सोमवार, २० एप्रिल, २०१५

आम आदमी पक्षातली यादवी


अलिकडेच आम आदमी पक्षात मोठे रणकंदन माजले. दिल्ली विधानसभेत या नव्या पक्षाने दुसर्‍या प्रयत्नात प्रचंड यश संपादन केले. पण उर्वरीत भारतात भाजपाला शह देवू शकेल असे राजकीय समिकरण उभे राहिल, अशी अपेक्षा बाळगणार्‍यांचा त्यामुळे मुखभंग झाला असल्यास नवल नाही. मात्र त्यासाठी इतर कोणाला जबाबदार धरता येणार नाही. एकूणच हल्ली जे उथळ व संदर्भहीन राजकीय विश्लेषण चालते, त्यामुळे असा मुखभंग अपरिहार्य असतो. ज्यांनी ‘आप’चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांची सार्वजनिक जीवनातील वाटचाल काळजीपुर्वक अभ्यासली असेल, त्यांना अशा घटना घडामोडींचे अप्रुप वाटणार नाही. उलट असेच घडणार व घडत राहिल, याची त्याला खात्रीच होती. त्यासाठी ताजे उदाहरण द्यायचे, तर केजरीवाल यांच्या दुसर्‍या शपथविधीचे देता येईल. त्या शपथविधीच्या मंचावरून त्यांनी जमलेल्या गर्दीला एक संदेश दिला होता. इतका मोठा विजय मिळाल्यावर काही लोक अन्य राज्यात निवडणूका लढवून सत्ता संपादनाच्या वा विरोधकांना पाणी पाजण्याच्या गमजा करू लागलेत. हा अहंकाराचा नमूना आहे. हे चालणार नाही. आपल्याला पाच वर्षासाठी दिल्लीची सेवा करायची आहे. वास्तविक तसे कोणी हवेत बोलले नव्हते किंवा कोणी सामान्य नेता कार्यकर्ता बोललेला नव्हता. त्या पक्षाचे विचारक मानले जाणारे योगेंद्र यादव, यांनी तशी घोषणा केलेली होती. कारण आपण सत्ता मिळवायला नव्हेतर राजकारणात परिवर्तन घडवायला आलोत, ही आम आदमी पक्षाची स्थापनेपासूनची भूमिका होती. यादव त्याच भूमिकेला धरून बोलत होते. मग केजरीवाल यांनी त्यांना असे जाहिररित्या कशाला फ़टकारावे? तिथेच त्या दोन नेत्यांमध्ये संवाद संपला असल्याचा पहिला इशारा मिळालेला होता. मात्र केजरीवाल यांच्या भाषणातील तेवढ्याच महत्वाच्या विधानाकडे कोणी गंभीरपणे बघितले नाही. पण लौकरच त्याची प्रचिती आली. पुढे मागल्या दोन आठवड्यात झाले ते नाट्य ठरल्याप्रमाणेच झालेले आहे. 

आधी योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांची हाकालपट्टी झाली आणि त्यासाठी अगदी हाणामारीपर्यंतचा प्रसंग आला. त्याही दोघांना त्याची कल्पना नव्हती असे अजिबात नाही. मागल्या तीनचार वर्षात केजरीवाल व त्यांचाच मुळचे निष्ठावंत असलेल्या जमावाने प्रत्येक आंदोलन व लढ्यात तेच केलेले होते. लोकसभेपुर्वी गुजरात दौर्‍यावर असलेले केजरीवाल यांच्या गाड्यांचा ताफ़ा निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याने गुजरात पोलिसांनी अडवला होता. तेव्हा कोणती प्रतिक्रीया दिल्लीत बघायला मिळालेली होती? फ़टाफ़ट निष्ठावंतांना फ़ोन गेले आणि अर्ध्या तासात भाजपाच्या मुख्यालयावर ‘आप’च्या जमावाने घोषणा देत दगडफ़ेक करण्यापर्यंत मजल मारली होती. त्याचे समर्थन प्रशांत भूषण यांनी केले नव्हते काय? मग एका कोर्टाच्या समन्सला दाद देत नाही म्हणून केजरीवाल यांच्यावर अटकेची वेळ आली. तर जामिनही घेणार नाही, अशा पोरकटपणाची पाठराखण कोणी केली होती? कायदेपंडित अशी ओळख असलेल्या भूषण यांनी त्यासाठी कोर्टात बुद्धी लढवली नव्हती काय? त्याचीच किंमत आता त्यांना मोजावी लागते आहे. आधी त्यांची राजकीय समितीतून हाकालपट्टी झाली आणि मग राष्ट्रीय कार्यकारिणीतून हाकलताना थेट हाणामारीचा प्रसंग आला. यापुर्वी तशी वेळ आली नाही, कारण पक्षात नको असलेल्यांनी गुंडगिरीच्या भयाने सभ्यपणाने राजिनामे दिले होते. तीच कार्यपद्धती उघडी पाडण्यासाठी यादव व भूषण यांनी सगळा तमाशा करायची पाळी केजरीवाल यांच्यावर आणली. अर्थात आता कार्यभाग उरकला असल्याने आणि अशा प्रतिवाद करणार्‍यांची गरज उरली नसल्याने, केजरीवाल यांनी त्या दोघांना ‘ढुंगणावर लाथ’ मारून हाकलून लावले आहे. पण तेही तितके महत्वाचे नाही. त्या निमीत्ताने कार्यकर्त्यांसमोर केलेल्या भाषणात केजरीवाल यांनी आपली राजकीय परिवर्तनाची भूमिका अधिक स्पष्ट केली. पण पुन्हा ती साफ़ दुर्लक्षित राहिली आहे.

‘हम यहॉ चुनाव जीतने आये है, हारने नही’, असे केजरीवाल आपल्या अनुयायांना ठणकावून सांगतात. त्याचा अर्थ काय? निवडणूका जिंकून झालेल्या आहेत आणि पुढल्या कुठल्या अन्य राज्यातल्या निवडणूका लढवायच्याच नाहीत, असा केजरीवाल यांचा अट्टाहास आहे. यादव यांना तो मान्य नाही, म्हणून विवाद उदभवला आहे. यादव यांना निवडणूका जिंकण्याशी कर्तव्य नाही. एका परिवर्तनाच्या दिशेने काम करताना एक सामाजिक. राजकीय, आर्थिक भूमिका जनमानसात ठसण्याला महत्व आहे. ते करताना निवडणुका हे एक साधन असते. त्यात विजय किती मिळतो वा पराभव किती होतात, ते दुय्यम असते. ही आजवर समाजवादी पुरोगामी म्हणवल्या जाणार्‍या वर्गाची भूमिका राहिलेली आहे. यादव आणि त्यांच्यासोबत हाकलून लावलेले बहुतांश ‘आप’ सदस्य त्याच वर्गातले आहेत. १९७७ सालात जनता पक्षात मुळचे समाजवादी विचारधारेचे लोक पक्ष विसर्जित करून सहभागी झाले. आज ते अनेक पक्षात विखुरलेले आहेत. त्यापैकी ज्यांनी प्रचलीत राजकारणापासून अलिप्त रहाण्याचा पवित्रा घेतला होता, अशापैकी यादव किंवा मेधा पाटकर होत. त्यांनी नव्याने पुर्वीच्या समाजवादी राजकीय प्रवाहाचे उत्थान होईल, अशा अपेक्षेने केजरीवाल यांच्या पक्ष व लढ्यात उडी घेतली होती. त्यासाठी आपल्या बुद्धीला व विचारांशी जुळणार नाहीत, अशा अनेक पोरकटपणातही केजरीवाल यांचे बौद्धिक समर्थन केले होते. कारण वैचारिक सुत्रे आपल्या हाती आहेत आणि पक्ष व संघटनेने व्यापक स्वरूप घेतले, मग आपल्या भूमिकांच्या आधारे केजरीवाल यांना वेसण घालता येईल, असा आशावाद त्यांच्या मनात होता. मात्र त्यांना वाटले होते, तितके केजरीवाल कच्च्या गुरूचे चेले नाहीत व नव्हते. आजवरच्या वाटचालीत त्यांनी अतिशय धुर्तपणे प्रत्येकाचा वापर आपले हेतू साध्य करून घेण्य़ासाठी केला आणि प्रसंगी त्यांचा मोठ्या खुबीने बळीही द्यायला मागेपुढे बघितले नाही. पण जात्यातल्यांना सुपातल्यांनी हसावे, तसे यादव भूषण हे केजरीवालांची साथ देत बळी पडणार्‍यांची खिल्ली उडवत राहिले. आज त्याचेच बळी व्हायची वेळ आली. 

डिसेबर २०१३ म्हणजे दिल्लीत कॉग्रेस पुरस्कृत केजरीवाल सरकार स्थापन व्हायचे होते, तेव्हा त्याच पक्षाचे एक आमदार विनोदकुमार बिन्नी धुसफ़ुसत होते आणि त्यांनी नंतर केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप केले होते. नंतर लोकसभा लढवायची वेळ आली तेव्हा अश्चिनी उपाध्याय नावाचे संस्थापक सदस्य तोच आरोप करताना दिसले. लोकसभा संपल्यावर शाझिया इल्मी यांनी केलेले आरोप वेगळे नव्हते. पक्षाच्या स्थापनेपुर्वी स्वामी अग्निवेश यांच्यावर आलेले बालंट आठवा. प्रत्येकवेळी अण्णा वा इतरांना पुढे करून आपल्या विरोधकांचा काटा केजरीवाल यांनी सराईतपणे काढला होता. पक्षस्थापनेच्या बाबतीत वा नंतर सत्ताग्रहण केल्यावर केजरीवाल यांच्याबद्दल किरण बेदी काय वेगळे बोलत होत्या? प्रत्येकाने तुसडा स्वभाव, एकांगीपणा व आपले तेच खरे करणारा हुकूमशाही वृत्तीचा माणूस; अशीच केजरीवाल यांची संभावना केलेली नव्हती काय? त्या सर्व घटनांचे यादव-भूषण जवळून साक्षिदार होते. जे इतर नाराज बघू शकले व तेव्हाच बोलले, तेव्हा यादव कशाला गप्प बसले होते? तर उद्या सत्ता मिळाल्यावर आणि विचाराधिष्ठीत पक्ष चालवायचा तर केजरीवाल यांना हट्टीपणा सोडावा लागेल, ही खुळी आशाच त्यांना गप्प ठेवत होती. आज त्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. पण कोणीही या दोघा नेत्यांवर सत्तालोभ वा मतलबाचे आरोप करू शकणार नाही. कारण तो त्यांचा स्वभावच नाही. तसे असते तर त्यांना नव्या पक्षात जाण्याची गरज नव्हती. केजरीवाल लोकांना माहित होण्याचय खुप आधीपासून यादव-भूषण यांना स्वत:ची ओळख मिळालेली आहे. कुठल्याही प्रस्थापित राजकीय पक्षात पायघड्या घालून त्यांच्यासारख्याचे स्वागत होऊ शकले असते. पण सत्तेचा मोह-लोभ नसल्यानेच एक वेगळा तत्वाधिष्ठीत राजकीय पक्ष उभा करण्याचे त्यांचे स्वप्न होते. त्यासाठी ते दोघे केजरीवाल यांच्या पोरकटपणा व मुर्खपणालाही साथ देत राहिले होते. मात्र केजरीवाल यांच्या मनात कुठलाही गोंधळ नव्हता. म्हणून त्यांनी उपयुक्तता असेपर्यंत या दोघांना खेळवले आणि उपयोग संपताच पक्षाबाहेर हाकलून दिलेले आहे. 

परिवर्तन, स्वराज, जनलोकपाल, भ्रष्टाचार निर्मूलन या सर्व गोष्टी म्हणजे केजरीवाल यांच्यासाठी निव्वळ बोलाची कढी व बोलाचा भात होता. म्हणूनच आंदोलनापासून सत्तेपर्यंत निव्वळ नाट्यमय कृतीतून लोकांना खेळवण्याचा प्रयोग केजरीवाल यशस्वीरित्या खेळत गेले. आता पाच वर्षे त्यांना हुकमी बहुमत मिळाले आहे आणि त्यापेक्षा त्यांना कसलीही अपेक्षा नाही. सामान्य जनताच नव्हेतर यादव-भूषण यांच्यासारख्या बुद्धीमंतांनाही शब्दांनी खेळवता येते आणि काम संपले की फ़ेकून देता येते, हे व्यवहारी केजरीवाल पक्के ओळखून आहेत. बाबा रामदेव, अण्णा हजारे यांचा असाच वापर करून इथवर मजल मारलेल्या केजरीवालना यादव-भूषण यांना बाजूला करणे फ़ारसे अडचणीचे नव्हते. त्यांची एकच गल्लत झाली. हे दोघे सभ्यपणे बाजूला होतील आणि आरोपांना घाबरून पळतील, ही अपेक्षा त्या दोघांनी फ़ोल ठरवली. उलट केजरीवाल यांचा गुंडगिरीच्या आधारे हुकूमशाही गाजवणारा चेहरा जगापुढे आणायचा त्या दोघांचा डाव मात्र यशस्वी झाला. अर्थात त्याची केजरीवालना फ़ारशी फ़िकीर नाही. हेतू साध्य होण्याशी त्यांना मतलब होता आणि पाच वर्षे त्यांना सत्तेचे अढळपद मिळालेले आहे. मग त्या पक्षाचे राजकीय भवितव्य काय असेल? त्यापासून काही राजकीय परिवर्तनाची अपेक्षा करता येईल काय? प्रथमच मुख्यमंत्री झाल्यावर विधानसभेत केजरीवाल यांनी केलेले भाषण आणि कालपरवा पक्षाच्या कार्यकारिणीतले भाषण, यातला जमीन अस्मानाचा फ़रक त्यांचे चरित्र स्पष्ट करणारा आहे. 

तेव्हा केजरीवाल म्हणाले होते, ‘प्रस्थापित पक्षांनी लोकाना भ्रष्टाचारमुक्त व सुसह्य कारभार दिला असता, तर आम्हाला राजकारणात कशाला यावे लागले असते? आमची औकात (लायकीच) काय? आम्हाला सत्ता नको आहे की कुठले लाभ नको आहेत. जिंकणे हरण्याला वा सत्ता टिकण्याला कवडीचे महत्व नाही. परिवर्तन व्हायला हवे आहे. जनलोकपालसाठी अशी शंभर मुख्यमंत्रीपदे कुर्बान.’ असेच सातत्याने केजरीवाल बोलत होते ना? त्याचीच री ओढत प्रशांत भूषण व योगेंद्र यादव बोलत होते ना? मग वर्षभरात कुठे घसरगुंडी झाली? अवैध मार्गाने जनलोकपाल विधेयक विधानसभेत मांडायचा पोरकटपणा करून केजरीवाल यांनी राजिनाम्याचा कांगावा केलेला होता. जे विधेयक मांडताच येत नाही, ते भाजपा-कॉग्रेसने मिलीभगत करून हाणून पाडल्याचा खोटाच दावा त्यांनी चालविला होता. त्यातला खोटेपणा या दोघा शहाण्यां नेत्यांनी एकदा तरी थांबवण्याचा प्रयत्न केला काय? यावेळी तर त्याच जनलोकपाल शब्दाचाही निवडणुकीत उल्लेख झाला नाही. उलट कार्यकर्त्यांना केजरीवाल म्हणतात, ‘हम यहॉ जितने आये है, हारने नही’. पण जिंकायचे कशाला होते, त्याचे स्मरण तरी त्यांना उरले आहे काय? बाकीचेही राजकीय पक्ष वर्षानुवर्षे राजकारण कशासाठी करीत आहेत? हरण्यासाठी की जिंकण्यासाठी? मग त्यांच्यात आणि आम आदमी पक्षात फ़रक तो काय उरला? तोही एक अन्य पक्षांसारखा सत्तेचा भुकेलाच पक्ष नाही काय? ज्याला जिंकायचे आहे आणि सत्ताही हवी आहे. कुठल्याही मार्गाने व साधनांनी सत्ता संपादन करायची आहे. मग त्याचे भवितव्य काय असेल? इतरांचे जे भवितव्य आहे, तेच याही पक्षाचे भवितव्य असणार ना? अर्थात प्रत्येक पक्ष जसा उच्च उदार तात्विक भाषणबाजी करतो, तशीच हा नवा पक्षही करणार आहे. त्यात परिवर्तन, भ्रष्टाचार निर्मूलन, जनलोकपाल, स्वराज अशा अदभूतरम्य कहाण्या कथन केल्या जातील. पक्षांतर्गत लोकशाही, पारदर्शकता इत्याची शब्दांची जपमाळ ओढली जाईल. मात्र त्यापैकी कशाचीही अपेक्षा लोकांनी बाळगू नये. झुलवणारे आकर्षक शब्द, यापेक्षा त्यांना मोल नसेल. 

अर्थात असे देशात प्रथमच होते असेही मानायचे कारण नाही. केजरीवाल गुडघ्यावर रांगत होते, तेव्हा १९७४ सालात गुजरातमध्ये भ्रष्टाचार विरोधातले नवनिर्माण आंदोलन विद्यार्थ्यांनीच छेडलेले होते आणि पुढल्या काळात त्यातले नेते जनता पक्ष वा कॉग्रेस यांच्यात विलीन होऊन संपलेही. १९८० च्या काळात त्याचीच पुनरावृत्ती इशान्येला आसाम राज्यात झाली होती आणि त्याचे नेते नवा पक्ष काढून थेट सत्तेवर येऊन बसले. मग त्याच सत्तेने त्यांच्यात इतकी हमरातुमरी माजली, की दहाबारा वर्षातच त्यांचा पक्ष नामशेष झाला. आता तर त्या पक्षाचे नामोनिशाण शिल्लक उरलेले नाही. तेव्हा प्रफ़ुल्लकुमार महंता हे नाव आजच्या केजरीवाल याच्यासारखेच तळपत होते. तीन दशकांनी महंता, भृगू फ़ुकन अशी नावे विस्मृतीत गेली आहेत. याचे कारण स्पष्ट आहे. नवनिर्माण वा आसामची विद्यार्थी चळवळ यांच्यापाशी कुठले स्वत:चे राजकीय तत्वज्ञान वा विचारसरणी नव्हती. नुसताच उत्साह आणि उतावळा आक्रमकपणा होता. त्यामुळे सत्ता आली वा यश मिळाले, तरी राजकीय सामाजिक वा आर्थिक धोरणे यांचा कुठेही पत्ता नसतो. मग जेव्हा जनतेला भेसडसावणारे गहन प्रश्न सोडवायची वेळ येते, तेव्हा थातूरमातूर काहीबाही केले जाते आणि दुरगामी काही करता येत नाही. परिणामी क्रमाक्रमाने लोकांचा अशा नेतृत्वाविषयी, पक्षाविषयी भ्रमनिरास होत जातो. मोठ्या अपेक्षेने त्यात सहभागी झालेले तरूण वैफ़ल्यग्रस्त होतात आणि अलिप्त होऊन जातात वा अन्य पक्षात आश्रयाला जातात. नेत्यांमध्ये सत्तालंपटतेने हमरीतुमरी बोकाळत जाते आणि तडजोडीची शक्यता असेपर्यंत पक्ष व काम चालते. नेत्यांमधला संयम व सोशिकता जितका काळ टिकून असते, तोपर्यंतच अशा पक्षाला भवितव्य असते. केजरीवाल यांच्याकडे बघता, तितका काळ या पक्षाकडे नाही. हा माणूस कमालीचा आत्मकेंद्री आहे. आपला शब्द प्रत्येकाने प्रमाण मानावा असे त्याला वाटते आणि दुसरी बाजू वा प्रतिकुल मत ऐकून घेण्याचा संयम त्याच्यापाशी नाही. सहाजिकच यादव-भूषण यांचे बळी घेतल्यावर त्याची हुकूमतीची भुक अधिक वाढणार आहे. किंबहूना कुठलेही लोकोपयोगी काम करण्यापेक्षा आपली हुकूमत पक्की आहे किंवा नाही, याचीच परिक्षा घेण्यात केजरीवाल यांची शक्ती व वेळ खर्ची पडणार आहे. 

यादव-भूषण यांच्यासारखे थंड डोक्याचे व विचारी सहकारी गमावल्याने त्यांचे नुकसान किती ह्याला अर्थ नाही. त्यापेक्षा अधिक नुकसान पक्षाचे व केजरीवाल यांचे होणार आहे. कारण आता त्यांच्याभोवती शिल्लक उरलेत ते तोंड्पुजे व आपमतलबी बोलघेवडे लोक आहेत. त्यांच्यात नेतृत्वाची कुवत नाही की समस्येवर ठोस उपाय शांतपणे शोधणारी बुद्धी नाही. प्रश्नाचे नेमके उत्तर देण्यापेक्षा प्रत्यारोप करून प्रश्नच नाकारणारे बुद्धीमंत नसतात आणि केजरीवाल यांच्या भोवती सध्या असलेल्या आशुतोष आशिष खेतान, संजय सिंग, कुमार विश्वास अशांची तेवढीच कुवत आहे. केजरीवाल सत्तेतला हिस्सा देतील याच आशेवर त्यांनी भोवती घोळका केलेला आहे. त्यापैकी ज्यांच्या पदरी काही पडेल, ते खुश होऊन आणखी भाटगिरी करतील. पण ज्यांना तशी संधी हुकेल, ते ज्याला पद वा संधी मिळाली, त्याच्या विरोधात जाऊन पक्षाला खड्ड्यात पाडायला कमी करणार नाहीत. थोडक्यात अशा सत्तालंपट कर्तृत्वहीन गोतावळ्यात केजरीवाल आता बंदिस्त होत चालले आहेत. त्यांना एका गट वा सहकारी नेत्याला पाठीशी घालताना, दुसर्‍याचा बळी घेतच वाटचाल करावी लागणार आहे. त्यातून मग आम आदमी पक्षाचे अधिकाधिक वस्त्रहरण जनतेसमोर होणार आहे. मग यादव-भूषण बाजूला झालो, म्हणूनच खुश असतील. कारण त्या दोघांवर अन्य कुठलेही आरोप होऊ शकले तरी सत्तालंपटतेचा आरोप होऊ शकत नाही. आपल्या परीने ते वेगळी चुल मांडतील, त्यांनी मांडवी सुद्धा. त्यामुळे आज त्या पक्षात निव्वळ कामासाठी आलेल्या निष्ठावान कार्यकर्त्याला मार्ग सापडू शकेल. त्याचा मूळ पक्षात कोंडमारा होणार नाही. त्याला सत्तालंपट भंपक लोकांच्या मागे फ़रफ़टावे लागणार नाही. भले या नव्या प्रयत्नांना केजरीवाल झटपट मिळवू शकले तितके यश मिळाणार नाही. पण राजकारणात मुलभूत परिवर्तन करण्याची इच्छाशक्ती जगवण्याचे महत्वपुर्ण कार्य त्यातून साधले जाऊ शकेल. पुढल्या दोनतीन दशके देशाच्या विविध क्षेत्रात नेतृत्व करू शकतील, अशा तरूणांना त्यातून उदयास येणे शक्य होईल. कारण केजरीवाल यांच्या हाती गेलेल्या पक्षाकडून ती अपेक्षा संपलेली आहे. लालू, नितीश वा मुलायम, मायावती, जयललिता इत्यादींचे पक्ष आहेत, तसा आता आम आदमी पक्ष हा दिल्लीतला एक प्रादेशिक पक्ष झाला आहे. दिल्लीबाहेर त्याला खर्‍या उद्दीष्टांवर उभे करणे यादव यांना अशक्य नाही. म्हणूनच दिर्घकालीन भारतीय राजकारणात यादव गटाला भवितव्य नक्की आहे. 

लक्षात घ्या, केजरीवाल यांना दिल्लीत रहायचे आहे आणि तिथली मिळालेली सत्ता मोलाची आहे. परिवर्तन वगैरे त्यांच्यासाठी विरंगुळ्याच्या गप्पा आहेत. यादव-भूषण यांच्यासाठी ते उद्दीष्ट आहे, तसेच देशभर पसरलेल्या तिसर्‍या पर्यायाची आशा बाळगणार्‍यांचेही उद्दीष्ट आहे. मात्र त्यांचा प्रस्थापित तिसर्‍या डाव्या म्हणवणार्‍यांवर विश्वास उरलेला नाही. ती भारतीय राजकारणातील दिर्घकालीन पोकळी आहे. ती भरायला वेळ लागेल. केजरीवाल यांच्या चेहर्‍याला पुढे करून लगेच भरता येईल हा यादवांचा खुळा आशावाद होता. तो भ्रम संपला हे चांगलेच झाले. खरे तर तीच अशा प्रयत्नातील त्रुटी होती. केजरीवाल यांनीच पुढाकार घेऊन यादवांच्या मार्गातला काटा दूर केला असेल, तर चांगलेच म्हणायला हवे ना? देशभरातील अन्य राज्यातील आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते गडबडले आहेत. पण त्यांना झटपट परिवर्तनाची घाई नाही. म्हणूनच यादव यांनी त्यांना हाताशी धरून पुढाकार घ्यायला हवा आहे. त्याला केजरीवाल यांचीही हरकत नाही, हा शुभसंकेतच म्हणायचा. कारण आपल्याला दिल्लीखेरीज बाहेर रस नाही, असे त्यांनी म्हणून ठेवलेच आहे. मात्र दिल्लीतही अशा मार्गाने जाऊन ते किती टिकतील त्याची शंकाच आहे.

 बहार, दै. पुढारी  (५/४/२०१५)

1 टिप्पणी: