गुरुवार, ५ एप्रिल, २०१२

सहन होत नाही आणि सांगता येत नाही




   दर्डाशेठचे राजपुरोहित निखिलशास्त्री वागळे यांचे एक सुभाषीत मला आज आठवले. हेमंतभटजी देसाई यांची स्मरणशक्ती सध्या कमालीची दुबळी झाली आहे. तेव्हा त्यांनाच कायबीइन लोकमतच्या होमहवनात अधूनधून आमंत्रित करणार्‍या, त्यांच्याच यजमान पुरोहिताचे ते सुभाषित त्यांना सांगणे मला भाग पडते आहे. स्मृतीभ्रंश झालेल्यांना मदत करणे, हे कुठल्याही नागरिकाचे कर्तव्य असते ना? मग हेमंतभटजींची स्मृती भ्रष्ट झाली असेल, तर त्यांना आपण आठवणी करून द्यायलाच हव्यात. म्हणूनच मी सतत त्यांना महाराष्ट्र टाईम्सच्या जमान्यातल्या शिरिष निपाणीकरची आठवण देत असतो. पण हेमंतभटजींची अवस्था शारदा नाटकातल्या ’अवघे पाऊणशे वयमान’ भटासारखी म्हणजे, ’फ़ुटले दोन्ही कान"सारखी झाली असेल तर आपण बोंबलून काय फ़ायदा? तेव्हा त्यांचे डोळे शाबूत असावेत, या अपेक्षेने मी त्यांना वाचायला जमावे अशी निखिलशास्त्रींची एक सुभाषितवजा आठवण सांगणार आहे. कारण ३ अप्रिलच्या ठोकपालमध्ये बिचारे हेमंतभटजी हातात वाडगा घेऊन उभे राहिले आहेत. हा वाडगा देखिल निखिलशास्त्रींचाच शब्द बर का. शिवाजीपार्क माहिमच्या एका कचेरीत बसून निखिलशास्त्री अविष्कार स्वातंत्र्यासाठी महायज्ञ करत होते, तेव्हाचे हे सुभाषीत होते. अधुनमअधून हेमंतभट्जीसुद्धा अलिकडेपर्यंत तिथे भिक्षुकी करायला नियमित जात असत. त्या ’महानगर’च्या १५ नोव्हेंबर १९९६ च्या अंकात वागळे शास्त्री लिहितात,

   ’अनेकांचा उपयोग (कपिल) पाटिल यांनी आपल्या आरोपांची पुष्टी करण्यासाठी करून घेतला आहे. पु. ल. देशपांडे, कुसुमाग्रज, गोविंद तळवलकर, मृणाल गोरे, विजय तेंडूलकर यांनाही त्यात खेचलं आहे. सहानुभूतीचा वाडगा फ़िरवल्याने आपल बाजू मजबूत होईल, असं त्यांना वाटत असावं. पण ज्याचे पाय मातीचे आहेत त्याला हा वाडगा किती काळ पुरणार? चारित्र्यवान माणसापाठी लपून बदमाश नेहमीच आपले धंदे करत असतात.’

   हेच ते सुभाषित आहे. आता ते हेमंतभटजींसाठी कसे लागू पदते? तर त्यांनी ३  एप्रिल २०१२ रोजी ठोकपाल लिहितांना अशीच बदमाशी केली आहे. त्यासाठी एका चारित्र्यवान माणसापाठी ते लपले आहेत. तो माणुस कोण? काय लिहिटात हेमंतभटजी? हाजी मस्तानचे श्राद्ध घालण्यासाठी आरंभलेल्या कार्यात ते पुटपुटतात,  

   ’समाजवादी विचारसरणीचे असूनही मधूजी (दंडवते) उर्फ़ नाना हे अर्थव्य्वस्थेतील व्यवहारीक समस्यांचा विचार करणारे होते. अत्यंत स्वच्छ चारित्र्य हा त्यांचा आणखी एक गुण. सध्या सटरफ़टर लोकही समाजवाद्यांवर चिखलफ़ेक करत असून, म्हणुनच या बाबींचा मुद्दाम उल्लेख केला.’

   शाब्बास भटजीबुवा. हे सटरफ़टर कोण? समाजवाद्यांवर मीच तर एकटा टिका करतो आहे. ती या भटजींना चिखलफ़ेक वाटली तर नवल नाही. माझा आक्षेप आहे तो चिखल शब्दाला नसून फ़ेक या शब्दाला आहे. जे स्वत:च चिखलात रहातात व त्यातच डूंबत असतात, त्यांच्यावर तो फ़ेकण्याची गरजच काय? पण तो मुद्दा नंतर बघू. इथे मधूजी उर्फ़ नानांना मध्ये कशाला आणायचे? त्यांच्या चारित्र्याबद्दल कोणी सवाल विचारला आहे? शिरीश निपाणीकर याने खंडणीखोरी केली, तेव्हा मधूजी उर्फ़ नाना दंडवते महाराष्ट्र टाईम्समध्ये मुख्य उपसंपादक नव्हते; तर हेमंतभटजी तिथे खर्डेघाशी करत होते. आणि मी त्याच भटजींकडे बोट दाखवले आहे. त्यांनी मधूजींच्या मागे कशाला लपावे? की निखिलशास्त्री म्हणतात तसा हेमंतभटजी मधु्जींच्या मागे लपून आपले धंदे करत होते? हा वाडगा घेऊन काय होणार? समाजवाद्यांवर चिखलफ़ेक करायला ते उरलेत किती?

   मागल्याच आठवड्यातली गोष्ट आहे. अशोक सासवडकर हा आमचा समाजवादी मित्र अकस्मात निधन पावला. त्याने देहदान केले होते. त्याच्या अंत्यदर्शनासाठी आम्ही त्याचे जुने मित्र परिचित जेजे र्ग्णालयात जमलो होतो. तो विधी पार पडल्यावर भायखळा स्टेशनकडे चालत आलो. एका हॉटेलात चहा घ्यायला बसलो असताना, केतन मसदेकर म्हणाला, हल्ली आपण असेच कुणी गेला, मग भेटत असतो. बाकी काही होतच नाही एकत्र यायला. थोडक्यात समाजवादी हा वाघ वा सिंह यांच्याप्रमाणे दुर्मिळ प्राणी बनला आहे. त्याच्यावर चिखलफ़ेक केली तर कदाचित मला वनविभागाकडून अटक होण्याचा धोका आहे. ते पाप मी कशाला करीन? अर्थात त्यात मला आश्चर्य वाटत नाही. कारण तसे भाकित मी १९७९ सालात समाजवाद्यांचे मठाधीपति डॉ. जी. जी. पारिख यांच्या उपस्थितीत ताडदेवच्या युसूफ़ मेहरअली शाळेच्या सभागृहातच केले होते. तेव्हा मी विनोद म्हणुन तसे एका सभेत बोललो होतो.

   जनता पक्षातल्या जनसंघीयांच्या कारवायांबद्दल बोलण्यासाठी बोलावलेल्या या जनता पक्षिय समाजवाद्यांच्या छुप्या सभेत कोणी संघ वा जनसंघाचे नाव घेऊन उघड बोलत नव्हता. ’ते लोक’ असे बोलले जात होते. तेव्हा मी उभे राहुन विचारले, ज्यांच्याबद्दल तक्रार आहे, त्यांचे नाव घ्यायला का घाबरता? सरळसरळ नावे घ्या की. तेवढेही अशा फ़क्त समाजवाद्यांच्या खाजगी बैठकीत धाडस नसेल, तर पुढल्या दहा वीस वर्षात पाच पन्नास समाजवादी शिल्लक उरणार नाहीत. आणि जे उरतील ते रस्त्यावर दिसणार नाहीत. दुर्मिळ वस्तू म्हणुन त्यांना वस्तुसंग्रहालयाच्या कपाटात बंद करून ठेवले जाईल. त्यावर सर्व हसले होते. तर जीजी म्हणाले, एवढी वाईट परिस्थिती होणार नाही. माझा तो विनोद आज वास्तव बनला आहे. कारण चिखलफ़ेक करायला सुद्धा समाजवादी औषधाला शिल्लक उरलेले नाहीत.  

   सांगायचा मुद्दा इतकाच, की तेव्हा या सटरफ़टर हेमंत भटजींची मुंज तरी झाली होती की नाही, याची मला शंका आहे. आज ते मोठा आव आणून मला समाजवादाची परवचा शिकवायला निघालेत; म्हणून ही त्यांची सगळी वंशावळ सांगण्याची वेळ माझ्यावर आली. मधूजी उर्फ़ नाना तेव्हा जनता पक्षा़च्या सत्तेत रेल्वेमंत्री होते. त्यांनी मांडलेल्या पहिल्याच रेल्वे अर्थसंकल्पाच्या विरोधात त्यांच्याच समाजवादी नेत्या मृणाल गोरे यांनी चर्चगेट्वर निदर्शने केली होती. पण तो इतिहास या भटजींना वाचूनसुद्धा आठवणार नाही. तेव्हा मधूजी उर्फ़ नाना यांचे कौतुक हेमंतभटाने मला सांगण्या्चे काही कारण नाही. मी त्यांच्यावर थेट शिरिष निपाणीकर खंडणी प्रकरणाचा आरोप अनेकदा केला आहे. त्याच्यावर मधू दंडवते यंचे पाघरूण घालायचे कारण काय? मी दंडवते यांच्यावर आरोप केलेले नाहीत वा त्यांच्या चारित्र्यावर शंका उपस्थित केलेल्या नाहीत. हेमंत भटजींना ते हवे असेल तर वेळ आल्यावर तेसुद्धा जरुर करीन. नानांचे नाना गुण व चरित्र्य जरूर लोकांसमोर मांडल्याशिवाय रहाणार नाही. मग हेमंत भटजी कुठले उपरणे पांघरणार आहेत?  

   असो. मुद्दा इतकाच की त्यांचेच निखिलशास्त्री सांगतात, त्या सुभाषिताप्रमाणे हेमंतभटजी मधूजी नावाचा वाडगा घेऊन कुठवर सहानुभूतीची भिक मागणार आहेत? तो फ़ारकाळ पुरत नाही असे निखिलचे निदान आहे. हेमंत भटजींचे पाय मातीचे आहेत त्यामुळेच थोडे पाणी पायाला लागले, मग त्यांच्या पायाचा चिखल होऊ लागतो. ते चिखलात गडबडा लोळू लागतात. त्यांच्यावर कोणी चिखलफ़ेख करण्याची गरजच नाही. चिखलापासून त्यांना आपले मातीचे पाय वाचवायचे असतील, तर त्यांनी कुंभाराच्य भट्टीत आपले ते मातीचे पाय चांगले भाजून घ्यावेत. मग पाणी लागले म्हणुन त्याचा चिखल होणार नाही. आणि दुसर्‍या कुणावर चिखलफ़ेकीचा आरोप करावा लागणार नाही.

   हेमंत देसाईसारख्या अर्धवटरावांसाठी आमचे एक मित्र दत्तू आंबेरकर नेहमी एक किळसवाणे उदाहरण द्यायचे, ते या हेमंतभटजींना छान लागू होते. ’नवा कावळा शेंबूड खायला शिकतोय’ असे दत्तू म्हणत. ज्यांनी हे किळसवाणे दृष्य बघितले असेल, त्यांना त्याचा नेमका अर्थ कळू शकेल. तो अत्यंत बुळबुळीत पदार्थ त्याच्या चोचीत येत नसतो आणि त्याला त्यासाठी जी घाणेरडी कसरत करावी लागते, तशी हेमंतभटजी आपल्या फ़सव्या बुद्धीवादाची व बिनबुडाच्या युक्तीवादाची कसरत करत असतात. आपल्या खोटेपणाचा खुलासा देता येत नाही, त्याचा बचाव करता येत नाही. लिहिले वा थापा मारल्या त्या सिद्ध करता येत नाहीत आणि गप्पही रहाता येत नाही अशी त्यांची चमत्कारिक अवस्था झालेली आहे. एक जाहिरात आते ना? ’सहन होत नाही आणि सांगता येत नाही’ त्यापेक्षा ही स्थिती वेगळी आहे काय? खाजवत रहा हेमंतभटजी.  (क्रमश:)
 भाग   ( २२७ )       ६/४/१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा