होतात. पण त्यांनी कधी तिथल्या शोकपालांची लाज कुठे दडी मारून बसली आहे याचा शोध घेतला आहे काय? इतर मंत्री पुढारी यांना आजचा सवाल विचारणार्या आणि नितीमता बुडाली म्हणून रोजच्या रोज गळा काढणार्या, शोकपालांनी कधी दर्डा किंवा ’लोकमत’ दैनिकाच्या लाजेचा सवाल विचारला आहे काय? शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या सचिवाला लाच घेताना पकडल्यावर सवाल ’लाजबाब’ होतो. लोकमत दैनिकावर पेडन्यूजचा आरोप आहे, त्याबद्दल अवाक्षर न बोलणार्यांना कसली लाज असते? जनाची की मनाची?
त्या वाहिनीत गटारगंगेत प्रवाहपतित होताना देसाई यांना लाज नावाचा शब्दच आठवत नाही काय? की बिचारे विलासराव आणि त्यांच्यासारखे पुढारी मंत्री उत्तर देत नाहीत म्हणून शेफ़ारल्यासारखी त्यांची लाज काढायची? आपण ज्यांच्यात वावरतो ते किती लाज बाळगणारे आहेत, त्याची फ़िकीर नस्णे हे अब्रुदाराचे लक्षण आहे काय? उमेदवाराकडून मतदार काय काय घेतात आणि म्हणून मतदार कसा भ्रष्ट झाला आहे, यावर सवाल करणारे निखिल वागळे ’लोकमत’च्या पेडन्यूजबद्दल कधी बोलणार? की त्यांना जनाची वा मनाची कसलीच लाज नाही, असे देसाई यांना म्हणायचे आहे आणि म्हणून ते वागळेंना तोच ( विलासरावांना केलेला ) उपदेश करत नाहीत? आणि हे काही रहस्य नाही. अविष्कार स्वातंत्र्याच्या पोकळ गप्पा मारून सत्य लपत नाही.
प्रत्येक पक्षात आता मीडिया मॅनेजर कशाला असतो? तो मीडियाला मॅनेज करायला असेल तर जो मीडिया मॅनेज होतो. त्यातले शहाणे कुठल्या स्वातंत्र्याबद्दल बोलत असतात? कंपन्या, उद्योगसमुह, बड्या संस्था यांना पीआर कंपन्या काय मदत करतात? दिर्घकाळ् माध्यमात काम करून देसाईना यातले काहीच ठऊक नाही काय? त्यांनी याबद्दल कधी कोणाला म्हणजे आपल्या पत्रकार सहकार्यांना सवाल केला आहे काय? जनाची नाही तर निदान मनाची लाज बाळगून हे उद्योग थांबवा, असे आवाहन तरी केले आहे काय? विलासराव किंवा खासदार अडसुळ यांच्या लाजेला हात घालण्यापुर्वी आपल्या पायाशी काय जळते आहे ते पहायचेच नाही काय? अर्थात त्याला विलासराव किंवा शरद पवार यांच्यासारखे पुढारी सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत. त्यांनीच असले बदमाश प्रतिष्ठीत करून ठेवलेत. जेवढ्या जाहिरपणे त्यांना असे लाजेचे प्रश्न केले जातात, तेवढ्याच ठामपणे त्यांनीही पत्रकार माध्यमांना पावित्र्याचे सवाल करायला हवेत. का करू नये? नसतील करायचे तर निदान फ़ुले आंबेडकरांची नावे तरी घेऊ नका.
यालाच सैतानाच्या हाती बायबल असे म्हणतात. मी तर म्हणेन विलासरावांना थोडी जरी जनाची किंवा मनाची लाज असेल, तर त्यांनी असे आगंतुक उपदेश करणार्याना उलट सवाल करण्याची हिंमत बाळगली पाहिजे. इज्जतदार माणूस दुसर्याला सवाल करू शकतो. कोर्टाने विलासरावांचा राजिनामा मागितलेला नाही. मग हे कोण शहाणे त्यांना लाजेचा हवाला देऊन राजिनामा मागणार? मागायला हरकत नाही. पण तेवढे पुण्य किंवा पावित्र्य सुद्धा प्रायश्चित्त सांगणार्याकडे असायला हवे ना? देसाई किंवा आजचे बाजारू पत्रकार विचारवंत तेवढे पवित्र राहिले आहेत काय? तेवढ्या सोवळेपणाचा दावा करू शकतील काय? अविष्कार स्वातंत्र्य किंवा पावित्र्याची अधिकारवाणी शब्दावर नव्हे तर प्रामाणिकपणावर अवलंबून असते. कर्मावर अवलंबून असते. मुख्यमंत्री म्हणून हाती आलेल्या अधिकाराचा गैरवापर विलासरावांनी केला तर ते जेवढे गुन्हेगार असतात, तेवढेच वृत्तपत्र हाती असल्यावर त्याचा गैरवापर करणारेही गुन्हेगार असतात. त्यांच्या पापावर उपरणे घालायचे आणि इतरांना पावित्र्याचे हवाले द्यायचे, याला कसली लाज म्हणायची? मनाची की जनाची? म्हणून मला वाटते, विलासरावांनी पापाचे प्रायश्चित्त करायचे असेल तर अशा ढोंगी बगुलाभगतांचा पर्दाफ़ाश करायची हिंमत दाखवावी. तोच अशा लोकांचा इ’लाज’ आहे. विलासराव तुम्हाला थोडी जरी लाज असेल तर अशा शहाण्यांचा नाई’लाज’ करून दाखवाच. (क्रमश:)
(भाग-१७७) १४/२/१२
BHAU SIR, YA MALIKETIL YA POSTCHYA ADHICHE LEKH BLOG VAR PRASIDDHA KELELE NAHIT KA?(BHAG 1 TE 176)
उत्तर द्याहटवाbest writing
उत्तर द्याहटवाmi sampurn lekh wachle Khup Vaicharik & sadetod aani total Nispakspati
उत्तर द्याहटवादर्दांचे नाव कोळसा घोटाळ्यात आल्यावर मी आवर्जून ibn लोकमत पहात होतो . पहिल्यांदा कोणत्यातरी फालतू विषयावर चर्चा करून १ दिवस वाग्लेंनी पुढे ढकलला . २ र्या दिवशी चर्चेच्या सुरवातीलाच भ्रष्टाचार हा १ का पक्षाचा किंवा व्यक्तीचा नसतो असे म्हणून सुरवात केली , नेहमीप्रमाणे आक्रमक नव्हते निखिलजी . किरीट सोमय्यांनी दर्डा नाव उच्चारले कि निखील नागपुरातील जय्स्वलांचे विमान गडकरींनी का वापरले ? हाच प्रश्न विचारत आणि त्यांचे बोलणे थांबवत
उत्तर द्याहटवाबऱ्याच दिवसांनी काही निरपेक्ष वाचायला मिळतेय. लिहित रहा.
उत्तर द्याहटवाउत्तम लेख. भाऊ या आधीचे 176 भाग कुठे वाचायचे. कृपया कळवावे.
उत्तर द्याहटवाह्या लेखापासून मी ब्लॉगवर लिहू लागलो. कारण टाईप करू लागलो. तोपर्यंत हाती लिहीलेले लेख पुण्यनगरीत प्रसिद्ध झालेले आहेत.
हटवा