गुरुवार, १४ फेब्रुवारी, २०१३

वाजपेयींपेक्षा मोदी यांची लोकप्रियता अधिक आहे?




   हिंदू मतांचा गठ्ठा हे कुणालाही सहज न पटणारे गणित आहे. आपल्या देशातले तमाम सेक्युलर पक्ष व राजकारणी; मुस्लिमांच्या चुकांवरही पांघरूण घालायला नेहमी सज्ज असतात. स्वत: हिंदू असले तरी ते मुस्लिम अतिरेकाची अतिशयोक्त बाजू घेतात. त्यातून आपण मुस्लिमांचे हितचिंतक आहोत, असे भासवण्याची अखंड धडपड चालू असते. कारण आपल्या मुस्लिम धार्जिणेपणातून मुस्लिमांची एक गठ्ठा मते आपल्या पारड्यात पडावित, अशी त्यामागची अपेक्षा असते. तसे हिंदूंच्या बाबतीत सहसा घडत नाही. कारण मुख्य वैचारिक राजकारण हिंदू समाजाच्या बाबतीत विचलित झाले असून ते जाती पोटजाती निहाय विस्कटले आहे. जाती पोटजातीचे विविध नेते व त्यांचे प्रादेशिक लहानमोठे पक्ष उदयास आलेले आहेत. त्यांनी आपापला जम बसवला असून त्यांचे मतांचे गठ्ठेही तयार झालेले आहेत. त्यामुळेच हिंदू म्हणून धर्माच्या नावाने मते मागणे शक्य नाही, की तशी अपेक्षाही बाळगता येत नाही. या जाती पोटजातीच्या लहानलहान मतांच्या गठ्ठ्य़ांचे बालेकिल्ले प्रादेशिक आहेत. मुस्लिमांसारखे अखील भारतीय नाहीत. अयोध्येतील राम मंदीर व शहाबानू प्रकरण यामुळे काही काळ हिंदू मतांचे थोडेफ़ार धृवीकरण भाजपा करू शकला होता. पण तो भार पेलणे वाजपेयी किंवा अडवणी यांना जमले नाही. सेक्युलर माध्यमे व मित्र पक्ष यांच्या अपेक्षांचा बोजा पेलता पेलता त्या दोन्ही नेत्यांचे हिंदूत्व दबून गेले. त्यातच पुन्हा तयार होणारा हिंदू मतांचा गठ्ठा विस्कटून गेला. १९९६ सालात संसदेमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आलेल्या भाजपाला सत्तेची स्वप्ने पडू लागली व त्याने तयार होणार्‍या हिंदू मतांच्या गठ्ठ्याला लाथ मारून बहूमताच्या आघाडी समिकरण बनवताना हिंदू एकजुटीच्या भूमिकेला तिलांजली दिली. तिथून तो हिंदू म्हणून गठ्ठा मते देणारा मतदार विचलित व उदासिन होऊन गेला. १९८९ पासून १९९८ पर्यंत भाजपाची ताकद सतत वाढत होती आणि तेव्हा भाजपा हिंदूत्वाची पाठराखण करत होता. चार निवडणुका वाढत गेलेल्या भाजपाने १९९८ सालात एनडीए बनवताना मंदिर आदि हिंदूत्वाचे मुद्दे बाजूला टाकले व त्याची वाढ खुंटलेली दिसेल. १९९९ सालात आधी होत्या तेवढ्याच जागा जिंकल्या आणि २००४ मध्ये त्यातही घसरण झाली. २००९ मध्ये आणखी घसरण होऊन भाजपा १९९१ च्या इतक्या कमी जागांपर्यंत खाली आला. याचे रहस्य कोणी कधी समजून घेण्य़ाचा प्रयत्न केला आहे काय?

   कालपरवा हेडलाईन्स टूडे या वाहिनीवर राहुल कन्वल याने हिंदू परिषदेचे अध्यक्ष अशोक सिंघल यांची मुलाखत घेतली. त्यात मोदींच्या लोकप्रियतेची चर्चा केली. मोदी यांचा चेहरा वाजपेयी यांच्याइतका उदारमतवादी नाही; वगैरे नेहमीची पोपटपंची कन्वल याने केली. पण वाजपेयी व मोदी यांच्या लोकप्रियतेमधला नेमका फ़रक सिंघल यांनी सांगितला, तो काही त्याला समजून घेता आला नाही. ही आजच्या माध्यमांची शोकांतिका आहे. ज्याची मुलाखत घेतात, त्याचे मत समजून घेण्याची वा जनतेला तो माणूस दाखवण्याची इच्छाच ही माध्यमे गमावून बसली आहेत. चित्रपट कथाकार वा नाटककार जसा आपल्या पात्रांना आपल्या मनाप्रमाणे खेळवत व प्रेक्षकांसमोर मांडत असतो; तसे हे आजचे पत्रकार जिवंत माणसे व नेत्यांना पात्राप्रमाणे पेश करू बघतात. त्यामुळे खरीखुरी माणसे वा नेते लोकांसमोर आणलेच जात नाहीत. त्याचे खरे कारण असे पत्रकार समोरच्या व्यक्तीला, त्याच्या व्यक्तीमत्व किंवा मताला समजूनही घेण्य़ाचा संयम दाखवत नाहीत. तिथे सगळी गडबड होते. इथे राहुल कन्वल सुद्धा सिंघल यांची मुलाखत घेण्यापेक्षा आपल्या मनातली वाक्ये व मुद्दे सिंघल यांच्याकडून वदवून घेण्यासाठी धडपडत होता. सहाजिकच सिंघल यांनी कुठला मोठा मुद्दा सांगितला त्या्कडे त्याचे लक्षच नव्हते. मोदी व वाजपेयी यांच्या जनमानसातील लोकप्रियता व प्रतिमेचे तेच नेमके विश्लेषण आहे. ‘वाजपेयी हे पत्रकार व राजकीय पक्ष- विचारवंतांमध्ये लोकप्रिय होते, जनतेमध्ये त्यांची लोकप्रियता तेवढी नव्हती. मोदी यांचे उलट आहे. त्यांची लोकप्रियता माध्यमे व राजकीय पक्ष विचारवंतामध्ये कमी आणि सामान्य जनतेमध्ये अधिक आहे.’ हा अत्यंत सुक्ष्म असा राजकीय बारकावा आहे आणि त्याची साक्ष निवडणुकीचे आकडेही देतात.

   दीनदयाळ उपाध्याय यांचे निधन झाल्यापासून वाजपेयीच भाजपाचे सर्वात वरिष्ठ नेता होते यात वाद नाही. पण जनता पक्षातून १९८० साली वेगळे झाल्यापासून भाजपाने नवा अवतार घेतला; तेव्हाही वाजपेयीच भाजपाचा चेहरा होते. पण १९८४ मध्ये त्यांचाही लोकसभा निवडणुकीत पराभव झाला आणि अन्य पक्षांबरोबर भाजपाचीही राजीव लाटेत धुळधाण उडाल्यावर नव्याने पक्ष उभारणीचे शिवधनुष्य अडवाणींनी पेलले. १९८७ नंतर हिंदूत्वाचा झेंडा भाजपाच्या खांद्यावर घेतला. त्यानंतर पुढल्या दहा वर्षात अडवाणी हाच भाजपाचा चेहरा होता. पण १९९६ साली जैन डायरीचा मामला गाजला. त्यात अडवाणी यांचे नाव आले आणि त्यांनी त्यातून मुक्त होईपर्यंत निवडणुक लढवणार नाही अशी भूमिका घेतल्यावर पुन्हा वाजपेयींचे नाव पुढे आले. अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने नुसता पक्ष सावरला नाही; तर संसदेतील सर्वात मोठा पक्ष होण्यापर्यंत मजल मारली. २ खासदारावरून ९०, १४०, १६० आणि १८६ अशी मजल मारली होती. पण वाजपेयी यांना पंतप्रधान केल्यावर अन्य पक्षांना सोबत घेताना ज्या तडजोडीची भूमिका घेतली गेली; तिथून भाजपाचा विस्तार थंडावत गेला. सहा वर्षे वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा राहिला आणि सत्तेसाठी अगतिक अशी त्याची प्रतिमा बनत गेली. त्यातच त्याची घसरण पुन्हा दिडशे खासदारांच्या खाली गेली. वाजपेयी असे अन्य पक्षात व सेक्युलर माध्यमात लोकप्रिय होते, पण जनतेत व मतदारांमध्ये अप्रिय होते. आकडेच त्याची साक्ष देतात. किंबहूना तोच सेक्युलर माध्यमे व विचारवंतांनी भाजपासाठी लावलेला सापळा होता, त्यात वाजपेयी आपली उजळ प्रतिमा बनवण्यासाठी फ़सत गेले व त्यांनी भाजपाच्या राजकीय शक्तीचे खच्चीकरण केलेले दिसेल. वाजपेयी यांना सेक्युलर म्हणायचे, सर्वसमावेशक म्हणायचे आणि भाजपावर मात्र हिंदूत्वाच्या दुगाण्या झाडायच्या, असा तो सापळा होता. त्यात वाजपेयी रमले आणि त्यांना थांबवणारा कोणी पक्षात नसल्याने त्याच्यासोबत भाजपाची लोकप्रियता रसातळाला गेली. हिंदूत्वाचा आक्रमक पवित्रा घेऊन उभा राहिलेला किंवा अडवाणींनी उभा केलेला भाजपा, सेक्युलर करता करता वाजपेयींनीच पुरता जमिनदोस्त करून टाकला. वाजपेयींचे माध्यमे आजही कौतुक करतात, त्यांना सर्वसमावेशक नेता म्हणतात, मग हीच भाषा तेव्हाच्या भाजपा बाबतीत का नव्हती? पुढल्या काळात त्यांची जागा घेऊ बघणारे अडवाणीही सेक्युलर माध्यमांच्या प्रेमात पडले. पण त्यामुळे २००९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा अधिकच खाली घसरला.

   एनडीएमधल्या अन्य पक्ष व सेक्युलर माध्यमांना खुश करताना अडवाणीही सेक्युलर होत गेले. पण ज्या हिंदूत्ववादी मतदाराने त्यांना इतक्या उर्जितावस्थेला आणले होते, त्याचाच त्यांना विसर पडला होता. गुजरातच्या दंगलीनंतर वाजपेयी तिकडे गेले असताना; त्यांनी आपल्या सेक्युलर प्रतिमेला जपताना मोदी यांना ‘राजधर्मका पालन करना चाहिये’ असा सल्ला दिला, ते भाजपा विरोधकांच्या हातात दिलेले कोलित नव्हते काय? सोनिया किंवा अन्य कुठल्या पक्षाचा वरिष्ठ नेता अशा प्रकारे स्वपक्षिय नेत्याला अडचणीत आणणारी विधाने कधी करतो काय? पण वाजपेयी यांनी नेमके तेच केले; तर माध्यमे त्यांचे कौतुक करत होती. ज्यांनी पक्षाच्या मतांमध्ये व जागांमध्ये कुठली भर घातली नाही, ते वाजपेयी लोकप्रिय म्हणजे नेमके काय? त्याची मोजपट्टी कुठली? ही शुद्ध धुळफ़ेक नाही काय? वाजपेयी यांनी लोकसभेत दोन खासदारांचा पाठींबा मिळावा म्हणून आसामच्या गण परिषदेशी मैत्री करताना तिथल्या स्वपक्षिय संघटनेचा बोजवारा उडवला, तसाच आंध्रमध्ये वाढणार्‍या पक्षाला चंद्राबाबूंच्या दावणीला बांधून कोंडी केली होती. मुद्दा इतकाच, की आपली प्रतिमा आणि पंतप्रधानपद जपण्यासाठी वाजपेयी यांनी पक्षाचा सतत बळीच दिला. त्याला सर्वसमावेश म्हणता येत नाही. उलट मोदी यांनी टिकेचे आसूड आपल्या पाठीवर घेताना पक्षाला आज देशव्यापी लोकप्रियतेच्या उंचीवर नेलेले आहे. आणि अशोक सिंघल नेमके तोच बारकावा दाखवत आहेत. पण राहुल कन्वल याला वा तत्सम पत्रकारांना तो बघायचाच नसेल तर दिसेल कसे? वाजपेयी यांना पक्षाच्या विस्तार व वाढीपेक्षा आपल्या पंतप्रधान पदाच्या शाश्वतीमध्ये रस होता व त्यासाठी त्यांनी पक्षाला स्वबळावर उभे रहाता येईल असा अजिबात विचार केला नाही. मोदी यांची कहाणी नेमकी उलटी आहे. आज तरी मोदींचे गणित स्वबळावरच भाजपाला संसदेत बहूमत मिळावे असे प्रयत्न दिसत आहेत. आणि म्हणूनच अन्य पक्षात, विचारवंतांमध्ये वा सेक्युलर माध्यमांत आपले व्यक्तीगत कौतुक व्हावे; याची त्यांनी अजिबात फ़िकीर केलेली नाही. मुसंडी मारून त्यांनी स्वत:ला व भाजपाला थेट लोकांनी सरकार बनवण्याची संधी द्यावी. असे प्रयास चालविलेले आहेत. त्यासाठी पंधरा वर्षापुर्वी सोडून दिलेल्या हिंदूत्वाची कास त्यांनी धुर्तपणे धरलेली आहे आणि त्या कार्यात त्यांच्या विरोधकांचे बळ मोदी मोठ्या खुबीने वापरून घेत आहेत. त्यातूनच त्यांनी आपल्यासाठी देशव्यापी हिंदू मतांचा गठ्ठा निर्माण करण्याची मोहिम यशस्वीरित्या राबवली आहे. म्हणूनच मुस्लिम आपला अधिकाधिक द्वेष करतील व आपल्याला मुस्लिमांचा शत्रू असे चित्र रंगवले जावे, असा मोदी जाणिवपुर्वक प्रयास करतात असेच कधीकधी वाटते.  ( क्रमश:)
 भाग   ( ८६ )    १५/२/१३

बुधवार, १३ फेब्रुवारी, २०१३

हिंदू व्होटबॅन्क कशी निर्माण होत आहे?





   कालच्या म्हणजे बुधवार दिनांक १३ फ़ेब्रुवारी २०१३ च्या ‘महाराष्ट्र टाईम्स’ दैनिकातली ही बातमी आहे. कुठल्या वाहिनीवर ही बातमी बघितल्याचे तुम्हाला आठवते का? मोहन भागवत किंवा आसाराम बापू त्यांच्या खाजगी कार्यक्रमात काय बोलले; त्याबद्दल आकाशपाताळ एक करणार्‍या वाहिन्यांना ही सनसनाटी बातमी का वाटली नाही? मूळ बातमी जशीच्या तशी वाचा आणि तुम्हीच ठरवा.

अलीगढ युनिव्हर्सिटीत भारत मुर्दाबाद

'अफझल तेरी याद में रो रही ये जमीं, रो रहा आसमाँ... अफझल के वारिस जिंदा है... आय एम अफझल, हँग मी टू इंडिया... वी ऑल आर अफझल... भारत मुर्दाबाद...

भारताविरोधातील ही घोषणाबाजी पाकिस्तान, चीन किंवा भारताच्या कुणा शत्रू राष्ट्रात झालेली नाही; तर भारतातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशच्या अलीगढ मुस्लीम विद्यापीठातील आहे. तीही दहशतवादी अफझल गुरूच्या समर्थनासाठी. भारतीय लोकशाहीचे सर्वोच्च प्रतीक असलेल्या संसदेवर आत्मघाती हल्ला घडवून आणणारा खरतनाक दहशतवादी अफझल गुरूचा कैवार घेत सोमवारी शेकडो मुस्लीम विद्यार्थ्यांनी सोमवारी अलीगढ विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये जोरदार मोर्चा काढला. 'शहीद मिस्टर अफझल गुरू' अशा आशयाचे बॅनर, पोस्टर या विद्यार्थ्यांच्या हातात होते. अफझलला फाशी देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर संताप व्यक्त करीत विद्यार्थ्यांनी भारतविरोधी घोषणा दिल्या. 'यू किल्ड वन अफझल अँड गेव बर्थ टू हंड्रेड अफझल...' अशा धमकीवजा घोषणाही देण्यात आल्या. यावेळी साध्वी प्रज्ञासिंह व गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना फाशी देण्याची मागणीही करण्यात आली. दिवसभर चाललेल्या या निदर्शनाकडे विद्यापीठ प्रशासनाने पूर्ण कानाडोळा केला.

   वाहिन्यांना ही बातमी का वाटू नये? असे फ़क्त उत्तरप्रदेशच्या एका विद्यापिठात झालेले नाही. असेच वातावरण काश्मिर खोर्‍यात आठवडाभर आहे. पण कोणी स्वत:ला सेक्युलर म्हणवून घेणारे त्याबद्दल अवाक्षर बोलत नाहीत. इतके मुस्लिम तरूण श्रीनगरपासून अलिगडपर्यंत स्वत:ला अफ़जल गुरू म्हणवून घेतात, त्याचा अर्थ काय होतो? त्यांना त्याने संसदेवर हल्ल्यात घेतलेला सहभाग हा गुन्हा वाटत नाही, असाच त्याचा अर्थ होतो ना? आपणही अफ़जल गुरू आहोत आणि आपल्यालाही फ़ाशी द्या, असे सांगणारा आपण भारतप्रेमी वा राष्ट्रवादी आहोत याची साक्ष देत असतो की आपणही अफ़जलसारखे जिहादी आहोत, अशी घोषणा करत असतो? आणि हे विद्यापिठात चालते, तेव्हा सेक्युलर मंडळींना घातक का वाटत नाही? कुणा मुस्लिम विचारवंत वा नेत्यांना त्यात धोका का दिसत नाही? की सेक्युलॅरिझम म्हणजेच अफ़जल गुरूने केलेले कृत्य असे त्यांना वाटते आहे? असे शेकडो प्रश्न आज सामान्य भारतीयांच्या मनात घोंगावत आहेत आणि त्याची उत्तरे द्यायला कोणी मुस्लिम नेता वा सेक्युलर नेता, विचारवंत पुढे आलेला नाही. मग अशा भारतीयांना काय वाटत असेल? त्यांना संसदेवरचा हल्ला किंवा तत्सम घटनांचे समर्थक कोण वाटत असतील? त्यावर त्यांना कोणता उपाय सुचू शकतो? यावर कोण उपाय देऊ शकतो; असे या भारतीयांना वाटेल? आपण अशा प्रश्नांची उत्तरे शोधली; तर मग नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता दंगलीचे आरोप त्यांच्यावर करूनही का वाढतेय, त्याचे उत्तर मिळू शकते. मोदी यांचा जो मुस्लिम विरोधी चेहरा आहे; तोच अशा सेक्युलर थोतांडावरचा उपाय लोकांना कशामुळे वाटू लागला आहे, त्याचे उत्तर अशा प्रश्नांच्या उत्तरामध्ये लपलेले आहे. आणि त्याचे सुत्र मोदी यांनी लपवून ठेवलेले नाही. मोदी यांची लोकप्रियता इस्लामी दहशतवादाची प्रतिक्रिया आहे. आणि जितक्या अशा घटना घडत जाणार आहेत व पाठीशी घातल्या जाणार आहेत; तेवढी मोदींची लोकप्रियता वाढतच जाणार आहे, मग ते कोणाला आवडो किंवा नावडो. त्याला पर्यायच नाही.

   जयपुरच्या भाषणात अकारण गृहमंत्री शिंदे यांनी भगव्या दहशतवादाची भाषा केली. अकारण एवढ्यासाठी म्हणायचे, की त्यात तथ्य अजिबात नव्हते. पण तशी अकारण सुद्धा नव्हती. ती भाषा मुस्लिम मतांच्या गठ्ठ्याला खुश करण्यासाठी वापरली होती. त्यावर इतकी संतप्त प्रतिक्रिया उमटेल; अशी कॉग्रेसची अपेक्षा नव्हती. पण मग त्यावर थातुरमातूर उपाय योजण्याच्या घाईत नंतर हिंदू मतांना खुश करण्याचा मुर्खपणा करायची नामुष्की ओढवली. त्यासाठीच मग घाईगर्दीने अफ़जल गुरूला फ़ासावर लटकवण्याची वेळ आली. पण त्यातून साधायचा परिणामही उलटला. कारण आपला मुस्लिमधार्जिणेपणा जयपूरला दाखवला, त्याने शिरजोर झालेले कडवे मुस्लिम अफ़जल गुरूच्या समर्थनासाठी घराबाहेर पडले. त्यांच्यावर लाठ्य़ा चालविण्याचीही हिंमत यांच्याकडे उरलेली नाही. म्हणजे जयपूरच्या भाषणातून मुस्लिमांना खुश करण्याचे प्रयास वाया गेलेच. पण उलट त्यातून अशी स्थिती आणली गेली, की अफ़जलचे समर्थन करणार्‍यांना रोखता येत नसल्याचेही दिसून आले. बिचार्‍या अफ़जलचा बळी मधल्यामधे गेला आणि हिंदूंनाही खुश करता आले नाही, की मुस्लिमांनाही खुश ठेवता आलेले नाही. सहाजिकच दोन्हीकडून मोदी व त्यांच्या हिंदुत्वाच्याच पथ्यावर सगळा डाव पडला आहे. जयपूरच्या मुर्खपणानंतर कॉग्रेसवाले शांत बसले असते तरी जितके नुकसान कॉग्रेसचे झाले नसते; तेवढे आता गुरूच्या फ़ाशीने झाले आहे. कारण त्यामुळे मुस्लिमांमध्ये नाराजी आलेली आहे, ती दु्र करणे शक्य नाही आणि हिंदूंना खुश करायचे, तर तेही अशा मुस्लिम खुल्या देशविरोधी निदर्शनांनी अधिकच विचलित झालेले आहेत. मग कॉग्रेसने साधले काय? मोठमोठ्याने मोदी इफ़ेक्ट संपला असे सांगितले जात होते, तो कितीसा संपला? आजघडीला गुरूच्या फ़ाशीनंतर कोणी मतचाचण्या घेतल्या तर मोदींच्या बाजूने लोकमताचा ओढा अधिक वाढल्याचे दिसून येईल. कारण श्रीनगरपासून अलिगढपर्यंत मुस्लिमांनी अफ़जलचे केलेले  समर्थन हिंदू व भारतीयांना जास्तच विचलीत करून गेले आहे. आणि असा विचलित हिंदू वा भारतीय; हेच मोदी यांनी आपले लक्ष्य ठेवलेले आहे. आधी त्यांनी आपली मुस्लिम विरोधी प्रतिमा बनण्यास सेक्युलर लोकांचा मस्तपैकी वापर करून घेतला होता. आता अफ़जल समर्थनाबद्दल सेक्युलर गोटात शांतता व मौन असल्याने मोदींचा दुसरा डाव यशस्वी झाला आहे. जिहादीच नव्हेत तर सेक्युलरही देशासमोरचा धोका आहे; असे लोकांना वाटू लागण्याची प्रक्रिया गुरूच्या फ़ाशीनंतर सुरू झाली आहे. त्यातून मोदी समर्थक चहात्यांमध्ये मोठीच भर पडणार आहे. अशाच लोकांना आपली व्होटबॅन्क बनवण्याचा खेळ मोदी गेली काही वर्षे अत्यंत धुर्तपणे खेळत आहेत. अजाणतेपणी किंवा उतावळेपणने सुशीलकुमार शिंदे व कॉग्रेसने त्याला किती हातभार लावला आहे बघा. तेच नाहीत अफ़जल समर्थनाच्या बातम्या आल्यावर सेक्युलर माध्यमे, पत्रकार, पक्ष व सेक्युलर नेते यांचे त्याबद्दलचे मौन त्यांच्याच बाबतीत जनमानसात शंका निर्माण करणारे आहे. त्याचा लाभ कोणाला मिळू शकतो?

   मुस्लिम आक्रमकता व आता तर उघड अफ़जल गुरूचे समर्थन, ज्यांना विचलित करून गेले आहे; असे लोक भाजपाचे वा संघाच्या हिंदूत्वाचे पाठीराखे नाहीत. पण त्यांची सहानुभूती कुठल्या बाजूला झुकेल, याचा विचार केला तर मोदींचे पारडे का जड होते, त्याचा अंदाज येऊ शकेल. एक दंगलीनंतर गुजरातमध्ये मोठे काही घडलेले नाही. पण दहा वर्षात तिथे खुप विकास, प्रगती झालेली आहे. दुसरीकडे देशभर खुलेआम अफ़जल गुरूचे समर्थन व पाकनिष्ठ निदर्शेने होत असताना गुजरातमध्ये मात्र तसे काही घडू शकले नाही. घडू शकले नाही, कारण मोदी यांची दहशत अशीच गुजरातबाहेरच्या लोकांची समजूत आहे. मग लोकांना ती मोदींची दहशत उपाय वाटला तर नवल आहे काय? कुणाच्या का दहशतीमुळे स्थानिक मुस्लिम देशविरोधी भूमिका घेणार नसतील; तर लोक अशा माणसाला, नेत्याला पाठींबा द्यायला पुढे येणारचा ना? असे लोक देशावर प्रेम करणारे असतात. पण हिंदूत्ववादी नसतात. सेक्युलर विचार व भूमिका देशविघातक जिहादींची पाठराखण करत असेल; तर मग देश वाचावण्यासाठी हिंदूत्ववादी असेल त्याच्या बाजूने उभे रहाण्याखेरीज दुसरा पर्याय देशप्रेमी असेल त्याला उरतच नाही. आणि अशी स्थिती मोदींनी नव्हे; तर सेक्युलर मुर्खपणाने आणली आहे. मुस्लिमांच्या लांगुलचालन व त्यासाठी मुस्लिमांच्या फ़ुटीरवृत्तीची सेक्युलर पाठराखण करणार्‍यांनी अशी स्थिती निर्माण केली आहे. तिचा फ़ुकटचा लाभ मोदी उठवत चालले आहेत. आठवडाभरात श्रीनगर वा भारतात अन्यत्र जिथे जिथे म्हणून अफ़जल समर्थनाची मुस्लिम निदर्शने झाली व ज्यांनी पाहिली; त्यांना तेवढ्या एका घटनेने मोदींचा मतदार बनवले आहे. मोदींचे काम सोपे केले आहे. त्यातूनच मोदींची हिंदू व्होटबॅन्क उभारली जात आहे.  ( क्रमश:)
 भाग   ( ८५ )    १४/२/१३

मंगळवार, १२ फेब्रुवारी, २०१३

कॉग्रेस मोदी इफ़ेक्टला का घाबरली आहे?




   शनिवारी अफ़जल गुरूला फ़ाशी दिल्यावर सोमवारी गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी थाटात पत्रकार परिषद घेतली होती. आपण फ़ार मोठी बाजी मारली असे त्यांना दाखवायचे ठरलेले असावे. जयपूर येथील भाषणात भगवा दहशतवाद बोलून जी गडबड झाली होती, तिची सावरासावर करण्यासाठी बिचार्‍या अफ़जल गुरूचा बळी घेतला गेला. त्याचे श्रेय घेण्यासाठीच ही पत्रकार परिषद होती. पण दुर्दैव कसे बघा, ज्या्ला झुरळ म्हणून झटकून टाकायचा प्रयत्न होतोय, ते अधिकच अंगाला येऊन चिकटावे; तशी कॉग्रेसची अवस्था झालेली आहे. कारण गुरूच्या फ़ाशीचे कौतुक सांगायला घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या तोंडावरच यासिन मलिकचे प्रकरण येऊन आपटले. काश्मिरातील फ़ुटीरवादी गटाचा एक नेता यासिन मलिक याला पाकिस्तानात जाण्याची खास मुभा गृहखात्यानेच सवलत म्हणून दिली आणि तिकडे जाऊन त्याने कोणाची भेट घेतली? तर मुंबई हल्ल्याचा प्रमुख सुत्रधार हफ़ीज़ सईद याची. ज्या सईदने भगव्या दहशतवादाचा आरोप केल्याबद्दल शिंदे यांचे आभिनंदन केले होते, त्यालाच हा यासिन भेटल्याचे प्रकरण शिंदे यांच्या पत्रकार परिषदेच्या वेळीच उघडकीस आले आणि त्याचे उत्तर टाळून त्यांना पत्रकारांचा ससेमिरा टाळायची वेळ आली. आपण गृहमंत्री म्हणून कठोर निर्णय घेऊ शकतो; असेच सांगायला पत्रकारांपुढे आलेल्या शिंदे यांना यासीनच्या विषयावर मौन पाळायची पाळी आली. मात्र त्याच पत्रकार परिषदेत त्यांनी जयपूरच्या भगवा दहशतवाद आरोपाचा गुरूच्या फ़ाशीशी संबंध नसल्याचा दावाही केला. पण अशी तडकाफ़डकी फ़ाशी का दिली; याचा खुलासा मात्र कोणाकडेच नाही. आणि वाहिन्यांपासून सगळी सेक्युलर माध्यमे तर अफ़जलच्या फ़ाशीने मोदी इफ़ेक्ट संपवला असे दावे केले आहेत. ते खरे असतील तर मोदी इफ़ेक्ट ही कॉग्रेससाठी चिंतेची बाब झाली आहे याची निदान माध्यमे तरी कबुली देत आहेत, हे मान्यच करायला हवे ना?

   इफ़ेक्ट याचा अर्थ मोदींचा प्रभाव ना? तो कोणावर कसला प्रभाव आहे? दिल्लीतल्या एका कॉलेजमधल्या भाषणाने मोदींचा प्रभाव निर्मा्ण होऊ शकत नाही आणि मतचाचण्याचा कौल घेण्यात आला, तो त्या भाषणाच्या दोन आठवडे आधी घेण्यात आलेला आहे. तेव्हा मोदी इफ़ेक्टच असेल तर तो गुजरातच्या निवडणुक निकालाचा किंवा त्याच्याही आधीपासूनचा असला पाहिजे. असेल तर मग तो कसा आला? कुठून, कशामुळे निर्माण झाला याचेही उत्तर माध्यमांनी द्यायला नको का? जो माणूस गुजरातमध्ये मुस्लिमांच्या विरोधात दंगली घडवून आणतो; असा आरोप गेली दहा वर्षे चालू आहे व त्यामुळेच भाजपाला भारतभर मुस्लिमांची मते मिळणार नाही; असेही सांगितले जात आहे. ज्याने गेल्या तीन निवडणुका जिंकताना गुजरातमध्ये मुस्लिम मतांची फ़िकीर केलेली नाही वा मुस्लिम उमेदवार पक्षातर्फ़े उभा करण्याचीही गरज समजलेली नाही; त्याचा देशाच्या लोकमतावर कसला इफ़ेक्ट म्हणजे प्रभाव असतो? ते लोकमत म्हणजे कोण लोक? असे अनेक प्रश्न आहेत. जो इफ़ेक्ट अफ़जलच्या फ़ाशीमुळे संपुष्टात आला, असा माध्यमांचा दावा आहे तो इफ़ेक्ट मुस्लिम लोकमतावरचा नक्कीच नाही. मोदी यांना मुस्लिमांचा शत्रू म्हणून गेली दहा वर्षे रंगवण्यात आलेले आहे, तेव्हा त्यांचा मुस्लिम मतांवर प्रभाव नसेल तर तो मुस्लिमांबद्दल शंका ज्यांच्या मनात आहेत,; त्यांच्यावरचा प्रभावच असणार ना? आणि तो कमी करायचा तर मुस्लिमांबद्दल ज्यांच्या मनात शंका आहेत, त्यांना खुश करण्याचाच प्रयास असणार ना? मग गृहमंत्री वा युपीए-कॉग्रेस सरकारने मुस्लिमांबद्दल शंका असणार्‍या मतदाराला खुश करण्यासाठी अफ़जल गुरूला फ़ाशी दिले काय? मोदींचा प्रभाव त्याच वर्गावर होता आणि तोच कमी करण्यासाठी कॉग्रेसने गुरूला फ़ाशी दिले; याचा अर्थच कॉग्रेस मुस्लिम विरोधी कडव्या हिंदूंना चुचकारण्याचा उद्योग करते आहे काय? तसे कुठली वाहिनी वा संपादक पत्रकार खुलेआम का सांगत नाही? मोदी इफ़ेक्ट संपवणे याचा अर्थच, कडव्या हिंदूंना चुचकारण्यासाठी कॉग्रेसने अफ़जल गुरू याला फ़ासावर लटकवले असे स्पष्ट का सांगितले जात नाही? त्यात कॉग्रेस हिंदूत्ववादी वा धर्माच्या आधारे मते मिळवू बघते; असा आरोप होईल ना? म्हणून ही पळवाट. मोदींच्या प्रभावाखालच्या कडव्या हिंदूंना आपणही मुस्लिमांच्या भावनांची पर्वा करीत नाही; असे दाखवण्यासाठीच अफ़जलला तडकाफ़डकी फ़ाशी देण्यात आली, हे निखळ सत्य आहे आणि ते स्पष्ट शब्दात सांगायचे नाही; म्हणून मोदी इफ़ेक्ट वगैरे अशी दिशाभूल करणरी भाषा वापरली जात आहे.

   अफ़जलच्या फ़ाशीमुळे मोदी इफ़ेक्ट संपल्याची ही भाषा, मोदी यांच्यासाठी हिंदू व्होटबॅन्क तयार होत असल्याची कबूली नाही काय? ती कशी व कोणती ते आपण नंतर बघू. पण मोदी इफ़ेक्टची. म्हणजे आज कॉग्रेसला भिती वाटू लागली आहे ती भाजपाची वा मोदी भाजपाचे उमेदवार होतील याची नसून; हिंदू व्होटबॅन्क तयार होत असल्याची भिती आहे. व्होटबॅन्क म्हणजे साध्या भाषेत हिंदू मतांचा गठ्ठा होय. सर्वसाधारणपणे मुस्लिम कुठल्या तरी बाजूला एक गठ्ठा मतदान करतात व त्यानुसार निवडणूक निकालाचे पारडे झुकते, असे आपल्याकडे मानले जाते. हे राजकीय पक्षांनी व सेक्युलर माध्यमांनी इतके मनावर घेतलेले आहे, की त्याचे भुतच राजकीय नेत्यांच्या मानगुटीवर बसलेले आहे. म्हणूनच एनडीएमध्ये असूनही नितीशकुमार मोदी यांना कडवा विरोध करीत असतात. बिहारमध्ये वीस टक्क्याहून अधिक मुस्लिम लोकसंख्या आहे आणि त्याच पाठींब्यावर आपण सत्तेवर बसलो आहोत, अशी त्यांची समजूत आहे. तीच कथा बंगालमध्ये ममता किंवा कॉग्रेस व डाव्यांची आहे. करण तिथे सत्तावीस टक्के मुस्लिम लोकसंख्या आहे असे मानले जाते. जिथे म्हणून मुस्लिम लोकसंख्या मोठी आहे; तिथे त्यांच्या कलाने राजकीय पक्ष हलतात व डोलतात, हे आपल्याकडल्या राजकारणाचे सर्वमान्य विश्लेषण आहे. त्यामुळेच मोदी म्हणजे एकगठ्ठा मुस्लिमांचा विरोध असे गृहीत आहे. ते फ़ारसे चुकीचे म्हणता येणार नाही. पण असे समिकरण मांडतात, त्यांना एका गोष्टीचा साफ़ विसर पडतो, की मुस्लिमांच्या एकगठ्ठा मतांचे वजन जोपर्यंत दुसर्‍या बाजूला हिंदू मतांचा गठ्ठा नाही, तोपर्यंतच राहू शकते. गुजरातमध्ये मुस्लिमांची एकूण लोकसंख्या तुलनेने कमीच आहे. साधारणपणे दहा टक्के मुस्लिम लोकसंख्या आहे. तिच्या अन्यायाचे डंके पिटताना हिंदू समाज इतका दुखावला गेला, की मोदी यांनी त्याच्या्च जखमेवर फ़ुंकर घालण्यात आपले राजकीय समिकरण उभे केले. त्यामुळेच मोदी यांनी इतकी बदनामी व कोर्ट खटले झेलत तीन वेळा विधानसभा जिंकून दाखवली आहे.

   गेल्या तीन निवडणूकात कॉग्रेसही गुजरातमध्ये हिंदूत्वाकदे झुकत चालल्याचे दिसून येते. २००२ च्या निवडणूकीत दंगलीचे भांडवल करणार्‍या कॉग्रेसने १७ मुस्लिम उमेदवार उभे केले होते. पाच वर्षांनी ती संख्या ११ पर्यंत खाली आली आणि यावर्षी तर ती आठपर्यंत खाली आलेली आहे. तेवढेच नाही. कॉग्रेसने यावर्षी गुजरातच्या निवडणूकीत कोणी मोठा मुस्लिम नेताही गुजरातमध्ये प्रचाराला येऊ दिला नाही. उलट मोदी यांची बाब आहे, त्यांनी आपल्यावरचा मुस्लिम विरोधी हा शिक्का पुसण्याचे प्रयत्न अजिबात केला नाही. उलट एकही उमेदवार मुस्लिम उभा केला नाही. तरीही त्यांनी बहुमतापेक्षा अधिक जागा जिंकून दाखवल्या. अगदी तोगडीया व केशूभाई असे जुने सहकारी विरोधात असतानाही त्यांनी यशस्वीरित्या बहूमत मिळवून दाखवले आहे. त्यासाठी त्यांनी गुजराती अस्मिता असा शब्द वापरला असला तरी, त्यामागचा खरा चेहरा हिंदूत्वाचाच आहे. त्यांनी कुठेही प्रचारात हिंदूत्वाचा उल्लेख केला नाही. पण त्याची गरजच नव्हती. त्यांचे विरोधक व माध्यमे अखंड त्यांच्या हिंदुत्वाचा झेंडा फ़डकावत ठेवत असल्यावर मोदींना आपल्या हिंदू मतदाराला तसे उघडपणे सांगायची गरजच काय? पण कृतीतून बघितले तर त्यांनी आपण मुस्लिमांच्या गठ्ठा मतांवर हिंदू गठ्ठा मतांनी मात करू शकतो, असा सिद्धांतच गुजरात राज्यात यशास्वी करून दाखवला आहे. हे गठ्ठा मतांचे गणित केवळ मुस्लिमच वापरू शकतात असे नाही; तर हिंदूंचा धुर्त नेताही यशस्वीरित्या वापरु शकतो; हेच मोदींनी मागल्या तीन निवडणूकीत दाखवून दिले आहे. आणि त्याचाच अखिल भारतीय प्रयोग करायची सज्ज्ता हा माणू्स  गेली तीनचार वर्षे करत होता. आज मतचाचण्यांपधून जे आकडे समोर येतात, त्याची पद्धतशीर तयारी मोदी यांनी आधीपासून केली आहे. मोदी इफ़ेक्ट असे म्हटले जाते ते दुसरेतिसरे काही नसून हिंदू मतांच्या गठ्ठ्याचेच राजकारण आहे. हे कॉग्रेस सारख्या अनुभवी पक्षाला व नेत्यांना कळू शकते. भाजपानेते किंवा पत्रकारांना त्याचा थांग लागलेला नसला तरी निवडणूका जिंकण्यासाठी वेगवेगळे डावपेच खेळण्यात हयात गेलेल्या कॉग्रेस नेत्यांना येऊ घातलेला धोका कळतो आहे. कारण मोदी म्हणजे भाजपा नव्हे तर आपल्या मुस्लिम व्होटबॅन्केला धक्का देऊ शकणारी हिंदू व्होटबॅन्क; हे आता कॉग्रेसच्या लक्षात आले आहे. त्यामुळेच मोदी यांच्या जादूभोवती जमू लागलेला तोच हिंदू मतांचा गठ्ठा विचलित करायचे राजकारण अफ़जल गुरूच्या फ़ाशीतून खेळले गेले. त्यातून मोदी इफ़ेक्ट पुसण्याचा प्रयास झाला. तो कितीसा पुसला गेला हे नजीकच्या काळात दिसेल. कारण फ़ाशीच्या तिसर्‍या दिवशीच यासिन मलिकच्या सईद भेटीने फ़ाशीवर पाणी ओतले आहे. ते बाजूला ठेवून आपण आधी हिंदू मतांचा गठ्ठा म्हणजे काय ते समजून घेऊ. ( क्रमश:)
 भाग   ( ८४ )    १३/२/१३

सोमवार, ११ फेब्रुवारी, २०१३

मोदी दंगलीबद्दल माफ़ी का मागत नाहीत?


  अशा प्रकारे आपली कडव्या हिंदू नेत्याची प्रतिमा उभी राहिली, तर आघाडीच्या राजकारणात अन्य पक्ष सोबत येणार नाहीत व आपल्याला विरोध करतील; हा धोका मोदींनाही कळत होता व कळतो आहे. पण त्यांना आघाडीचे राजकारण करायचेच नसेल तर त्यांनी मित्रपक्षांची पर्वा कशाला करायची? त्यांना भाजपावरच कब्जा मिळवायचा असेल आणि त्यात पक्षातलेच प्रतिस्पर्धी आडवे येत असतील तर? म्हणूनच पाच वर्षापुर्वी राजनाथ सिंग पक्षाध्यक्ष झाले; तेव्हा त्यांनी मोदीसारख्या लोकप्रिय नेत्याला राष्ट्रीय कार्यकारीणीतून वगळले होते. कुठल्याही अधिकृत राष्ट्रीय संघटनेमध्ये मोदींना महत्वाची भूमिका पक्षाने नाकारली होती. कारण हा महत्वाकांक्षी माणूस दिल्लीत आल्यास आपल्या डोक्यावर चढून बसेल; याची दिल्लीतल्या ‘श्रेष्ठींनाही’ पुरेपुर कल्पना होती. सेक्युलर पक्ष, विचारवंत व माध्यमांना मोदी नको होते, त्यापेक्षा अधिक भाजपामधल्याच बड्य़ा लोकांना मोदी नको होते. कारण कानामागून आलेला नवखा राजकारणी तिखट होत चालला होता. जोवर दंगलीचे आरोप मोदी यांच्यावर होत राहिले व खटल्यांसह चौकशांचा ससेमिरा त्यांच्या मागे लागलेला होता; तोपर्यंत भाजपाचे नेते उपकार केल्याप्रमाणे मोदींची अनिच्छेने पाठराखण करताना दिसत होते. पण मन:पुर्वक कोणी मोदींचे समर्थन केले, असे कधीच दिसले नाही. उलट पदोपदी मोदी हा भाजपाच्या राष्ट्रीय राजकारणावरचा बोजा आहे; असे दाखवायची कुठलीही संधी भाजपाच्या दिल्लीतील राष्ट्रीय नेत्यांनी सोडली नाही. मोहिमा चालवा, आंदोलन करा व संघटनात्मक कामाचे ओझे उचला; याचा कंटाळा असलेले ऐदी लोक आज भाजपाचे श्रेष्ठी बनलेले आहेत. त्यांना मोदीसारखे आक्रमक नेतृत्व किंवा राजकारण नको आहे. सरकार कुठलेही असो, त्याने विरोधातल्या भाजपाच्या नेत्यांचे आर्थिक व व्यावसायिक हित जपावे एवढीच; अपेक्षा असलेले हे लोक आहेत. त्यांना सत्तेच्या स्पर्धेत ओढून कामाला जुंपणारा कोणी नको आहे. त्यामुळेच मोदींच्या दिल्लीत येण्यास तिथे बसलेले बहुतांश नेते विरोधातच होते. पण सेक्युलर मंडळी मात्र मोदींची पाठ सोडायला तयार नव्हती. भाजपाला देशभर बदनाम करण्यासाठी त्यांनी मोदीचा गवगवा चालूच ठेवला होता. मोदींना शिक्षा झालीच पाहिजे, मोदींनी माफ़ी मागितलीच पाहिजे, मोदी म्हणजेच हिंदू आक्रमकता, हिंदु दहशतवाद ही विशेषणे चिकटवली जात असताना, आपण अनवधानाने मोदींना देशाच्या कानाकोपर्‍यात घेऊन जातो आहोत, त्यांची कडवा हिंदू नेता अशी आयती प्रतिमा निर्माण करून देत आहोत; याचे भान सेक्युलर मंडळींनी अजिबात ठेवले नाही.

   यातला एक भाग समजून घेण्याची गरज आहे. भाजपा कितीही हिंदूत्ववादी असला तरी कायद्याचे साखळदंड पायात असल्याने; धर्माच्या नावावर हिंदू मताचा जोगवा तो मागू शकत नाही आणि मोदीसुद्धा तसे करू शकत नाहीत. पण जो अपप्रचार झाला, त्यातुन जी कडव्या हिंदू नेत्याची प्रतिमा निर्माण झाली, तिने कडव्या हिंदूत्ववादी लोकांना नेता घरबसल्या मिळवून दिला. मोदी यांना मतांचा जोगवा मागताना, आता हिंदू हा शब्दही बोलायची गरज उरलेली नाही. त्यांचे काम सेक्युलर पक्ष व माध्यमांनी सोपे करून टाकले आहे. या देशातला बहूसंख्य हिंदू, धर्मासाठी मतदान करणार नाही, यात शंका घेण्याचे अजिबात कारण नाही. पण त्यातला काही अंशी म्हणजे दहा पंधरा टक्के तर हिंदू तसा असु शकतो ना? त्याला असा नेता हवा असू शकतो ना? पण सत्ता हाती येण्यासाठी बहुतांश भाजपा नेत्यांनी व पक्षाने हिंदूत्वाचा मुद्दा सोडून दिल्यामुळे असा हिंदू भाजपावर नाराज झाला होता. त्या्चा कडव्या हिंदू नेत्याचा शोध मात्र चालू होता. त्याच्या या शोधकामात सेक्युलर लोकांनी अमूल्य हातभार लावला. अधिक शोध न घेता घरबसल्या अशा कडव्या हिंदूला मोदी यांच्या कडव्या हिंदूत्वाचे दाखले सेक्युलर माध्यमांनी आणून दिलेच. पण सत्ता हाती असली तर हा माणूस किती ‘कठोर’ वागू शकतो, त्याची रसभरीत वर्णनेही ऐकवली. ज्या गोष्टी मोदी उघडपणे बोलायला धजावणार नाहीत, इतक्या स्फ़ोटक प्रक्षोभक गोष्टी सेक्युलर लोकांनी हिंदूंच्या मनात भरवल्या. अर्थात त्या सेक्युलरांना मोदींचे कौतुक करायचे नव्हते; तर मोदींच्या हिंदूत्वाचे भय घालून मुस्लिमांना कॉग्रेस वा अन्य सेक्युलर पक्षांच्या दावणीला आणून बांधायचे होते. पण अशा प्रचाराचा साईड इफ़ेक्ट मोदी यांच्या पथ्यावर पडला. आणि तो बघायचा असेल तर तटस्थपणे बघावा लागतो, दिसू शकतो. परवा ‘टाईम्स नाऊ’ वाहिनीवर चर्चेत भाग घेताना ब्रिटीश संसदेतले लॉर्ड मेघनाद देसाई यांनी त्यावरच नेमके बोट ठेवले, पण त्याच चर्चेत सहभागी झालेल्या अनेक सहकार्‍यांच्या डोक्यात मात्र प्रकाश पडू शकला नाही.

   अर्णब गोस्वामी हा संयोजक मोदींच्या पंतप्रधानकीच्या शक्यतेवर चर्चा घडवून आणत होता. तेव्हा मोदींनी घडल्या दंगलीबद्दल माफ़ी मागितली तर त्यांच्या बाबतीतले बनलेले विरोधी मत बदलू शकते असा त्याचा दावा होता. तो खोडून काढताना मेघनाद म्हणाले, त्यामुळे इथेच बसलेले किती विरोधक मोदींना माफ़ करतील विचारा. प्रत्येकजण म्हणाला माफ़ करणार नाही. मग मेघनाद उत्तरले; हेच तर मोदीच्या आडमुठेपणाचे कारण आहे. यांच्यासाठी माफ़ी मागायची, त्याचा कुठलाही लाभ नाही. पण यांच्यापलिकडे असा मोठा मोदी चहातावर्ग आहे, ज्याला मोदीच्या आक्रमक हिंदूत्वाचे कौतुक आहे आणि मोदींनी माफ़ी मागू नये, असा त्यांचा आग्रह आहे. मोदींनी माफ़ी मागितली तर तोच पाठीराखा नाराज होईल. म्हणजे माफ़ी मागून काय होणार? विरोधक आहेत, त्यांचे मतपरिवर्तन होणार नाहीच. पण चहाते आहेत ते मात्र नाराज होतील. मग मोदीने माफ़ी कशाला मागायची? स्वत:चा राजकीय तोटा त्याने कशाला करून घ्यायचा? मोदी हा निवडणूकीच्या म्हणजेच मतांच्या राजकारणात आहे आणि त्याला मतांची फ़िकीर केली पाहिजे. त्यामुळेच त्याला मत देतील, त्यांच्या भावना जपायला हव्यात. असा जो देशभर वर्ग तयार झाला आहे, त्याला आक्रमक, निष्ठूर, कठोर मोदी आवडत असेल, तर तो दंगलीबद्दल माफ़ी कशाला मागणार? आपली हक्काची मते कशाला गमावणार? मोदीचा जो देशव्यापी हिंदूत्ववादी मतदारसंघ तयार झाला आहे, त्याला हवा तसाच आक्रमक मोदी राहिला तर ती मते मिळणार आहेत. पण त्याने आपला चेहरा सौम्य, उदारमतवादी बनवल्याने ही मते गमवावी लागतील. पण सेक्युलर मते मात्र त्याच्याकडे वळणार नाहीत. अगदी माफ़ी मागितली म्हणून त्याला मुस्लिमांची भरघोस मतेही मिळण्याची शक्यता नाही. आणि म्हणूनच कुठल्याही स्थितीत माफ़ी मागणार नाही, असा हट्ट मोदी धरून बसला आहे. मेघनाद देसाई यांचे हे विश्लेषण नेमके व नेटके आहे. मुठभर सेक्युलर जे कधीच मोदीला माफ़ करणार नाहीत, त्यांच्या खुशीसाठी मोदींनी आपल्या हुकूमी मतदाराला तिलांजली द्यायची काय?

   मोदी हा माणुस किती धुर्त व सावध आहे त्याचा पत्ता यातून लागतो. त्याच्यासाठी सेक्युलर माध्यमांनी मोठ्या खुबीने अनेक वर्षे सापळा लावला आहे. पण तो त्यात अडकायला तयारच नाही. जेव्हा गुजरातची दंगल झाली, त्यानंतर सेक्युलर मंडळींना खुश करण्यासाठी पंतप्रधान अटलविहारी वजपेयी यांनी मोदी यांना ‘राजधर्म’ शिकवला होता, त्यामुळे भाजपाची प्रतिमा सेक्युलर वा सर्वसमावेशक होऊ शकली का? मोदी व गुजरातसाठी देशभर भाजपाच्या विरोधातला प्रचार चालुच राहिला ना? म्हणजे कितीही सेक्युलर चेहरा मुखवटा लावला, तरी भाजपावरचा हिंदूत्वाचा शिक्का पुसला जाणार नसेल तर ते नाटक करायचे तरी कशाला? त्यातून सेक्युलर वा मुस्लिम तुमच्या वाट्याला येत नाहीत. पण जे हिंदुत्वासाठी तुमच्या मागे आलेले आहेत, ते मात्र नाराज होऊन बाजूला पडतात. म्हणजेच सर्वसमावेशक चेहरा असा जो सापळा माध्यमे वापरतात, त्यात अडकणे हा शुद्ध मुर्खपणाच नाही काय? वाजपेयी यांच्यासह अडवाणी सुद्धा त्यात अनेकदा अडकलेले आहेत. पण मोदी मोठा चतुर व धुर्त माणूस आहे, तो असे सगळे प्रयत्न उधळून लावून आपल्या भूमिकेवर ठाम उभा आहे. त्याने स्वत:ला सेक्युलर सिद्ध करण्यास ठामपणे प्रत्येकवेळी साफ़ नकार दिला आहे. त्यातून आपल्या विरोधकांना व सेक्युलरांना स्वत:वर हिंदूत्वाचे सतत आरोप करण्याचीही भरपूर संधी दिलेली आहे. त्यातून आपली कडवा हिंदूत्ववादी अशी प्रतिमा तयार करून घेतली आहे. अगदी परवा अफ़जल गुरूला फ़ाशी दिल्यावर सेक्युलर माध्यमांची भाषाही बोलकी होती. एका फ़ाशीतून कॉग्रेसने ‘मोदी इफ़ेक्ट’ पुसून टाकला. पुसून टाकला तो मोदी इफ़ेक्ट म्हणजे तरी नेमके काय ते सांगाल की नाही? मोदी इफ़ेक्ट त्या फ़ाशीने पुसला गेला असेल तर तत्पुर्वी तो कसला इफ़ेक्ट होता, ते कोणी सांगायचे? ज्याला धर्मांध वा भगवा दहशतवादी असा लोकांसमोर दहा वर्षे सेक्युलर पक्ष व माध्यमांनी पेश केला, त्याचा कशावर, कुणावर, कसला इफ़ेक्ट होता, तो पुसण्यासाठी त्या बिचार्‍या अफ़जल गुरूला फ़ासावर का जावे लागले?( क्रमश:)
 भाग   ( ८३ )    १२/२/१३

रविवार, १० फेब्रुवारी, २०१३

नरेंद्र मोदीं यांची ‘सेक्युलर’ हिंदूत्ववादी रणनिती


   नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्याची तयारी गेली पाच वर्षे करीत आहेत आणि त्यांच्या मुख्यमंत्री पदाला सुरुंग लावण्यात त्यांचे विरोधक मागली दहा वर्षे गुंतले आहेत. इथे लढाई किती विषम आहे ते आधी लक्षात घ्यावे लागेल. शत्रू वा प्रतिस्पर्ध्याशी लढताना नुसती हत्यारे व साधने पुरेशी नसतात तर त्याच्या रणनितीवर मात केल्यासच लढाई जिंकता येत असते. मोदी विरुद्ध बाकीचे सगळे, म्हणजे अगदी त्यांच्याच भाजपामधले त्यांचे विरोधकही, एका बाबतीत मागे पडले, ते म्हणजे त्यांनी कधी मोदी यांची रणनिती समजूनही घेण्याचा प्रयत्न केला नाही. परिणाम असा झाला आहे, की मोदींना स्वत:ला ते काय करीत आहेत व कुठल्या दिशेने चालले आहेत ते नेमके ठाऊक आहे, पण त्यांचे तमाम विरोधक मात्र अंधारात चाचपडल्यासारखे लढत आहेत व फ़सत आहेत. मला बिशनसिंग बेदीची एक गोष्ट आठवते.

   बहूधा १९९९ सालची गोष्ट असावी. तेव्हा विश्वचषक क्रिकेटस्पर्धा चालू होती आणि भारताचा कर्णधार अझरूद्दीन होता. तेव्हा नव्यानेच सुरू झालेल्या एनडीटीव्ही प्रणित स्टारन्युज वाहिनीवर टर्निंग पॉइंट असा एक कार्यक्रम व्हायचा. रोज रात्री होऊन गेलेल्या त्या दिवशीच्या सामन्याचे विश्लेषण करायला माजी कर्णधार बिशनसिंग बेदी हजेरी लावायचा. बेदी उपरोधिक व खोडसाळ बोलण्याविषयी प्रसिद्धच आहे. एकेदिवशी पावसामुळे सामना होऊ शकला नव्हता, तेव्हा चर्चेला दुसर्‍या दिवशीच्या सामन्याचा विषय घेण्यात आला होता. तो सामना भारत पाकिस्तान यांच्यात व्हायचा होता. तर भारताचा कर्णधार अझरुद्दीन याने कोणती रणनिती वापरावी म्हणजे पाकिस्तानला हरवता येईल; असा प्रश्न त्या कार्यक्रमाच्या संयोजकाने विचारला. तेव्हा बेदीने दिलेले उत्तर अवाक करणारे होते. संयोजकही बडबडला. बेदी म्हणाला उद्याच्या सामन्यात उतरण्यापुर्वी अझरने स्वत:ला संघातून वगळावे, संघाचा कर्णधार स्वत:ला वगळून कसा सामना खेळला जाऊ शकतो? त्यावर बेदीने दिलेले उत्तर मार्मिक, पण नेमके आहे. बेदी उत्तरला, पाक संघाची सगळी रणनिती अझर कर्णधार आहे, यावर बेतलेली आहे. कारण अझर समोर कुठलाही संघ वा खेळाडू असला, तरी तो कुठलाच बदल करत नाही. त्यामुळे त्याच्या बुद्दूपणावर पाकची रणनितीची भिस्त आहे. तोच कर्णधार नसेल, तर नव्या कर्णधाराच्या नव्या रणनितीचा पत्ताच नसल्याने पाक संघ गोंधळून जाईल. म्हणजे रणनितीतच पाकिस्तानचा अर्धा पराभव होऊन जाईल. उरलेले काम खेळाडू सहज पार पाडतील. ऐकायला विचित्र वाटणारी गोष्ट असली, तरी त्यातली खोच लक्षात घेण्यासारखी आहे. तुमची रणनिती व डावपेच ठाऊक असले, तर तुमचा प्रतिस्पर्धी त्यावर मात करण्यासाठी आपले डावपेच आखत असतो. जर तुमचे डावपेच ठाऊकच नसतील तर त्याला तुमच्यावर मात करण्याची रणनिती आधीपासून आखता येत नाही. त्याला तुमच्या प्रत्येक चालीचा ती खेळली गेल्यावरच विचार कारवा लागतो व त्यावर मात करायची रणनिती आखत जावे लागते. म्हणूनच युद्ध व लढाईत रणनिती आकस्मिक व धक्कादायक असणे अगत्याचे असते. मोदींच्या बाबतीत नेमकी तीच चुक त्यांच्या तमाम विरोधकांनी केलेली आहे. मोदींची कोंडी करण्याचे सर्व मार्ग व मुद्दे विरोधकांकडे ठरलेले आहेत व त्यावर मोदी कुठे व कशी मात करू शकतील; त्याचा त्यांच्या विरोधकाने किंचितही विचार केलेला नाही. ही मोदी विरोधकांना त्यांची जमेची बाजू वाटते. पण प्रत्यक्षात तीच आता मोदी यांच्यासाठी जमेची बाजू होऊन गेली आहे. 

   मुस्लिमांची नाराजी, सेक्युलर मित्रांचा आक्षेप, गुजरातच्या दंगली, हुकूमशाही वृत्ती, कडवे हिंदूत्व, एकाधिकारशाही असे मोदी यांच्या विरोधातले ठरलेले आक्षेप आहेत. ह्या गोष्टींमुळे त्यांना गुजरातमध्ये यश मिळत असले, तरी संपुर्ण देशात १८ टक्के मुस्लिम लोकसंख्या आहे आणि तिचा रोष पत्करून मोदी यांना देशाच्या पंतप्रधान पदावर दावा करता येणार नाही. जगभर गुजरातच्या दंगलीने मोदी बदनाम झालेले आहेत. अनेक बड्या पाश्चात्य देशांनी त्यांना व्हिसाही नाकारलेला आहे. सहाजिकच गुजरात बाहेर मोदी यांना कोणी स्विकारणार नाही; हे गृहित धरून त्यांच्या विरोधकांनी सगळे डाव आजवर खेळले आहेत. अर्थात हे डावपेच सुरू झाले, तेव्हा ते भाजपाची कोंडी करण्यासाठी सुरू झाले होते. तेव्हा मुळात गुजरातमध्येही भाजपाला संपवण्यासाठी मुस्लिमांचे दंगलीत मोठेच नुकसान झाल्याचा डंका सतत पिटला गेला. त्यातून देशाच्या कानाकोपर्‍यातले मुस्लिम, मोदी व मोठ्या प्रमाणात भाजपाच्या विरोधात जाण्याची रणनिती यशस्वी झाली, हे कोणी नाकारू शकत नाही. पण या व्यापक रणनितीचा अन्य दुष्परिणाम होऊ शकतो, याचा कोणीही मोदी विरोधकाने गंभीरपणे विचारच केला नाही. त्याचे एकच कारण म्हणजे देशातले १८ टक्के मुस्लिम एक गठ्ठा मतदान करतात, हे सेक्युलर गृहीत. पण अठरा टक्के मुस्लिम गठ्ठा मतदान करतात, म्हणून सगळे पक्ष त्यांच्याच गठ्ठ्य़ाचा विचार करत असतील; तर तेवढाच मतांचा दुसरा गठ्ठा निर्माण झाला मग काय होईल; याचा विचारही कोणाच्या मनाला कधी शिवला नाही. मोदी यांनी नेमका तोच विचार पर्याय म्हणून केला आणि पुढले डावपेच आखत गेल्या दहा वर्षात पद्धतशीर वाटचाल केली आहे. पहिली गोष्ट म्हणजे दंगलीतून जेवढी कटूता हिंदू व मुस्लिम यांच्यात निर्माण झालेली नव्हती; तेवढी नंतरच्या अपप्रचाराने निर्माण केली. त्याचे आरंभिक परिणाम गुजरातमध्ये दिसले. म्हणजे लगेच घेतल्या गेलेल्या विधानसभा निवडणुकीत मोदी यांच्या हिंदूहृदय सम्राट असण्यावर शिक्कमोर्तब होऊन गेले. बाकीचे सेक्युलर लोक हिरीरीने तो शिक्का पक्का करीत असताना, मोदी यांनी तो पुसून टाकायचा कधीच प्रयत्न केला नाही. उलट त्यांनी आपल्यावरच्या हिंदूत्वाच्या शिक्क्याला गुजराती अस्मितेची जोड देऊन मोदी म्हणजेच गुजरात अशी एक नवी अस्मिता जन्माला घातली. तिचे पालनपोषण आपल्या सेक्युलर विरोधकांकडून पद्धतशीरपणे करून घेतले. 

   गेल्या दहा वर्षात मोदी यांचे तमाम विरोधक ज्याला बदनामी समजून मोदी विरोधातला आक्रमक प्रचार करीत होते; तो मोदींना हवाच होता. म्हणूनच की काय, त्यांनी वेळोवेळी आपल्या विरोधकांना हाती कोलित द्यावे, तसे काही मुद्दे जाणिवपुर्वक पुरवले सुद्धा. कोणी उत्तरप्रदेशात, कोणी बिहारमध्ये तर कोणी मुंबई वा अन्यत्र गुजरातच्या दंगलीचा मुद्दा वापरून मते मिळवण्याची धडपड केली. पण असे करताना नुकसान भाजपाचे होत असले, तरी प्रत्यक्षात मोदींची प्रतिमा कडव्या हिंदू नेत्याची बनवली जात होती. ती मोदी यांना हवीच होती. कारण मुस्लिमांच्या आक्रमक वृत्ती व जिहादी कारवायांनी अस्वस्थ असलेला भारतीय किंवा हिंदू कडव्या हिंदूत्वाच्या शोधात आहे, याची जाण मोदींना होती. ते स्थान दिर्घकाळ शिवसेनाप्रमुख बाळासहेब ठाकरे यांनी व्यापलेले होते. पण अलिकडे प्रकृती अस्वास्थ्यामुळे ठाकरे थंडावले असताना, ती पोकळी भरून काढायला मोदी यांचे छुपे प्रयत्न चालू होते. त्याला देशभरातल्या सेक्युलर माध्यमे, पक्ष व विचारवंतांनी मोलाचा हातभार लावला. मतांसाठी व सत्तेसाठी भाजपानेच हिंदूत्वाचा आग्रह सोडला असला, तरी तशी अपेक्षा बाळगणारा मोठा मतदारवर्ग होता, त्याला ठाकरे यांच्यासारखा कोणी हवाच होता. मोदींनी त्या दिशेने धुर्तपणे वाटचाल सुरू केली होती. त्यात दोन अडचणी होत्या. एकीकडे पक्षातले त्यांचे प्रतिस्पर्धी व दुसरीकडे मुस्लिम मतांच्या गठ्ठ्याचे राजकारण. त्यावर मात करण्यासाठी त्यांनी आपल्या विरोधकांचा धुर्तपणे वापर करून घेतला. स्वत: हिंदूत्व न बोलता त्यांनी गुजरातच्या विकास कामांवर भर दिला, पण दंगलीबद्दल माफ़ीची भाषा करायला साफ़ नकार दिला. त्यामुळे सेक्युलर मंडळी देशभर निषेध करीत मोदींचे नाव सर्वत्र घेऊन जातील; हे त्यांना पक्के ठाऊक होते. दुसरीकडे विकासात मुसंडी मारून आपल्या प्रशासकीय कर्तृत्वाची छाप पाडण्यावर आपली शक्ती केंद्रीत केली. म्हणजे कामातून विकासपुरूष हे त्यांनी सिद्ध करायचे आणि त्यांच्या हिंदूत्वाचा डंका विरोधकांनी पिटावा; अशी कामाची वाटणी मोदींनी केली. सेक्युलर लोकांनी आपले काम मोठ्या मेहनतीने पार पाडले. परिणामी भाजपाच्या हिंदूत्वाविषयी साशंक असलेला देशाच्या कानाकोपर्‍यातला कडवा हिंदू आपोआपच मोदींकडे आकर्षित होत गेला. म्हणजे प्रत्यक्षात सेक्युलर लोकांनी त्याला मोदींच्या गोठ्यात आणायची अत्यंत महत्वाची जबाबदारी पार पाडली. स्वत:च्या नकळत सेक्युलर लोकांनी मोदींना बहूमोलाची मदत केली. याचे कारण सरळ सोपे आहे. ज्याला सेक्युलर मोदींच्या बदनामीची रणनिती समजत होते, तीच मोदींनी आपल्या हिंदूत्वाची रणनिती बनवली. परिणाम बघा. ज्याला भाजपाच्या राष्ट्रीय समितीत जागा द्यायला पक्ष तयार नव्हता व ज्याला गुजरातमध्ये रोखू बघत होता, तो भाजपाचा राष्ट्रीय नेता होऊन गेला आहे आणि त्याचे श्रेय सेक्युलरांनाच द्यावे लागेल. हा कोणाच्या रणनितीचा विजय व कोणाच्या रणनितीचा पराभव आहे?   ( क्रमश:)  
 भाग   ( ८२ )    ११/२/१३

नरेंद्र मोदी हा राजकीय अपवाद आहे


   नवा पत्रकार होतो आणि राजकीय घडमोडींचा अभ्यास करायला नव्याने शिकत होतो, तेव्हा चार दशकांपुर्वी अशीच इंदिरा गांधींवर माध्यमातून कडाक्याची टिका होत असे. पण त्या विचारवंतांना वा संपादकांना इंदिराजी कितपत कळल्या होत्या? आज त्याची आठवण होते, कारण तेवढीच भरकटलेली टिका नरेंद्र मोदी यांच्यावर होत असते. एक किरकोळ फ़रक आहे. इंदिराजींवर टिका करणारे संपादक राजकीय जाणकार आजच्या इतके पक्षपाती किंवा व्यक्तीद्वेषाने भारावलेले नसायचे. आपला राजकीय अभ्यास व अनुभव यानुसारच त्यांचे विश्लेषण चालत असे. आजही कमीअधिक प्रमाणात तसेच होत असते. ते बाकीच्या पक्ष, नेते वा घटनांच्या बाबतीत योग्य वा खरे ठरणारे असले, तरी मोदींच्या बाबतीत फ़सते, तसेच तेव्हा ते इंदिराजींच्या बाबतीत फ़सायचे. मग तेव्हा जे कोणी मला पत्रकारीतेतले गुरू वा नायक वाटायचे, त्यांची फ़सगत आवडत नसे. पण म्हणून वस्तुस्थिती बदलत नव्हती. याचे कारण असे होते, की इंदिराजी वा त्यांचे राजकारण तुम्हाला आवडणारे नसले तरी त्यांच्या समर्थनाला बाहेर पडणार्‍या सामान्य जनतेला आवडत असेल; तर ते त्यांनाच मते देणार होते व देत होते. सामान्य मतदार कधी विचारवंत वा संपादकांच्या मतानुसार मतदान करीत नसतो. तो परिस्थिती ताडून त्याच्या अनुभवानुसार मत बनवत असतो आणि आपला नेता व सत्ताधारी निवडत असतो. त्याला तात्कालीन स्थिती जबाबदार असते. १९७१ सालात देशात इतकी अस्थिरता व अराजक माजलेले होते, की एका राज्यात अवघ्या तीन दिवसात मुख्यमंत्री बदलावा लागला होता. एका मुख्यमंत्र्याने तर शपथ घेऊन मंत्रिमंडळही न बनवता राजिनामा देण्यापर्यंत अनागोंदी माजलेली होती. कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही अशी अवस्था आलेली होती.

   अनेक पक्षांची आघाडी सरकारे नऊ राज्यात सत्तेवर आलेली होती आणि मंत्रीपदे वा मुख्यमंत्री पदासाठी एका दिवसात आमदारांचे गट इकडून तिकडे निष्ठा बदलत होते. त्याच काळात बिहारमध्ये डझनभर आमदारांचा गट पदरी असलेल्या एका खासदाराला मुख्यमंत्री व्हायचे होते. पण ते पद मिळवणे शक्य असले तरी त्यासाठी सहा महिन्यात आमदार म्हणून निवडून येणे त्याला शक्य नव्हते. तेवढ्यासाठी त्याने आपल्या एका बगलबच्च्याला मुख्यमंत्री पदावर आणून बसवले. तीन दिवसासाठी मुख्यमंत्री झालेल्या या माणसाने मंत्रीमंडळही बनवले नाही. दुसर्‍या दिवशी त्याने त्या खासदाराला विधान परिषदेचा आमदार म्हणून नेमायची शिफ़ारस राज्यपालांना केली आणि त्यावर शिक्कामोर्तब होताच आपल्या पदाचा राजीनामा दिला. मग पुन्हा बहूमताचा दावा करून त्या खासदाराने मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. असा द्राविडी प्राणायाम कशाला करावा? तर मुख्यमंत्री स्वत:लाच आमदार नेमण्याची शिफ़ारस करू शकणार नव्हता. म्हणजे त्या खासदाराने स्वत:ला आमदार नेमण्यासाठी, तीन दिवसांचा मुख्यमंत्री आणला व घालवला. त्या खासदाराचे नाव आजही तुमच्या आमच्या जिभेवर आहे; म्हटले तर वाचकाला धक्काच बसेल. त्याचे नाव होते, बिंदेश्वरी प्रसाद मंडल उर्फ़ बी. पी. मंडल. अजून लक्षात नाही नाही? त्याच्याच नेतृत्वाखाली पुढे इतरमागास समाजाच्या सवलतीसाठी अभ्यास आयोग नेमण्यात आला आणि त्याच्याच अहवालाला मंडल शिफ़ारशी म्हटले जाते.

   तर अशी स्थिती १९७० सालात देशाच्या मोठ्या भागात होती. आठवड्यात वा महिन्यात मुख्यमंत्री बदलत होते, आमदार पक्षांतर करत होते. राजकीय व प्रशासकीय अस्थिरता धुमाकुळ घालत होती. राजकारण्यांच्या लोकशाही मर्कटलिलांना लोक इतके कंटाळलेले होते, की यापेक्षा एकछत्री हुकूमशहा बरा म्हणायची पाळी लोकांवर आलेली होती. मात्र तेव्हा कॉग्रेसचा पक्ष म्हणून पुरता बट्ट्य़ाबोळ झालेला होता. त्यामुळेच कोणी तरी सरकार म्हणजे देशाचा कारभार सरळसोट खंबीरपणे चालविल; त्याचा शोध सामान्य नागरिक म्हणजे मतदार घेत होता. तेव्हा इंदिराजींच्या पाठिशी तरी कितीसा प्रशासकीय अनुभव होता? १९६६ सालात देशाच्या पंतप्रधान झाल्यापासून पक्षातच इंदिराजींचे पाय ओढणे चालू होते. शिवाय कॉग्रेसचा अनेक राज्यात पराभव झालेला होता. पण पक्षातले ढुढ्ढाचार्य किंवा प्रांतिक सुभेदार यांना न जुमानता आपल्याला हवे तेच करण्याचा सपाटा इंदिराजींनी लावला होता. त्यातलेच त्याचे दोन निर्णय वादग्रस्त तसेच लोकप्रिय सुद्धा ठरून गेले होते. संस्थानिकांचे तनखे बंद करणे व चौदा मोठ्या बॅन्कांचे त्यांनी केलेले राष्ट्रीयीकरण; हे अत्यंत धाडसी निर्णय होते. त्याचा प्रभाव जो जनमानसावर पडला होता, त्यातूनच इंदिराजींची साहसी व खंबीर नेता अशी प्रतिमा उभी राहिली होती. बाकी त्यांच्या पाठीशी कॉग्रेस वा तिची संघटनाही ठामपणे उभी नव्हती. अशावेळी त्यांनी अत्यंत धा्डसी जुगार खेळला होता. थेट लोकसभा बरखास्त करून मध्यावधी लोकसभा निवडणुका जाहीर केल्या. मग दुफ़ळी माजलेली कॉग्रेस बघून विरोधकांची बडी आघाडी तयार झाली होती. पण एका बाजूला स्वतंत्र, जनसंघ व संघटना कॉग्रेस अशी बडी आघाडी व दुसर्‍या बाजूला डाव्या विविध पक्षांची मोर्चेबांधणी यांच्याशी इंदिराजींना दोन हात कारवे लागले होते. असलेले बहूमत तरी टिकेल की नाही; असे त्यांच्या विषयीचे जाणकारांचे विश्लेषण होते. पण प्रत्यक्षात मतदान होऊन निकाल समोर आले; तेव्हा सर्वांनाच धक्का बसला होता. कारण इंदिराजींनी फ़ोडलेल्या कॉग्रेस पक्षातील त्यांच्या गटाला नुसतेच बहूमत मिळाले नव्हते तर दोन तृतियांश बहूमत मिळाले होते.

   तेव्हा इंदिराजींनी कोणता चमत्कार घडवला होता? त्यांच्यापाशी देखील भक्कम लोकप्रिय पक्ष नव्हता, की संघटना नव्हती. फ़ार कशाला महिन्याभरात नव्या पक्षाला मिळालेल्या नव्या चिन्हावर त्यांना ती देशव्यापी निवडणुक लढवावी लागली होती. पण त्यांनी बाजी मारली, त्यात त्यांचे कर्तृत्व जेवढे होते, तेवढेच विरोधी पक्षांचे योगदानही मोठे होते. विरोधकांनी माजवलेल्या अराजकाची प्रतिक्रिया म्हणून मतदार मोठ्या संख्येने इंदिराजींकडे आकर्षित झालेला होता. मग त्यांना पक्ष संघटना वा कार्यकर्त्यांची गरज उरलेली नव्हती. त्यांना फ़क्त जागोजागी लढायला पाय रोवून उभे राहातील असे उमेदवार हवे होते आणि ज्यांना त्यांनी शेंदूर फ़ासला, ते लोकसभेत निवडून गेले. तो चमत्कार परिस्थिती व माहोलचा होता. त्यावेळची स्थिती आज मला दिसते आहे. लोकपालचे आंदोलन, सामुहिक बलात्कारानंतरचा जनतेचा उठाव, भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले आजचे नाकर्ते मनमोहन सरकार आणि सार्वत्रिक अराजक, अनागोंदीची स्थिती नेमकी १९७० सारखीच आहे. आणि लोक नेमके तसाच कोणी हुकूमशहा शोधत असल्याप्रमाणे नरेंद्र मोदी यांच्याकडे आशाळभूतपणे बघत आहेत. त्या लोकांना लोकशाही वा गुजरातच्या दंगली असल्या गोष्टींची फ़िकीर उरलेली नाही. त्यामुळेच चाचण्यांत देशाच्या २८ मोठ्या शहरे व महानगरांमध्ये नरेंद्र मोदी यांच्यावर इतका विश्वास का दाखवला, त्याचे उत्तर सापडू शकेल. त्याला मोदी यांच्या लोकप्रियतेची कसोटी लावता येणार नाही, तर युपीए व कॉग्रेसच्या ना्कर्तेपणाची मोजपट्टी लावणे आवश्यक आहे.

   ज्यांना मोदी मुख्यमंत्री असून देशाच्या अन्य राज्यात लोकप्रिय का आहे असा प्रश्न पडतो; त्यांनी म्हणूनच आपले निकष तपासून बघण्याची गरज आहे. मग त्यांचे शंकानिरसन होऊ शकते. पण तसे न करता आजच्या भाजपाची विविध राज्यातील लोकप्रियता वा लोकमताचा त्या पक्षाला असू शकणारा पाठींबा, हा निकष मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या दाव्याला लागू होत नाही. कारण चार दशकांपुर्वी अशाच स्थितीत तोच निकष इंदिराजींच्या निवडणूकीलाही लागू शकला नव्हता. कारण नियम हे नेहमीची स्थिती असते तेव्हा लागू होतात. जेव्हा परिस्थिती अपवादात्मक असते तेव्हा नियमाच्या पलिकडे जाऊन त्या अपवादाला लक्षात घ्यावे लागते. इथे मोदी लोकप्रिय आहेत का, किंवा त्यांचा पक्ष किती राज्यात संघटित आहे, हा विषयच महत्वाचा नाही. युपीएच्या कारभाराला व सेक्युलर म्हणून जे थोतांड गेल्या दहा वर्षात देशात धुमाकुळ घालते आहे, त्यापासून लोकांना मुक्ती हवी आहे. ती मुक्ती देऊ शकणारा कोण नेता आहे; याचा शोध मागल्या दोन वर्षापासून सुरू झाला आणि लोकांच्या कल्पनाशक्तीला नरेंद्र मोदी नावाचा चेहरा गवसला आहे. तेव्हा नेहमीच्या फ़ुटपट्ट्या लावून त्याच्या लोकप्रियतेचे मोजमाप करता येणार नाही तर देशाच्या राजकीय इतिहासात जे अपवादात्मक स्थितीचे राजकीय संदर्भ आहेत, त्याचे निकष वापरून विश्लेषण करणे भाग आहे   ( क्रमश:)
भाग   ( ८१ )    १०/२/१३

शुक्रवार, ८ फेब्रुवारी, २०१३

भाजपा उमेदवारी घोषणा का करीत नाही?


   सध्या तरी नरेंद्र मोदी गुजरातमध्येच आहेत आणि त्यांचा पक्ष किंवा त्यांनी स्वत:ला २०१४ च्या निवडणुकीत अधिकृतपणे झोकून दिलेले नाही. पण माध्यमांना मात्र त्याची खुपच घाई झालेली आहे. मोदी उमेदवार असल्याप्रमाणे मतचाचण्या घेतल्या जात आहेत व त्यावर चर्चाही चालू आहेत. तेवढ्यावरही भागत नाही. मोदी एनडीएचे उमेदवार झाले तर नितीशकुमार यांचा जेडीयू त्या आघाडीत रहाणार कसा; याची त्या पक्षापेक्षा माध्यमांना चिंता भेडसावते आहे. तितकेच नाही तर एनडीएमधून नितीशचा पक्ष बाहेर पडला, तर भाजपाला उर्वरित मित्रांसह बहूमताचा पल्ला कसा गाठता येईल; याचीही चिंता माध्यमांनाच अधिक भेडसावते आहे. जणू मोदी पंतप्रधान व्हावेत अशी सेक्युलर माध्यमांचीच सर्वाधिक इच्छा असावी; असेच आजचे तरी चित्र आहे. मात्र भाजपा किंवा त्यांचा को्णी मित्र पक्ष ती इच्छा, लगेच तथास्तू म्हणून पुर्ण करायला राजी नाहीत. त्यामुळे माध्यमातील सेक्युलर मंडळींच्या जीवाची खुपच घालमेल सुरू आहे. मोदी उमेदवार असतील तर आम्ही एनडीएमधून बाहेर पडू; अशी नितीशनी धमकी द्यावी, इतकी किमान इच्छासुद्धा त्यांचा पक्ष पुर्ण करायला राजी नाही. किती अत्याचार आहे ना? वाहिन्या आणि माध्यमे ज्या राजकारण्यांना इतकी अहोरात्र प्रसिद्धी देत असतात, त्यांनी माध्यमांची इतकी सामान्य इच्छा सुद्धा पुर्ण करू नये? नितीश त्यावर काही बोलत नाहीत आणि त्यांचे विश्वासू सहकारी तशी वेळ येऊ देत म्हणून प्रश्नच झटकून टाकतात. याला अत्याचार नाही तर काय म्हणायचे? बरे मोदींची लोकप्रियता सिद्ध करण्यासाठी वाहिन्यांनी पदरमोड करून चाचण्या घेतल्या. भाजपाला आणखी काय हवे? करायचे लगेच मोदींचे नाव जाहिर आणि जाऊ द्यायचे नितीश ना एनडीए सोडून. पण कोणी म्हणून ढिम्म हलायला तयार नाही. ना मोदी आपली उमेदवारी बोलत, ना भाजपा त्यांचे नाव घेत. मग वाहिन्यांनी चोविस तास बोंबलायचे काय? तोगडीया, सिंघल यांच्या बडबडीला कोणी किंमत देत नाहीत, नितीश वगैरे त्यांची दखलही घ्यायला तयार नाहीत. मोठी गोची झाली आहे वाहिन्यांवरचा उतावळ्या सेक्युलरांची.

   जे माध्यमातल्या विद्वान, हुशार, अभ्यासू पत्रकारांना इतके सोपे वाटते, तेच या बुद्दू राजकारण्यांना अवघड का वाटावे? त्याचे कारण हे अभ्यासू लोक किनार्‍यावर बसून बोलत असतात. पण राजकारण्यांना वहात्या धारेत उतरून पोहायचे असते. हात मारता आले नाहीत तर गटांगळ्या पत्रकार, अभ्यासक खात नसतो. राजकीय नेते व उमेदवारांना खाव्या लागत असतात. म्हणूनच किनार्‍यावर बसून पोहणे किती सोपे आहे; त्याची गणिते मांडणार्‍या पत्रकार अभ्यासकांपेक्षा राजकारणी सावधपणे पावले टाकत असतात. त्यांना घाई नसते आणि वाहिन्यांना बातम्या रंगवायच्या आहेत, म्हणून कोणी पक्ष चालवत नसतो. त्यांची काही धोरणे, योजना व भूमिका असतात. त्या बातमीसाठी नसतात, तर समाजाच्या वर्तमान व भविष्याशी संबंधित असतात. त्यामुळेच त्यांना असे विषय माध्यमे व पत्रकारांच्या शिळोप्याच्या गप्पा चालाव्यात; तशा हाताळता येत नसतात. मग देशाच्या पंतप्रधान पदाचा विषय इतका झटपट सोडवावा हे शक्य आहे काय? त्यातील शक्यता, गणिते, समिकरणे, जु्ळवाजुळवी, रागलोभ अशा अनेक बाजू विचारात घ्याव्या लागतात. मतचाचण्या घेऊन अंदाज बांधावेत, अशा खर्‍या निवडणूका सोप्या नसतात. त्यात अनेकांच्या आयुष्याचा जुगार पणास लागलेला असतो. लालू किंवा मुलायम यांचीच कहाणी घ्या. मागल्या काही वर्षात त्यांनी माध्यमांच्या तालावर नाचतांना स्वत:ची कशी दयनीय अवस्था करून घेतली आहे? काही वर्षे सतत वाहिन्यांवर दिसणारे लालू आता कशाला गायब आहेत? कारण सेक्युलर पोरखेळात ते आपली शक्ती गमावून कफ़ल्लक झाले आहेत.

   भाजपाला सत्तेपासून रोखण्याचा जो खेळ दहा वर्षापुर्वी सुरू झाला, त्यात माध्यमांच्या तमाशात लालू मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. त्यात आपल्या कॉग्रेस विरोधाचा चेहरा ते गमावून बसले आणि आता आपले पाठीराखे निवडून आणायची क्षमता गमावल्यावर त्यांना त्याच सेक्युलर समिकरणात कोणी विचारत सुद्धा नाही. मागल्या खेपेस त्यांनी कॉग्रेसला सोबत घेतले होते व स्वत: लालू युपीए सरकारमध्ये सहभागी झाले. परिणामी त्यांचा बिहारमध्ये असलेला कॉग्रेस विरोधाचा पाया ठिसूळ होऊन गेला आणि पुढल्याच निवडणुकीत त्यांचा फ़ज्जा उडाला. त्यांच्या कॉग्रेस विरोधी मतांवर नितीश कब्जा करत गेले आणि लालू व पासवान नेस्तनाबूत झाले. बिहारमध्ये सेक्युलर खेळ खेळताना आणि त्यातून भाजपाला संपवताना, तेच दोघे संपले. भाजपा शिल्लक आहे. पण दरम्यान कॉग्रेसच्या नादाला लागून या दोघांनी आपली पत गमावली. उलट मुलायम-मायावती यांची कहाणी बघा. त्यांनी कॉग्रेसला लोकसभेत पाठींबा देताना कधीच थेट निवडणुकीत युती मात्र केली नाही. आपला मतदार कॉग्रेस विरोधातला आहे व तो कॉगेस सोबत गेल्याने बिथरू शकतो, याचे दोघांनी भान ठेवले आहे, तर त्यांची ताकद कमीजास्त झाली तरी टिकून आहे. तेव्हा माध्यमांतील सेक्युलर अभ्यासकांची गणिते वेगळी असतात आणि खर्‍या निवडणुकीतली सेक्युलर गणिते वेगळी असतात. हे मुलायमला ठाऊक आहे; तसेच नितीशही ओळखून आहेत. मोदींच्या विरोधात बोलणे वेगळे आणि कॉग्रेसच्या वळचणीला जाऊन बसणे वेगळे. आज तर कॉग्रेस पक्ष इतका बदनाम झालेला आहे, की त्याच्याशी कसलीही संगत म्हणजे शापच अशी स्थिती आहे. ते नितीश व त्यांच्या पक्षाला कळते. म्हणूनच मोदी विरोधात बोलतानाही कॉग्रेसचा लाभ होणार नाही, याची काळजी त्यांना घ्यावीच लागते. अन्यथा त्यांनाही बिहारमध्ये आपला पाया गमवावा लागेल.

   बिहारचे मुख्यमंत्री नितीश असले तरी तिथे त्यांचे सरकार वा बहूमत स्वबळावर सत्तेपर्यंत पोहोचलेले नाही, भाजपाने पाठींबा काढून घ्यायचा म्हटला तर नितीशचे सरकार एका दिवसात अल्पमतात जाऊ शकेल. कारण तिथे एनडीएचे संयुक्त सरकार असून त्यात भाजपाही भागीदार आहे. नितीशचे ११० तर भाजपाचे ९० आमदार आहेत. भाजपाला सोडून नितिश सत्ता टिकवू शकतात. पण त्यासाठी त्यांना लालू व पासवान यांची मदत घ्यावी लागेल. ते खेळवतील तसे त्यांच्या तालावर नाचावे लागेल. त्यापेक्षा दहाबारा वर्षात भाजपने मैत्रीची बुज राखली आहे. तिला सेक्युलर या शब्दासाठी चुड लावायची काय; असा नितीश समोर गंभीर प्रश्न आहे. तसे केल्यास मग त्यांचाही लालू व्हायला वेळ लागणार नाही. कारण त्यातून बिहारमध्ये पुन्हा लालू, पासवान व कॉग्रेसचे पुनरुज्जीवन होऊ शकेल. भाजपाला नामोहरम करणे शक्य नाही, पण हे लोक शिरजोर झाले तर नितीशची सद्दी संपुष्टात यायला वेळ लागणार नाही. म्हणूनच जो माध्यमातल्या अभ्यासकांसाठी कागदावरचा खेळ आहे, तो नितीश वा त्यांच्यासारख्या नेत्यांसाठी जीवनमरणाचा प्रश्न असतो. त्यांना एक बातमी रंगवावी, तसा हा विषय हाताळता येत नसतो. कारण त्यांना त्याच्या मतदाराच्या मानसिकतेचा कल लक्षात घ्यावा लागत असतो. सेक्युलर वा हिंदुत्व यांच्या माध्यमातल्या व्याख्या वेगळ्या व व्यवहारी राजकारणातल्या वास्तविक व्याख्या वेगवेगळ्य़ा असतात. मते त्यानुसारच मिळत असतात. म्हणून त्याच कलाने राजकीय नेते व पक्षांना निर्णय घ्यावे लागत असतात. लोकमत जेव्हा कॉग्रेसच्या विरोधात खवळलेले आहे, अशा वेळी ज्या लोकप्रिय नेत्याकडे लोकमत आकर्षित झालेले असते, त्याला झुगारून चालत नाही.  

   म्हणूनच नितीशकुमार यांचा मोदी यांच्या नावाला मनापासून विरोध असला, तरी तो व्यवहारी राजकारणात कितीसा परिणामकारक आहे, त्याचीही चाचपणी करावी लागत असते. मागल्या दहा वर्षात भाजपाकडे लोकांच्या मनाला गवसणी घालणारा कुणी नेता नव्हता. पण त्याच कालखंडात कॉग्रेस व युपीए मिळून जो बट्ट्य़ाबोळ करण्यात आलेला आहे, त्यामुळे मोदी यांची प्रतिमा उंचावलेली आहे, त्यांच्याविषयी जनमानसात अपेक्षा उंचावलेल्या आहेत. हे राजकारणात दिर्घकाळ वावरलेल्या नितीशना नेमके कळते. म्हणूनच त्यांच्याशिवाय सुद्धा मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपा मोठा पल्ला गाठू शकते, याची नितिशना जाणिव आहे. म्हणून तर त्यांना एक एक पाऊल जपून टाकायची वेळ आलेली आहे. बिहारमध्ये वीस टक्क्याहून अधिक मुस्लिम लोकसंख्या आहे तिला मोदींचे नाव कितपत पचनी पडू शकेल याची चिंता नितीशना आहे. त्यावर त्यांचा सेक्युलॅरिझम अवलंबून आहे. म्हणूनचा येत्या चारपाच विधानसभा निवडणुकीत मोदी त्या त्या राज्यात काय करिष्मा दाखवतात; याची प्रतिक्षा भाजपासोबतच नितीश सुद्धा करणार आहेत. तोपर्यंत कोणीच मोदी यांना पंतप्रधान पदाचे थेट उमेदवार म्हणून घोषित करणार नाही की पाठींबा देणार नाही.    ( क्रमश:)
भाग   ( ८० )    ९/२/१३