(झुंडीचे राजकारण -१)
गेल्या तीन वर्षापासून देशाची राजधानी दिल्लीत, जनलोकपाल आंदोलनाच्या निमित्ताने जी एक विशिष्ठ मानसिक लोकसंख्या एकवटलेली दिसते आणि तिचे वर्तनही एकाच ठाशीव पद्धतीने होताना दिसते आहे. त्याला आपण आम आदमी पक्ष असे संबोधतो आहोत. या तीन वर्षाच्या काळात त्यापैकी अनेकजण त्यापासून दुर झाले, तर काही नवे लोक त्यात सहभागी झाले. आधी विविध संस्था व संघटनांच्या स्वरूपात कार्यरत असलेल्या काही नेत्यांनी पुढाकार घेऊन ‘इंडीया अगेंस्ट करप्शन’ नावाची एक तात्कालीन संघटना निर्माण केली. आपापले अस्तीत्व कायम ठेवून त्यात बाकीच्या संस्था संघटना सहभागी झाल्या. त्यातून काही चेहरे पुढे आले आणि त्यामुळेच सहभागी संघटनांच्या बाहेरचे अनेक अस्वस्थ लोक त्यात सह्भागी होत गेले. अखेरीस त्यातल्या काही परिचित व लोकप्रिय झालेल्या चेहर्यांनी आंदोलनाचा वारसा पुढे चालवण्यासाठी एका राजकीय पक्षाचे स्वरूप धारण केले. त्यांनी निवडणूका लढवल्या व सत्ताही प्राप्त केली. मग अशा यशस्वी व्यक्ती वा संघटनेकडे सामान्य लोकांचा ओढा असणे स्वाभाविक असते. निवडणूका लढवून सत्तेपर्यंत मजल मारली, तर आपण त्यांच्याकडे एक राजकीय पक्ष म्हणून बघत असतो आणि त्याचे विश्लेषण वा मूल्यांकनही राजकीय पक्ष म्हणूनच करू बघतो. पण कुठल्याही प्रकारे तपासायला वा अभ्यासायला गेल्यास आम आदमी पक्षाचे स्वरूप राजकीय पक्ष व संघटनेच्या ढाच्यात बसवता येत नाही. त्यामुळेच मग त्याचे आकलन वा विश्लेषण गडबडून जाते. त्याचप्रमाणे या पक्षाच्या नेत्यांची भाषणे, वक्तव्ये, विधाने, विचार वा कृती, कारवाया आपल्या आवाक्यात यायला तयार नसतात. त्याबद्दल विचारणा केल्यास त्या पक्षाचे नेते वा सदस्य ते काही नवेच करीत आहेत आणि त्यामुळे त्याबद्दलचे आकलन इतक्यात कोणाला होणार नाही, अशी फ़ुशारकीही मारत असतात. त्यांचा हा दावा योग्यही आहे. कारण त्यांनी स्वत:ला कायद्याच्या तरतुदी पुरती राजकीय पक्ष म्हणून नोंदणी करून घेतलेली असली, तरी त्यांचे वर्तन वा कार्यशैली कुठल्याही कारणास्तव राजकीय पक्षासारखी होत नसते. मग सक्तीने त्यांना राजकीय पक्ष ठरवून केलेली त्यांची चिकित्सा चुकत असेल तर त्यांना दोष देऊन कसे चालेल? चुक त्यांची नाही. त्यांना आपल्या व्याख्येत कोंबून त्यांचे मूल्यांकन करणार्यांची चुक होते आहे. कारण आम आदमी पक्ष हा जसा राजकीय पक्ष नाही, तशीच ती राजकीय संघटनाही नाही. ते एक आंदोलन नाही किंवा तो नुसताच एका मागणी वा कारणासाठी लढायला जमलेला जमाव सुद्धा नाही. ती एक प्रकारची झुंड आहे. म्हणूनच त्यांचे वर्तन वा कृती या सार्वथैव झुंडीसारख्या असतात. म्हणूनच त्यातली झुंडीची मानसिकता शोधावी व समजून घ्यावी लागेल. किंबहूना त्यासाठी आधी झुंडीचे मानसशास्त्रही उलगडावे लागेल.
आधी म्हणजे अण्णा हजारे यानी जंतरमंतर येथे जनलोकपाल आंदोलनाची तुतारी फ़ुंकण्याच्या पुर्वी हे अरविंद केजरीवाल कोण होते? आज त्यांच्या भोवती दिसणारे त्यांचे सवंगडी कोण होते व काय करीत होते? अकस्मात त्यांच्याभोवती ही झुंड कशी जमा झाली? ज्यांनी अण्णा हजारे यांच्या चेहर्याआड राहून त्या आंदोलनात पुढाकार घेतला, तेच आज अण्णांना झुगारून राजकारण करू लागले, तरी भोवतालची झुंड त्यांच्या भोवती कशाला टिकून राहिली आहे? अण्णांनी साथ सोडल्यावर झुंडीने केजरीवाल यांना डोक्यावर कशाला घ्यावे? दुसरीकडे दिवसेदिवस या झुंडीच्या मागे धावलेल्या काही लोकांचा भ्रमनिरास कशामुळे होत आहे? प्रामुख्याने केजरीवाल व त्यांच्या पक्षाच्या कौतुकात रममाण झालेल्या बुद्धीमंत पत्रकारांवर आता पश्चात्ताप करायचा प्रसंग कशामुळे आलेला आहे? इत्यादी प्रश्नांची उत्तरे शोधण्याची गरज आहे. कारण आज ज्याप्रकारे व ज्या समजूतीवर आधारीत आम आदमी पक्षाची चिकित्सा होत आहे; ते निकषच चुकलेले आहेत. म्हणून मग एका बाजूला केजरीवाल यांचे पाठीराखे अधिक चिवटपणे नेत्याचे समर्थन करीत आहेत, तर दुसरीकडे गेले काही महिने केजरीवाल यांच्या कर्तृत्वाने भारावलेला मध्यमवर्ग व बुद्धीजिवी वर्ग गडबडून, गोंधळून गेला आहे. शंका व्यक्त करू लागला आहे किंवा संशयीत नजरेने या पक्षाकडे बघू लागला आहे. पण कोणीही घडल्या प्रकाराकडे झुंड म्हणून बघायला तयार नाही. तिथेच त्यांची गफ़लत झालेली आहे. जितकी ही गफ़लत केजरीवाल यांच्या निष्ठावंत पाठीराख्यांची झालेली आहे, तितकीच ती त्यांच्या विरोधकांचीही झालेली आहे. जितक्या लौकर सामान्य माणूस म्हणजे आम आदमी केजरीवाल यांच्यापासून दुरावेल, तितका बुद्धीवादी वर्ग त्यांच्यापासून दुरावणार नाही. याचे कारण आपण झुंडीच्या आहारी जाऊन फ़सलो, हे बुद्धीजिवी वर्गाला कबुल करणे सोपे नसते. पण आम आदम व्यवहारवादी असतो. त्याला कल्पनाविश्वात रमायची चैन परवडणारी नसते. वास्तवाचे चटके सोसतच त्याला प्रत्येक क्षणाला सामोरे जावे लागत असते. म्हणूनच आम आदमी लौकर भ्रमातून बाहेर पडू शकतो आणि बुद्धीमंत दिर्घकाळ भ्रमनिरास व्हायची प्रतिक्षा करीत रहातो. दिल्लीची जनता म्हणूनच आता डोळस होऊन केजरीवाल सरकारकडे बघू लागली आहे आणि देशातले पत्रकार बुद्धीमंत मात्र मिमांसा करण्यातच गर्क आहेत. असो, इथे आजच्या राजकारणाचा वा समिकरणाचा उहापोह करायचा नसून आम आदमी पक्षाची निर्मिती उदय व वर्तनशैली; यांची कारणमिमांसा करायची आहे. म्हणूनच अन्य तमाम प्रस्थापित राजकीय पक्षांपेक्षा हा पक्ष, त्याचे सरकार व त्याचे नेतृत्व भिन्न कशाला भासते; त्याकडे बारकाईने बघावे लागेल. अभ्यासावे लागेल.
एक विशिष्ठ कारणास्तव वा मागणीसाठी विभिन्न विचारांचे वा भूमिकेतले ठराविक लोक जेव्हा एकत्र येतात, तेव्हा त्यांच्यात वैचारिक साम्य वा साधर्म्य असू शकत नाही. सार्वजनिक वा सामाजिक जाणीवांच्या बाबतीत त्यांची वेगवेगळ्या विषयावरील मते टोकाची भिन्न असू शकतात. ज्या कारण वा मागणीसाठी ही मंडळी एकत्र आलेली असतात, तोच त्यांना जोडणारा धागा असतो. तो धागा जोपर्यंत आणि जितका मजबूत असतो, तोपर्यंतच त्यांच्यात एकसुत्रीपणा आढळून येतो. त्यात सैलसरपणा आला किंवा तो धागा तुटला; मग त्यांच्यात कमालीची मतभिन्नता दिसू लागते. कधीकधी असे लोक एकामेकांच्या विरुद्ध अत्यंत कडवी भाषा बोलू लागतात. परस्परांच्या विरोधात दंड थोपटून उभे ठाकलेलेही दिसू लागतात. म्हणूनच त्यांना एक संघटना वा एक राजकीय पक्ष समजून त्यांची कृती वा वर्तन तपासता येत नाही. कारण त्यांच्यात समान तत्वज्ञान वा विचारसरणीचा कुठलाही धागा नसतो. अधिक सोपे करून सांगायचे, तर एकाच आगगाडी वा वाहनातून प्रवासाला दूरच्या प्रवासाला पर्यटनाला निघालेल्या लोकांमध्ये अल्पावधीतच एकप्रकारचे सौहार्दाचे व आपुलकीचे नाते निर्माण होते. तितक्या पर्यटन वा प्रवासात दिर्घकालीन मैत्रीसारखे हे लोक वागत असतात. नंतरही पुन्हा भेटण्य़ाचे कबुल करतात, एकमेकांचे पत्ते घेतात. प्रवासात गंभीर प्रसंग ओढवला तर परस्परांच्या मदतीला धावून जातात. पण तितका प्रवास आवरला, मग काही काळ त्यातल्या गंमती वा मजा आठवतात. संपर्कात रहातात. पण हा सगळा मामला अल्पायुषी असतो. थोड्याच दिवसात सर्वकाही काळाच्या पडद्याआड जाते. पण कुटुंब वा नात्याच्या गोतावळा, अन्य संस्थात असलेल्या माणसांची मैत्री दिर्घकालीन असते. एकमेकांच्या सुखदु:खात त्यांचा कायम सहभाग असतो. हा जो वेगळेपणा आपल्याला प्रवासीमैत्री व नातेसंबंधात आढळतो; तसाच फ़रक आंदोलनासाठी जमलेली गर्दी व वैचारिक आधारे बांधलेली संघटना यांच्यातही असतो. वैचारिक तात्वज्ञानावर आधारलेल्या संघटना व पक्ष दिर्घकाळ टिकणारे असतात आणि त्यांचे सर्वव्यापी विषयांवरचे मत तयार असते. त्यांचे व्यवहार प्रासंगिक नसतात. आम आदमी पक्षाची उभारणी मुळात एका आंदोलनासाठी जमलेल्या जमावातून झालेली आहे. एका मागणीसाठी जमलेल्या गर्दीने स्वत:ला पक्ष म्हणून घोषित केले. पण त्यांना कुठल्या वैचारिक सुत्राने बांधलेले नव्हते. त्यामुळेच मूळ मागणी व विषय बाजूला पडत गेला; तसे त्यातले दुवे निखळत गेले. लोक पांगत गेले आणि नव्या मतलबासाठी नवे लोक त्यात समाविष्ट होत गेले. पण यातला कोणीही एका विचारसरणीसाठी तिथे आलेला नाही. तो आपापली मागणी व हेतू साधण्य़ासाठी त्या जमावात, झुंडीच्या मानसिकतेने सहभागी होत गेलेला आहे. त्यामुळेच त्याची पक्ष म्हणून नोंदणी झालेली असली व त्याने निवडणूका लढवून जिंकलेल्या असल्या; तरी त्याचे स्वरूप आजही झुंडीसारखेच आहे. मात्र माध्यमातून व विचारवंत विश्लेषकांकडून त्याची चिकित्सा राजकीय संघटित पक्ष म्हणून होते आहे.
अनेकांना प्रश्न पडेल, की झुंड वा राजकीय संघटित पक्ष यात नेमका काय फ़रक असतो? आपण आजवर अनेक राजकीय पक्ष बघितले व बघत असतो. त्यापेक्षा झुंड किंवा आम आदमी पक्ष नावाचा प्रकार कसा व का वेगळा आहे? अशा प्रश्नांची उत्तरे हवी असतील, तर आधी झुंड म्हणजे काय आणि झुंडीचे मानसशास्त्र कसे असते? झुंडी कशा बनतात आणि झुंडी कोणत्या परिस्थितीत उदयाला येतात? झुंडींचे भवितव्य काय असते वा झुंडीचे नेतृत्व कसे उदयास येते, इत्यादी प्रश्नांची उत्तरे बघावी लागतील. पुढील काही लेखातून तीच कारणमिमांसा करण्याचा माझा प्रयास आहे. (अपुर्ण)