माध्यमात गेल्या काही वर्षात अब्जावधी रुपयांची नवी गुंतवणूक आली. अशी काय मोठी कमाई या धंद्यात आहे, की त्यात इतक्या मोठ्या प्रमाणात पैसा गुंतवायला लोक पुढे यावेत? त्याचे कारण आपल्याला चौथ्या खांबामध्ये लपलेले आढळू शकते. माध्यमे लोकमत बनवू शकतात व बिघडवू शकतात. त्यांच्यावर सत्ता व राजकारणाचे वर्चस्व चालू शकत नाही, असे आढळून आल्यावर पैसेवाल्यांनी यात गुंतवणूक सुरू केली. एका बाजूला लोकहिताचे नाटक करून, दुसरीकडे या माध्यमांचा राजकीय सत्तेवर दडपण आणायला उपयोग होऊ शकतो याचा साक्षात्कार त्याला कारणीभूत झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा मुळ नागरिक असलेला मर्डोक ब्रिटीश वृत्तपत्रे व माध्यमांवर कब्जा मिळवून, एकेकाळच्या या जागतिक साम्राज्याच्या सत्ताधीशांना मुठीत ठेवू शकला; हे चौथ्या खांबातील गुंतवणुकीचे खरे रहस्य आहे. या माध्यमांना साधन वा हत्यार बनवले तर भल्याभल्यांना वेठीस धरता येते, याचा लागलेला शोध या अफ़ाट गुंतवणूकीचे खरे कारण आहे. या चौथ्या खांबाला कुठलाही कायदेशीर लगाम नाही. पण तो हातात असला, तर लोकशाहीच्या उर्वरीत तिन्ही खांबांना ओलिस ठेवता येते, असे अलिकडल्या काळात दिसून आले आहे. तुलनेने त्यासाठी खुप कमी गुंतवणुक करावी लागते आणि अधिक लाभ अन्य उद्योगात उपटता येतात, याची जाणीवच त्या गुंतवणुकीचे खरे कारण आहे.
शेवटी आज सर्वत्र कायद्याचे राज्य असते. म्हणजे प्रत्यक्षात जे राज्य करतात वा सरकार चालवतात, त्यांच्याच हातात कायद्याचे राज्य असते. त्यांना वाकवता आले किंवा मुठीत ठेवता आले, तर कायद्याने वाटेल ते करून घेता येते. राजकीय वा सार्वजनिक क्षेत्रात वावरणारे प्रसिद्धीला हावरे असतात, तसेच विपरित प्रसिद्धीला घाबरून असतात. ते काम चौथा खांब करू शकत असतो. शेवटी हा चौथा खांब म्हणजे तरी काय असते? तिथे राबणारे मुठभर विद्वान व शहाणेच असतात ना? त्यांच्यापाशी वाचाळता खुप असली तरी त्यांच्या गरजा खुपच कमी असतात. मग त्यांना खरेदी केले आणि आपले पाळीव शिकारी बनवले, तर कुणालाही वाकवता येते. त्याच भावनेने आज अनेक भांडवलदार माध्यमात घुसलेले आहेत. त्यांचे काम कसे चालते, त्याचे वर्णन निखिल वागळे यांनी दर्डा कंपनीच्या सेवेत रुजू होण्यापुर्वी करून ठेवलेले आहे. ते त्यांच्याच शब्दात वाचण्यासारखे आहे.
"मुकेश पटेल आणि लालसिंग राठोड हे काही साधूसंताचे अवतार नव्हेत. कोणतीही लायकी नसताना पैशाच्या जोरावर राजकीय महत्वाकांक्षा जोपासणारी ही माणसं आहेत. ’ऑटोरायडर्स’ नावाची पाचशे कोटींचा व्यवहार असलेली कंपनी मुकेश पटेल यांच्या नावावर असली, तरी हे साम्राज्य काही सरळ मार्गाने उभं राहिलेलं नाही. मुकेश पटेलचे एक भाऊ अमरिश पटेल कॉगेसचे आमदार आहेत आणि दुसरे एक नातेवाईक प्रफ़ुल्ल पटेल कॉग्रेसचे खासदार आहेत. धुळे जिल्ह्यात रॉकेलचा प्रचंड भ्रष्टाचार करून या पटेल कुटुंबियांनी आपली संपत्ती गोळा केली आहे. अलिकडेच धुळ्याचे जिल्हाधिकारी मधुकर कुटे यांनी या भ्रष्टाचाराची चौकशी करून पटेल बंधूंच्या तोंडाला फ़ेस आणला होता. शेवटी ठाकरे यांच्याकडे असलेलं आपलं वजन वापरून मुकेश पटेल यांनी कुटे यांची बदली केली आणि हे प्रकरण दडपण्य़ात आलं. सत्तेत असलेल्या माणसांचा उपयोग करून आपले खिसे भरणं आणि त्यायोगे प्रतिष्ठा मिळवणं; हा या पटेल मंडळींचा खरा धंदा आहे. म्हणूनच कॉग्रेसचं राज्य असताना ते शरद पवारांच्या जवळ होते आणि आज शिवसेनाप्रमुखांच्या जवळ आहेत. विलासराव देशमुखांच्या रंगणार्या मैफ़लीतही मुकेश पटेल पुर्वी असायचे. तिथेच त्यांची लालसिंग राठोड या तिसर्या दर्जाच्या माणसाची ओळख झाली. आपल्या राजकीय संबंधांच्या जोरावर बड्या लोकांची कामं करून द्यायची आणि वेगवेगळे लाभ मिळवायचे हा दलालीचा धंदा राठोड यांनी गेली अनेक वर्षे केला आहे. अशा माणसांनी ’आज दिनांक’ला पैसा पुरवायचं ठरवलं, ते काही पत्रकारितेच्या उद्धाराच्या हेतूने नक्कीच नव्हे. राजकीय महत्वाकांक्षा असलेल्या पटेल-राठोड यांच्यासारख्या माणसांना वृत्तपत्राचा अनेकांगी उपयोग असतो. एक तर फ़ुकटची प्रतिष्ठा त्यामुळे मिळते आणि वेळीप्रसंगी विरोधकांना ब्लॅकमेलींगही करता येतं. पुन्हा वृतपत्र असल्याने आपल्या नेत्याकडे या माणसाचं वजन वाढतं, ते वेगळंच. ’आज दिनांक’चा जन्म झाला तो काळ इथे लक्षात घ्यावा लागेल. शरद पवारांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप तेव्हा होत होते आणि पत्रकारांविषयीच्या भूमिकेमुळे ठाकरेही पुरेसे बदनाम झाले होते. त्यामुळे या सायंदैनिकाचा जन्म या दोन्ही नेत्यांच्या सोयीचा होता. त्याचाच फ़ायदा मुकेश पटेल यांनी उठवला असावा. पुढे पटेल खासदार झाले आणि लालसिंग राठोड आमदार. राठोड यांना आमदार बनवताना मोठ्या प्रमाणावर खरेदी विक्री झाली. त्यावेळी या सायंदैनिकाच्या संपादकांनी (पुढे शिक्षक मतदारसंघातून आमदार झालेले कपिल पाटिल) आणि काही वार्ताहरांनी मह्त्वाची भूमिका बजावली. पत्रकारितेशी कोणताही संबंध नसताना लालसिंग राठोड स्वत:ला व्यवस्थापकीय संपादक म्हणवून घ्यायचे. त्या जोरावर ते मंत्रालयात कोणत्याही मंत्र्याच्या केबिनमध्ये घुसायचे आणि आपले दलालीचे व्यवहार पार पाडायचे. अशा माणसाकडून वृत्तपत्रिय स्वातंत्र्याची, अविष्कार स्वातंत्र्याची अपेक्षा करणं म्हणजे वेश्येकडून पातिव्रत्याची अपेक्षा करण्यासारखं आहे. अशी माणसं वृत्तपत्राला आपल्या गरजेप्रमाणे वळवणार, वाकवाणार आणि वेळप्रसंगी मोडुन खाणार, हे ओघानेच आलं. त्यांचा भ्रष्ट पैसा घेतानाच ही गोष्ट आज दिनांकच्या संपादकांच्या लक्षात यायला हवी होती. असंगाशी संग करायचा आणि एडस झाला म्हणुन बोंब मारायची, याला काय अर्थ आहे? "
आज दिनांकच्या संपादकांना जो उपदेश निखिलने सोळा वर्षापुर्वी केला, त्याचे पालन त्यानेच केले असते तर त्याच्यावर आज तशाच "सेवेत" रुजू व्हायची पाळी कशाला आली असती? आज ज्या नेटवर्कमध्ये निखिल अविष्कार स्वातंत्र्याच्या डरकाळ्या फ़ोडत असतो, त्याला त्याच पद्धतीच्या रिंगमास्टरच्या सर्कशीतला सिंह म्हणतात. शुक्रवार २५ ऑक्टोबर १९९६ च्या "आपलं महानगर" दैनिकात निखिलने लिहिलेल्या कॅलिडोस्कोप स्तंभातला हा उतारा आहे. त्यातला एकतरी शब्द त्याला आठवतो काय? त्यात कपील पाटिल याला जे इशारे निखिल देत होता, त्याला तोच आज बळी पडला आहे काय? बाकीच्या गोष्टी सोडुन द्या. त्यात वृत्तपत्र मालकीचे जे लाभ निखिल सांगतो, त्यापैकी त्याने किती वापरले? मंत्रालयातल्या गोष्टी सोडुन द्या. पण विरोधकांना ब्लॅकमेलींग करण्यासाठी वृत्तपत्राचा वापर हो्तो, हे सर्वप्रथम निखिलनेच जगासमोर आणलेले सत्य आहे. ते स्वानूभवातून आलेले ज्ञान आहे काय? कारण निखिलपुर्वी कुठल्या संपादकाने याचा असा जाहीर उल्लेख केलेला नव्हता. पण इवलेसे वृत्तपत्र काढून त्याच्या बळावर निखिलने जी मजल मारली, त्यातून अनेक नव्या लोकांना माध्यमात मोठी गुंतवणुक करण्यातले लाभ नक्कीच कळले असणार. जर निखिल आपल्या वडीलांच्या निवृत्ती निधीमधून मुठभर पैसे भांडवलासाठी घेऊन इतकी राजकीय दादागिरी करू शकत असेल, तर करोडो रुपये गुंतवून किती दबदबा निर्माण करता येईल; हे पैसेवाल्यांच्या लक्षात आले असावे. या एकाच परिच्छेदात निखिलने माध्यमात किंचित गुंतवणूक करून केवढे अफ़ाट लाभ उकळता येतात, त्याचा पाढाच वाचला आहे. तो चौथ्या खांब वा अविष्कार स्वातंत्र्याच्या संघर्षाचे विवरण आहे काय? अजिबात नाही ना? तर माध्यम, वृत्तपत्र व पत्रकारिता कशी राजकीय दादागिरी व ब्लॅकमेलींगसाठी उत्तम हत्यार आहे, त्याचा तो दाखलाच आहे ना?
निखिल वागळे व त्यांच्या सेक्युलर गोतावळ्यात वावरणारे पत्रकार नेमकी काय पत्रकारिता मागील दोन दशके करीत आहेत, त्याची ही ऐतिहासिक नोंद आहे. म्हणूनच असे लेख व स्तंभलेखन मी जपून ठेवलेले असते. लोकशाहीच्या चौथ्या खांबाला कशी वाळवी लागली आहे व त्यातली कीड कुठे आहे; त्याचा हा पुरावा आहे. आज सगळीकडे करोडो रुपये ओतून भांडवलदार निखिल. राजदीप, बरखा दत्त, इत्यादींना का पोसतात वा या तोट्यातल्या धंद्यात गुंतवणूक का करून बसले आहेत, त्याचे रहस्य असे खुप आधीच उलगडलेले आहे. मी फ़क्त ते शोधून वाचकांसमोर आणून ठेवले आहे. एक रुपयात वा अगदी फ़ुकट घरोघरी वृत्तपत्र पोहोचते करायला, आजचे गुंतवणूकदार का धडपडत आहेत, त्याचे उत्तर निखिलच्या या उपदेशात सापडते ना? (क्रमश:)
भाग ( २४५ ) २४/४/१२