१९७० च्या आसपासची गोष्ट असेल. प्लाझा सिनेमाच्या समोर खांडके बिल्डींगच्या परिसरात तेव्हा समर्थ विद्यामंदीर नावाची माध्यमिक शाळा होती. तिच्याच एका वर्गामध्ये एक छोटासा समारंभ होता. माझा रुपारेल कॉलेजमधला मित्र शशिकांत लोखंडे याने लिटल मॅगझिन चळवळीत उडी घेतली होती. त्याने काही मित्रांसमवेत छापलेले पुस्तिकावजा ‘गारुडी’ नामक अनियतकालिक तिथे प्रकाशित व्हायचे होते. महर्षी दयानंद कॉलेजातील मराठीचे प्राध्यापक केशव मेश्राम यांच्या हस्ते तो प्रकाशन समारंभ व्हायचा होता. मोजून अठरा वीस लोक तिथे उपस्थित होते. शाळकरी मुलांसाठी असलेल्या बाकावर आम्ही मंडळी कशीबशी सामावलो होतो. त्यात एक अजिबात वेगळा वाटणारा इसम होता. कारण तो बाकीच्या विद्यार्थी वा तरूणांपेक्षा भिन्न दिसणाराही होता. कुठल्या इराणी हॉटेलातला वेटर वा टॅक्सी ड्रायव्हर दिसणारा हा कोण, असा प्रश्न मला सतावत होता. पण लौकरच त्याची ओळख झाली, म्हणजे करून घ्यावी लागली. कारण प्रकाशनाच्या निमित्ताने मेश्राम बोलू लागले आणि याने त्यात अडथळे आणायला सुरूवात केली. मुद्दे काय होते, ते मला आज आठवत सुद्धा नाहीत. पण मेश्राम यांच्यासारख्या विद्वान प्राध्यापकाशी हुज्जत करू शकतो असा हा ‘आम आदमी’ मला तत्क्षणी भावला होता. मग कसाबसा त्याला गप्प करून समारंभ उरकला आणि आम्ही सगळेच पांगलो. ती माझी आणि नामदेव ढसाळ याच्याशी झालेली पहिली भेट. नुसती नावाची देवाणघेवाण यापेक्षा जास्त काहीच नाही.
मग दोनचार महिन्यांनी ताडदेवच्या जनता केंद्रात एक कविसंमेलन योजलेले होते. तिथे मी पत्रकार म्हणून हजेरी लावली. त्यात राजा ढाले, सतीश काळसेकर, तुळशी परब, गुरूनाथ सामंत, चंद्रकांत खोत अशी त्या काळातली बंडखोर कवी मंडळी उपस्थित होती. त्यातही हा ‘इसम’ म्हणजे नामदेव ढसाळ होताच. किंबहूना त्या नवकवींच्या गोतावळ्यात तेवढाच एक माझ्या परिचयाचा चेहरा होता. तेव्हा मी ‘मराठा’ दैनिकात नव्याने उमेदवारी करीत होतो. त्या कवीसंमेलनाची बातमी दिली मग विषय संपला असता. पण त्याच विषयावर ‘मराठा’च्या रविवार पुरवणीचे संपादक आत्माराम सावंत यांच्याशी बातचित झाली. अधिक ज्येष्ठ सहकारी नारायण पेडणेकर याच्याशी हुज्जतही झाली. तेव्हा सावंतांच्या आग्रहाखातर मी त्याच कवीसंमेलनावर एक छोटेखानी लेख लिहिला होता. त्याचे शिर्षक आजही नेमके आठवते. ‘प्रस्थापिताविरुद्ध प्रस्थापित होण्यासाठी नवकवींनी पुकारलेल्या बंडाची एक रात्र’. या लेखाने अनेक नवकवींचे भाऊ तोरसेकर या व्यक्तीकडे लक्ष गेले. त्यापैकी उत्साहात मला भेटायला आलेला कवी म्हणजे नामदेव ढसाळ. नारायण पेडणेकरला माझ्या कामाची वेळ विचारून नामदेव ‘मराठा’ कार्यालयात भेटायला आला. आणि पहिल्या भेटीतच थेट अरेतुरे करून त्याने मैत्री पार जुनीपुराणी करून टाकली. आजही तो दिवस तितकाच आठवतो. कारण तो बेकार आणि मी तेव्हा नवशिका. त्यामुळे त्याने गळी पडून नारायण पेडणेकरला आमच्या भेटीसाठी हॉटेलचा भुर्दंड दिलेला होता. अंगावर व अंगभर कपडे घातलेला नामदेव कायम असाच पारदर्शक होता. साडेचार दशकात मग अधूनमधून आम्ही किती भेटलो वा नाही भेटलो. म्हणून कुठलाही फ़रक पडला नाही. त्याच्यातला नितळ माणूस कधी बदलला नाही.
त्यानंतर नामदेवशी त्या तरूण वयात सतत संपर्क होत राहिला. कारण तो कायम अस्वस्थ आत्मा असल्यासारखाच जगत होता. दलित पॅन्थर ही संघटना त्याने स्थापन केली, तरी तो कधी संघटनात्मक बंधनात अडकून पडणारा नव्हता. संघटनेत एकांडी शिलेदारी चालत नाही. दहा पंधरा लोकांच्या सहमताने गोष्टी घडत असतात वा घडवल्या जात असतात. पण नामदेव कवीमनाचा नव्हता, तर तो साक्षात स्वत:चे एक काव्य होता. ते एक कल्पनारम्य व्यक्तीमत्व होते. त्यामुळेच त्याला शब्दात, धोरणात वा विचारात बंदिस्त होणेच शक्य नव्हते. त्यामुळेच राजकारण, समाजकारण वा साहित्य अशा प्रस्थापित चौकटीत अडकणे त्याला शक्यच नव्हते. ते त्यालाही ठाऊक होते. पण त्याला अशा बंधनात अडकण्याची हौस होती. पण अल्पावधीतच त्याचा त्यातून भ्रमनिरास व्हायचा. जितक्या गतीने जग बदलावे, असा त्याचा अट्टाहास असायचा, तेवढ्या वेगाने जग धावत नाही, ही वेदना त्याच्या बोलण्यातून प्रक्षोभातून नेहमी व्यक्त व्हायची. त्या काळात मला आठवते आम्ही विविध संघटनांनी व्हिएटनामवरील अमेरिकन बॉम्बहल्ल्याच्या निषेधार्थ एक मोर्चा काढला होता. त्यानंतर मोर्चा यशस्वी झाल्याने आमचे सगळे मित्र खुश होते. पण सगळे पांगले आणि आम्ही दोघेतिघेच म्हणजे नामदेव, कमलाकर सुभेदार आणि मी राहिलो. तेव्हा त्याचा वैताग उफ़ाळून आला. तो म्हणाला, ‘साला काय घंटा मिळाले? आपली खाज भागली मोर्चा काढायची. पुढे काय? भावड्या आपल्या देशात महात्मे खुप झाले रे, पण हो चि मिन्ह जन्माला आला नाही.’ कमलाकर आणि मी; आम्ही दोघे त्याच्याकडे बघतच राहिलो.
एका बाजूला कवी म्हणून अविष्कृत व्हायला उतावळा असलेला नामदेव राजकीय व्यवस्थाही उलथून पाडायला तितकाच उतावळा असायचा. नुसत्या शब्दापुरता तो जगावेगळा नव्हता. स्वभावानेही तो वेगळाच होता. त्याच्या कविता वा शब्दातून त्याला दलित कवी, साहित्यिक असे का म्हटले जाते; त्याचे मला नेहमी आश्चर्य वाटत राहिलेले आहे. त्याला जितके बाबासाहेबांचे आकर्षण होते, तितकेच जगभरच्या प्रत्येक क्रांतीकारकांचे अप्रुप होते. त्याच्या शब्द व अविष्कारातून वर्णवर्चस्ववाद, जातीभेदाविषयीचा संताप व्यक्त व्हायचा; त्यापलिकडे त्याचा आवेश विषमतेच्या विरोधातला असायचा. जन्माधिष्ठीत अन्यायाच्या विरोधातला त्याचा आवाज कुठल्याही अन्यायाच्या विरोधात तितकाच बुलंद असायचा. पण त्या राग प्रक्षोभात कुठलीही वैरभावना वा द्वेष नसायचा. कुठल्या व्यक्ती वा जातीपंथाच्या विरुद्ध त्याने कधीच शत्रूत्व केले नाही. त्याच्या वागण्यातून सतत जाणवायचे, की नामदेव कुणाही व्यक्ती वा संघटना पक्षाकडेही प्रवृत्ती म्हणूनच बघायचा. त्या व्यक्ती वा संघटनेला त्याचा विरोध त्या प्रवृत्तीपुरता असायचा. एकदा त्या भूमिका बाजूला ठेवल्या, मग तीच व्यक्ती नामदेवसाठी मित्र असू शकायची. त्यासाठी आपले आग्रह वा हट्ट नामदेवला सोडावे लागायचे नाहीत. क्रांती वा बंडखोरीचा चेहरा म्हणून जसे आपण नामदेवकडे बघू शकतो; तितकाच तो निष्पाप निरागसतेचा चेहराही होता. त्याची प्रचिती नामदेवच्या बोलण्यात, लिहिण्यात वा कवितेतल्या अपशब्दातून येते. अन्यथा जे शब्द आपण गैरलागू वा अपशब्द म्हणून टाळतो, तेच शब्द नामदेवने बोलावेत किंवा लिहावेत, त्यांचा नूर बदलून जातो. ज्या ओघात ते शब्द नामदेवच्या रचनेत वा मांडणीत यायचे, त्यांची जागा इतकी नेमकी व आशयपुर्ण असते, की त्यात तुम्ही काहीही गैर शोधूही शकत नाही.
एकदा मी आक्रमक वा भडक बोलणार्या लोकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यात नामदेवचाही समावेश होता. त्यात त्याने दिलेले स्पष्टीकरण सर्वात अप्रतिम होते. जी भाषा माझ्या आईकडून शिकलो वा माझ्या गोतावळ्यात सहजगत्या वापरली जाते, ती अश्लिल कशी? त्याचा हा सवालच निरूत्तर करणारा होता. पण पुढे एकदा गहन बोलताना त्याने मला अपशब्द वा सभ्य शब्द यातला फ़रक उलगडून सांगितला, शब्द निर्जीव असतात, त्यांच्यातला आशय ओळखता आला नाही, तर शब्द व भाषाच निरूपयोगी होऊन जाते. शब्दांना हेतू नसेल, तर त्यांना अर्थच नसतो. शिवी वा अपशब्दामागचा हेतू इजा करण्याचा नसेल, तर त्यांना अपशब्द कोणी कशाला म्हणावे? माय पोराला लबाड म्हणते, तिच्या मायेकडे काणाडोळा केला, तर तिने वापरलेला शब्दच निरर्थक होतो. कारण त्या शब्दातली माया ती प्रकट करत असते. भावड्या जन्मदातीची माया बघायची नसेल, तर तिचे शब्द ऐकायचे तरी कशाला?
अनेकांना प्रश्न पडतो, की असा हा नामदेव ढसाळ मस्त पैसे मिळवायचा, ऐष करायचा, चैनीचेही जीवन जगला, तर त्यावेळी त्याच्यातला क्रांतीकारक कसा बहकला? मलाही आरंभीच्या काळात तसेच वाटलेले आहे. काही लब्धप्रतिष्ठीतांच्या नादी लागलेला व ऐषोरामाच्या गुंत्यात अडकलेला नामदेव आपल्यातला बंडखोराचा गळा घोटून मोकळा झाला, असेच मलाही अनेकदा वाटलेले आहे. त्याने केलेल्या राजकीय कसरती वा तडजोडी, उलथापालथी सौदेबाजीसारख्या होत्या, हे कोणी नाकारू शकणार नाही. माझे असे प्रामाणिक मत आहे, की त्यासाठी नामदेवने स्वत:ला बदलण्याचा खुप कसोशीने प्रयासही केला. त्यानेही सुखवस्तू सुरक्षित जीवनाच्या वळचणीला जाण्य़ाचा प्रयास केला, यात शंका नाही. पण नामदेव त्यात कितीसा रमला? चार दशकांपुर्वी मला भेटलेला तो सामान्य ‘इसम’ वरवर बघता कुठल्या कुठे बेपत्ता झाला असेच वाटू शकते आणि मलाही अनेकदा तसेच वाटले सुद्धा. पण त्यानंतर जेव्हा केव्हा अकस्मात तो भेटायचा, तेव्हा आलीशान गाडीतून उतरणारा वा त्यात बसलेला नामदेव असा सामोरा यायचा, की तो तसूभरही बदललेला नाही, याची खात्री व्हायची. २००४ सालातली गोष्ट त्यातला शेवटचा अनुभव होता.
शिवसेनेशी त्याची दोस्ती होती. त्या विधानसभा निवडणूकीत त्याला सेनेने दोन जागा सोडल्या होत्या. त्यापैकी नागपाडा मतदारसंघात नामदेव स्वत:च उभा रहाणार होता. मात्र दक्षीण कराडमध्ये त्याला कोणी उमेदवार सापडत नव्हता. अपरात्री त्याने मला फ़ोन केला. म्हणाला तिथे कोणी उमेदवार मिळेल काय? मी पण थक्क झालो. इतक्या दिर्घकाळानंतर याला माझी अशा अजब कामासाठी कुठून आठवण झाली? मग त्याला मी एका जुन्या मित्राचे नाव सुचवले. पण हा सेक्युलर मित्र मान्य करील काय, याबद्दल तो साशंक होता. पण ती समस्या मी निकालात काढून दिली. पण त्या उमेदवारीचे अधिकारपत्र घेण्य़ासाठी त्या उमेदावारासह नामदेव व मी मातोश्रीवर गेलेलो असताना; याला कुठून तरी खबर मिळाली जॉर्ज फ़र्नांडीस मुंबईत आलेले आहेत. तात्काळ मातोश्रीचे काम तसेच सोडून नामदेव म्हणाला ‘चला जॉर्जला भेटू.’ माहिमला येताना मी त्याला घरातली एक गोष्ट सांगितली. वाजपेयी सरकारच्या विश्वास प्रस्तावावर जॉर्जच्या जोरदार भाषणावर माझी मुलगी कशी बेहद्द खुश होती. अर्थात ती सहा वर्षे जुनी बाब होती. पण तिथे जॉर्जची भेट होताच. या महाभागाने विनाविलंब ती कहाणी जॉर्जच्या कानी घातली आणि त्या मुलीशी तुम्ही बोललेच पाहिजे असा आग्रहही धरला. वास्तविक ते व्हायला एक अडचण होती. कारण तेव्हा माझी मुलगी उच्चशिक्षण घ्यायला अमेरिकेत गेलेली होती. पण ह्या हट्टी माणसापुढे कोणाचे चालणार? त्याने मला पळता भूई थोडी करून मुलीचा तिथला नंबर काढायला लावला आणि आपल्या मोबाईलवरून थेट अमेरिकेत संपर्क साधून जॉर्जना तिच्याशी संवाद करायला भागच पाडले.
वास्तविक माझी मुलगी सोडा, माझ्या पत्नीचीही नामदेवशी कधी ओळखपाळख झालेली नाही. तसा प्रसंगच कधी आला नाही. मुलीचेही तेच. नामदेवने तिला कधी काळीगोरी बघितली नाही. पण आपल्या पोराचे कौतुक करायला नको, अशा हट्टापायी त्याने त्या गडबडीत हा सगळा प्रकार घडवला होता. त्यात नवे असे काहीच नव्हते. पस्तीस वर्षापुर्वी नामदेव तसाच होता. तेव्हा कमलाकर सुभेदार विवाहित आणि आम्ही उपटसुंभ होतो. पण ताडदेवच्या रुसी मेहता हॉल या व्यायामशाळेचे नामदेवच्या गोलपिठा या पहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन व्हायचे होते. तर तिथे कमलाकरने आपल्या पत्नी मुलासह यायलाच हवे असा हट्ट नामदेवने पुर्ण करून घेतला होता. ती लेकुरवाळी स्त्री तिथे अवघडून बसली होती. पण वहिनी अगत्याने आली म्हणून नामदेव आनंदला होता. त्याच्यातले हे निष्पाप, निरागस मुल, निर्व्याज उत्साह आणि विशुद्ध माणुसकी क्वचितच बघायला मिळते. खरे सांगायचे तर कितीही सभ्य सुसंस्कृत माणसांकडे माणसातला माणूस शोधून त्याची गळाभेट करण्याची क्षमता नसेल, ती अपुर्व कुवत नामदेवपाशी उपजतच होती. समतेच्या गमजा व वल्गना आजवर अनेकांकडून ऐकल्या असतील. पण स्वत:च्या जीवनात समतेने वागण्याची कुवत फ़ार थोड्या लोकांपाशी असते. नुसते इतरांना समभावाने वागवणे नाही, तर आपणही इतरांशी समतेच्या धारणेने वागणे खुप अवघड काम आहे. अनेकदा आपल्याला आपल्या अहंगंडातून बाहेर पडणे अशक्य असते, तितकेच स्वत:च्या न्युनगंडातून बाहेर पडता येत नाही. या दोन्ही जोखडातून बाहेर पडलेली दोनच माणसे मला आयुष्यात भेटली त्यातला एक नामदेव ढसाळ होय, असे मी छातीठोकपणे सांगू शकतो. समोर शिवसेनाप्रमुख असो किंवा कोणी सामान्य पॅन्थर कार्यकर्ता असो, नामदेव दोघांशी समान पातळीवर बोलू वागू शकला. ही त्याची शक्ती, कुवत वा उपजत क्षमता त्याची एकमेव ओळख होती. त्या नामदेवला कितीजण ओळखतात, ते मला माहिती नाही. कोणी त्याला दलितकवी म्हणून, कोणी दलित नेता वा अन्य काही म्हणून ओळखत असतील. पण मला भेटलेला नामदेव हा असा होता. त्याचे जितके पैलू उलगडावे तितका तो अधिकच भारावून टाकत राहिल.
छान लेख आहे
उत्तर द्याहटवाBadhiya (y)
उत्तर द्याहटवा