गुरुवार, ७ फेब्रुवारी, २०१३

दिसण्यातला आणि बघण्यातला नेमका फ़रक




   दिसणे आणि बघणे यात खुप मोठा फ़रक असतो. दिसणे आपोआप होत असते. पण बघणे खुपच वेगळी गोष्ट आहे, ज्याला आपण लक्ष देणे म्हणतो. बोलताना अनेकदा ‘लक्ष कुठे आहे’ असे आपण एकमेकांना म्हणतो; किंवा माझे लक्ष नव्हते अशी कबुली देतो. त्याचा अर्थ इतकाच, की समोर घडत असते आणि दिसतही असते पण आपले तिथे लक्ष नसते. सगळी फ़सगत तिथेच होते. बघण्यासाठी नजर लागते किंवा इच्छा असावी लागते. अन्यथा दिसणे शक्य असले तरी बघणे अशक्य असते. आपोआपच प्रत्येकाला वेगवेगळे दिसू शकते; वेगवेगळे जाणवू शकते. बुधवारी दिल्लीच्या श्रीराम कॉलेजमध्ये गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे भाषण झाले; तेव्हा त्यांनीही त्यासंबंधात एक चांगले उदाहरण दिले. भाषण करताना मध्येच तहान लागली तर घसा ओला करायला तिथे जे पाण्याचे ग्लास ठेवलेले होते. ते उचलून त्यांनी श्रोत्यांना दाखवले आणि म्हटले जो सकारात्मक विचार करील तो म्हणेल यात अर्धे पाणी आहे तर नकारात्मक विचार करणारा अर्धे रिकामी आहे असे म्हणेल. पण मी (म्हणजे मोदी) तिसर्‍या प्रकारचा माणूस आहे. मी म्हणतो हे ग्लास संपुर्ण भरलेले आहे. त्यात अर्धे पाणी व अर्धी हवा आहे. इथे बघण्यातला व दिसण्यातला फ़रक पडतो. अर्धे ग्लास रिकामे असू शकत नाही; हे वैज्ञानिक सत्यच आहे. पण ते किती लोक डोळसपणे बघू शकतात. आता कोणी म्हणेल, अर्धी हवा आहे म्हणजे काय मोठे? तशी आसमंतामध्येही हवा आहेच की सर्वदूर. मग अर्ध्या ग्लासात हवा असण्यात कुठली सकारात्मकता आली? तर त्याचे उत्तर असे, की त्या हवेचाही उपयोग होऊ शकतो का, याचा विचार ती आहे; असे डोक्यात असेल तरच होऊ शकतो. जिथे आपण फ़क्त अर्ध्या ग्लास पाण्याचाच साधन सामग्री म्हणून विचार करतो; तिथे मोदी अर्धा ग्लास हवेचाही उपयोग करून घेता येईल काय याचा विचार करतो, असा त्याचा अर्थ आहे. आणि तो विचार नुसता तात्विक मानायचे कारण नाही. त्यामागची मानसिकता व भूमिका महत्वाची आहे. चटकन न दिसणारी वा ठाऊक नसलेली, तरीही उपलब्ध असलेली साधने शोधून त्यांचा वापर करण्याची शोधक वृत्ती त्यातून दिसून येते. मोदी यांच्या विकासाचे कौतुक फ़ार होते व झाले आहे. पण त्यामागच्या मानसिकतेचा शोध कोणी व कितीजणांनी घेतला आहे? श्रीराम कॉलेजमधील त्या भाषणातून त्यांनी आपल्या त्या विकासशील मानसिकतेचा सकारात्मक उलगडा करून दाखवला. त्यांच्या त्या भाषणानंतर त्यावरच्या वाहिन्यांवरील चर्चेचा आढावा मी घेतला; तर कोणालाही त्या मानसिकतेमध्ये रस दिसून आला नाही. प्रत्येकाने उपस्थित मुले, श्रोते व इतरांवर झालेल्या परिणामांचा आढावा घेतला होता. पण सांगितले काय त्याचा मात्र आशय समजून घेण्याची मनोवृत्तीच नव्हती.

   आपण गुजरातमध्ये काय केले, याची उदाहरणे देताना मोदी यांनी आपल्याला एकविसाव्या शतकातील जगातील घडामोडींचे किती भान आहे, त्याचा दाखलाच त्या भाषणातून दिला. युरोप म्हातारा होऊन गेला आहे आणि चीन म्हातारा होतोय; या पार्श्वभूमीवर जगातल्या सर्वाधिक तरुणांची मोठी लोकसंख्या असलेला देश, म्हणून भारत आज जगातला सर्वात तरूण देश व समाज आहे. आणि नुसताच वयाने तरूण नाही तर त्याच्याकडे गुणवत्तेसह असलेली कार्यक्षमता; हेच देशाचे सर्वात मोठे भांडवल आहे, ज्या बळावर आपला समाज जगातली महासत्ता बनू शकतो, असा त्यांच्या प्रतिपादनाचा आशय होता. तीच राज्यघटना आहे, तेच कायदे आहेत, तेच नियमांचे जंजाळ आहे, तेच (आळशी) कर्मचारी अधिकारी आहेत, तेच मंत्रालय कचेर्‍या आहेत, पण गुजरात बदलू शकला, कारण तिथे बदल घडवणारी प्रशासकीय इच्छाशक्ती कार्यरत झाली, असा त्यांच्या एकूण भाषणाचा आशय होता. या सगळ्या भाषणात मोदी यांनी कुठेही अडचणी, त्रुटी, टंचाई, तुटवडा यांचा उल्लेख केला नाही. आपल्या देशात कुठे काय कमी आहे, यापेक्षा कुठे काय बघायला आपण विसरून गेल्यामुळे अभावाची भावना आहे, त्यावर त्यांनी बोट ठेवले. एकीकडे महाराष्ट्रात अपुर्‍या पावसाने दुष्काळाची स्थिती आहे, भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेदिवस खाली जाते आहे आणि दुसरीकडे देशात गुजरात एकच असे राज्य आहे की तिथली पाण्याची पातळी वाढते आहे. मग हे साधणार्‍या  मोदीकडे जादूची कांडी नाही तर सकारात्मक बघायची दृष्टी आहे, असेच त्याने त्या भाषणातून सांगितले. पण समोर ऐकणार्‍यांना ते दिसले व बघता आले, तेच बाकी अभ्यासकांना का दिसू नये? बघायचेच नसेल तर दिसणार कसे? म

   पाऊण तासाच्या भाषणात मोदी यांनी कुठेही राजकारण येऊ दिले नाही. पक्षीय वा राजकीय संदर्भ त्यांनी कटाक्षाने टाळले. पण मजा अशी, की त्यांचे संपुर्ण भाषण मात्र राजकीय हेतूने भारलेले होते. म्हणूनच संपुर्ण भाषणच राजकीय होते. आपल्याला देशाचे नेतृत्व सोपवले तर आपल्यासमोर देशाच्या विकासाचे कसे परिपुर्ण व्यापक स्वप्न आधीच तयार आहे, त्याची पेशकश मोदी यांनी त्या भाषणातून मोठ्या खुबीने करून दाखवली. संपुर्ण भाषणातले एकच राजकीय म्हणता येईल असे वाक्य म्हणजे मतांचे राजकारण करून देशाची प्रगती करता येणार नाही आणि विकासाच्या राजकारणाला अन्य कुठला पर्यायच नाही. हे एकमेव वाक्य राजकीय म्हणता येईल असे आहे. पण त्या एका वाक्याला अर्थपुर्ण बनवण्यासाठी मोदी यांनी एकूण भाषणात केलेली विकास, आर्थिक व्याप व समस्यांची मांडणी अतिशय मूलभूत स्वरूपाची होती. जी तिथल्या हुशार तरूण मुलांना भुरळ घालणारी होती; तशीच या देशातील अतिशय सामान्य अशा जनतेला सुद्धा भुरळ घालणारी असू शकते. दिल्लीतले लोक चहात गुजरातचे दूध घालतात. युरोपात कुठेही भेंडी खाल्लीत तर ती गुजरातमध्ये पिकलेली असते. सिंगापूर हॉंगकॉंगमध्ये मस्का गुजरातचा असतो आणि अफ़गाणीस्तानात टोमॅटो गुजरातचे असतात, असे सांगताना त्यांनी आपण जगाला बाजारपेठ बनवू शकतो असे सुचवले. जग आपल्याकडे बाजारपेठ म्हणून बघते. पण विकास व प्रगती करायची तर आपण जगाला बाजारपेठ बनवले पाहिजे आणि ते शक्य आहे. त्यातूनच गरीबीवर मात करता येईल व आली; असेही त्यांनी आपल्या अनुभवातून सांगितले. मोदींचे दावे खोटे पाडायला अनेकजण नेहमी उत्सुक असतात. पण दुर्दैव इतकेच, की केंद्रातील युपीएच्या अनेक योजना गुजरातमध्ये यशस्वी झाल्याचे दावे केंद्रालाच करावे लागत आहेत. मग मोदीकडे बघायचे कसे? सामान्य माणूस त्याच्याकडे बघणार कसा? कशासाठी बघेल? सामान्य मतदार म्हणजे जनता आपली निवड कशी करत असते? वाहिन्यांच्या वा वृत्तपत्रांच्या वातानुकुलीत केबीनमध्ये बसून जनमताचा कानोसा घेता येत नसतो. मोदींना देशभरच्या चाचण्यांमध्ये इतका कौल का मिळतो, ते जाणून घ्यायचे असेल तर आधी सामान्य माणुस विचार कसा करतो व मत कसे बनवतो, त्याचा अभ्यास करण्याची गरज आहे. अभ्यास याचा अर्थ तिथे जाऊन सामान्य माणसाला समजून घ्यावे लागेल. आपले मत बनवून त्यात सामान्य माणसाला कोंबता येणार नाही. आपले मत बाजूला ठेवून सामान्यांच्या मनात घुसावे लागेल व त्याच्या आवडीनिवडीचा अभ्यास करावा लागेल.

   शहाणे व बुद्धीमंत आणि सामान्य माणुस यात एक मोठा फ़रक असतो, तो म्हणजे जे दिसते ते बघण्याची सामान्य माणसाची क्षमता. नेमकी उलट स्थिती बुद्धीमंत लोकांची असते. जे साध्या डोळ्यांनीही दिसू शकते, त्याच्यासाठीही शहाण्यांना चष्मा लावूनच बघायची सवय असते. सहाजिकच त्यांना असलेले दिसत नाही आणि नसलेले दिसत असते. परिणामी शहाण्यांना व्यवहारी निर्णय घेता येत नाहीत; तर सामान्य माणसे त्वरेने व्यवहारी निर्णय घेउ शकत असतात. मागल्या किंवा यावेळच्या उत्तरप्रदेशच्या निवडणुकीत मतदाराने एकाच पक्षाला बहूमत देत सत्तांतर घडवले. पण दोन्ही वे्ळी या विषयतले जाणकार मात्र त्रिशंकू विधानसभेची गणिते मांडत होते. इतकी तफ़ावत का होते? तेव्हा मायावती किंवा यावेळी मुलायमनाही बहूमताच खात्री नव्हती. मग त्या मतदाराने कधी व कसे निर्णय घेऊन सत्तांतर घडवले? असा सामुहिक निर्णय त्या मतदारामध्ये होतोच कसा? कुठून ही मताची लाट तयार होते? ज्याची उत्तरे अभ्यास करून जाणकारांना मिळत नाहीत त्याची उत्तरे सामान्य जनता शोधते कशी व कोणत्या निकषावर हे म्हणूनच जाणून घेण्याची गरज आहे. लोकमत बनते कसे व घडते-बिघडते कसे? इतक्य वेगाने लोकमत फ़िरते कसे? जाहिरात व प्रचार करून राहूलची कॉग्रेस उत्तरप्रदेशचा मतदार नाकारतो कशाला आणि प्रसिद्धीपासून दूर असूनही अखिलेश वा मायावती बाजी मारतात कसे? भ्रष्टाचाराचे आरोप असून मायावती वा हत्याकांडाचे दंगलीचे आरोप मोदींना पराभूत का करू शकत नाहीत? हे लोकमत बनतेच कसे? लोक कोणात काय बघतात की जे जाणकार अभ्यासकांना बघता येत नाही?
( क्रमश:)
भाग   ( ७९ )    ८/२/१३

बुधवार, ६ फेब्रुवारी, २०१३

सेक्युलर शंकराचार्यांची मनोरंजक भाकडकथा


  मला पुराणकथा व भाकडकथा खुप आवडतात, कारण त्या तर्कात बसणार्‍या नसल्या तरी त्यात घेण्यासारखा काही बोध असतो. तो बोध घ्यायचे सोडून त्याचे तर्कशास्त्रीय विच्छेदन केले; मग कथा मरतेच आणि हाती काही लागत नाही. म्हणून मी त्यातले मनोरंजन घेतो आणि सापडला तर बोध शोधत असतो. अशीच एक कधीतरी ऐकलेली वा वाचलेली भाकडकथा आहे. हिंदू धर्माचे मुख्याधिकारी मानल्या जाणार्‍या शंकराचार्यांची ती कथा आहे म्हणतात. ‘ब्रह्म सत्य आणि जगन मिथ्या’ हे तत्वज्ञान सांगणारी अशी ती कथा आहे. कुठल्याशा धार्मिक प्रवचनात शंकराचार्यांनी त्याचे विवेचन केले होते. की आपल्याला जे डोळ्यांना दिसते तो निव्वळ भ्रम म्हणजे माया आहे. नुसता आभास आहे आणि आपण त्याच्या प्रेमात पडून हव्यास धरतो, त्याचाच पाठपुरावा करीत आयुष्य खर्ची घालतो, जीवन निरर्थक करून टाकतो. पण जे आपल्या लौकिक डोळ्यांना दिसत नसते असे महान ब्रह्म आहे; तेच सत्य आहे आणि त्यापर्यंत जाऊन पोहोचणे हे जीवनाचे उद्दीष्ट आहे, असे ते तत्वज्ञान शंकराचार्य कथन करतात. त्यांनी आपल्या अफ़ाट बुद्धीचातुर्याने केलेले  विवेचन निरुपण ऐकून भारावलेल्यांना मग आपले जीवन अगदीच व्यर्थ गेले असे वाटणे स्वाभाविक असते. पण त्या तत्वज्ञानाची झिंग उतरली; मग माणूस माणसात येतो आणि पुन्हा मायेच्या मागे धावू लागतो. त्याला पर्यायच नसतो. कारण डोळ्यांना न दिसणारी, पण जाणवणारी पोटाची भूक त्याच्या बौद्धिक मार्गाने भागत नसते. त्यामुळेच त्याला या मायावी जगात जगण्यासाठी पैसे मिळवावे लागतात. सहाजिकच रात्रीच्या प्रवचनाने भारावलेले भक्तगण सकाळी उठून कामधंद्याला लागतात व मायावी जगात ब्रह्म वगैरे विसरून जातात.

   त्यातल्याच एकाला दुसर्‍या दिवशी सकाळी नदीवर जात असताना तिथून उलट्या दिशेने धावत येणारे शंकराचार्य दिसतात. जीव मुठीत धरून शंकराचार्य पुढे पळत असतात व त्यांच्या मागे एक कुत्रा भुंकत धावत असतो. थोडक्यात कुत्र्याच्या भयाने शंकराचार्य पळत असतात. त्या भक्ताला त्याचे नवल वाटते. जर डोळ्यांना दिसणारे जग हे निव्वळ भासमात्र असेल व त्याच्या मोहात पडायचे नसेल किंवा त्याने भयभीत व्हायचे नसेल; तर तसे सांगणारे शंकराचार्यच कशाला घाबरले आहेत? त्या भुंकणार्‍या कुत्र्याला? कशाला घाबरायचे? अवघे दिसणारे जगच एक आभास असेल, तर मग तो भुंकणारा कुत्रासुद्धा आभासच ना? मग त्याला घाबरून पळायचे कशाला? वाटणारी भिती सुद्धा निव्वळ आभासच नव्हे काय? मग हेच आपल्याला शिकवणारे शंकराचार्य कशापासून पळत अहेत? कोणाला व कशाला घाबरले आहेत? त्या भक्ताला समोरचे दिसणारे दृष्य़ चक्रावून सोडते. आपले शंका निरसन करून घेण्यासाठी तो धावणार्‍या शंकराचार्यांच्या बाजूने धावत त्यांना तोच प्रश्न विचारतो. कुणाला व कशाला घाबरून पळता आहात आचार्य? तुमच्या मागे धावणारा कुत्रा सुद्धा मायाच असेल ना? मग घाबरून पळता कशाला? कुत्रा पाठलाग करतो असे तुम्हाला भासते आहे, ती निव्वळ मायाच आहे, तर घाबरून पळायचे कशाला? कशापासून पळायचे? तो भक्त स्वत:वर भलताच खुश असतो. आचार्यांना कसा निरूत्तर करणारा प्रश्न विचारला, अशा अहंकारी नजरेने तो त्यांच्याकडे बघत असतो. आचार्य हसतात आणि उलट प्रश्न विचारतात,

वत्सा, तुला मी पळताना दिसतो आहे का? माझ्या मागे कुत्रा धावतोय, असा तुला आभास झाला आहे का? दिसते ती नुसती माया आहे. मी पळत नाही की कुत्रा माझ्या मागे लागलेला नाही. हा सगळा निव्वळ भास आहे. ब्रह्म सत्य आहे आणि जग मिथ्या आहे. 

   बिचारा भक्त थबकतो आणि पुढे पळणार्‍या आचार्य व त्यांच्या मागे भुंकणार्‍या कुत्र्याकडे डोळे चोळत बघत रहातो. कशावर विश्वास ठेवावा तेच त्याला कळत नाही. स्वत:चा जीव मुठीत धरून धावणारे शंकराचार्य त्याला दिसत आहेत. पण तेच सांगतात, तोही भास आहे. मग काल प्रवचन देत होते आचार्य तोसुद्धा भासच होता का? त्या सामान्य भक्ताचे डोके चालेनासे होते. त्याचे कशाला आपले डोके तरी किती चालते असे काही बघितले वा ऐकले मग? ही भाकडकथा असेल तर रोजच्या रोज आपण ऐकतो, वाचतो, त्या कसल्या सत्यकथा असतात? महिन्याभरापुर्वी आसाराम बापू किंवा मोहन भागवत अशा लोकांनी काही विधाने केली होती आणि त्यांची कुणा महिलेने दखल सुद्धा घेतली नाही, तरी देशातल्या महिला मुलींचे स्वातंत्र्य कसे धोक्यात आले, त्यावरला गदारोळ आपण आठवडाभर ऐकत होतो ना? प्रत्यक्षात अशा कुणा धर्ममार्तंडने जी विधाने केली; त्यामुळे कुठल्या मुलीमहिलांवर गडांतर आलेले नव्हते. तरीही कल्लोळ असा सुरू होता, की जणू मुलींना घराबाहेर पडायचीच बंदी घालण्यात आली आहे. मग सांगा दिसत नव्हते तेच घडते व सत्य आहे असाच त्या ओरडा करणार्‍यांचा दावा नव्हता का? आणि आज प्रत्यक्षात तशी घराबाहेर पडायची बंदी काश्मीरच्या काही संगीतभक्त मुलींवर आलेली असताना तेच सेक्युलर पोंगा पंडीत चुपचाप आहेत. जणू काही घडलेच नाही, असे मौन त्यांनी धारण केले आहे. म्हणजेच आपला अनुभव काय आहे? जेव्हा काही खरोखरच घडत असते तेव्हा ही मंडळी त्याची दखल सुद्धा घेत नाहीत. पण जेव्हा काही घडतच नसते; तेव्हा मात्र आभाळ कोसळळ्याचा ओरडाआरडा करतात ना? मग ते शंकराचार्यांचेच तत्वज्ञान आपल्याला सांगत नसतात का? दिसणारा आहे तो आभास आहे आणि जे दिसत नाही ते सत्य आहे. ब्रह्म सत्य जगन मिथ्या? मग यांना सेक्युलर शंकराचार्य म्हटले तर चुकीचे होईल काय?

   किती विचित्र गोष्ट आहे ना? जे पोटतिडीकीने हिंदूत्वाचा विरुद्ध अहोरात्र बोलत असतात, लिहित असतात; तेच आपल्याला हिंदूत्वाचा गाभा सांगत पटवत असतात. ‘ब्रह्म सत्य जगन मिथ्या’. आता हेच बघा ना, काश्मिरच्या त्या मुलींच्या संगितसेवेला तिथल्या इस्लामी मुफ़्तीने फ़तवा काढून बंदी घातल्यावर त्यांना घराबहेर पडायची भिती वाटू लागली आहे. कारण त्यांना धमक्या मिळू लागल्या आहेत. म्हणून त्यांनी आपला बॅन्ड गुंडाळला आहे. असे काही असाराम बापू वा अन्य कोणाच्या बडबडीने झाले नव्हते. पण तेव्हा पोपटासारखे बोलणारे सेक्युलर आता गप्प कशाला? घडते आहे, ते घडतच नाही किंवा नुसताच आभास आहे, असेच त्यांना वाटत असेल ना? समोर दिसते आहे, ती माया व आभास असल्याचा दांडगा विश्वासच त्यांना प्रतिक्रिया देण्यापासून रोखत असेल ना? आणि नेहमी असेच होते. जिथे काही गंभीर घडते; तेव्हा सेक्युलर मंडळी काही घडलेच नाही अशी शांत असतात. पण जिथे काही घडलेलेच नसते, तेव्हा मात्र देश व समाज संकटात सापडल्याप्रमाणे आकाशपाताळ एक करताना दिसतील. मालेगाव किंवा अन्य कुठल्या हिंदू दहशतवादाचे आरोप घ्या. अजून त्यातले काही सिद्धच झालेले नाही. पण अगदी ते खरे आहेत असे आपण मानून हिशोब करू. त्यात पकडलेले आरोपी संशयित किती, त्यांनी केलेल्या उचापतीमध्ये मारले गेलेल्यांची संख्या किती? इस्लामी जिहाद वा दहशतवादाच्या तुलनेत पाहिल्यास शंभराला एक असेही प्रमाण आढळुन येणार नाही. पण सेक्युलरांच्या भाषा व चर्चेत सर्वात मोठा धोका हिंदू दहशतवादाचा आहे, असा कंठशोष चालू असलेला आपल्याला दिसेल. एकट्या मुंबईत आतापर्यंत दोन मोठ्या जिहादी बॉम्बस्फ़ोट मालिका व एक हत्याकांड झाले आहे. त्यातल्या मृतांची संख्याच हजारापर्यंत जाऊ शकते. त्याच्या तुलनेत मालेगाव व सगळ्या हिंदू संशयितांची बेरीज मांडून बघितले तर कुठे तुलना होऊ शकते का? मग धोका कुठला मोठा व प्राणघातक आहे? सेक्युलर शंकराचार्य दिसते तो भास व दिसत नाही तेच सत्य असे तत्वज्ञान मांडत असतात ना? मग खरे कडवे हिंदूत्ववादी कोणाला म्हणायचे? दिसते त्यावर विश्वास ठेवून बोलणारे की शंकराचार्यांच्या भाषेत ब्रह्म सत्य म्हणुन वास्तवाला आभास म्हणजे माया ठरवू बघणार्‍या सेक्युलरांना हिंदूत्ववादी म्हणायचे? कास्मिरच्या मुलींना तोंड लपवून घरी बसायची पाळी आल्यावर मुस्लिम मुफ़्तीच्या फ़तव्यावर गप्प बसणारे सेक्युलर सत्य बघू शकत नसतील तर त्यांचे तत्वज्ञान कुठले? नसलेला हिंदू दहशतवाद बघू शकणारे व असलेला जिहादी दहशतवाद न दिसणारे शंकराचार्यच नाहीत का?     ( क्रमश:)
भाग   ( ७८ )    ७/२/१३

मंगळवार, ५ फेब्रुवारी, २०१३

कर्तव्यामधला आपुलकीचा ओलावा जपायला हवा


   गेले साडेपाच महिने मी माझा मोबाईल फ़ोन जवळपास बंद ठेवला आहे. कारण वाचकांचे फ़ोन आले तर त्याच्याची बोलायला वा वादप्रतिवाद करायची मला खरेच सवड उरलेली नाही. कारण रोजचे वाचन, लिखाण करण्यातून सुटका नाही आणि त्यात घरी रुग्णाईत अवस्थेत पडलेली माझी आई. तिचे वय आता शहाण्णव इतके आहे. रुग्णशय्येवर पडलेली असून तिच्या सगळ्या गोष्टी जागच्या जागीच उरकाव्या लागतात. अगदी उठणे, बसणे सोडा; साधे कुशीवर वळणेही अशक्य अशी दुरावस्था आहे. बाकी तसा काही आजार नाही, तर वार्धक्याने शरीर निकामी झालेले आहे. पण मेंदू व हृदय ठणठणीत आहे. ऐकू कमी येते. तरीही जगण्याचा मोह सुटलेला नाही. म्हणजे तोंडाने म्हणते, की यातून कधी सुटका होईल तो सुदिन. पण तो निव्वळ देखावा आहे. कारण तिचे हे शब्द मी गेली बारा वर्षे ऐकतो आहे. तेव्हा निदान ती उठबस करत होती, आपला देहधर्म स्वत:च उरकू शकत होती. गेले वर्षभर सर्वकाही परावलंबी झाले आहे. पण जगण्याची आसक्ती किंचितही कमी झालेली नाही. असे मी का म्हणू शकतो? तर दिवसभर बिछान्यावर पडल्यापडल्याही तिच्या हालचाली सुरू होत असतात. आपण खाली पडतोय, तोल जातोय, असे भास होऊन ती उशा, तकिये हलवते आणि ते पडतात. मग ते पुन्हा जागच्याजागी ठेवायचा उद्योग  दुसर्‍यांसाठी काम होऊन बसते. पण इतकी परावलंबी स्थिती असतानाही तिचे वागणे मला चक्रावून सोडते. या चारपाच महिन्यात अनेक शब्दांचे अर्थ मला नव्याने कळले व तिच्यामुळे कळले; हे मान्यच करावे लागेल. जीव नकोसा होणे, देह ठेवणे, जगण्याची आसक्ती, जीव मुठीत धरणे वगैरे शब्द आजवर हजारो, लाखो वेळा मी उच्चारलेले असतील, लिहिले सुद्धा असतील. पण किती नकळत मी त्यांचा निरर्थक वापर करीत होतो, त्याची जाणिव आता होते. हे मोजके शब्द झाले. असे अजून किती शब्द असतील मी आजही वापरतो, पण त्याचा खरा अर्थ मलासुद्धा ठाऊक नसेल असेच आता वाटते. मीच कशाला आपण सगळेच तसे शब्दांचा असा सढळ वापर करत असतो. असो.

   पाचसहा महिने आई माझ्याकडे आलेली आहे. त्यामुळे तिची सरबराई करताना मला माझ्या एकूण दिनचर्येला वेसण घालावी लागली आहे. बाहेरचे येणेजाणे जवळपास बंद झाले आहे, महिना महिना कुठे घराबाहेर पडलेलो नाही. कारण घरात आईला एकटी ठेवून जाता येत नाही. बदली कामगार कोणी असला तरच मी बाहेर पडू शकतो. शिवाय तिला ठरल्या वेळी खाऊपिऊ घालणे, औषध वा अन्य गोष्टी करणे अपरिहार्य आहे. मग लिहिणे वाचणे, थोडाफ़ार टिव्ही, बातम्या बघणे; यातच दिवस मावळत असतो. मग कोणाशी गप्पा वा फ़ोनवर बोलणे कसे शक्य आहे? अनेक वाचक त्यामुळे नाराज असतील याची मला खात्री आहे. म्हणूनच हे लिहावे लागत आहे. पण त्याहीपेक्षा मानवी स्वभावाचा एक वेगळा पैलू माझ्या अनुभवास आला, तोही वाचकांसमोर मांडावा अशी खुप तीव्र इच्छा झाली. आई माझ्याकडे आल्यापासून दिनचर्या ठरून गेली आहे. साधारण आठला सकाळी उठल्यापासून माझे व्याप उरकले; मग मी तिला टुथब्रश, पेस्ट देऊन तोंड धुवायला मदत करतो, चहा पाजून काम संपवतो. बाकी साफ़सफ़ाई एक महिला येऊन उरकते. म्हणजे साधारण नऊच्या आधी तिचे तोंड धुणे होत असते. सोमवारी पत्नी घरी नसल्याने मला लौकर उठून पाणी भरण्याचे काम उरकावे लागले. माझी ती पळापळ चालू असताना आईचे डोळे उघडेच होते आणि ती वर्दळ बघत होती. पाणी भरून संपल्यावर माझ्या गोष्टी उरकायच्या होत्या. पण ते राहिले बाजूला पाणी भरणे चालू असतानाच तिने मला इशारा करून जवळ बोलावले आणि विचारले, ‘तोंड वगैरे धुवायचे आहे की नाही?’ मी तिच्याकडे बघतच राहिलो. कारण खुलासा करणे अशक्य होते. तिला ठार ऐकू येत नाही. वैतागलो आणि आपल्या कामाकडे वळलो. तिच्याकडे दुर्लक्ष केले. रोजच्यापेक्षा मीही लौकर उठलो असल्याने तिचेही व्यवहार लौ्करच उरकले. पण दिवसभर तिचा तो प्रश्न मनात पिंगा घालत होता. पाणी भरून ठेवण्यासाठी चाललेली माझी तारांबळ तिला दिसत होती. तरीही तिने असे का विचारावे; हे माझ्या तर्कात बसत नव्हते. की आपल्याला त्रास द्यायला, डिवचायला तिने असे बोलावे? अनेक प्रश्न मनात राहुन राहुन येत होते, पिच्छा पुरवत होते. हिच्यासाठी गेले काही महिने बाहेरचे जग विसरून बसलोय आणि ही असे का बोलते?

   स्वत:च्या गोष्टी स्वत:ला करता येत नाहीत, इतके परावलंबी जगणे झाल्यावर माणूस दुसर्‍यावर विसंबून जगत असतो. तेव्हा तो दुसर्‍यावरचा बोजा झालेला असतो. आणि ज्याने ती जबाबदारी घेतलेली असते, त्यालाही स्वत:चे जगणे असते, आपल्या गोष्टी उरकायच्या असतात. त्यात मग त्या दुसर्‍याने आपल्या आयुष्यात कशाला प्राधान्य दिले पाहिजे? त्याच्या स्वत:च्या गरजा, गोष्टी सगळ्या विसरून त्याला जबाबदार्‍या पार पाडणे शक्य असते का? आपोआपच मग जो अवलंबून आहे, त्याच्या गरजा हे दुय्यम प्राधान्य होऊन जाते. ते त्यानेही समजून घेण्याची गरज असते. कारण ज्याने ह्या सर्व गोष्टी उरकायच्या आहेत, त्याने उभे रहाणे व बोजा उचलण्याइतकी त्याच्यात शक्ती असणे; हे दोघांसाठी सारखेच प्राधान्य असते. आणि याचे भान जो परावलंबी आहे, त्यानेच जास्त ठेवायला नको काय? कारण जो मदत करतो आहे, तोही थकून गेला वा कंटाळून गेला, तर त्याचे कोणी काढायचे? म्हणजेच जो मदतनीस असतो, त्याला सेवक वा हक्काचा गडी न समजता, पुरवून वापरण्याची उर्जा समजले पाहिजे. तेवढे भान ठेवले तर मदत देणारा व घेणारा यांच्यातले व्यवहार सुरळीत होऊ शकतात. अन्यथा कटकटीचे होऊन जातात. स्वत:ची कामे उरकताना दुसर्‍याची जबाबदारी घेतलेला असतो, त्याच्या धावपळ व कष्टाचे भान मदत घेणार्‍याने ठेवले; तर सर्व व्यवस्थित पार पडू शकते. अन्यथा मग जो परावलंबी असतो, त्याची कामे बोजा वाटू लागतात. कारण जबाबदारी घेणार्‍याचा चांगुलपणाच त्याला प्रवृत्त करत असतो, तो चांगुलपणा जपण्याची जबाबदारी परावलंबी माणसाची असते. त्याचे भान सुटले मग कटकटी सुरू होतात. आणि असे कधी होते? जेव्हा त्या मदतीला सवलत न समजता हक्क वा अधिकार समजले जाते, तिथून सगळी गडबड होते.

   मी सकाळी लौकर ऊठून पाणी भरत होतो, म्हणजे दिवसभर लागणार्‍या पाण्याचा साठा सर्वांसाठी करत होतो, व्यक्तीगत काम करत नव्हतो. ते सर्वच घरासाठी प्राधान्य होते. त्यापेक्षा आईला जेव्हा तिचे तोंड धुणे, दात घासणे प्राधान्याचे वाटते, तेव्हा समतोल बिघडत असतो. मुलगा उठला आणि इतका वेळ आपल्याकडे त्याचे लक्ष नाही, यातून तिचा अहंकार दुखावला होता. तो अहंकार असावाच कशाला? आपल्याला आपले व्यवहार उरकता येत नाहीत, इतकी दयनीय अवस्था असताना अहंकार कसा असू शकतो? हा विषय माझ्या घरापुरता नाही किंवा माझ्या आईपुरता नाही, कुठल्याही घरात वा समाजाच्या विविध स्तरातले व्यवहार चालतात, तिथे आपण बघितले तर त्यात अशीच गफ़लत होताना दिसेल. जिथे सवलत ही अधिकार बनून गेली; तिथे कुरबुरी वा वादंग उठलेले दिसतील. व्यक्ती, कुटुंब, संस्था वा एकूण समाज व राष्ट्र यांच्यातल्या प्राधान्याच्या गोष्टी बाजूला पडून गेल्या आहेत. त्या दिवशी समजा मी पाणी भरायचे बाजूला ठेवून आधी आईचे उरकत बसलो असतो, तर माझ्या मातृप्रेमासाठी पालिका अधिक काळ पाणी सोडणार नव्हती. म्हणजेच एकू्ण घरासाठी लागणारा पुरेसा पाणीसाठा अगत्याचा व प्राधान्याचा विषय होता. तो आईला समजत नसेल तर तिच्याकडे दुर्लक्ष करणे अपरिहार्य असते. पण मुद्दा तो नाहीच. पाचसहा महिन्यात मी सर्वकाही मनपुर्वक करीत होतो. मला त्यात फ़ारमोठे काही केल्यासारखे वाटले नाही. पण सोमवारच्या त्या घटनेनंतर मला प्रथमची आईची जबाबदारी हा बोजा असल्याची जाणिव झाली. असे का व्हावे?

   तिला दिसते कमी, तिला वेळेचे भान नाही, हे मान्य आहे. पण तिने नकळत माझ्यातल्या चांगूलपणाला दुखावले. त्यातल्या आपुलकीला इजा केली आणि आता कर्तव्य भावना शिल्लक उरली आहे. जे करण्यात आनंद होता, तो हरवला आहे. आईने मी करत असलेल्या सेवेला आपला हक्क समजून जी चुक केली, तिथे सगळी गडबड झाली ना? माझ्या करण्यात कुठला बदल झालेला नाही. इतके महिने केले तेच सर्व गेले दोन दिवस ठरल्याप्रमाणे उरकतो आहे. पण आता त्यातली आस्था कमी झाली हे माझे मला जाणवते. कर्तव्यातला आपुलकीचा ओलावा कमी झाला आहे. एकाच्या कर्तव्य भावनेत दुसर्‍याने सवलत बघितली तर आपुलकीचा ओलावा आनंद निर्माण करत असतो. उलट एकाच्या कर्तव्यात दुसर्‍याने आपला अधिकार, हक्क बघितला वा मागायचा अट्टाहास केला, तर दोघातले नाते नासू लागते. समाजाच्या आज विस्कटलेल्या विविध संबंधात वाढत असलेली दरी अशीच काहीशी असेल का?  ( क्रमश:)
भाग   ( ७७ )    ६/२/१३

सोमवार, ४ फेब्रुवारी, २०१३

प्रत्येक जातच एक समाज बनून गेलीय


   नेवासे तालुक्यातील सोनई येथे मेहतर समाजातील तीन युवकांच्या हत्याकांडाच्या निषेधार्थ या समाजाच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. राज्य सरकारच्या विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

   मला अस्वस्थ करणारे हेच शब्द आहेत. तसे चटकन न खटकणारे शब्द आहेत. कारण ही नेहमीचीच वर्तमानपत्री भाषा आहे. त्या शब्द व भाषेवरून आपली नजर सतत फ़िरतांना मन किती बधीर होऊन गेले आहे बघा. त्यातली भळभळणारी जखमही आपल्या मनाला यातना द्यायची थांबली आहे. किती वेळ हे शब्द मी वाचले आणि माझे मलाच आश्चर्य वाटले, की लिहिणार्‍यापासून वाचणार्‍यांपर्यंत सर्वांचीच मने अगदी संवेदनाशून्य होऊन गेलीत. आता शब्दांना काही अर्थबोधच उरलेला नाही. ‘या समाजाच्या वतीने ..... मोर्चा नेण्यात आला.’ या शब्दांचा अर्थ कसा आणि काय लावायचा? या समाजाच्या वतीने म्हणजे कुठल्या समाजाच्या वतीने? मेहतर समाज म्हणजे कोण, त्या जातीचे लोक म्हणजे ‘समाज’ असतो? तर मग त्या जातीबाहेरचे जे कोणी आहेत ते समाज नाहीत काय? त्या उर्वरितांचा समाजाशी संबंधच नाही काय? एक जात म्हणजे एक समाज असतो का? असेच असेल तर मग या विविध समाज व जातिपातींचा परस्परांशी नेमका काय संबंध किंवा नाते आहे? मी जन्माने मेहतर नाही, म्हणून माझा त्या मृतांशी कुठलाच सामाजिक संबंध नाही काय? त्यांच्याशी माझे काही देणेघेणेच नाही काय? ते मेले वा त्यांना कोणी अकारण ठार मारले, तर मला त्याच्याशी काहीच देणेघेणे नसते का? असेल तर मग ‘या समाजाच्या वतीने’च मोर्चा का काढला जातो. तो समाज वगळून उरलेल्यांनी मोर्चा का काढू नये? की अशा बाबी आपापल्या जाती समाजाशीच निगडीत आहेत? ही कुठल्या मानवी संबंधांची पद्धत आहे? जिथे खुन, हत्या, न्याय अन्यायालाही जात असते?

   मेहतर समाज म्हणजे त्या जातीचे जे कोणी मुठभर लोक जात म्हणुन संघटित आहेत, त्यांचीच अशा खुन प्रकरणात न्याय मागायची जबाबदारी असते काय? बाकी जे मेहतर जातीत जन्माला आलेले नाहीत, अशा कुणाला अशा हत्याकांडाशी काहीच कर्तव्य नसावे काय? गावात बिबट्या वा कुठले श्वापद घुसलेले असते, तेव्हा त्याच्या विरोधात सगळा गाव एकवटतो, तो मानवी जमाव ‘समाज’ नसतो काय? मग त्याला कुठला समाज म्हणून नाव द्यायचे? बिबट्याने, लांडग्याने गावातल्या कुणाच्या मुलावर, म्हातारीवर हल्ला चढवला तर धावून येताना, रान उठवतांना, जातपात असते का? तेव्हा भिन्नभिन्न समाज असे वागतात काय? मग इथे काय वेगळे घडले आहे? कोणी तरी अमानुष पाशवी कृत्य केलेले आहे आणि रक्ताला चटावलेले जनावर मोकाट असताना एकट्य़ा मेहतर जातीतल्याच लोकांनी त्याच्या बंदोबस्तासाठी रस्त्यावर यावे, मोर्चा काढावा, हा काय प्रकार आहे? त्या रक्तपिपासू जनावराचे भय एकट्या मेहतर समाजाला का वाटावे आणि उर्वरित समाज वा जातींना निश्चिंत का वाटावे? चक्रावून सोडणारी गोष्ट नाही काय? उपरोक्त बातमीच्या भाषेतला तो थंडपणा मला भयभीत करणारा वाटला. त्यात हत्या, मृतदेहाचे तुकडे करणे, त्यातली अमानुष कृती याबद्दलची शब्दांपासून माणसांमधली बधीरता चिंताजनक आहे. त्या शब्दातला व बातमीतला सूर कसा आहे? ‘त्यांच्यातल्यांची हत्या झाली व त्यांनी न्यायाची मागणी करायला मोर्चा काढला’, ही भाषा त्यांना म्हणजे मेहतर जातीतल्यांना अन्य लोकसंख्येपासून वेगळा मोजणारी आहे. म्हणजे बातमी लिहिणार्‍याला व वाचणार्‍यांना सुद्धा आपण माणसाच्या हत्येने व्यथित होत नाही, याचीही खंत उरलेली नाही याचीच साक्ष नाही काय?

   सीमेवरच्या दोन जवानांची हत्या व त्यांचे मुंडके कापले, त्यांचा समाज कुठला होता? त्यांची जात कुठली होती? तो सुखविंदर त्याच्या समाजाने सरकारकडे दाद मागायला मोर्चा काढल्याची बातमी निदान माझ्या तरी वाचनात नाही. याचा अर्थ त्या दोन्ही जवानांसाठी संपुर्ण भारतातील सर्व जातीजमातीचे नागरिक म्हणजे, त्यांचा समाज होता व आहे ना? मग सोनईच्या या तीन तरूणांसाठी मेहतर जातीतलेच लोक त्यांचा समाज कसा होऊ शकतो? काही क्षणांसाठी विसरून जा, की ह्या तीन तरुणांची हत्या सोनई गावात झाली. समजू की त्यांची हत्या नियंत्रण रेषेवरती पाकिस्तानी सैनिकांनी केली असती आणि त्यांच्या मृतदेहाचे असेच तुकडे पाडलेले, फ़ेकून दिलेले आढळले असते; तर आपण कसे वागलो असतो? मग त्यांच्या हौतात्म्याच्या विटंबनेची दखल त्यांच्या समाज वा जातीने घ्यावी, अशी अपेक्षा करत आपण शांत बसलो असतो का? तसे घडले असते तर सुधाकर सिंग वा हेमराजच्या हत्ये इतक्याच प्रक्षोभाने आपली प्रतिक्रिया उमटली असती ना? तेव्हा आपल्याला जात आठवत नाही, मग आज सोनईतल्या हत्येचा न्यायनिवाडा होण्यासाठी मेहतरांनीच पुढाकार कशाला घ्यायचा? त्यात बाकीचे भारतीय, बाकीचे मराठी महाराष्ट्रीयन का नसावेत? समाज हा शब्द आपण किती संकुचित करून टाकला आहे ना? एका जातीचे, त्या जातीमध्ये जन्मलेले असतील, त्या लोकसंख्येला समाज म्हणतो आपण. आणि मग एका समाजाला दुसर्‍या समाजाच्या सुखदु:खाशी कसले कर्तव्यच उरलेले नाही. बाकी आपण भारतीय असतो ते क्रिकेटचे सामने खेळले जाणार असतील तेव्हा. उरलेल्या काळात आपण आपापल्या समाजातले असतो.

   पकिस्तानने सीमेवर हल्ला करून किंवा आपल्या जवानांची हत्या करून आपल्यातले भारतीयत्व जागवावे लागते. तर आपण आपापल्या ‘समाजाच्या’ कवच किंवा भिंती पार करून एकत्र येऊ शकतो. सोनईच्या हत्याकांडाची तीच भयावहता आहे. त्यातली अमानुषताही त्या सामाजिक जातीय भिंतींना खिडार पाडू शकली नाही, ती बाब त्या हत्याकांडापेक्षा चिंताजनक आहे. अशा हत्या, खुन कुठे ना कुठे होतच असतात. मरणारा अन्य कुठल्या जातीचा असेल. पण मुद्दा मृत कुठल्या जातीचा वा समाजाचा होता असा नाही, तर त्या हत्याकांडातल्या भीषणतेनेही आमच्यातल्या जातीय मानसिकतेला धक्का बसू नये ही वास्तविकता चिंतेची बाब आहे. खैरलांजी किंवा अन्यत्र असा प्रकार कुठल्या जातीबाबतीत होतो, त्यानुसार आवाज उठवला जातो, त्यातही पुन्हा मतदार यादीतल्या संख्याबळानुसार आवाजात चढउतार होत असतात. पण या सगळ्या गडबडीत आपल्यातला माणूस कुठल्या कुठे हरवून गेला आहे. संवेदनशीलता ही जाती समाजानुसार कार्यान्वीत होते, इतकी कृत्रीम होऊन गेली आहे. न्याय कुठल्या जातीपेक्षा दुबळ्यावर होत असतो आणि मुजोरीचा अविष्कार असतो. म्हणुनच अन्यायाचे परिमार्जन माणूस म्हणून करायला पुढे सरसावले पाहिजे, याचा आपल्याला विसरच पडून गेला आहे. मग ते सत्य मान्य करण्यापेक्षा आपण त्याला समाजाचे मुखवटे चढवत असतो. न्याय आणि अन्यायालाही आपण जातीपाती चिकटवल्या आहेत. सवलती अधिकार मिळवण्यापुरती लढाई मर्यादित होऊन गेली आहे, की सत्तेतला वाटा मुठभरांना मिळण्याचा संकुचित अजेंडा त्याला कारणीभूत आहे?

   परत एक गोष्ट विसरता कामा नये. इथे ता हत्याकांडातील गुन्हेगारांना कठोर शिक्षा द्यायची मागणी घेऊन अनेकजण पुढे येतील. पण सवाल त्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा देण्यापुरताच आहे काय? सवाल कायद्याच्या कठोर अंमलाचा आहे, की या जातीपातीच्या अस्मिता संपवून समाजात परस्परांविषयी आत्मियता निर्माण करण्याचा आहे? एकमेकांविषयी असलेली हिणकस भावना, तिटकारा किंव द्वेष-हेवा, यातून बाहेर पडण्याची प्रक्रिया त्या एका गुन्हेगाराला कठोर शिक्षा मिळाल्याने सुरू होणार नाही, की गतिमान होणार नाही. त्या अस्मिता व जातीच्या भिंती पाडण्याला प्राधान्य देण्याचा विचारच झालेला नाही. मग असे गुन्हे घडतच रहातात. त्यातून मग दुसर्‍या ‘समाजाच्या’ अस्मिता दुखर्‍या होतात. ही सामाजिक तेढ वाढतच जाते. त्यापासून मुक्त होण्याची प्रक्रिया महत्वाची आहे. म्हणूनच नुसती या किंवा खैरलांजी प्रकरणातील न्यायाची प्रक्रिया मोलाची नसते, तर त्या न्यायप्रक्रियेमध्ये समाजाचे सर्व घटक व स्तर तेवढ्याच आस्थेने सहभागी होण्याला महत्व असायला हवे. दिल्लीतल्या सामुहिक बलात्कारानंतर जसे तमाम वर्गातले लोक रस्त्यावर उतरले वा तिथे सीमेवर जवानाचे मुंडके कापल्याने प्रत्येक भारतीय अस्वस्थ प्रक्षुब्ध झाला; तशीच प्रतिक्रिया सोनई वा खैरलांजी नंतर उमटली पाहिजे. त्यासाठी याप्रकारची घटना घडली मग नुसत्या कायदेशीर न्यायाच्या मागणीपेक्षा, त्या मागणीमागे लोकसंख्येतले सर्वच घटक उभे करण्याची चळवळ उभी राहिली पाहिजे, तरच खरे सामाजिक अभिसरण सुरू होऊ शकेल. अन्यथा आपण नुसती शाहू, फ़ुले आंबेडकरांच्या नावाची जपमाळ ओढत राहू, पण सामाजिक समता व न्यायाच्या दिशेने एकही पाऊल पडणारे नाही. सोनईच्या घटनेनंतरची उदासिनता, त्याचाच पुरावा आहे, म्हणूनच तो मनाला यातना देणारा आहे.

रविवार, ३ फेब्रुवारी, २०१३

फ़ुले आंबेडकरांवर हक्क सांगणारे कुठे गेले?


   अहमदनगरच्या नेवासे तालुक्यातील सोनई गावात तीन तरूणांचे मृतदेह सापडल्याच्या घटनेला महिन्याचा कालावधी उलटून गेला आहे. त्याचा तपास रखडला आहे आणि खुनाची कारणेही उलगडलेली नाहीत. त्याबाबत सरकारी व प्रशासकीय उदासिनता एकवेळ समजू शकते. पण सामाजिक, राजकीय उदासिनता खरी धक्कादायक आहे. कारण राज्यातले पोलिस वा प्रशासन कधी शाहू, फ़ुले, आंबेडकरांच्या नावाची जपमाळ ओढत नाहीत. असा उद्योग सातत्याने करणारे जे महान समाज सुधारक आपल्यात वावरत असतात, त्यांची उदासिनता धक्कादायक आहे. अवघ्या अडीच महिन्यापुर्वी मुंबईत एक मोठी घटना घडत होती. त्या दिवशी शिवसेनाप्रमुखांची अंत्ययात्रा निघालेली होती आणि मुंबईच नव्हे, तर महाराष्ट्रातल्या सर्वच प्रमुख शहरातले महत्वाचे व्यवहार ठप्प झालेले होते. त्याबद्दल जाहिरपणे सोशल नेटवर्कद्वारे नाराजी व्यक्त करणार्‍या दोन मुलींना पोलिसांनी ताब्यात घेतले; तर देशाच्या कानाकोपर्‍यात जाऊन पोहोचेल असा आक्रोश सुरू झाला होता आणि ज्यांनी ती कारवाई केली, त्या पोलिसांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करायला एकाहून एक समाज सुधारकांची शर्यत सुरू झाली होती. ज्यांना दोन मुलींच्या त्या आविष्कार स्वातंत्र्याच्या गळचेपीने इतके व्यथित व्हायची वेळ येते, ते किती संवेदनाशील असतील ना? मग त्यांनी तीन तरुणांच्या अमानूष हत्येने किती व्यथित व्हायला हवे? त्यासाठी किती आक्रोश व्हायला हवा होता? त्याहीनंतर दिल्लीत सामुहिक बलात्काराची घटना घडल्यावर किती आक्रोश सुरू झाला होता? दिल्लीतल्या त्या घटनेचे पडसाद इतक्या दूर मुंबईतही उमटले होते. पण त्यातलाही कुणी नेवाश्याच्या गावातील या सामुहिक हत्याकांडाने विचलित झालेला दिसला नाही. आता त्या घटनेला महिन्याचा कालावधी होऊन गेल्यावरही कुठली तरी सामान्य घटना असावी तसे ते प्रकरण धुळ खात पडून रहावे?

   पहिली बाब म्हणजे तिन्ही मृत दलित आहेत. त्यांची हत्या झालेली आहे आणि त्यांच्यावर अन्याय झालेला आहे. तरीही त्यांना दलित न मानता साध्या नेहमीच्या कायद्याने तरी न्याय मिळायला हवा की नको? तेवढाही न्याय किंवा तेवढीही दखल त्यांची घेतली जात नाही, अशी आजची वस्तुस्थिती आहे. आणि अशी दखल घेतली जात नाही, त्याला शाहू, फ़ुले आंबेडकरांचा महाराष्ट्र असे मात्र अगत्याने म्हटले जात असते. कसला हा विरोधाभास आहे? कसली ही थट्टा आहे? बाकीच्या पक्षांचे सोडून द्या, जे स्वत:ला दलितांचे पक्ष व संघटना म्हणवतात, त्यांचीही उदासिनता धक्कादायक नाही काय? अर्थात आजकाल त्या दलित संघटनांपुरते फ़ुले आंबेडकर मर्यादित राहिलेले नाहीत. अलिकडे त्यांच्यावर अनेक मराठा, बहुजन संघटना आपलाही हक्क गाजवू लागल्या आहेत. त्यांच्यापैकी कोणी सोनई हत्याकांड प्रकरणात आवाज उठवल्याचे ऐकीवात नाही. मग असा प्रश्न पडतो, की फ़ुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणजे तरी काय? की निवडणूका आल्यावर आम्हाला हे महात्मे आठवतात आणि निवडणूकांचे निकाल लागल्यावर महाराष्ट्राची मालकी बदलत असते? मरणारा व मारला गेलेला माणूस आहे, माणसे आहेत, एवढेही आपण आता विसरून गेलो आहोत काय? एका कुटुंबातली तीन निरपराध माणसे अशी कत्तलखान्यातल्या जनावराप्रमाणे मारली जातात, त्याचे कोणालाच काही वाटत नाही काय? याला उदासिनता म्हणायचे की बधीरता? जातीपाती बाजूला ठेवा, निदान माणुसकी म्हणून तरी आपण कुणा निरपराधाकडे बघणार आहोत की नाही? या कसल्या अस्मिता आपल्याला बधीर करून बसल्या आहेत?

   महिन्याभरापुर्वी भारत पाक सीमेवर नियंत्रण रेषेची टेहळणी करणार्‍या दोन भारतीय जवानांची पाकने हत्या केली; तर उभा देश विचलित झाला होता. त्याचा चोख हिशोब देण्यासाठी पाकिस्तानवर हल्ला चढवा आणि युद्ध पुकारा, असा पुकारा करीत लाखो लोक कंठरवाने ओरडू लागले होते. आपल्या देशप्रेमाची साक्ष देण्याची सार्वत्रिक स्पर्धाच सुरू झालेली होती. कशाला? खरेच आपण त्या आपल्या सैनिकांवर इतके प्रेम करतो का? त्यापैकी एकाचे मुंडके तोडून पाकिस्तानी घेऊन गेले, म्हणून आपले रक्त खवळले होते ना? ते सगळे कितपत खरे होते? कारण इथे मुंबईपासून दोन चारशे किलोमिटर्स अंतरावर असलेल्या सोनई गावात त्यापेक्षा वेगळा प्रकार घडला नव्हता. जेवढे ते दोन जवान भारतीय होते, तेवढेच सोनई गावातले हे मारले गेलेले तीन तरूण अस्सल भारतीय होते. त्यांच्याही देहाची हत्या केल्यावर भीषण विटंबना करण्यात आलेली आहे. नुसती विटंबनाच नाही. निदान सीमेवरील त्या जवानाचे मुंडके सोडून उर्वरित देह भारतीयांच्या हाती सुखरूप लागावा, अशी स्थिती होती. त्यापेक्षा अधिक मृतदेहाची विटंबना करू नये, इतकी मर्यादा त्या शत्रू सैनिकांनीही पाळली होती. पण सोनई गावातला प्रकार त्यापेक्षाही पाशवी व अमानुष आहे. इथे मृतदेहाची विल्हेवाट लावुन ते कुजून सडून नष्ट व्हावेत इतका पाशवी प्रकार घडलेला आहे. आणि कोणाच्या अंगावर शहाराही येऊ नये? इतक्या आपल्या संवेदना व भावना बधीर झाल्या आहेत काय? सोनईतले हे तीन तरूण आणि सीमेवरचे ते दोघे जवान यांच्यात असा कुठला फ़रक होता? ते देशाच्या शत्रूशी लढणारे होते आणि इतके सोनईतले तरूण समाजाच्या शत्रूशी लढणारे नव्हते का? त्यांचा बळी समाजिक भेदभाव नावाच्या शत्रूनेच घेतलेला नाही काय? मग आपल्या प्रतिक्रिया व प्रतिसादामध्ये असा जमीन अस्मानाचा फ़रक कस पडतो?

   कुठल्याही विषयात व घटनेत तमाम लोकांना लाज वाटावी असे आवाहन करणारे मुखंड कुठे आहेत? कारण ही इतकी लज्जास्पद घटना मुंबईच्या नजीक आपल्या दारापाशी घडली असताना, तिचा सुगावा लोकांना लागू नये याची काळजी कोणी घेतली? पालघरच्या नगण्य दोन मुलींसाठी आक्रोश करणार्‍यांचे सोनई बाबतीतले मौन चकित करणारे नाही का? सीमेवरील जवानांच्या मुंडक्यासाठी चर्चा घडवून आणणार्‍यांची या बाबतीतली उदासिनता थक्क करणारी नाही का? की संवेदनशीलता व बधीरता ही प्रत्येकाच्या जातीनुसार ठरत असते? हे तिन्ही तरूण मेहतर समाजाचे आहेत, दलितच आहेत. पण दलितांच्या प्रमुख जातीमधले नाहीत; म्हणून इतकी उदासिनता होती, की मतदार यादीत त्यांची संख्या जातीनिहाय नगण्य आहे म्हणून ही बधीरता दाखवण्यात आली? मला भिती त्यांचे मुडदे पाडणार्‍यांची वाटत नाही; इतकी भिती या शांततेची व मौनव्रताची वाटते. कारण ही शांतता व उदासिनता आजच्या वास्तविक जातीय राजकारणाचा सर्वात हिडीस चेहरा आहे. तो फ़क्त उच्चभ्रूंचाच नाही; तर संख्याबळ अधिक असलेल्या दलित पिछड्यांचाही आहे. आंबेडकरांच्या नावाने मतांचा जोगवा मागणार्‍यांचाही चेहरा त्यातच समाविष्ट आहे. कारण ही उदासिनता व निष्क्रियता पिछड्यांमधल्या मनूवादाचाही चेहरा आहे. आपल्या रक्तात जातीयवाद व जातीभेद किती खोलवर रुजला आहे, त्याचे ते प्रमाण आहे. आणि त्यासाठी आपण आपल्यातल्या माणुसकीला कशी तिलांजली देउन बसलो आहोत, त्याचे ते लक्षण आहे. भय त्याचे वाटते. सामाजिक न्यायाच्या गप्पा मारताना एकू्णच समाज किती व्यवहारी निष्ठूर झालाय; त्याची अशी प्रचिती चिंताजनक आहे. ज्या अविष्कार स्वातंत्र्यासाठी गळा काढला जातो, तेच स्वातंत्र्य अन्यायाविरुद्ध आक्रोश करताना मरगळून निष्क्रिय होत असेल, तर त्याचा उपयोग तरी काय?

   सीमेवरील जवानांची हत्या व मृतदेहाची विटंबना आणि सोनईतील घटना जवळपास एकाच वेळच्या असून त्यात माध्यमांनी दाखवलेला भेदभाव म्हणून तर धक्कादायक व चिंताजनक आहे. मग प्रश्न पडतो, त्या जवानांविषयीची आत्मियता खरी होती, की या तीन मेहतर तरुणांच्या हत्येविषयीचे मौन खरे असावे? त्या सोनई गावाची ख्याती काय? कुठे आहे ते गाव? याच गावातून शनी शिंगणापूरात जाता येते. जिथे म्हणे कुठली चोरी होत नाही. आणि शेजारच्या गावात मात्र चोरटे खून होऊ शकतात? कुठल्या जमान्यात आणि कुठल्या मानसिकतेमध्ये आपण आज जगतो आहोत? सगळा प्रकारच मन विषण्ण करून सोडणारा आहे. कारण बदनाम पोलिसांपेक्षा सामाजिक न्यायाचा डंका पिटणार्‍यांची अलिप्तता भयकारी आहे. आणि म्हणे फ़ुले आंबेडकरांचा महाराष्ट्र. कोण होते ते तिघे तरूण? (क्रमश:)
भाग   ( ७५ )    ४/२/१३

शनिवार, २ फेब्रुवारी, २०१३

अंधश्रद्धेने गांजलेले माणसाचे नित्यजीवन


   श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात अतिशय पुसट रेषा असते. तशीच विश्वास व श्रद्धा यांच्यातही पुसट रेषा असर्ते. त्या केव्हा अनवधानाने पार केल्या जातात, त्याचे आपल्याला भान असतेच असे नाही. भक्ती वा श्रद्धा या अशा गोष्टी आहेत, की त्या तुम्हाला गाफ़ील करत असतात. अंधश्रद्धा तुमच्यातली चिकित्सक वृत्तीच निकामी करून टाकत असतात. आणि त्यासाठी अन्य कुणाकडे बोट दाखवण्याची गरज नाही. अगदी मी सुद्धा त्या अनुभवातून अनेकदा जात असतो. मी स्वत:ला बुद्धीप्रामाण्यवादी म्हणत असलो, तरी असे अनेक गाफ़ील क्षण माझ्याही आयुष्यात अधूनमधून आलेले आहेत, हे नाकारता येणार नाही. तेव्हा मी उगाच कोणाची अंधश्रद्ध म्हणून हेटाळणी करायला धजावत नाही. अंधश्रद्ध त्याला म्हणतात, जो आपल्या गाफ़ीलपणाच्या मागे आपली बुद्धी पणाला लावून युक्तीवाद करू लागतो. वास्तव दिसत असूनही बघायचे नाकारतो. आणि असे अनेक बुद्धीमंतही करताना दिसतील. प्रत्येकाच्या समजूती व श्रद्धा भिन्न असतील. पण त्यांचा आंधळेपणा मात्र एकाच स्वभावाचे असतात. आणि तो स्वभाव आपल्याला सत्य गवसल्याचा वा समजल्याचा अहंकार असतो. तो अहंकार एकदा मानगुटीवर बसला; मग बुद्धी त्याची गुलाम होऊन जाते. त्यामुळेच शक्य तेवढे सावध रहाणे हा शहाणपणा असतो. मग तो बुवाबाजीच्या संदर्भातला असो की राजकीय, वैद्यकीय, विज्ञानाच्या बाबतीतला असो. तेच दाखवण्यासाठी मी दोन वाचकांच्या प्रतिक्रियांवर इथे भाष्य़ केले. त्यांची हेटाळणी करणे हा माझा अजिबात हेतू नाही. आपण किती गाफ़ीलपणे एखाद्या भूमिका, विचार वा व्यक्तीच्या आहारी जाऊ शकतो, तेच दाखवण्याचा उद्देश त्या्मागे होता. असे माझेही अनेकदा झालेले आहे. कधी ते घरातल्या, मैत्रीच्या बाबतीतले असेल; कधी गंभीर विषयाच्या बाबतीतले असेल. याचे अगदी ताजे उदाहरण म्हणजे दिल्लीतल्या सामुहिक बलात्काराच्या बाबतीतले दाखवता येईल. त्यात सर्वात हिडीस व विकृत वर्तन करणार्‍या गुन्हेगाराचे वय अठरा वर्षे पुर्ण नाही; म्हणून त्याला अजाण ठरवून कायदा त्याचा गुन्हा पोटात घालायला तयार झाला आहे. याला विज्ञाननिष्ठा, बुद्धीप्रामाण्य़ म्हणायचे, की शब्दप्रामाण्याची अंधश्रद्धा म्हणायचे?

   ज्या मुलीवर तो सामुहिक बलात्कार झालेला आहे, तिच्या जीवाशीही खेळ झालेला आहे. त्या मुलीवर बलात्कार करण्यात जो मुलगा सहभागी झाला, त्याला बलात्कार हा गुन्हा आहे हे कळत नव्हते का? त्याला लैंगीक अत्याचार कळत नव्हते का? त्या मुलीच्या अब्रूचा विषय सुद्धा बाजूला ठेवा, तिला आपण प्राणघातक इजा करतोय, हे सुद्धा त्याला कळत होते ना? मग त्याला अजाण कसे ठरवता येईल? जो मुलगा आपल्या सैतानी वर्तनातून जे करून दाखवतो आणि केल्यावर अपराधी भावनेने पळ काढतो; त्याला अजाण कशाच्या आधारे मानायचे? तर तसे कायदा म्हणतो, अठरा वर्षे वय पुर्ण असेल तोच सज्ञान; अशी कायद्याची व्याख्या आहे. पण ती व्याख्या कशासाठी बनवलेली आहे? तर सरसकट काही निर्णय घ्यायचे असतात, म्हणून एक वय निश्चित केलेले आहे. त्याचा अर्थ असा होत नाही, की ते वय पुर्ण होते, त्या दिवशी माणसामध्ये कुठला एक अवयव आपोआप कार्यरत होतो आणि त्याला अक्कल येते. सर्वसाधारण त्या वयाच्या आसपास माणसाला समज येते, अशा गृहीतावर त्या वयाचा आकडा कायद्याने गृहीत धरलेला आहे. म्हणून एक दिवस किंवा एक तास अलिकडे पलिकडे करून कोणाचे जाणतेपण ठरवायचे नसते. शब्दांचा अर्थ असा लावणे; ही शब्दांची प्रतारणा असते. शब्दांचा हेतू काही संकेतापुरता मर्यादित असतो. त्या शब्दाचा, त्याच्या योजनेमागचा हेतू विसरून त्याचा अर्थ लावायला जाणे; म्हणजे त्या हेतूलाच हरताळ फ़ासणे असते. कायद्याचा सुद्धा काही हेतू असतो. लोकांना न्याय मिळतो व मिळावा; याचे हेतूने कायद्याची निर्मिती झालेली आहे. त्या हेतूला बाजूला ठेवून कायद्याच्या रचनेतल्या शब्दांचे महात्म्य वाढवले, मग कायद्याचा हेतू रसातळाला जात असतो. पण इथे बलात्कार प्रकरणात किंवा इतर अनेक प्रकरणात कायद्यातल्या शब्दांचे अर्थ शोधून न्यायालाच हरताळ फ़ासलेला दिसेल. त्याला कायद्यावरची अंधश्रद्धाच म्हणायला हवे ना?

   दोनतीन महिने अठरापेक्षा वय कमी आहे, म्हणून त्या गुन्हेगाराला अजाण ठरवण्याला न्याय म्हणून आपण निमूटपणे मान्य करायचे, याला विज्ञान कशाच्या आधारे म्हणायचे सांगा? ही विज्ञानाची कुठली कसोटी आहे? पण आपण ती कशासाठी मान्य करतो? तर कायदा तसे म्हणतो आणि ज्यांनी कायद्याचा तसा अर्थ लावला आहे, ते त्यातले जाणकार आहेत म्हणून? जे बुद्धीला व विज्ञानालाही पटणारे नाही, ते पटवून कशासाठी घ्यायचे? कशासाठी मान्य करायचे? ही या एकाच बाबतीतली गोष्ट नाही. आपला शेजारी पाकिस्तान नावाचा देश आहे. तिथे असा कायदेशीर पेचप्रसंग उभा राहिला आहे. तिथल्या सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्राध्यक्ष आसिफ़ अली झरदारी यांच्यावर भ्रष्टाचाराचा अर्धवट सोडून दिलेला व रद्दबातल करण्यात आलेला खटला, नव्याने चालू करावा असा हट्ट धरला आहे. आणि तसे करत नाही म्हणून तिथल्या पंतप्रधानाला दोषी ठरवून राजिनामा द्यायला भाग पाडले. त्यामुळे पाकिस्तानात नवा पंतप्रधान आणावा लागला. असे युसुफ़ रझा जिलानी यांनी का करावे? ते पंतप्रधान होते, पण ते सर्वोच्च न्यायालयाचा आदेश जुमानू शकले नाहीत. हा त्यांचा गुन्हा कसा ठरला? तर न्यायालयाचा आदेश त्यांनी मानला नाही. पण तो मानायला देशाची घटनाच परवानगी देत नव्हती. कुठल्याही देशाचा कारभार तिथल्या राष्ट्राध्यक्षाच्या नावाने चालत असतो. त्यामुळे त्याच्यावर कुठला खटला भरता येत नाही. मग पंतप्रधानाने घटना धाब्यावर बसवून झरदारी यांच्या विरोधात खटला चालवावा कसा? पण तसा सर्वोच्च न्यायालयाचा तरी हट्ट कशाला?

   झरदारी यांनी अध्यक्ष झाल्यावर भ्रष्टाचार केलेला नाही. त्याच्या खुप आधी त्यांच्या पत्नी बेनझीर पंतप्रधान असताना झरदारी यांनी सरकारी कंत्राटे मिळवून देताना दहा टक्के लाच खाल्ल्याचा आरोप होता. त्यासाठी ते तुरुंगात होते व खटला चालू होता. राजकीय सौदेबाजी करताना मध्यंतरी सत्तेवर असलेले लष्करशहा परवेझ मुशर्रफ़; यांनी आठ हजार खटले अध्यक्षिय आदेश काढून रद्दबातल केले. त्यातच झरदारी यांच्यावरच्या खटल्याचा समावेश होता. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने अध्यादेश मान्य केल्याने खटले रद्दबातल झाले. पण आपला जुना आदेश आता सर्वोच्च न्यायालयाने रद्द करून त्या सर्व खटल्यांची नव्याने सुनावणी करायचे आदेश जारी केले आहेत. त्यात काहीच अडचण नाही. पण मध्यंतरी बदलत्या राजकारणामुळे झरदारी पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष बनून गेले. त्यामुळे नेहमीचे कायदे त्यांना लागू होत नाहीत. देशाचे अध्यक्ष म्हणून त्यांना घटनेने संरक्षण दिलेले आहे. म्हणजेच सर्वसामान्य कायद्यानुसार ते भ्रष्ट व गुन्हेगार आहेत. पण त्यांच्याच नावाने चाललेल्या कायद्याच्या राज्यात तोच कायदा त्यांना हात लावू शकत नाही. मग तो कायदा सर्वांना सारखाच लागू होतो, असा दावा करण्यात अर्थ उरला काय? गुन्हे करून कोणी अध्यक्ष पदावर आरुढ झाला; मग त्याला गुन्हे माफ़, असाच त्याचा अर्थ होत नाही काय? मग कायद्याने न्याय होतो, याला अंधश्रद्धा नाही तर काय म्हणायचे? आणि इथे किती विचित्र भानगड आहे बघा. गुन्हा अध्यक्ष झरदारी यांचा आहे. पण त्यांच्यावर खटला भरू शकत नसल्याने पंतप्रधानाचा हकनाक बळी कायद्यानेच घेतलेला आहे. ज्या कायद्याने न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे, त्यानेच एकावर अकारण अन्याय मात्र केला आहे. पण त्याबद्दल अवाक्षर बोलण्याची कोणाची पाकिस्तानात हिंमत नाही. कारण तो कायद्याचा वा न्यायालयाचा अवमान ठरू शकतो. थोडक्यात कायद्याने अन्याय, अत्याचार केला तरी त्याला न्यायच मानायचा अशी सक्ती आहे.

   कायद्यावरचा विश्वास व श्रद्धा यांची कशी कधी अंधश्रद्धा होऊन गेली ना? किती नकळत आपण अन्यायाला न्याय मानायची सवय अंगवळणी पाडून घेतली आहे बघा. नित्यनेमाने आपल्या आयुष्यात आपण असे अनेक अन्याय सहजगत्या पचवत असतो. कायद्यानुसार म्हटले, की आपली बोलती बंद होऊन जाते. आपली विवेकबुद्धी व चिकित्सक वृत्ती काम करीनाशी होऊन जाते. विश्वास व श्रद्धा यांची किती सहजगत्या अंधश्रद्धा होऊन जाते, त्याचे असे शेकडो नमूने सादर करता येतील. पण तो व्यवस्थेचा भाग असल्याने त्याला कोणी अंधश्रद्धा म्हणत नाही वा समजत नाही. पण त्याचे व्यवहारी परिणाम बघा. अंधश्रद्धा नाही तर त्यात दुसरे काय आहे? कुठलेही शब्दप्रामाण्य वा ग्रंथप्रामाण्य जेव्हा बुद्धीला पटत नसते, ती अंधश्रद्धा असते. कारण ग्रंथ व शब्द हे मानवी जीवन सुसह्य बनवण्यासाठी असतात. त्यातच त्या शब्दांनी बनलेले नियम बाधा आणत असतील तर ती अंधश्रद्धाच असते.    ( क्रमश:)
भाग   ( ७४ )    ३/२/१३

शुक्रवार, १ फेब्रुवारी, २०१३

देवीची साथ अंधश्रद्धेने नव्हे विज्ञानाने संपली


   बालपणीची गोष्ट आठवते. आज देवीची साथ म्हटले तर नव्या पिढीला त्याचे गांभिर्य कळणार नाही. पण त्या काळात म्हणजे साठ वर्षापुर्वी देवी ही भयंकर सांसर्गिक रोगाची साथ असायची. तिची जनमानसावर इतकी दहशत होती, की कोणाला त्याची बाधा झाली असेल; तर ‘देवी आल्या’ असेही बोलायला लोक घाबरत असत. मला हे आठवते कारण आमच्या लालबागच्या चाळीत माझी एक बालमैत्रीण त्याचा बळी झाली होती आणि तिचा भाऊ त्यातून कसाबसा बचावलेला आठवतो. त्यावर उपचार औषधे तेव्हा झटपट उपलब्ध नव्हती. जन्मत:च बालकांना काही डोस टोचून वगैरे दिले जात. तरीही त्याचे निर्मूलन झालेले नव्हते. त्यामुळे कुठल्या वस्तीत त्याची बाधा कुणाला झाली; मग आसपासच्या लोकांची पाचावर धारण बसायची. एक मजला खालच्या घरात दोन मुलांना बाधा झाली, म्हटल्यावर तमाम पालक हवालदिल झाले होते. त्यांच्या अंगावरचे पुरळ व फ़ोड बघून आमचीही गाळण उडाली होती. दुसर्‍या मुलांसोबत आमच्यातही त्याची चर्चा व्हायची. कारण तात्कालीन समजूतीप्रमाणे तो देवीचा कोप होता आणि मग देवीला प्रसन्न करून घेण्य़ावरच त्यापासून सुटका शक्य होती. सहाजिकच अन्य उपचार होत असताना; त्या घरात रोजच्यारोज भजने व्हायची. मला त्याविषयी कमालीचे कुतूहल होते. म्हणून घरच्यांची नजर चुकवून मी त्या खोलीत डोकावण्याचा प्रयास करीत असे. पण तिथले पालकही मला हाकलून लावायचे. एका दुसर्‍या मुलाच्या घरात देवी हा शब्द उच्चारला म्हणून कानशीलात आवाजही निघाला होता. कारण काय असेल? तर नाव घेतले तरी देवी तिथेही येते. त्या वयात चिकित्सा फ़ारशी शक्य नव्हती. पण कुतूहल खुपच होते. नाव घेतल्यावर देवी येते कशी व बाधा होते कशी? भजनांनी रोगराई बरी होत असेल तर औषधे कशाला करीत आहेत, असे अनेक प्रश्न डोक्यात थैमान घालत होते. पण विचारायचे कोणाला आणि शंकासमाधान करणार कोण? लालबागच्या त्या कामगार वस्तीत आगावू शंका घेणार्‍या पोरांना पाठीत रट्टा घालणे; हेच शंकासमाधान असायचे. सहाजिकच देवीचे रहस्य दिर्घकाळ मनात पिंगा घालत राहिले होते. काही दिवसांनी त्या दोन भावंडातील मुलगी दगावली आणि मुलगा बचावला. पण आजाराची मुदत पुर्ण होत असताना शेवटचे भजन दुपारी उरकून मंडळी निर्माल्य वगैरे घेऊन भजने म्हणतच समुद्रावर विसर्जनासाठी गेल्याचे माहित होते. मग अशा भजने गुणगुणत निघालेल्या टोळ्या दिसल्या तर मी त्यांच्या मागून जात काय बडबडतात, त्याचाही मागोवा घ्यायचा प्रयत्न केला होता. पण काहीच कळू शकत नव्हते. देवीची बाधा म्हणजे दहशत होती.

   पुढे शाळेत विज्ञान शास्त्र शिकताना रोगराई, आजार, त्यावरील उपचार व ते शोधून काढणारे शास्त्रज्ञ असे विषय आले आणि काही प्रमाणार शंकानिरसन होऊ शकले. तेव्हा लक्षात आले, की पूजापाठाने वा भजनाने देवीची बाधा संपली नाही, ती बाधा होऊच नये म्हणून बालवयातच लस टोचून घेतली; मग त्या रोगजंतूंशी प्रतिकार करणारी शक्ती शरीरात उपजत निर्माण होते, ती निर्माण करायला औषधी लस मदत करते. अशी लस शोधून काढण्यासाठी जगभरातल्या अनेक शास्त्रज्ञांनी आयुष्यातली कित्येक वर्षे खर्ची घातली आहेत. नुसती औषधे शोधून काढली नाहीत; तर त्या रोगाची बाधा होऊच नये असेही उपाय शोधून काढले आहेत. त्यामुळे देवीचे जगातून निर्मूलन व उच्चाटन होत गेले. आरंभी शाळांमधून शहरातून व अखेरीस खेड्यापाड्य़ातून अशी लस टोचण्याचे व्यापक कार्यक्रम योजले गेले. लस न टोचलेले मूल शिल्लक ठेवले गेले नाही आणि दोन पिढ्यातच देवीचे संपुर्ण देशातून उच्चाटन झाले. त्याची घोषणा जागतिक आरोग्य संघटनेने करण्यापर्यंत मी पत्रकार होऊन गेलो होतो. भारतातल्या्च बिहार राज्यात अखेरचा देवीच रोगी आढळला आणि त्यानंतर पृथ्वीतलावर देवी शिल्लक उरली नाही. लोक त्यातून कसे बाहेर पडले? सरकारी योजना व सक्तीचे लसीकरण त्याचे खरे कारण होते. मोफ़त व सक्ती यामुळे समाज रोगमुक्त झाला आणि त्यानंतर बाधाच होत नसेल तर लोकांना निरर्थक भजन पूजनातून अंधश्रद्धा जोपासण्याची गरजच राहिलेली नाही. आता कुणासाठी देवीचा रोग ही असाध्य बाधा राहिलेली नाही, कारण त्याचे निर्मूलन होऊन गेले आहे. आपोआपच त्याच्या भोवतीच अंधश्रद्धा संपुष्टात आली. त्याचे श्रेय लस शोधून काढणार्‍यांपासून ती स्वस्तात उपलब्ध करणारे, ते लसीकरण खेड्यापाड्यापर्यंत घेऊन जाणारे, अशा सर्वांना आहे. त्यांनी भजनपूजनातून रोगबाधा संपत नाही, अशी लोकांची हेटाळ्णी केली नाही, की अंधश्रद्धा निर्मूलनाचा आव आणला नाही. त्यांनी लोकांना रोगमुक्त करण्याचा उपाय अंमलात आणला आणि लोकांना अंधश्रद्धेच्या मार्गाने जाण्याची गरजच उरली नाही. समजा हे सगळे लोक लस शोधण्यापासून ती लोकांपर्यंत घेऊन जायच्याऐवजी भजनपूजनाच्या विरोधातच भाषणे देत बसले असते, तर जगाला देवीपासून मुक्ती मिळाली असती का? देवीच्या रोगाचे निर्मूलन झाले असते का? त्यातून विज्ञानाची महती निदान तेवढ्या बाबतीत लोकांना पटली असती का?

   तेव्हाही देशात आणि जगात वैद्यकशास्त्र वापरात होते, विविध औषधे व उपचार होते. पण ते परिणामकारक नव्हते. तोकडे पडत होते. म्हणूनच एका बाजूला लोक डॉक्टरकडे जायचे. पण त्याची खात्री नसल्याने अंगारेधुपारे व भजनपूजनाचा मार्गही सोडत नव्हते. मुळात विज्ञानाने रोगच संपवला वा रोगाचे म्हणजे समस्येचे निर्मूलन केले आणि त्या अंधश्रद्धेतून लोक आपोआपच मुक्त झाले. त्याचा अर्थ लोक विज्ञानिनिष्ठ झाले असा अजिबात नाही. त्यांच्या लेखी भोंदू भगत व डॉक्टर त्यात फ़रक नाही. या्च्या दुकानात जायचे, त्याऐवजी त्याच्या दुकानात जायचे इतकाच फ़रक पडला आहे. उलट आज विज्ञान वा वैद्यकशास्त्राच्या बाबतीत नवनव्या अंधश्रद्धा उदयास आलेल्या आहेत. खेड्यापड्य़ात किंवा गरीब कष्टकर्‍यांच्या वस्तीत गेलात; तर इंजेक्शन देणारा डॉक्टरच उत्तम मानला जातो. सलाईन लावणारा डॉक्टरच्या हाताला गूण असल्याच्या समजूतीला काय म्हणायचे? कारण नसताना साध्यासाध्या आजारासाठी पन्नास चाचण्या घ्यायला भाग पाडून सामान्य माणसाची लूट करणारे वैद्यकशास्त्रातले भामटे कमी नाहीत. त्याला काय विज्ञाननिष्ठा म्हणायचे आहे? व्यवहारातील अनेक विषयात समजूती व अंधश्रद्धा आहेत. त्या धर्माइतक्याच बळकट व त्रासदायक आहेत. आणि त्या किंवा तसल्या अंधश्रद्धा निर्माण करणार्‍यांना सोबत घेऊन कोणी ‘अंधश्रद्धा निर्मूलना’चा आव आणत असेल, तर माझ्या लेखी तो कुठल्याही बापूबुवापेक्षा कमी भोंदू नसतो. डॉक्टर श्रीराम लागू हा असा डॉक्टर आहे आणि जर दाभोळकर त्याला आपल्या संस्थेमध्ये मानाचे पान देणार असतील; तर मग त्यांना भोंदू का म्हणायचे नाही?

   आज जो थेट वेदनाशामके वा अन्य औषधांचा अकारण मारा प्रचार व जाहिरातीमधून लोकांवर होत असतो, ती काय विज्ञाननिष्ठा आहे? अमुकतमूक मलिये और कामपर चलीये; अशा जाहिराती, वैद्यकीय अंधश्रद्धा निर्माण करीत नाहीत काय? कुठल्या गोळ्या घ्या मग क्षणार्धात तुम्ही वेदनामुक्त होऊन ताजेतवाने होता, असे लोकांच्या डोक्यात भरवण्याचा उद्योग कुठल्या विज्ञाननिष्ठेचा पुरावा आहे? लागू अभिनेते म्हणून अशा जाहिरातीमध्ये सहभागी होत असतील तर ते जाणिवपूर्वक लोकांची दिशाभूल करीत असतात. एक डॉक्टर असूनही अशी जाहिरात अभिनय म्हणून करणे; कसे क्षम्य असू शकते? त्यावरच भारताच्या मेडीकल कौन्सिलने त्यांच्यावर आक्षेप घेतला होता आणि दाद देत नाहीत म्हणून त्यांची वैद्यक पदवी काढून घेतली. मग अशा माणसाला दाभोळकर त्यांच्या व्यासपीठावर वा कार्यक्रमात कसा सहभागी करून घेतात? त्याच्या भोंदूपणाला मान्यता कशी देतात? हे प्रश्न मी नव्हेतर दाभोळकरांच्या विज्ञाननिष्ठ कार्यावर फ़िदा असलेल्या, पण ज्यांची विवेकबुद्धी शाबुत असलेल्यांनीच मुळात उपस्थित करायला नकोत का? पण तसे झाल्याचे निदान माझ्यातरी अनुभवात नाही. उलट अनेक दाभोळकर चहात्यांनी लागू यांचा अभिनय हाच व्यवसाय असल्याला बचाव मांडला, हे धक्कादायक आहे. याला विज्ञाननिष्ठा वा विवेकबुद्धी कशी म्हणता येईल? दाभोळकर तर विवेकबुद्धी शाबूत ठेवून बुवाबापूंच्या कृती तपासण्याचे आग्रही आहेत, पण त्यांचे चहाते व भक्त मात्र आपल्या बापूंच्या विवेकाची तपासणीही सहन करू शकत नाहीत. एका अंधश्रद्धेतून सुटून दुसर्‍या अंधश्रद्धेत लोकांना ढकलण्याचाच हा प्रकार नाही का? देवाधर्माची अंधश्रद्धा असू नये, पण वैद्यक वा वैज्ञानिक अंधश्रद्धा असली पाहिजे; असा दावा आहे काय? असायला हरकत नाही. मग त्यांनी आपल्या संस्थेचे वा संघटनेचे नावही धार्मिक अंधश्रद्धा निर्मूलन असे ठेवावे. मग माझी काहीही हरकत नाही. दोन्ही बुवा बापू गुण्यागोविंदाने नांदू शकतील आणि त्यांच्यासहित समाजाचे गांजलेपणही सुखाने संसार मांडू शकेल. माझी विज्ञाननिष्ठा किंवा विवेकबुद्धी पुस्तके वाचून, भाषणे ऐकून आलेली नाही, तर अनुभवातून मी बुद्धीप्रामाण्यवादी झालो आहे. म्हणूनच शास्त्रज्ञ असो, की बुद्धीवादी असो, त्यालाही तपासून बघितल्याशिवाय मी कोणावर आंधळा विश्वास ठेवायला तयार नसतो. मग तो बुवा बापू असो की दाभोळकर असो.    ( क्रमश:)
भाग   ( ७३ )    २/२/१३