बुधवार, ३१ ऑक्टोबर, २०१२

ब्रिटिशांची दोनशे वर्षे जुनी बीओटी कार्यपद्धती


   दिडशे वर्षे ब्रिटीशांनी आपल्यावर राज्य केले, असे बालपणापासून ऐकत आलो. तसेच तागडी घेऊन व्यापार करायला आलेल्या बिटीशांनी संधी मिळताच हाती तलवार घेऊन इथली सत्ता बळकावली असेही ऐकत आलो. जुन्या गोष्टी बोलायच्या नसतील तर अवघ्या दोन दशकांपुर्वीची गोष्ट घेऊ. आजचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग तेव्हा अर्थमंत्री झाले होते आणि त्यांनी नेहरू इंदीरा गांधी यांचा कालबाह्य समाजवाद गाडू्न टाकायचे धोरण राबवायला सुरूवात केली होती. त्या मुक्त अर्थव्यवस्थे्चा आरंभ गॅट करारापासून होणार होता. त्या करारावर भारताने सही करू नये म्हणून उजवे-डावे असे सर्वच विरोधक कडाडून विरोध करत होते. तेव्हाही पुन्हा इस्ट इंडीया कंपनीचे नव्याने राज्य येणार अशी भाषा वापरली जात होती. इस्ट इंडीया कंपनी्चे राज्य म्हणजे व्यापाराच्या निमित्ताने इथे येणार्‍या परदेशी कंपन्याच देश ताब्यात घेतील; असाच आरोप होता. मात्र तसे काही झाले नाही. उलट जगाच्या पाठिवर अनेक देशात आपलेच उद्योगपती पोहोचले आणि त्यांनीच तिथल्या कंपन्या काबीज केल्या. असो. तो मुद्दा नाही. गेल्या दोन दशकात जी मुक्त अर्थव्यवस्था आली आणि बाजारू नितीमत्ता आली; तिने आपल्या सामाजिक सांस्कृतिक स्वभावामध्ये आमुलाग्र बदल घडवून आणले आहेत. त्यातून आपण एकदम शंभर वर्षे किंवा पन्नास वर्षे पुढल्या युगात आलो म्हणायला हरकत नसावी. म्हणजे पंधरा वर्षापुर्वीपर्यंत कोणीतरी परदेशी जाऊन येताना काही आयात माल घेउन येत असे. मग त्याने आणलेल्या भेटीचे इथे खुप कौतुक असायचे, ते आता राहिले नाही. सुविधा व साधने यात आपण थेट अमेरिकेच्या पंक्तीला येऊन बसलो आहोत. पण मनाने व वृत्तीने अजून आपण विसाव्या शतकातचा घोटाळतो आहोत. त्याच्याही पलिकडे सामुहिक मानसिकता तर दिडदोनशे वर्षे मागे गेली आहे. म्हणजे जेव्हा ब्रिटीश युरोपीयन इथे आपले बस्तान बसवत होते, त्यासारख्या परिस्थितीमध्ये आपण आज पोहोचलो आहोत.

   देहाने, साधनांनी व अनुभवाने आपण एकविसाव्या शतकात जगत असतो. पण आपल्या सामाजिक व सामुहिक जाणिवा मात्र उलट दिशेने प्रवास करत एकोणिसाव्या शतकात मागे जाऊन पोहोचल्या आहेत आणि समुह पातळीवर आपण नेमके तसेच वागत आहोत. ज्याला राजकीय परिभाषेमध्ये अराजक म्हणतात आणि सामान्य भाषेमध्ये यादवी म्हणतात. याच परिस्थितीमुळे मुठभर इंग्रजांना आपल्यावर राज्य करणे व त्यांचे गुलाम बनवण्यासाठी आपली मदत मिळणे शक्य झाले होते. पुढला इतिहास सर्वश्रुत आहे. ती परिस्थिती काय होती? दिल्लीच्या बादशाहीचे साम्राज्य खिळखिळे झाले होते. दुसरीकडे मराठ्यांची सत्ताही गडबडली होती. या खंडप्राय देशामध्ये कोठेच एक केंद्रिय सता नव्हती. सुभेदार, सरंजामदार, जमीनदार, नबाब. सुलतान यांचे आपापले मर्यादित राज्य होते. त्यांच्यात सता व हुकूमत गाजवण्याची क्षमता उरलेली नव्हती, की टिकवण्याची इच्छाशक्ती नव्हती. शिवाय कोणाला सत्ता राबवण्यापेक्षा त्या सत्तेचे लाभ घेण्याच्याच लोभाने पछाडलेले होते. त्यामुळे रयत वा जनता मेटकुटीस आली होती. ज्याच्या कोणाच्या मनगटात ताकद असेल वा सशस्त्र झुंड जमवून लोकसंख्येला ओलिस ठेवण्याची हिंमत असेल; तो भोवतालच्या परिसराचा राजा बनू शकत होता. हुकूमत गाजवू शकत होता वा लूटमार करत होता. राजकीय सता म्हणजे बजबजपुरी झाली होती. परिणामी व्यापार उदीम धोक्यात आले होते. कष्टाने संपत्ती निर्माण करणार्‍याला वेठीस धरून नुकसान करण्याची ज्याची क्षमता, तो हुकूमत गाजवत होता. सुरक्षा कोणालाच नव्हती. अराजक माजलेले होते. थोडक्यात गुंडगिरीची क्षमता असणे म्हणजे राजा अशी स्थिती होती. आणि जे कोणी राजे, नबाब होते, त्यांना अशा अराजक वा अशांतता माजवणार्‍यांचा बंदोबस्त करण्याची गरज वाटत नव्हती किंवा त्याच्यात तेवढी कुवत उरली नव्हती. परिणामी समस्त कष्टकरी जनता किंवा व्यापारी वर्ग गांजलेला होता. त्याला अशा ऐदी सत्ताधीश व लुटारू मुजोरांपासून मुक्ती हवी होती. त्याचाच धोरणी युरोपियनांनी लाभ ऊठवला. त्यांनी बेशिस्त झालेल्या राजकीय अराजकामध्ये शांतता देण्याची शक्यता आपल्या मर्यादित शिस्तबद्ध योजनेतून उभी करून दाखवली. तशी ती जनता व व्यापारी वर्ग त्यांच्याकडे झुकत गेला.

   लक्षात घ्या, ब्रिटिशांनी किंवा युरोपियनांनी इथे राज्य स्थापनेचा विचारच केला नव्हता किंवा तसे त्यांनी कोणाला आश्वासनही दिलेले नव्हते. प्रथमत: त्यांनी आपल्या व्यापाराला आवश्यक म्हणुन आपल्याच सुरक्षिततेची व्यवस्था उभारण्याचा पर्याय शोधला होता. त्यासाठी त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रामध्ये नागरी सत्ता राबवण्याचे अधिकार आपल्याकडे घेतले. सत्ताधीशांच्या परवानगीने घेतले. त्यातून निदान त्यांच्या परिसरात त्यांनी लोकांना शांततामय जीवन जगण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. त्यांनी आधी नुसते महसुलाचे आधिकार मिळवले, ज्याला आज आपण बीओटी असे म्हणतो. ‘बांधा, वापरा हस्तांतरित करा’ असे आज एक नवे धोरण मुक्त अर्थव्यवस्थेने आणले आहे. त्याच मार्गाने इथे युरोपियनांचे राज्य आले. म्हणजे आज देशाच्या अनेक भागात मोठमोठे रुंद रस्ते बांधले जातात, त्यावरून जायचे तर आपल्याला टोल म्हणजे रस्ताकर द्यावा लागतो. त्या रस्त्याच्या उभारणीमध्ये ज्या कंपनीने पैसे ओतले, त्यांची परतफ़ेड रस्ता वापरणार्‍याला करावी लागत असते. त्याला टोल म्हणतात आणि जोवर ती गुंतवणूक त्यातील व्याजासह वसूल होत नाही, तोवर त्या रस्त्याची मालकी त्याच कंपनीकडे असते. थोडक्यात त्या रस्त्यावर मालकी त्या कंपनीची असते आणि सताही त्याच कंपनीची असते. तिथे सरकार ढवळाढवळ करू शकत नाही. मग त्यातून किती पैसे वसुल केले जातात, किती वसूल झाले, त्याबद्दल सरकार प्रश्न विचारत नाही. ब्रिटीशांची सत्ता इथे प्रस्थापित होताना ज्या राजे नबाबांनी त्यांना विविध सनदी व अधिकार बहाल केले, त्यांनी तरी त्यानुसार होणार्‍या वसुल वा महसुलाच्या कामात कधी हस्तक्षेप केला होता काय? तेवढ्यापुरते त्यांचे म्हणजे ब्रिटिश व इस्ट इंडीया कंपनीचे राज्य होते, त्यांची मनमानी चालू असे. तेव्हा त्याला महसुलाचे अधिकार म्हटले जायचे. आज त्यालाच बीओटी असे म्हणतात. नेहमीच्या वृत्तपत्रिय भाषेमध्ये त्यालाच खाजगीकरण म्हटले जात असते. जिथे सरकार सार्वजनिक जबाबदारी सोडुन खाजगी कंपनी वा ठेकेदाराकडे आपले सत्तेचे अधिकार सोपवते, त्याला आज खाजगीकरण म्हणतात. तर दोनशे वर्षापुर्वी कंपनीला अधिकाराची सनद देणे म्हटले जायचे.

   ही पाळी तेव्हाच्या राजे नबाबांवर का आली होती? तर त्यांना राज्य चालवण्यापेक्षा त्या अधिकारामुळे जी जबाबदारी येते ती पार पाडण्यापेक्षा, त्यामुळे चैन व मजा करण्याचे अधिकार प्राप्त होतात, तेवढेच उपभोगायचे होते. सत्ता बापजाद्यांनी मि्ळवली होती. पुर्वजांनी लढाया मारल्या होत्या. सता मिळवून जनतेला सुरक्षिततेची हमी दिली होती. रयतेचा विश्वास संपादन केला होता. त्याच विश्वासावर जनता त्यांना राजा मानून त्यांच्या आश्रयाने सुखी सुरक्षित जीवन जगण्याची अपेक्षा बाळगत होती. पण त्यासाठी जागृतपणे सत्ता राबवावी लागते. जनहिताचे डोळ्यात तेल घालून रक्षण करावे लागते, याचे भान पुढल्या पिढीतल्या वारसांना राहिले नाही. त्यामुळेच त्यांच्या ढिलाईचा फ़ायदा घेऊन समाजातील गुंड गुन्हेगार सोकावत गेले. पण त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी हाती असलेल्या सत्तेचे हत्यार घेऊन मैदानात उतरण्याची इच्छाच राजे नबाब गमावून बसले होते. आपल्या ऐषोआरामात, चैनीत व्यत्यय येऊ न देता कारभाराची जबाबदारी उचलणारे ठेकेदार मिळाल्यास त्यांना हवे होते आणि तीच जबाबदारी उचलायला युरोपियन व्यापारी पुढे आले. आपल्या पगारी फ़ौजा उभ्या करून व शिस्तबद्ध सेना उभ्या करून, त्या व्यापार्‍यांनी तात्कालिन भारतीय सताधीशांच्या सत्तेला राबवण्याचे कंत्राट मिळवले. त्याची व्याप्ती वाढवत नेली. आपल्या नबाब राजांपेक्षा हा नवा ठेकेदार उत्तम सुरक्षा व व्यवस्था देतो; यावर इथली जनता सुखावली आणि क्रमाक्रमाने इथला राज्यकारभार बीओटी पद्धतीने ब्रिटीशांच्या हाती गेला. मग काही काळाने अशी स्थिती आली, की ठेका मिळवण्याचीच गरज उरली नाही. ठेकेदारच ठरवू लागले, की राजाने, नबाबाने काय कंत्राट द्यायचे आहे आणि कोणत्या अटीवर द्यायचे आहे. बिचार्‍या निकामी व निरुपयोगी संस्थानिकांना त्या ठेकेदारांच्या इच्छेपुढे मान तुकवण्याखेरीज पर्याय उरला नव्हता. कारण ते जनतेचा विश्वासच गमावून बसले होते. असे हळूहळू अवघ्या देशाचे राज्य ब्रिटिशांच्या हाती गेले. ते व्यापारी म्हणुन इथे आले, व्यापारच करत होते. पण हळुहळू त्यांच्या लक्षात आले, की विश्वास हे या देशातले सर्वात मोठे भांडवल आहे आणि आपण आपल्या कृतीमधून तो विश्वास या रयतेमध्ये निर्माण केला, तर एक पैशाचे भांडवल गाठीशी नसले तरी या देशाची सत्ता आपण मिळवू शकतो. आणि तसेच झाले, त्यांनी संपुर्ण देशच बीओटी पद्धतीने काबीज केला. आज किती वेगळी परिस्थिती आहे?      ( क्रमश:)
भाग   ( ७ )    १/११/१२

२ टिप्पण्या: